गुरुवार, ३० जून, २०१६

मोबाईल आणि मुले

मागिल वर्षी मुलीच्या शाळेत पालकांसाठी लेखन स्पर्धा होती त्या निमित्ताने लिहीलेला हा लेख.
हॅलो, आनंदाची बातमी आहे, मुलगा/मुलगी झाला/झाली. हो हो व्यवस्थित आहे. आता ही माझ्याकडे फोन करताना कशी टुकू टुकू पाहतोय/पाहतेय." आजकाल नवीन जन्मलेल्या बाळाच्या नजरेसमोर येणार्‍या ह्या पहिल्या प्रसंगातूनच बाळे मोबाइलशी परिचित होत असतील नाही का? आपल्या आई-वडील आणि घरातील इतर सदस्यांबरोबर मोबाइलही आपल्या आयुष्यातील एक घटक आहे हे नक्कीच बाळांना जाणवत असणार.
अडगुलं मडगुलं किंवा ये ग गाई गोठ्यात च्या ऐवजी आजकाल डायरेक्ट मोबाइलवर
इट्स माय पमकीन टमकीन
हॅलो हनी बनी,
फिलिंग समथिंग समथिंग हॅलो हनी बनी
रिंगींग ट्रिंग रिंग रिंगींग हॅलो हनी बनी
टोको टोको टोको टोको
हे गाणं बाळाला ऐकवलं की ह्याच्या गोड धुनी मुळे बाळ हातपाय हालवून हसू लागत. अजून पुढे जाऊन जेव्हा मुलांना जाहिरातीचे अर्थ कळायला लागतात तेव्हा
आयडिया इंटरनेट जब लगाविंग
दुनिया को ना उल्लू बनाविंग
कैसे उल्लू बनावींग
अश्या जाहिराती लागल्या की मुलांची बोटे जाहिरातींची नक्कल करण्यासाठी वळायला लागतात. तर अशा छान छान आकर्षक गाण्यांच्या, झुझु वापरून केलेल्या गमतीशीर जाहिरातींपासून मुलांना मोबाईल वापरण्याने कसे फिलिंग येते, आपल्याला कोणी कसे उल्लू बनवू शकत नाही. कोणते अ‍ॅप्स कुठल्या मोबाइलमध्ये चांगले आहेत, मोबाईल वापरल्याने कशी "दुनिया करलो मुट्ठी मे" ह्याचे आकलन होऊ लागते. मला वाटत मोठ्यांपेक्षा आजकाल मुलेच आपल्या आई-वडिलांना कोणता मोबाईल कसा आहे हे पटवून देण्यात सक्षम ठरतात व मुलांनी पटवून दिलेल्या माहितीवरून त्या ब्रँडचा स्मार्टफोन घरात येतो.
साधा फोनही जेव्हा मागील काळात नवलाईची गोष्ट होती तिथे दोन वर्षाच्या मुलांनाही आता मोबाइलवरचे अ‍ॅप्स चालवता येतात ह्यात काही नवल राहिले नाही. जितके फायदे तितकेच तोटेही मोबाइलमुळे लहान मुलांच्या आयुष्यात घर करून बसले आहेत.
पूर्वी शाळेतून घरी आलो, दप्तर टाकलं की हातपाय धुऊन, खाऊ खाऊन कधी अंगणात खेळायला जातो असे व्हायचे. पण त्या अंगणाची किंवा मैदानाची जागा आता मोबाइलच स्क्रीनने घेतली आहे. ह्याचा वाईट परिणाम मुलांच्या मनावर व शरीरावर अप्रत्यक्षपणे होत आहे. मैदानी खेळ सुटल्याने मुलं शारीरिक व्यायामाला मुकत चालली आहेत. त्याचा परिणाम त्यांच्या स्वास्थ्यावर होत आहे. कोडी, बुद्धिबळ, नवाव्यापार, सापशिड्यांसारख्या मनोरंजक व बौद्धिक खेळांची जागा मोबाइलच डोक्याने (मेमरीने) चालणार्‍या गेमने घेतली आहे. त्याचा परिणाम मुलांच्या बुद्धीच्या विकासावर व कल्पकतेवर होऊन मुलांची चंचल वृत्ती वाढीस लागत आहे. गोष्टीची पुस्तके कालबाह्य ठरून मोबाइलवर कथा, वाचल्या पाहिल्या जातात त्यामुळे पुस्तकांचे ते सुगंधीस्पर्शी अनुभव मुकत चालले आहेत उलट मोबाइलच स्क्रीनमुळे डोळ्यांवर व रेंजेस मुळे शरीरावर घातक परिणाम होण्याची शक्यता वाढीस लागली आहे. पालक आपल्या मुलांना घरी एकटे असतात, व अडीअडचणीला इमर्जन्सी म्हणून मोबाईल घेऊन ठेवतात. असावा काळानुसार गरजाही बदलत असतात. पण त्यावर पण कंट्रोल ठेवला नाही तर ह्याचा योग्य उपयोग न होता मुले गेम्स, चाटिंग, क्लिपिंग पाहणे या सारख्या गोष्टींमध्ये स्वतःला पूर्ण झोकून देतात. नेट सर्चिंगमध्ये जशी कोणतीही चांगली माहिती क्षणात उपलब्ध असते तशी वाईट गोष्टींचीही भर असते. वयात आलेली मुले जर वाईट गोष्टींच्या आहारी गेली तर त्याचे किती विपरीत होतात हे आपण पाहतोच. घरात पालकच हल्ली स्मार्टफोन वरील फेसबुक व वॉट्स अ‍ॅप सारख्या सुविधांमुळे घरातील आपला मोलाचा वेळ ह्या अ‍ॅप्सवर खर्च करतात. त्यामुळे मुलांमध्ये आणि पालकांमध्ये संभाषण कमी होऊन अ‍ॅप्सवर जिव्हाळा अडकून पडला आहे. मोबाईल कंपन्यांने आता खरच दुनिया मुठ्ठी मे केली आहे.
काही दिवसांपूर्वी मुलीला घेऊन लहान मुलांच्या दवाखान्यात गेले होते. पूर्वी लहान मुलांच्या दवाखान्यात कायम दवाखान्याच्या इंजेक्शन, तपासणीच्या भितीने मुलांच्या रडण्याचा आवाज यायचा. आई-वडील हे चित्र, ते चित्र दाखवून मुलांना समजवून त्यांना गप्प करण्याच्या आटोकाट प्रयत्नात दिसायचे पण त्या दिवशी आई-वडील नंबर येण्याच्या प्रतीक्षेत होते तर लहान मुलाच्या हातात मोबाईल होते व लहान मुले बिझिनेसमॅनप्रमाणे त्या मोबाइलमध्ये गर्क होती. त्यांच्या भिती, चिंतेची जागा मोबाइलने गिळंकृत केली होती. हा बदल चांगला आहे की वाईट हे समजणे जरा अवघडच आहे.
काही गोष्टी मोबाइलमुळे खरंच खूप चांगल्या झाल्या आहेत. गूगल सारख्या माध्यमातून हवी ती माहिती आज एका सेकंदात उपलब्ध होऊ शकते. काही माहितीमध्ये तफावत असते ही बाब वेगळीच. बर्‍याच गोष्टींच्या ट्युटोरियल्स यू ट्यूब द्वारे मिळते. कुठेही अडीअडचणीला व्यक्तींशी कॉन्टॅक्ट करण्यासाठी मोबाईल हे उत्तम साधन आहे. लांबवर अगदी फॉरेनलाही असणार्‍या आपल्या जीवलगांबरोबर व्ही चाट सारख्या अ‍ॅप द्वारे सेकंदात दृष्टिभेट होते त्यामुळे अशा दूरच्या व्यक्तींमध्ये बरीचशी जवळीक साधता येते.
कुठलीही गोष्ट म्हणजे मोबाइलही मुलांसाठी वाईट आहे असे नाही. पण त्याचा योग्य उपयोग केला गेला पाहिजे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा