मंगळवार, २८ जून, २०१६

बकुळीच्या झाडाखाली फुले वेचुया

भले मोठे ऐटीत मिरवणारे बकुळीचे झाड आणि त्याला लागणारी नाजूकशी फुले म्हणजे जणूकाही एक एक नक्षीदार कुडीच.
नुसती रुपानेच नाही तर सुगंधानेही गर्भश्रीमंत अशी बकुळीची फुले संध्यासमयी हिमवर्षावाप्रमाणे झाडाखाली सुगंधी सडा घालत असतात.बकुळीचा वर्षाव अनुभवणे म्हणजे रसिकांना सुखद अनुभव असतो. तो मी मे महीन्यात अगदी वेळ काढून घेतला.
आमच्या घरापासून १५ मिनीटांच्या अंतरावे एक मठ आहे. त्या मठीच्या आवारात २-३ बकुळीची झाडे माझ्या लहानपणापासुन पाहते. मागिल मे महिन्यात लेकीला सुट्टी पडल्या पडल्या ही फुले वेचायला जायचा चंग मनाशी बांधला. ह्या फुलांचा सडा प्राजक्ताप्रमाणे सकाळीच पडत असावा असा माझा भ्रम होता म्हणून एक दिवस लवकरच उठून आम्ही सहपरीवार बकुळीच्या झाडाखाली गेलो. पण तिथे तेंव्हा अगदी ४-५ फुले पडलेली सापडली. झाडावर पाहीले तर झाड फुला, कळ्यांनी गच्च भरले होते.
तिथल्याच एका माणसाला विचारले असता त्याच्याकडून संध्याकाळी ही फुले पडतात असे समजले. मग आम्ही संध्याकाळी ही फुले वेचण्यासाठी गेलो तर नुकतीच सडा पडायला सुरुवात झाली होती. माझी मुलगी बालपणीचा फुले बकुळीची फुले वेचण्याचा पहिला अनुभव घेत होती तर मी मोठेपणी लहान होऊन हा अनुभव घेत होते आणि माझे मिस्टर आमच्या दोघींच्या आनंदात सामिल झाले. वेचता वेचता जमलेल्या ओंजळभर फुलांचा वास घेताना मन धुंद होऊन गेल. बकुळीच्या झाडाखाली फुले वेचुया अशा काहीतरी गाण्याच्या ओळी मनामध्ये आपोआप गुणगुणल्या जात होत्या.
पिक्चमध्य स्लोमोशन दिसते तशी बकुळीची फुले हळूवार येउन खाली पडत होती. एक फुल वेचल की बाजुला दुसर येऊन पडायच. आमच्या दोघींची घाई झाली होती फुले वेचण्याची. फुले वेचून आम्ही एका रुमालात ठेवली. १५-२० मिनीटे आम्ही ह्या सुगंधी पुष्पवृष्टीचा आनंद घेत होतो.
ती रुमालभर फुले घेउन आम्ही घरी आलो. घरी गेल्या गेल्या पहिला एका पानावर ती फुले ठेऊन फोटो काढले.
नंतर त्याचे गजरे करायला घेतले. बकुळीचा गजरा करणे म्हणजे अतिशय सोप्पे काम. एखाद्या नारळाच्या, ताडाच्या पातीचा धागा काढून किंवा बिनपानांचे जे वेल असतात अमरवेल सारखे त्यात बकूळीची फुले बिनासुईने ओवली जातात. कारण ह्या फुलाला आधीच होल असते. कदाचीत ह्या कारणामुळेच बकुळीला दुसरे नाव ओवळी असे पडले असावे. दोर्‍यात गुंफतानाच सुईची गरज भासते पटापट ओवण्यासाठी.
हा गजरा केसात माळल्यावर १-२ दिवस ह्याचा सुगंध केसात दरवळत असतो. कालांतराने ही फुले बदामी, बदामी वरून चॉकलेटी रंगाची होऊ लागतात पण बकुळीच्या सुगंधात मात्र काही कमतरता येत नाही. ह्या फुलांची अजुन एक गंमत म्हणजे ही फुले मावळली तरी पाण्यात टाकल्यावर पुन्हा उमलतात. पुर्वी वह्या-पुस्तकांच्या पानांमध्ये ही फुले ठेवण्याचा माझा छंद होता. ही फुले असलेल्या पुस्तकाची पाने उघडल्यावर त्यातुन सुगंध दरवळत असे.
बकुळीपासुन सुगंधी साबण, अत्तर तयार करतात. बकुळीच्या सालीचा उपयोग आयुर्वेदात दातांच्या उपचारासाठी करतात. बकुळीला फळे धरतात.
बकुळीच्या झाडाखाली कृष्ण बासरी वाजवून गौळणींना आकर्षीत करत असे असा महाभारतात बकुळीच्या झाडाचा उल्लेख आहे. म्हणजे ह्या बकुळीसोबर प्रेमभावनाही जुळलेल्या आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा