मंगळवार, २८ जून, २०१६

प्राजक्त फुलला दारी

प्राजक्ताचे नाव काढताच डोळ्यासमोर येतो तो प्राजक्ताचा सडा त्याचा मंद
सुगंध. प्राजक्ताच्या फुलाच रुपडंही अगदी सुंदर, केशरी रंगाचे देठ ह्याचे
खास आकर्षण. प्राजक्त साधारण जुलै, ऑगस्टमध्ये बहरून येतो. असेच एक
प्राजक्ताचे झाड लहानपणी माझ्या माहेरी उरण्-नागाव (मांडळ आळी) येथील माझ्या माहेरच्या अंगणात होते. पावसाला सुरुवात झाली की काही दिवसांतच हा प्राजक्त बहरून यायचा. सकाळी छोट्या
असणार्‍या कळ्या संध्याकाळी टपोर्‍या झालेल्या पाहताना उत्सुकतेने डोळेही आपोआप टपोरे व्हायचे.

ह्या टपोर्‍या कळ्या अंधारातच गुपचुप फुलायच्या आणि सकाळी थेट
अंगणात त्यांचा सडा पडलेला दिसायचा. ओल्या जमिनीवर मंद सुगंध दरवळणारी ती केशरी-पांढरी फुले
पाहून मन उल्हसित व्हायच. मग परडी भरून ही फुले गोळा करायची.
ही गोळा करता करता अजून एक छंद असायचा म्हणजे झाड हालवून प्राजक्ताच्या फुलांचा
पाऊस अंगावर घ्यायचा. त्या कधी दवाने तर कधी पावसाने भिजलेल्या फुलांचा
मऊ, गार स्पर्श मायेचा पाझर घालायचा. ह्या प्राजक्ताच्या फुलांच्या
पावसातील आनंद म्हणजे टप टप टप टप पडती प्राजक्ताची फुले ह्या
बालगीताच्या ओळी सार्थकी लावायच्या.
प्रत्येक सीझनला प्राजक्ताची फुले यायला लागली की आवर्जून प्राजक्ताचे
हार बनवून ते देवांच्या तसबिरींना घालायचे. बर हार बनवायचे ते पण
वेगवेगळ्या पद्धतीने. एका लाइनमध्ये सगळी फुले, एक पाकळ्याना पाकळ्या व
देठांना देठ चिकटवून म्हणजे कमळासारखा आकार येतो दोन फुलांचा मिळून तर एक
कष्टाचा प्रकार होता तो म्हणजे देठ काढून नुसत्या फुलांचा हार. हा हार
अगदी भरगच्च व गुबगुबीत दिसे. पूजेसाठी हार घालून झाले की उरलेल्या
फुलांची ओटीवर रांगोळी काढायची. हे झाले माझे बालपणाचे दिवस.
लग्न झाले आणि उरण - कुंभारवाडा येथे सासरी आले. माझ्या सासर्‍यांनी नवीनच जागा घेतली होती. त्या जागेत एक छोटं प्राजक्ताच कलम लावल होत. अगदी अंगणातच. २-३ वर्षातच ते मोठ्ठ होऊन त्याचा सडा पडायला लागला. आता तर झाड मोठे होउन अंगणात सड्याची रांगोळी काढून घराची शोभा वाढवत आहे. विविध पक्षी, फुलपाखरे ह्या झाडावर आनंदाने बागडत गुंजन करतात.
ह्या प्राजक्ताच माझ्याशी इतक दृढ नात आहे की लग्नानंतर जागृती ह्या नावाचे पतीने आपल्या पराग ह्या नावाला साजेसे प्राजक्ता नाव ठेवले. माझ्या राधा आणि श्रावणी ह्या दोन मुलींना प्राजक्ताची फुले ही आपल्या आईसाठी लावलेली म्हणून त्यांचे नाव प्राजक्त असे वाटायचे.
हा प्राजक्त पाहताना परत मला माझे बालपणीचे दिवस आठवतात. आता ह्या सड्याचा आनंद उपभोगावासा वाटतो, पण बालपणाचा निखळ काळ संपुष्टात येऊन नोकरी-कौटुंबीक जबाबदार्‍यांनी त्यावर विजय मिळवला आहे. पण मनाने मी प्राजक्तामध्ये गुंतलेलीच आहे. त्याचा सहवास लाभावा म्हणून सकाळी मी चहा घेऊन अंगणातल्या लादीच्या कडेला बसते. कपातला चहा संपेपर्यंत हिरव्यागार गवतावर पांढरा-केशरी प्राजक्ताचा
सडा आणि त्याचा मंद सुगंध अनुभवते. ही अनुभवलेली पाच मिनिटे माझ्यासाठी
दिवसभराचा उत्साह निर्माण करतात.
आता बालपणी एवढा रांगोळी वगैरे काढण्यापर्यंत वेळ नसतो. पण प्राजक्ताची
फुले पाहिली की राहवत नाही. मग सुट्टीच्या दिवशी परडी भरून फुल गोळा करते
आणि सासूबाईंना त्याचे हार बनवून देते वेळ असेल तर स्वतःही घालते. रात्री
शतपावली करताना नवीन उमलणाऱ्या फुलांचा पुन्हा सुगंध भरभरून घेते. त्याने
रात्रही अगदी सुगंधी होऊन जाते.
ह्या फुलांच आणि माझं नातही अस आहे की माझं लग्न झाल आणि माझ्या
मिस्टरांनी त्यांच्या पराग ह्या नावाला मिळत जुळत म्हणून माझ नावही
प्राजक्ताच ठेवल. आमच एकत्र कुटुंब आहे. माझ्या जाऊबाई रोज ही फुले
देवपूजेसाठी गोळा करतात. माझी मोठी मुलगी श्रावणी २ वर्षांची असताना एक दिवस
लवकर उठली होती आणि तिने पाहील की तिची काकी फुल गोळा करतेय. तेंव्हा ती तिच्या बालबुद्धिने
म्हणाली काकी ती ना माझ्या आईची फुले आहेत. एक क्षण
मला काही कळले नाही. नंतर आम्हा सगळ्यांना समजल की आम्ही रोज
प्राजक्ताची फुल म्हणून उल्लेख करतो त्याचा अर्थ माझ्या मुलीने माझीच
फुले असा घेतला होता. दुसर्‍या मुलीच्या म्ह्णजे राधाच्या बाबतीतही असाच किस्सा घडला. एकदा तिला मी खेळवताना दाखवत होते ही बघ प्राजक्ताची फुले तर लगेच म्हणाली मग राधाची कुठे आहेत?
असा हा माझ्या अंगणात बहरणारा प्राजक्त. ह्याचे नि माझे मला काही
ऋणानुबंध आहेत अस वाटत. हे माझे प्राजक्ताच्या फुलांवरचे प्रेम म्हणून का
कोण जाणे पण जरी फुलांचा बहर ओसरला, त्यांचा हंगाम गेला तरी अगदी
उन्हाळ्यातही ७-८ तरी फुलांचा सडा आमची मैत्री निभावण्यासाठी, माझे मन
प्रसन्न करण्यासाठी अंगणात पडतो.





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा