मंगळवार, २० फेब्रुवारी, २०१८

व्यावसायिक कला १) बुरुड कला

एका नवीन लेखाच्या मालिकेला सुरुवात करत आहे. आपल्या आजूबाजूला अनेक व्यावसायिक कला आहेत ज्यांचे स्थान आता कमी होत चालले आहे. त्यांची प्रत्यक्ष त्या कलाकारांकडून माहिती घेऊन ती सादर करण्याचा हा एक प्रयत्न. तर अशा कलांच्या भरभराठीसाठी शुभेच्छा देऊन आजची पहिली कला ह्या लेखाद्वारे सादर करत आहे. (फोटो क्रोम वरून दिसतील)
बुरूड समाजाचा बांबूच्या विणकामाचा पारंपरिक व्यवसाय म्हणजे सुबक कलाकुसर. टोपल्या, सुपे, डोबूल, परड्या इतर वस्तू ह्या बुरूड समाजातील व्यक्ती सराईतपणे सुंदर विणतात. सदर विणकामासाठी बांबू तासताना, काड्या विणताना हातावर अनेक यातना, व्रण व शारीरिक कष्ट झेलत एक एक काडी विणत प्रत्येक कलाकृती तयार होत असते.
बांबू विणकामासाठी लागणारी साधने.
टोपलीची विण व्यवस्थित बसवताना.
चिरलेला बांबू
टोपल्यांसाठी बांबूच्या केलेल्या बारीक काड्या.
तयार टोपल्या
माझ्या लहानपणात मी अशा विणलेल्या वस्तू पाहिल्यांत त्या म्हणजे छोट्या-मोठ्या टोपल्या, कोंबड्यांची खुराडी, तांदूळ ठेवण्यासाठी मोठे पिंपासारखे विणलेले कणगे, पाला गोळा करण्यासाठी विणलेला दोन हात रुंद करूनच मावेल इतका मोठा झाप, पावसाळ्यात शेतातील कामे करताना छत्रीसारखा उपयोग होणारे इरले, तांदूळ पाखडण्यासाठी सूप, पकडलेले मासे ठेवण्यासाठी मासेमार कंबरेला बांधायचे ते डोबुल, लग्नसमारंभातील तांदूळ धुवताना लागणारी रोवळी, देवपूजेची फुले गोळा करण्यासाठी परडी, लग्न समारंभातील रुखवतीसाठी ठेवण्यात येणार्‍या शोभेच्या वस्तू तसेच काही विणून बनवलेली काही छोटी छोटी खेळणी. पण ह्यातल्या बर्‍याच वस्तू आता नामशेष होत आल्या आहेत तर काही झाल्या आहेत. परिणामी हा पारंपरिक व्यवसायच आता लयाला चालला आहे.
उरण येथील बुरूड आळीतील उल्हास सोनकर यांनी दिलेल्या माहितीनुसार बुरुडकाम करणारी कुटुंबे आता हाताच्या बोटावर मोजता येतील इतकीच राहिली आहेत. त्यातील काही साईड बिझनेस म्हणून हे काम करतात कोणी आवड म्हणून तर फार क्वचितच कुटुंब फक्त पोटापाण्यासाठी हे काम करतात. पूर्वी डोंगर-रानात बांबूचे भरपूर उत्पादन असायचे. तेव्हा दारावर बांबू विकायला यायचे. बांबूचे अनेक प्रकार असतात त्यात कळका, काठी, मेस, पोकळ, टोकर असे काही प्रकार असतात. पण आता औद्योगीकरण आले आणि डोंगरे-रानांची संख्या कमी झाल्याने बांबूचे उत्पादन कमी होऊन बांबूचे भाव वाढले आहे. १०० रुपयांच्या आसपास एक बांबू मिळतो.
बुरूड व्यवसाय प्रामुख्याने शेती व मासेमारीवर आधारलेला असायचा. शेतीसाठी लागणार्‍या छोट्या-मोठ्या टोपल्या, इरली, झाप, कणगे, सूप हे प्रत्येक घरात लागायचे पण आता शेतीच नष्ट होत चालली आहे. शेतीच्या जागी सिमेंटची शेती ठिय्या मांडून बसली आहे. तसेच कणग्यांच्या जागी आता मोठे धातूचे, प्लास्टीकचे पिंप वापरले जातात. इरलीच्या जागी मेणकापडे आली. प्लास्टीकच्या वस्तूंमुळे नैसर्गिक बांबूच्या वस्तूंच्या प्रमाणात प्रचंड घट निर्माण झाली. मासे विक्रीसाठी कोळी समाजाला टोपल्यांची आवश्यकता असायची. तेव्हा भरपूर टोपल्यांचा खप व्हायचा. पण आता त्यांनाही न गळणारे प्लास्टीकचे टब सहज उपलब्ध झाल्याने तिथेही बुरूड व्यवसायात घट निर्माण झाली. पूर्वी भरपूर प्रमाणात उरणमध्ये मिठागरे (मिठांचे आगर) होती. तेव्हा मिठासाठी मोठ्या मोठ्या टोपल्यांची नियमित विक्री होत असे. आता अग्रेसर कंपन्या आल्या आणि खाडी-आगरांवर मातीचे भराव पडले. त्यामुळे मिठाचा व्यवसायही कमी झाला आणि परिणामी टोपल्यांचाही. पूर्वी बहुतांशी घरात गावठी कोंबड्या पाळल्या जात. त्यासाठी खुराडी लागत पण आता क्वचितच गावठी कोंबड्यांचे पालन होताना दिसते त्यामुळे खुराड्यांची मागणीही होत नाही.
पालखी
डोबुल, सूप व टोपली
कष्ट करूनही कमी उत्पादन मिळत असल्याने आता नवीन पिढी ह्यांत रस घेत नाही. ते घेत असलेले चांगले शिक्षण तसेच औद्योगीकरणामुळे, नोकरीच्या संधी, इतर व्यवसायांच्या वाढत्या सोयींमुळे नवीन पिढी अर्थातच तिकडे खेचली गेली आहे त्यामुळे ह्या पिढी नंतर हा परंपरागत कलाव्यवसाय जवळ जवळ बंद पडण्याच्या मार्गावर आहे.
बुरूड आळीत रहाणार्‍या श्रीमती चंद्रकला तेलंगे ह्यांचं घर ह्या बुरुडकामावरच चालू आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार अजूनही काही प्रमाणात ह्या वस्तूंना मागणी असते. लग्नसराईत वड्यांसाठी टोपल्या, रोवळी लागते, गौरीच्या सणाला सुपांची मागणी येते, वटपौर्णिमेला काही प्रमाणात छोट्या टोपल्या लागतात. सणांमध्ये ह्या वस्तू परंपरागत लागतात व ही परंपरा चालू आहे म्हणून थोड्याफार प्रमाणात ह्या वस्तू टिकून आहेत. रात्रंदिवस हे काम करून त्यांच्या पदरी फारच कमी नफा येतो कारण बांबूचे वाढते भाव आणि त्यात भर म्हणून परगावातून काहीजण ह्या वस्तू बाजारात विकायला आणतात त्याचा विपरीत परिणाम त्यांच्या धंद्यावर होतो.
पकडलेले मासे ठेवण्याकरीता हा डोबूल कमरेला अडकवलेला असतो.
मासे आहेत आत.
आग्री लग्न सोहळ्यात पारंपारीक वडे करण्यासाठी लागणार्‍या टोपल्या व रोवळी
ही परंपरागत कला नष्ट होऊ नये म्हणून बांबूची अधिक लागवड झाली पाहिजे. नवीन पिढीने निदान कलेची जोपासना करण्यासाठी तरी ह्या कामात रस घेतला पाहिजे व वडीलधाऱ्यांनी त्यांना प्रोत्साहीत करून आपल्या कलेचा वारसा त्यांच्यामध्ये रुजविला पाहिजे. सरकारनेही ह्या कलेला प्रोत्साहन दिले तर ह्या कलेची जपणूक होण्यास मदत होईल. प्रदर्शने, सेमिनार सारखे कार्यक्रम आखून ह्या कलेला महत्त्व दिले गेले पाहिजे. शिवाय आपण जनतेनेही घातक असणारे प्लास्टीकला मर्यादा आणून आपल्या परंपरागत ह्या वस्तूंचा वारसा चालविला तर ही आणि अशा इतर अनेक संपुष्टात येणार्‍या कला जपल्या जातील.
सौ. प्राजक्ता पराग म्हात्रे
वरील लेख दिनांक ९ फेब्रुवारी २०१८ च्या झी मराठी दिशा या साप्ताहिकात प्रकाशीत झालेला आहे. (कृपया दुसरीकडे पाठवताना साप्ताहिक व मूळ लेखिकेचे नाव लेखासोबत असावे.)