आम्ही नवीन घरात राहायला येऊन पाच वर्ष झाली. ह्या घरात आलो तेव्हा आम्ही घराच्या सजावटीसाठी विविध वस्तू घेतल्या. जसे सोफा, बेड, फ्रेम्स, टिव्ही ट्रॉली, लॅम्स, झुंबर. त्यातील माझ्या आवडीचे म्हणजे झुंबर. थोडा वेगळा आणि आकर्षक म्हणून मला आणि माझ्या मिस्टरांना बाउल्सच्या आकाराचा झुंबर आवडला. ह्यात रिंग्ज मध्ये खोलगट काचेचे डिझाइन्स वाले बाउल्स बसवलेले आहेत. अगदी आवडीने आम्ही ते झुंबर लावल. कोणी पाहुणे येणार असतील किंवा घरात एखादा कार्यक्रम असेल तर आवर्जून आम्ही ह्या झुंबराची लाइट चालू करायचो. सगळ्यांना हया झुंबराच आकर्षण वाटायच. जेवढ सुंदर आहे तेवढच हे झुंबर नाजुक पण आहे. हे साफ करताना कसरतच करावी लागते. उंच स्टूलवर चढून ह्यातील बाउल्स अलगद काढून धुऊन पुसून ठेवावे लागतात. धुतल्यावर अजून आकर्षक दिसतात.
पण गेल्या तीन-चार वर्षांपासून एक बुलबुल आमच्या ह्या घरावर मालकी हक्क दाखवत असल्याने आम्हाला ह्या झुंबराचा वापर कमी करायला मिळतो. आमच्या आजुबाजुच्या परिसरात भरपूर झाडे आहेत. त्या झाडांवर ढोलीपण केलेल्या आहेत पक्षांनी.
ह्या ढोलींत फक्त साळुंखी पक्षांचे अस्तित्व दिसते. ह्याचे कारण कदाचित परिसरात फिरणारे साप असतील. हे साप ढोलीत जाऊन पण पक्षांची अंडी खातात. त्यामुळे ह्या ढोलींवर फक्त साळुंख्या आपला हक्क गाजवतात. ह्या साळुंख्या सापा पासून नेहमी सावध असतात आपल्या ढोलीतील पिल्ले किंवा अंडी सापाने खाउ नयेत म्हणून. साप दिसले की त्यांना टोचायला त्यांच्या मागे कर्कश्य आवाज करत पाठलाग करतात. त्यांच्या सोबतीला एखादा कावळाही असतो कर्कश्य आवाज करत. ह्या मैना पक्ष्यांचा आणि कावळ्यांचा एकत्र कर्कश्य आवाज आला आणि बाहेर जाऊन बघितले की हमखास तिथून साप जाताना दिसतो. पण बुलबुल पक्षी हे घाबरट असतात. ते कधी असे सापाच्या मागे धावताना दिसत नाहीत. उलट जराशी जरी कसली चाहूल लागली की पळून जाताना दिसतात. त्यामुळे कदाचित ह्या बुलबुल पक्षाने आमच्या हॉलमधील झुंबर आपले माहेरघर किंवा सुरक्षित नर्सिंग होम म्हणून मानले असेल. कदाचित तिला ह्या घरट्यात राहताना शिश महालात राहिल्यासारखंही वाटत असेल असही मला वाटत असत.
वर्षातून दोन ते तीन वेळा ह्या बुलबुलची डिलिव्हरी आमच्या झुंबरात होते. आता ही एकच बुलबुल आहे की परंपरेनुसार तिची पिल्ले मोठी होऊन आमच्या झुंबरात आपली डिलिव्हरी करून घेतात हे संशोधन करणे कठीण आहे. कारण सगळेच बुलबुल सारखे दिसतात. त्यांचा डोळ्यांखालील आणि शेपटा खालील लाल भडक रंग त्यांच्या सौंदर्यात भर पाडतो.
इतर दिवशी हे बुलबुल आमच्या चिकू पेरूच्या झाडावर हिंडताना दिसतात. वायरवर कधी कधी झोके घेताना पण दिसतात. पण त्यातील बुलबुलला आपल्या आईपणाची चाहूल लागली की तिचे पाय आमच्या झुंबराकडे वळतात. मग ही बुलबुत आपल्या छोट्याश्या चोचीत गवताच्या काड्या, पान, कापूस घेऊन येताना दिसते. आम्ही झुंबर साफ करायला घ्यायच्या आत तिचे घरटे ती तयार करते. जर कधी अर्धवट घरटे आम्ही काढून टाकले तरी ती तिची जिद्द सोडत नाही. ती आपले कार्य चालूच ठेवते. झुंबरातील गवत काढून आम्ही मोठी माणसं थकतो. पण त्या इवल्याश्या चोचीत आपल घरटं साकारण्याच स्वप्न पाहात असलेली बुलबुल हार मानत नाही. अखेर ती आपल छोटस घरट तयार करते आणि त्यात अंडी घालते.
एकदा का हिने अंडी घातली की हा झुंबर आमचा राहत नाही. फक्त पोटापाण्याची सोय करण्यापुरती ही बुलबुल बाहेर जाते. बाकी दिवस रात्र ती आपल्या झुंबराच्या घरट्यात राहते. त्या काळातही ती आपल्या चोचीत काही ना काही आणत असते. कदाचित आपली दिवस रात्रीची शिदोरी जमा करत असेल किंवा डिलिव्हरीनंतरची पूर्वतयारी करत असेल. आता ही बुलबुल आमच्याकडे डिलिव्हरीला आल्याने आम्हालाही तिची काळजी घ्यावी लागते. त्यामुळे आम्हाला काही छोट्या गोष्टींचा त्याग करावा लागतो. हे बुलबुल घरात बसले की आम्हाला झुंबराच्या बाजूला असलेले दोन्ही पंखे लावता येत नाहीत, नाहीतर ही बुलबुल अचानक कधीतरी बाहेर जायला निघते आणि पंख्याला धडक मारून आपल्या पंखांना इजा करून घेते.
कधी कधी शिटही लादीवर टाकून जाते. तेव्हा मात्र खूप राग येतो तिचा आणि कधी एकदाची डिलिव्हरी करून जाते अस होत.
एकदा का हिने अंडी घातली की दीड महिना तरी आम्हाला झुंबराचे दिवे लावता येत नाहीत. मग तेव्हा कोणतेही समारंभ असूदे. घराला टाळ लावून जाताना हिच्यासाठी स्लायडींग उघडी ठेवावी लागते म्हणजे ती बाहेर जाऊन आपले पोट भरून यावी म्हणून.
जर आम्हाला माहीत असते की ही काय खाते, हिला कसले डोहाळे लागले आहेत तर कदाचित तेही तिला आणून दिल असत म्हणजे तिला तेही कष्ट नसते पडले. आम्ही एकत्र कुटुंबात राहत असुनही कोणी बोलत नाही हाकलवत नाही म्हणून हिचा संचार आमच्या घरभर चालू असतो. खूप लाडावली जाते ह्या दिवसांत ती.
जवळ जवळ एक महिना होत आला की आनंदाची कुजबुज झुंबराखाली ऐकण्यासाठी आम्ही सगळे उत्सुक होतो. मग अचानक एक दिवस झुंबराखाली पिल्लांची चुचू सुरू होते. मग टेबल, खुर्च्या, स्टूलवर चढून आम्ही झुंबरात डोकावू लागतो. पण बाउल खोलगट असल्याने ही पिल्ले दिसत नाहीत. जेव्हा माता बुलबुल तिच्या पिल्लांना आपल्या चोचीने त्यांच्या चोचीत भरवत असते तेव्हा फक्त पिल्लांची चोच दिसते. अगदी घोडा स्टूल घेऊन कॅमेऱ्याने फोटो काढून ह्या पक्षांना झुंबराच्या बाउल मध्ये पाहता येत.
बघत असताना अगदी जवळ गेलो तरी आई झालेली बुलबुल आमच्या अंगावर येत नाही. कारण तिने आमच्यावर माहेरच्या माणसांसारखा विश्वास ठेवलेला असतो. तिच्या कडे बघताना अस वाटत की ती आम्हाला आनंदात सहभागी करून घेत आहे.
साधारण दहा दिवस झाले की अचानक कधीतरी ही पिल्ले खाली उतरलेली दिसतात. ही पडली की काय अशी भीतीही तेव्हा मनात येते. पण भरारी मारण्याचे हे त्यांचे पाहिले पाऊल असते.
पिलेही अगदी आमच्याघरात बिनधास्त फिरत असतात. ह्यावेळेस तर माझ्या मुलीच्या दप्तरावर बसुन शाळेत जाण्याचा हट्ट करत होता.
पण माता बुलबुल अजुन तुम्ही लहान आहात समजाउन आपल्या बाळांना बाहेरच्या जगाची दिशा दाखवते. आणि बाळांना दिशा दाखवता दाखवता ती पण आमच्या घरची दिशा विसरते.
ती आणि पिल्ले येण्याची आम्ही थोडे दिवस वाट बघतो. पण ती कदाचित आपल्या बाळांना स्वावलंबी बनवण्यासाठी गर्क असेल. ती येण्याची बंद होते त्या दिवसांत आम्हाला चुकल्या चुकल्या सारखं वाटत. सवयीने कधी कधी आम्ही गरम होत असेल तरी फॅन लावत नाही. सण असेल तरी झुंबर लावत नाही. मग हळू हळू ती आता येतच नाही हे लक्षात येत. मग आम्ही झुंबर साफ करायला घेतो. झुंबर साफ करताना तिने विणलेले घरटे ती आमच्या उपयोगी पडेल म्हणून कदाचित आम्हाला ठेवून जात असेल.
पण आम्हाला वाटत की बाहेर एखाद्या झाडावर हे घरटं ठेवलं तर ही बुलबुल किंवा तिची पिल्ल परत त्या घरट्यात येऊन बसतील. म्हणून आम्ही ते घरटं घराच्या बाहेर एखाद्या झाडावर ठेवतो. पण नंतर त्यात ती बुलबुल किंवा तिची बाळ फिरकतही नाहीत. मग अचानक काही महिन्यांनी बुलबुल परत आपले बाळंतपण करण्यासाठी तिच्या माहेरी म्हणजे आमच्या झुंबरावर येते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा