आमचा उरणचा कुंभारवाडा अजूनही झाडाझुडपांच्या सावलीत आहे ही एक सुखद गोष्ट आहे. आमच्या वाडीतील घराभोवतीही काही जुनी झाडे आहेत. त्यातच घराच्या बाजूलाच एक पुरातन आंब्याचे झाड आहे. आम्ही १२ वर्षापूर्वी इथे नवीनच राहायला आलो तेव्हा माझ्या सासर्यांनी त्या आंब्याच्या झाडाला एक मोठा पार बांधून घेतला.आता हा पार म्हणजे आमची एक जीवाभावाची वास्तूच झाली आहे. आम्ही जॉइंट फॅमिली असल्याने हा पार म्हणजे मोकळ्या हवेतील आमच्या कुटुंबाचे स्नेहसंमेलनाचे ठिकाण म्हणा किंवा आमचा कट्टा म्हणा. घरातील लहान मुलांसाठी हा पार म्हणजे जणू मामाचे गावच.
झाड पुरातन आणि मोठा असल्याने पारावर गार सावली पहुडलेली असते. सुट्टीत आमच्या घरातील बच्चे कंपनी ह्या पारावर अनेक खेळ खेळतात. आंब्याच्या फांदीला बांधलेल्या दोरीच्या झोपाळ्यावर माझ्या मुली श्रावणी आणि राधा मनमुराद झोके घेतात. दोघी लहान असताना त्यांना भरवण्याचा कार्यक्रम बर्याचदा ह्याच पारावर चिऊ काऊ दाखवत व्हायचा. पुतण्या अभिषेक फुटबॉल व क्रिकेट खेळताना पार बॉल अडवून खेळाचा आनंद लुटत असतो. मधून मधून संध्याकाळी आम्ही घरातील सर्व मंडळी पारावर एकत्र बसून चणे, शेंगदाणे, भेळ भेळीचा बेत करतो व खात गप्पा मारत बसतो तेव्हा तो पारही सगळ्यांना एकत्र भेटून सुखावतो. महिन्यातून एकदा तरी रविवारी आम्ही पारावर एकत्र जेवायला बसतो. ह्या वनभोजन आणि सहभोजनामुळे जेवणाला वेगळाच आनंद व रुचकरपणा येतो.

घरात काही मोठे कार्यक्रम म्हणजे लग्न, बारशांसारखे असले किंवा मोठ्या प्रमाणात पाहुणे आले की ह्या पाराचा आम्हाला मोठा आधार असतो. मोठ्या प्रमाणात बाहेर बनणार्या जेवणाची तयारी ह्या पारावरच चालू असते. जेवण तयार झालं की सगळं जेवण पारावरच ठेवून पाराच्या समोरच्या भागात टेबल खुर्च्यांच्या पंगती मांडल्या जातात.
आमच्या गैरहजेरीत पारावर पशू पक्षी बागडत असतात. ह्याच आंब्याच्या झाडावर अनेक ढोली आहेत ज्यात ह्या साळुंख्याची कुटुंब राहतात. त्यामुळे त्यांचे संवाद त्यांची भांडण, त्यांचा लाडिकपण सगळाच ह्या पारावर चालू असतो. इतर अनेक पक्षांची हजेरी पारावर लागत असते.
असा हा आमचा जिव्हाळ्याचा पार सगळ्यांना गुण्या गोविंद्याने नांदवून घेणारा, कधी कंटाळा आला, मूड नसला, थकवा जाणवत असला की ह्या पारावर शांत जाऊन बसलं की ह्या पाराच्या सहवासात तो थकवा दूर पळून जातो. नवीन उत्साह निर्माण होतो.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा