गुरुवार, ३० जून, २०१६

श्वानहिरो

नाव डॅनी असलं तरी हा चित्रपटातील कॅरॅक्टर नसून आमच्या घरातील श्वानहिरो आहे. खास पुतण्या अभिषेकच्या आग्रहास्तव माझ्या मिस्टरांनी एका काळ्या कुळकुळीत आणि कुक्कुल्या ग्रेटडेन नामक जातीच्या कुत्र्याच्या पिलाला आमच्या घरी आणल. ग्रेट्डेन जातीचे कुत्रे धिप्पाड, उंच असतात. असेच वेगळेपण ह्यांच्या पिलांमध्येही असते. इतर गावठी कुत्र्यांच्या पिल्लापेक्षा उंच, काळा कुळकुळीत चकमकता रंग तसेच पट्टा लावल्याने पावडर-तीट लावलेल्या बाळाप्रमाणे दिसणारा डॅनी घरातील सगळ्यांचाच कुतूहलाचा विषय झाला होता.
नवोदित श्वानपिलाचे कोड कौतुक जोरात चालू होते. वापरात असणार्‍या चादरी जुन्या मानून त्याच्या अंथरूण पांघरुणाची अभिषेकने सोय केली. थंडी लागत असेल म्हणून स्वतःचे जुने टीशर्टही ह्या हीरोला घातले. घरातल्या दुधात १ लीटरची वाढ केल्याने दूधवाल्याच्या धंद्यातही वाढ झाली. लहान बाळासाठी जसे सॅरेलॅक, बेबी सोप वगैरे आणतात तसे डॅनी साठी डॉग फूड, डॉग सोप, पावडर, अशा वस्तूंनी डॅनीचे बालपण सुसज्ज झाले. काही दिवसांनी माझ्या मिस्टरांनी डॅनीसाठी एक ग्रिलचा पिंजरा तयार करून आणला. त्याची स्पेशल रूमच म्हणा ना. त्यातच रात्री आम्ही डॅनीला निश्चिंतपणासाठी ठेवू लागलो तर आमच्या रात्री त्याच्या भुंकण्यामुळे चिंताग्रस्त जागू लागल्या. आता रात्री मात्र त्याचे डॅनी हे नाव विसरून "काय कुत्रा आहे, धड झोपू देत नाही" असे संवाद आम्हा घरातल्यांमध्ये होऊ लागले. माझे दीर म्हणजे अभिषेकचे वडील आणि अभिषेक अश्या वेळी मध्येच उठून त्याला पिंजर्‍यातून आणून घरातील हॉलमध्ये ठेवत. सकाळ झाली की पुन्हा आम्हा घरातल्यांच्या संवादात "रात्री बिचार्‍याला मच्छर चावत असतील" असा बदल घडत असे.
डास निवारण कार्यक्रमा अंतर्गत कछुआ छाप अगरबत्तीची धूर काढून काढून राख जमा झाली पण डॅनीचे रात्रीचे भुंकणे काही कमी झाले नाही. त्यानंतर आम्हाला कळले की डॅनीला डासांची फिकीर नाही तर आमच्या घराशिवाय करमत नाही. थोडे दिवस ठेवून बाहेरची सवय लावू म्हणून रात्री आम्ही त्याला हॉलमध्ये ठेवू लागलो. त्याची शी-सू घरात होऊ नये म्हणून दिरांना, मिस्टरांना रात्री मधून मधून उठून बाहेरून क्रिया कर्म उरकून आणावे लागत असे. त्यातही एखादं दिवस लागली झोप की वर्तमान पत्र पसरायची वेळ यायचीच. आता तर "हाकलून द्या त्याला घरा बाहेर, सोडून द्या कुठेतरी नेऊन" असे संवाद सगळ्यांच्याच विशेषतः साफ करणार्‍याच्या तोंडी मोठ्या मोठ्याने आणि तावातावानेच यायचे. मग डॅनीचा रात्रीचा मुक्काम हळू हळू घरातील हॉल पासून ओटीपर्यंत आणला त्यामुळे पुन्हा तो आता आपली नित्य क्रियाकर्मे स्वतःच बाहेर उरकून येतो. स्वावलंबी झाला म्हणा ना आता.
आता पर्सनली डॅनी विषयी बोलाल तर डॅनी हा अगदी मनमिळाऊ, प्रेमळ आहे. पण हट्टीही तितकाच आहे. जे पाहिजे तेच करणार. दिवसभर ह्याला बांधून ठेवले तर ह्याच्या ओरडण्याने आम्ही कर्णबधिर होण्याची शक्यता असा ह्याचा दांडगा आवाज. बंधन म्हणून अजिबात नको पठ्ठ्याला. सुटा ठेवला की आजूबाजूची गावकरी कुत्रे मंडळी ह्याच्यावर भाळलेली दिसायची आणि हा त्यांच्यावर दुप्पट भाळलेला. अरे नको जाऊ त्या भटक्या कुत्र्यांबरोबर त्यांची संगत चांगली नाही कितीवेळा त्याच्यावर असे शिस्त लावण्याचे प्रयत्न केले पण सगळे व्यर्थ. भरपूर मित्र-मैत्रिणी आहेत, मैत्रिणी जास्तच त्यात. काहींना तर आमच्या कुंपणात पण बिनधास्त वावरायला ह्याची पर्मिशन. आम्ही त्यांना सुरुवातीला खूप हाकलवून लावायचो पण डॅनी च्या प्रति असलेल्या प्रेमापोटी ते आमच्याकडे दुर्लक्ष करून पुन्हा यायचे. शेवटी आम्ही थकलो आणि ते ३-४ कुत्र्यांच सैन्य आता डॅनीच्या जीवावर आमच्या ओटीपर्यंत येऊन बसतात. बर ह्याच प्रेमही त्या कुत्र्यांवर इतकं की स्वतःच्या जेवणातील काही भाग त्या कुत्र्यांसाठी तो ठेवून देत असे. ही पण एक कुतूहलाची गोष्ट होती. आता आम्हीच त्या कुत्र्यांना वेगळे जेवण घालतो त्यामुळे आता बिनधास्त स्वतःचे जेवण खातो. आयजीच्या जीवावर बायजी उधार अजून काय? डॅनी तसा व्यवहारातही हुशार बर का. हल्ली असे वाटते की डॅनी ने घरच्या रक्षणाचे ह्या बाहेर बसणार्‍या कुत्र्यांना कॉन्ट्रॅक्टच दिले आहे. गेटवर कोणाचा आवाज आला की आधी बाहेरचे कुत्रे भुंकतात मग डॅनीशेठ कॉन्ट्रॅक्टर बाकीचे निस्तरायला बाहेर येतात. खाण्याच्या बाबतीत म्हणाल तर खाईन तर तुपाशी नाहीतर उपाशी असा नवाबी थाट. नाश्ता दूध-पोहे, बटर वगैरे आणि जेवणात उकडलेले चिकन असेल तरच खाणार. डॅनी अंघोळीच्या बाबतीत एकदम आळशी. अंघोळीसाठी पाइप लावला की ह्याची धावाधाव चालू होते. मग अभिषेक कसातरी मनवून त्याची अंघोळ घालतो. डॉ. कडून इंजेक्शन घेतानापण हेच प्रकार. जेव्हा ह्याचे प्रेमप्रकरण चालू होते एखाद्या कुत्रीशी तेव्हा दोन्-दोन दिवस न खाता-पिता उपाशी राहतो. अजब प्रेमरोगी आहे.
डॅनीच्या काही वागण्याच्या प्रसंगातून मात्र त्याच्या ह्या कनवाळू मनाची साक्ष दिली. आणून वर्षभराचा झाला असेल तेव्हा सकाळी पाहिल्यावर एका छोट्या कुत्र्याला हा रात्रभर आपल्या अंथरुणात जवळ घेऊन झोपलेला दिसायचा. सुरुवातीला माझ्या जाऊबाईंनी ह्याला घाईघाईत खायला दिले आणि तसेच निघून गेल्या की हा खातच नसे. का खात नाही कळत नसे. मग त्याच्या तोंडा जवळ भांडे नेऊन त्याला थोडे कुरवाळून सांगितले खा रे की हा लगेच मिटक्या मारत खायचा. त्याला प्रेमाची भूक पोटच्या भुकेपेक्षा जास्त आहे.
डॅनी घरातील माणसांवरही जीवापाड प्रेम करतो. घरातील कोणी आल की आधी त्याच्या जवळ जाणार, आमच्यापैकी कोणी २-३ दिवस बाहेरगावी जाऊन आले की गेटमधून आत शिरताच हा प्रेमाने अंगावर उड्या मारायला लागतो. तसा मला नोकरीमुळे डॅनीसाठी सकाळचे दूध तापवणे आणि रात्रीचा त्याच्यासाठी भाताची सोय करणे ह्या पलीकडे जास्त काही करण्याचा योग येत नाही. पण जेव्हा जाऊबाई किंवा दीर बाहेर जातात तेव्हा त्याच्या खाण्या-पिण्याची सोय मी किंवा माझे मिस्टर करतात. पण ह्याचीही त्याला पूर्ण जाणीव आहे. माझी मुलगी ३ महिन्यांची होती. घरात नणंदेच लग्न ठरलेल. एका महत्त्वाच्या कामासाठी मला नणंदेबरोबर थोड्या वेळासाठी बाहेर जावं लागल होत. त्या वेळेत नेमकी माझी मुलगी उठली आणि पाळण्यात खूप रडू लागली. घरातील सगळेच मी येण्याच्या दिशेने वाट पाहतच होते पण हा डॅनी सारखा पाळण्यात येऊन पाहायचा आणि गेटजवळ येऊन मी आले का ते पाहायचा. अशा त्याच्या खूप चकरा झाल्या. शेवटी मी गेटवर आले तेव्हा धावत जवळ येऊन जणू मला सांगू लागला की "अग तुझ बाळ रडतंय कशाला गेलीस तिला टाकून?" त्या क्षणी आम्ही सगळेच डॅनीच्या वागण्याने भारावलो. असे बरेच भारावण्यासारखे प्रसंग डॅनीच्या वागण्यात येतात.
पण हे सगळे प्रेम घरातल्या आणि ओळखींच्या माणसांसाठीच बर का. बिनओळखीच्या माणसांशी ह्याची कायम दुश्मनी. गेटची कडी जरी वाजली तरी गुरगूर चालू होते बसल्या जागी. कोणी येणार असले की आम्ही आधीच ह्याला साखळीने बांधून ठेवतो पण "कुत्र्यापासून सावधान" च्या पाटीवर दुर्लक्ष करून गेटची कडी न वाजवताच कोणी डायरेक्ट आल की डॅनीची त्याच्या दिशेने धावत गेलाच समजा. मग त्याला आवरताना नाकी नऊ येतात.
अभिषेकसाठी तर डॅनी म्हणजे जीवलग मित्र. अभिषेक ९ वीत असताना डॅनीला आणला म्हणून अभिषेकची आई नाराज होती. पण डॅनीने तिच्या नाराजीवर प्रेमाने मात केली. डॅनीच्या डोळ्यासमोर अभिषेक शाळेतून आता कॉलेज विश्वात गेला पण डॅनीसोबत खेळल्याशिवाय, त्याची चौकशी केल्याशिवाय अभिषेकला करमत नाही इतका लळा आहे त्याला डॅनीचा. माझ्या मुली राधा-श्रावणी ह्यांच्याही तोंडी डॅनीचे सतत नामघोष चालू असतात. सासूबाईंच्या तोंडीही दिवसभर घरच्याच सदस्याप्रमाणे डॅनीची विचारपूस चालू असते. डॅनी ९ सप्टेंबरला आमच्या घरी आला म्हणून अभिषेक त्याचा वाढदिवस त्या दिवशी त्याला न्हाऊ-माखू घालून साजरा करतो. प्रत्येक सणाला ह्या आमच्या घरच्या सदस्याला घरात असलेले गोड-धोड थोडे तरी देतोच. लहानपणी कुत्र्यावर निबंध लिहिलेले आठवतात की कुत्रा हा पाळीव प्राणी आहे, तो घराची राखण करतो. पण आता उमगत की त्यापलीकडे त्याला भावना, प्रेम, वेळप्रसंगी कठोरता, लळा, आपुलकी ह्यांचीही जोड आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा