मंगळवार, २८ जून, २०१६

जांभुळ पिकल्या झाडाखाली

उन्हाळ्याचे दिवस म्हणजे रानमेव्याचे दिवस. दर्‍या, डोंगरांवर, जंगलात रानमेवा तयार होत असतो. त्यातलाच एक रानमेवा म्हणजे जांभुळ.
तसे जांभूळांचा आस्वाद घेण्यासाठी मला कधी दर्‍या डोंगरांत नाही जाव लागल. आमच्या वाडीतच ३-४ जांभुळांची झाडे होती. परी़क्षा आणि सुट्टीचा काळ ह्या दरम्यान जांभुळांचा बहर असायचा. मी अभ्यास नेहमी वाडीत जाऊन एखाद्या झाडाखालीच करायचे. अमुक एकच झाड असे काही ठरलेले नसायचे. सावली चांगली असेल, साफसुफ असेल अश्या झाडाखाली जाऊन अभ्यास करायचे. पण जांभुळांच्या सिझनमध्ये मात्र मुद्दाम स्वतः जांभुळ्याच्या झाडाखाली झाडलोट करून तिथे चटई टाकून अभ्यासाला बसायचे. त्यामुळे झाडावरून पडणार्‍या ताज्या जांभुळांचा मधुन मधुन आस्वाद घ्यायला मिळत असे. आता म्हणू नका की अभ्यासात लक्ष होत की जांभुळांकडे हाहा
सुट्टीत तर धम्मालच असायची. आमच्या घरी आत्या-काकांची मुले यायची. सुट्टीत घरात आम्ही क्वचीतच सापडायचो. वाडीत हुंदडणे, कैर्‍या-चिंचा पाडून मिठ-मसाला लावुन खा, करवंद खा, अस्वने खा ह्या झाडावर चढ त्या झाडावर चढ अशी गंमत असायची. जांभुळाच्या झाडाखाली त्यावेळी जास्त मुक्काम असे. कधी कधी भातुकलीही आम्ही करायचो जांभुळाच्या झाडाखालीच.
पण जांभुळाच्या झाडाखाली आम्ही जास्त झाडलोट नाही करायचो कारण जांभळे जमिनीवर पडली की फुटून त्यांना माती लागायची आणि पानांवर पडली की चांगली असायची. म्हणून पालापाचोळा तसाच ठेवायचो. ह्याचा अर्थ असा नाही की जमीनीवर पडलेली जांभुळे आम्ही घ्यायचो नाही. फुटलेला भाग सोडून राहीलेला भाग खायचो हाहा ती चव, ती मजाच काही वेगळी असायची. मला भर दुपारी जांभुळे खायला जायला खुप आवडायच. कारण दुपारी ही जांभुळे तापली की ती नरम पडायची आणि जास्त गोड लागायची.
भावंडांपैकी कुणीतरी कधीकधी जवळ्यच्या फांद्यांवर चढून जांभळांच्या फांद्या हलवायचे किंवा दगडे मारायचे पण तेंव्हा काही अर्धी कच्ची जांभळेही पडायची. अशी जांभळे खाताना घशाला आवंढा बसायचा. पण तरीही चाळा म्हणून ती खाल्ली जात.
आता जांभुळे बाजारात भरपुर विकायला येतात अगदी हायब्रिड जातीची. पण झाडाखाली पडलेली ती अर्धवट जांभळे खाण्यात जी मजा यायची ती मजा ह्या विकतच्या मोठ्या आकर्षक आख्ख्या जांभळांना येत नाही.
जांभळाच्या झाडावर पक्षीही भरपूर येत. कावळे, पोपट, बुलबुल, साळुंख्या यांचा वावर सतत ह्या जांभळांच्या झाडावर असे. त्यांचे पोट भरण्याचे साधनच म्हणा. पण हेच पक्षी कधी कधी स्वतःचे पोट भरून आमच्या अंगावर प्रसाद टाकत. हाहा
आमच्या वाडीत गावठी म्हणजे लहान जांभळांची काही झाडे होती तर २ झाडे मोठ्या जांभळांची. पण मोठ्या जांभळांना बहुतेक किडच लागे. अजुन हे झाड आहे अजुनही तशीच किड लागते. रात्रीची वटवाघळही ह्या झाडावर सारखी उड्या मारत असतात. खुप कमी जांभळे मिळत ह्या झाडाची. ही जांभळे आई-वडील कुणाकडून तरी काढून घेत. काढण्यासाठी एक माणूस झाडावर चढायचा. आम्ही खाली आईची साडी किंवा चादर घेऊन माणूस जी फांदी हलवेल त्या खाली झोळी करून उभे राहायचो. मग फांदी हलवली की टपाटप जांभळे चादरीत पडायची. एक-दोन टणटणाटण डोक्यात पण पडायची. ही जांभळे आई-आजी सगळ्यांना वाटायच्या.
ही सगळी बालपणातली मजा. आता सासरी असेच मोठ्या जांभळाचे झाड अगदी गेटजवळ आहे.
जांभुळाचे शास्त्रिय नाव syzygium cumini असे आहे. जांभुळाचे झाड ३० फुटापेक्षा जास्त वाढते. बहुतेक जांभळाच्या झाडांच्या फांद्या ह्या वरच्या दिशेला सरळ वाढत जातात.
त्यामूळे हे झाड ऐटदार दिसते. भरगच्च पानांमुळे झाडाखाली थंड सावली पडलेली असते.
जांभळाच्या फांद्या जळण्यासाठी खुप उपयुक्त असतात. भराभर जळतात. जांभळाचे लाकूडही कडक असते. फळ्या बनवण्यासाठी तसेच कोळी माणसे बोट व मच्छी कापण्याचे लाकूड बनवण्यासाठीही ह्याच्या सुकलेल्या खोडाचा उपयोग करतात.
साधारण जानेवारी-फेब्रुवारीत जांभळाच्या झाडाला छान कोवळी पालवू फुटू लागते व मार्च-एप्रिल मध्ये फुले धरू लागतात. फुले अगदी ५ मिमि एवढीच असतात. जवळून पाहीले की त्यांचे सौंदर्य आपोआप नजरेत भरते.
थोड्याच दिवसांत छोटी-छोटी फिक्कट हिरव्या रंगाची लांबट फळे धरू लागतात. एखाद महीन्यात ह्या फळांना चांगले बाळसे धरते.
मग हळू हळू सुरुवात होते पिकण्याची.
दिवसोंदिवस ह्यांचा रंग गडद होत जातो म्हणजेच ती पिकू लागतात.
जांभळाचे इतर औषधी गुणधर्म तर सगळ्यांनाच माहीत आहेत म्हणजे जसे जांभूळ, डायबिटिझ झालेली माणसे खाऊ शकतात, जांभळाच्या बियांपासून डायबिटीझ वर औषध बनवले जाते. जांभुळा पासुन जांभुळ सरबत, जॅम बनवले जातात. जांभळावर बर्‍याचदा मधमाशा मधाची पोळी बनवतात ही मध गुणकारी मानली जाते.
जंगलातील जांभळांच्या झाडांमुळे कातकरी, डोंगराळ भागातील लोकांना जांभुळे विकून, लाकडे विकून उपजीवीकेसाठी हातभार लागतो.
पण आजकाल जंगलतोडीचे भिषण अवजार धार लावून सज्ज असल्यामुळे भविष्यात ह्या कातकरी लोकांच्या उपजीवीकेवर वार होत आहेत. जंगल-डोंगरांवर पडणारी ही मायेची सावली पोरकी होत चालली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा