वळणदार सोंड, मोठाले सुपासारखे कान, बोलके आणि हसरे डोळे, चार हात आणि त्या हातात असणार्या वस्तू, मुकुट, पितांबराचा आकर्षक रंग, पुढ्यात बसलेले पिटुकले उंदीरमामा, कलाकुसर केलेली मखर अशा वैविध्यतेमुळे अगदी बालपणापासूनच बाप्पा आवडीचे. तशी काही माझी चित्रकला छान नव्हती पण चित्र काढायची समज आली तेव्हा बाप्पाचे खूप वेळा चित्र रेखाटले असेल. मला त्याची वेगवेगळी रूपं काढायला आवडायची. विशेष भर दिला जायचा कान, सोंड आणि मुकूटावर. गणपतीच्या दिवसांत येणार्या अंकातील, वर्तमान पत्रातील गणपतीचे फोटो पाहून तसे चित्र काढण्याचे प्रयत्न करायचे. मला वाटतं माझ्यासारखे बालपणी सगळ्यांनाच असे वाटत असावे.
माझ्या चुलत काकांच्या घरी आमच्या कुटूंबातील गणपती असल्यामुळे आमच्या घरी कधी गणपती बसवला नाही. त्यांच्याकडे राहण्याची सोय नसल्याने आम्ही बाप्पाचे दर्शन घेऊन परत येत असू. मला खूप वाटायचे की आपल्या घरी पण गणपती बाप्पाची स्थापना करावी. मी दर वर्षी आई-वडिलांकडे हट्ट करायचे की आपल्या घरी गणपती मांडूया. मग माझी समजूत घालण्यासाठी माझे वडील आमच्या हॉलमध्ये टेबल मांडून त्यावर घरातील गणपतीची तसबीर काढून लावायचे. बाप्पा समोर फळं, मिठाई मांडून ठेवायचे. आई हार घालून पुजा करायची. मला त्याने उत्साह येई आणि मी मग सजावटीचे काम करायचे. मखर करायला जमण्यासारखे नव्हते..मग चकाकीचे किंवा डिझाईनचे पेपर पाठी आणि टेबलला चिकटवायचे, कुंड्या बाजूला मांडायच्या. घरासमोर प्राजक्ताचा सडा असायचाच, मग ह्या फुलांच्या माळा करुन त्या पाठी सोडायच्या..असे करुन मी बाप्पा आपल्या घरी असल्याचे समाधान मानायचे. आई-वडील आरतीही करायचे मला घेऊन. आमच्या घरात मग हा बाप्पा पाच दिवस बसायचा टेबलवर. पाच दिवस झाले की वडील पुन्हा त्याला देवघरात त्याच्या स्थानी नेऊन बसवायचे.
टेबल वरून अजून एक आठवण झाली. आमच्या घरात एक टेबल होतं, त्याला मध्ये आरसा व बाजूला दोन खण होते. ते टेबल दरवर्षी आमच्याकडून गावातील एका कुटूंबात गणपती स्थापनेसाठी नेलं जायचं. त्या टेबलला आम्ही 'गणपतीचं टेबल' म्हणूनच नाव ठेवले होते.
गणपतीच्या दिवसांत आई-वडिलांबरोबर ओळखीच्या लोकांकडे गणपती बाप्पा पाहायला जायचे. प्रत्येकाचे वेगवेगळे रूप मनाला भावायचे. माझ्या आईचे शिक्षण तिच्या मामांच्या घरी झाले. गणेशोत्सवात आई एक दिवस राहण्यासाठी तिच्या मामांकडे वरळीला नेत असे. तो प्रवास मला आवडायचा. कारण उरण वरून मोरा बंदराला जाऊन लाँच मध्ये बसायचं, मग धक्क्यावर उतरलं की वडील मला आइस्क्रीमचा कप आणून द्यायचे. जाता-येता हा आइसक्रीमचा कप मला मिळायचा. आता रोज आइस्क्रीम मिळतं, पण तेव्हा दुर्मिळ असणार्या त्या आइस्क्रीमची चव अजून जिभेवर आहे.
वडील मुंबईतील बरेचसे सार्वजनिक गणपती आम्हाला दाखवायचे. त्या सार्वजनिक गणपतीचे देखावे, चलचित्र पाहण्यासाठी रांगेत उभे राहावे लागायचे. ते पाहण्यासाठी मला मुंबईला जायला खूप आवडायचे. आईच्या मामांच्या घरच्या गणपतीलाही मला खूप प्रसन्न वाटायचे व तिथली रात्र मला आवडायची. कारण रात्री तिथे मामांची लेक व जावई फुलांची कंठी, हार करत बसायचे, दूर्वा निवडायचे. पुठ्ठ्यावर ते दोर्याने सायलीच्या, चमेलीच्या कळ्या ओवून कंठी तयार करत. ते पाहण्यात, फुलांचा सुगंध अनुभवण्यात मी दंग व्हायचे.
आमच्या गावामध्ये माझी मावस बहीण राहते. तिच्या घरी गणपती असे. जरा मोठी झाल्यावर मुंबईचे दिवस सोडले तर बाकीचे दिवस मी ह्या मावस बहिणीकडे गणपतीची मौज करायला जात असे. तेव्हा गणपतीच्या पहिल्या दिवशी ताकीद असे की चंद्र पाहायचा नाही म्हणून..त्या दिवशी फक्त संध्याकाळपर्यंत जायचे. बाकी इतर दिवशी संध्याकाळ पासून रात्री १२-१ पर्यंत जागरण करायला मी तिथे थांबत असे. तेव्हा जागरणात आम्ही बायका व मुली मिळून झिम्मा, फेर, फुगड्या खेळायचो. फुगड्या खेळताना वेगवेगळे उखाणे घेतले जायचे, त्यातला आता एकच आठवतो.
'चुलीत भाजला पापड पापड .... चा नवरा माकड माकड'
'चुलीत भाजला पापड पापड .... चा नवरा माकड माकड'
झिम्म्यासाठी पुढील गाणे वेडे वाकडे आठवते ते असे. तुम्हाला परफेक्ट माहिती असेल तर नक्की प्रतिसादात टाका.
आंबा पिकतो, रस गळतो
कोकणचा राजा झिम्मा खेळतो
झिम पोरी झिम
कपाळाचा झिम
झिम गेला उडून
पोरी आल्या रुसून
सर सर गोविंदा येतो
मजवर गुलाल फेकीतो,
या रे गुलालांच्या लाल
आमच्या वेण्या झाल्यात लाल
घडव घडव रे सोनारा
माणिक मोत्यांच्या बिल्वरा
बिल्वराला खिडक्या
आम्ही बहिणी लाडक्या
लाड सांगू बाप्पाला
मोती सांगू काकाला
कोकणचा राजा झिम्मा खेळतो
झिम पोरी झिम
कपाळाचा झिम
झिम गेला उडून
पोरी आल्या रुसून
सर सर गोविंदा येतो
मजवर गुलाल फेकीतो,
या रे गुलालांच्या लाल
आमच्या वेण्या झाल्यात लाल
घडव घडव रे सोनारा
माणिक मोत्यांच्या बिल्वरा
बिल्वराला खिडक्या
आम्ही बहिणी लाडक्या
लाड सांगू बाप्पाला
मोती सांगू काकाला
आता पुढचे आठवत नाही.
हे सगळे करताना मध्ये एक जण झांझर तर एक जण ढोलकी घेऊन वाजवत बसे त्या तालावर आम्ही फेरही धरत असू. फेर धरताना पुढील गाणे असायचे. अर्धवट येतेय ते लिहिते.
गणपती देवा, पडते मी पाया, काय मागू मागणं रे
काय मागू मागणं रे देवा, काय मागू मागणं रे ?
काय मागू मागणं रे देवा, काय मागू मागणं रे ?
गळ्यातलं मंगळसूत्र अखंड राहूदे, हे माझं मागणं रे
हेच माझं मागणं रे देवा, हेच माझं मागणं रे
हेच माझं मागणं रे देवा, हेच माझं मागणं रे
गणपती देवा, पडते मी पाया ...........
हातातला चुडा अखंड राहूदे, हेच माझं मागणं रे
हेच माझं मागणं रे देवा, हेच माझं मागणं रे
हेच माझं मागणं रे देवा, हेच माझं मागणं रे
गणपती देवा, पडते मी पाया ...........
कपाळीच कुंकू अखंड राहू दे, हेच माझं मागणं रे
हेच माझं मागणं रे देवा, हेच माझं मागणं रे
हेच माझं मागणं रे देवा, हेच माझं मागणं रे
गणपती देवा, पडते मी पाया ...........
पायातले पैंजण अखंड राहू दे, हेच माझं मागणं रे
हेच माझं मागणं रे देवा, हेच माझं मागणं रे
हेच माझं मागणं रे देवा, हेच माझं मागणं रे
गणपती देवा, पडते मी पाया ...........
पायातली जोडवी अखंड राहू दे, हेच माझं मागणं रे
हेच माझं मागणं रे देवा, हेच माझं मागणं रे
हेच माझं मागणं रे देवा, हेच माझं मागणं रे
गणपती देवा, पडते मी पाया ...........
हे गाणं तेव्हा फेर धरण्यासाठी म्हणून गायचो. तेव्हा त्याचा अर्थ कळत नव्हता आता तो समजतोय काय आहे ते
त्यानंतर कोंबडा - अक्का बाईचा कोंबडा पाटी खाली झाकला (पुढे कोणीतरी कंटिन्यू करा )
मग पिंगा, बसफुगडी. बसफुगडीला काहीतरी बसफुगडी पाय लंगडी असे गाणे असे.
बायकांचे खेळून झाले की पुरुष वर्गही मजा करत असे. तेव्हा पत्त्यांचे एवढे सोंग नव्हते. पुरुष मंडळी, तरुण मुले ढोलकी वाजवीत बाल्या डान्सही करत. नंतर गप्पा गोष्टी रंगत कधी बाप्पाच्या, तर कधी भुताखेताच्या
असे पाच दिवस मजा करत घालवले की मग विसर्जनाचा दिवस. हा दिवस मला खूप आवडे कारण आमच्या गावातल्या गणपतींचे विसर्जन समुद्र किनारी होत असे. तेव्हा समुद्र किनारी जाण्यासाठी आम्हाला विर्यातुन जावे लागे. तेव्हा विरा पाण्याने भरलेला असायचा. अश्या पाण्यातून फ्रॉक सावरत तर कधी त्याची पर्वा न करता डुबुक डुबुक करत जायला मला खूप आवडे. तेव्हा गावात फक्त ४ गणपती होते. सगळे गणपती एकत्र निघत आणि गणपती बाप्पा मोरया च्या गजरात विसर्जनास निघे. कधी कधी पाऊसही पडे, माझ्या उत्साहाला मग अजूनच उधाण. समुद्र किनारी गेल्यावर बाप्पाची आरती होई आणि मग प्रसाद वाटला जाई. हा प्रसादही कधी कधी पावसामुळे हातात भिजून जायचा व तसा भिजलेला प्रसाद खायलाही मजा येई.
लग्न झालं आणि सासरी आले. इथे मात्र माझी घरात गणपती असण्याची इच्छा पूर्ण केली बाप्पाने. सासरी नवसाचा म्हणून साखरचौथीचा गणपती मांडला जातो. आता गणपतीच्या दिवसांत मला ती रुखरुख लागत नाही.
काळ बदलला तशी त्या काळची मौजही बदलत चालली आहे. हल्ली विभक्त कुटूंब पद्धतीमुळे घराघरांत गणपती आणला जातो. एकमेकांकडे जायला सवडही मिळत नाही. जागरणांसाठी काही ठिकाणी जुगार वाढू लागला आहे. छोटी मुले मोबाईल, काँप्युटर वर गेम खेळत जागरण करतात. पूर्वीचे फेर, झिम्मा आता लयाला चालले आहेत. आत्ताचा तरुण वर्ग बाल्या डान्स करू शकेल का हा प्रश्न पडतो आहे. पूर्वी गावातील गणपती एकत्र जायचे म्हणून एकमेकांसाठी थांबायचे. आता घराघरांत गणपती झाल्याने गर्दी वाढेल म्हणून आपला गणपती लवकर काढू ह्या धांदलीत गणपती बाप्पाच्या विसर्जनाचा दु:खमिश्रीत आनंद आपण गमावत चाललो आहोत.
हे झाले माझे अनुभव आणि मतं. सगळ्यांनाच असे अनुभव येत असतील असं नाही. शेवटी जमाना बदलतोय तसा गणेशोत्सवातही बदल होणारच. आनंदाची माध्यमं ही बदलत जाणारच. मात्र हे वाक्य कधीच बदलणार नाही -
"गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या!".
"गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या!".
(मायबोली गणेशोत्सव २०१२ मध्ये प्रकाशीत)
मस्तच लेख
उत्तर द्याहटवाधन्यवाद सचिन.
हटवातुझे लेख वाचले की जुन्या आठवणी ताज्या होतात . परत एकदा तसेच जगावे असे वाटू लागते. जसे जिवाभावाचा पार वाचले तेंव्हाही वाटले.
उत्तर द्याहटवा