बुधवार, २७ जुलै, २०१६

आरोळ्या फेरीवाल्यांच्या

पूर्वी मुंबई सोडली तर इतर शहर, गावांत आतासारखी बाजारपेठ खूप कमी होती. मॉल तर अस्तित्वातच नव्हते. मग काही नित्य गरजा भागवणार्‍या वस्तूंसाठी दारावर येणार्‍या फेरीवाल्यांची आतुरतेने वाट पाहिली जायची. बहुतेक फेरीवाले तेच ठरलेले असल्याने ह्या लोकांबरोबर चांगला परिचय होऊन एक आपलेपणाही तयार होत असे. त्यांच्या रस्त्यावरून दारापर्यंत येणार्या आरोळीवरून कोण व्यक्ती आली असेल हे कळायची. कुठल्या कुठल्या दूरवरच्या गावातून ही लोक व्यवसायासाठी पायी भटकत यायची. वस्तू विकता विकता ते त्यांचे सुख,दुःखही आपल्याबरोबर शेयर करायचे त्यामुळे पुढच्यावेळी आल्यावर काय गं आता कशी आहे तुझी लेक, का रे बाबा काल चांगला धंदा झाला ना? अशा प्रकारची विचारपूस आवर्जून व्हायची. माझ्या आठवणीतल्या काही दारावरच्या फेरीवाल्यांच्या आठवणी मी खाली देत आहे. तुमच्या आठवणीही येऊद्या.
१) सूर्योदयापूर्वी किंवा सूर्योदय होताच ट्रिंग ट्रिंग बेल अंगणात घुमायची. बेल वाजवून दूध$$ आवाजाने दारावरच्या फेरीवाल्यांच्या फेरीचा आरंभ होत असे. दूध वाला येणार म्हणून आधीच सुटे पैसे काढलेले असायचे. वडील दूध आणायला जाताच तो नमश्कार शाब म्हणून सलाम ठोकायचा. कधी कधी आपल्या धंद्याबद्दल म्हणजे किती लवकर उठावे लागते किती कष्ट करावे लागतात ह्यांबद्दलही त्याच्या सुरात वडिलाशी हितगुज करायचा.
२)थोड्याच वेळात दुसरी ट्रिंग ट्रिंग ऐकू यायची. पण हा बेल सोबत आधीच पाव$$$$ ओरडत यायचा. ह्याचा धंदा रोजच चाले असे नाही. कारण पाव अधून मधूनच घेतले जायचे. पावा मध्ये दोन प्रकार असायचे एक नरम पाव आणि दुसरा कडक पाव. पाव हवे असतील तर त्यासाठीही सुटे पैसे बाजूला काढलेले असायचे. बेकारीतून आणलेल्या त्या ताज्या पावांना एक चविष्ट उबदार वास असे. पाव हातात पडताच तो चहात बुडवून खाण्याची इच्छा होत असे. कडक पाव कधीतरीच आम्ही घ्यायचो त्यामुळे तेही सहज न तुटणारे, कष्ट करून खावे लागणार्‍या पावाचीही चव कडक असायची. स्मित
३) १०-११ च्या सुमारास जिचे मला खास आकर्षण असायचे अशी हाक यायची. ओळखलंच असेल तुम्ही स्मित म्हावरा घ्या गो$$$$$$$$$/कोलबी घ्या गो$$$$$$$$$$ बुधवार, शुक्रवार, रविवार ह्या तीन दिवशी कोळणी आमच्याकडे नेहमीचे गिर्‍हाईक म्हणून यायच्याच. त्यांची रस्त्यावरून हाक ऐकली की मी खेळत असेल तिथून किंवा घरात अभ्यास करत असेल तर ते सगळे टाकून माश्यांची टोपली आणि कोळीणही पाहायला यायचे. कोळी साडी नेसलेल्या, कानात भावनगरी गठ्ठ्याएवढ्या जाडीच्या रिंगा घातलेल्या, डोक्यावर चुंबळ, चुंबळीवर माश्यांची टोपली त्यावर प्लायवूडचा तुकडा झाकलेला, हातात एका झाडाची छोटी फांदी माश्या हाकलण्यासाठी तर कधी माश्यांच्या वासावर तिच्या पाठी येणार्‍या कुत्रे किंवा मांजरांना हुसकावण्यासाठी. चालण्यात व बोलण्यातही त्यांची लकब असायची. कोळीण आली की जर पाटी (टोपली) जड असेल तर हात लावायला एक जण लागायचा. आई किंवा आजी पाटी खाली उतरवायला मदत करायची. टोपलीत मेणकापडावर कोलंबी/करंदी एका बाजूला एका बाजूला बोंबील कधी कधी बोईटे, छोटे पापलेट वगैरे असे मासे असायचे. मासे खराब होऊ नये म्हणून त्यात मध्ये मध्ये बर्फाचे तुकडे असायचे. हा बर्फ वितळत जायचा तसे मेणकापडाला न जुमानता टोपलीतून पाणी ठिबकत राहायचे. ती फळीवर वाटे लावायची. ते लावत असताना तिची हाताची हालचाल मला विशिष्ट वाटायची. कधी वेळ असेल तर करंदी, कोलंबी निवडून पण द्यायची. मग ती निवडता निवडता घरातून तिच्यासाठी एक चहाचा गरमागरम कप ठरलेला असे.
४) दुपार नंतर खूप फेरीवाले असायचे. ते रोज नाही पण आठवड्याने वगैरे त्यांची फेरी असायची प्रत्येकाची. एक साडी विकणारा यायचा. तो सुरत वरून साड्या आणायचा. त्याच्या साड्या अगदी मऊ आणि चांगल्या रंगात असायच्या. त्या साड्यांना हात लावायला मला खूप आवडायचे. गार आणि मऊ लागायच्या त्या हाताला. त्यांची एक एक प्रिंटही फार सुंदर असायची. बायका मिळून डझनावर साड्या घ्यायच्या त्याच्याकडून कारण रीझनेबलही असायच्या त्या. साडीवालाही गोड बोलून आणि चांगल्या साड्या दाखवून त्याने आपला इतका जम बसवला की आज त्याचे एक मोठे दुकान आहे बाजारात.
५) गरुडी पुंगी वाजवत आला की कुत्र्यांच्या भुंकण्याची त्याला साथ असायची. हाहा हा गरुडी जाडजूड आणि पोट पुढे आलेला असल्याने लगेच ओळखून यायचा. हा आला की नागोबाचे दर्शन जवळून व्हायचे. त्याच्या टोपलीत तो गुप गुमान बसलेला असायचा. पुंगी वाजवली की फणा काढायचा. मग आजी माझ्या हातात पैसे द्यायची. त्या गारुड्याला द्यायला. ते मिळाले की टोपलीच झाकण बंद व्हायचं व नागोबा डोलीत बसल्याप्रमाणे पुढे प्रवासाला निघायचे.
६) स्टोव्ह रिपेरिंग वाला आला हे तो लांब असतानाच समजायचं. कारण त्याची आरोळीच एवढी लांबलचक असायची. इस्टो रिपेर$$$$$$$$$$$$$$$ असा ओरडत यायचा. त्यावेळी प्रत्येकाच्या घरात स्टोव्ह असल्याने ह्याला खूपच डिमांड असायचं. मग त्याला आणण्यासाठी खास रस्त्यावर जाऊन अगदी प्रमुख पाहुणे आणतात तसे त्याला आणले जायचे. आमच्या स्टोव्हच्याही तक्रारी असायच्या. पिन मारूनही तो पॅरॅलिसिस झाल्याप्रमाणे एकाच बाजूला पेटतोय, त्याचा वायसर, बर्नर गेलाय अशा काही बाही तक्रारी असायच्या. मग स्टोव्ह रिपेरिंग वाला ठीक ठाक करून जायचा.
त्या काळी सगळ्यांकडे पितळी भांडी असायची व त्या भांड्यांना कल्हई लावावी लागायची. कल्हई वाल्यांची हाकही ठणठणीत असे. कल्हाई$$$$$$$$$$. आमची ठश्यांची पितळी पातेली/टोपे कल्हईसाठी बाहेर यायची आणि कल्हई करून परत मांडणीवर जाऊन बसायची.
७) हातात लोखंडी टाचण आणि हातोडा घेऊन पाट्याला टाकी लावायला पाथरवट यायचे. पाट्याचा भरपूर वापर झाला, की पाट्याची टाकी, म्हणजे धार कमी होत असे. आठवड्यातून किंवा पंधरा दिवसांतून एकदातरी त्या काळी पाथरवट, किंवा पाट्याला टाकी लावणारे दारावर येत असत. त्यांची "टाकीयेsssssss " अशी हाक ऐकू आली की आई त्यांना बोलवून पाट्याला टाकी लावून घेत असे. ही टाकी लावणारा एक लोखंडी जाड तासणी पाट्यावर ठेवून त्यावर हातोडीनं ठकठक करत ठोकून गाळलेल्या जागा भराच्या तुटक रेषांप्रमाणे पूर्ण पाट्यावर टाकीच्या रेषा ठोकत. हे बघताना मला तसं करण्याची फार इच्छा होई. मी कधीतरी खेळ म्हणून आमच्या घरातली तासणी घेऊन हातोड्यानं तासणी पाट्यावर ठोकायचा प्रयत्न करायचे. पण पाटा फार शिस्तीचा कडक होता. ज्याचं काम त्यानंच करावे, या तत्त्वाचा. माझ्यासाठी कध्धीकध्धी त्यानं नरमाई म्हणून घेतली नाही आणि मला कधी एका शब्दाचीही गाळलेल्या जागेची रेषा बनवता आली नाही.
८) संध्याकाळी शाळा सुटल्यानंतर हमखास यायचा तो म्हणजे खारी-बटर वाला. त्याच्या पेटीच मला फार आकर्षण असायचं. सायकलच्या कॅरियरला तो ती मोठी पेटी लावून आणायचा. पेटी अ‍ॅल्यूमिनियमची आणि चकचकीत असायची. त्या पेटीला आत ओढायचे कप्पेही असायचे. त्यात खारी, बटर, टोस्ट रचलेले असायचे. आणि एक कप्पा अजून आकर्षक असायचा तो म्हणजे केक पेस्ट्रीजचा. तेव्हा मॉन्जीनीज सारखी केकची दुकाने माहीतही नव्हती त्यामुळे ह्या केकच फार आकर्षण असायचं. पण आतासारखा दिसत म्हणून रोज घ्या अस तेव्हा नव्हत. कधीतरी पंधरा दिवसातून किंवा महिन्यातून एखादी पेस्ट्री घेतली जायची. आई घरी केक बनवायची पण ह्या पेस्ट्रीज रंगीत आयसिंगने फुलापानांनी सजवल्यामुळे मोहक दिसायच्या. दोन तीन बटरवाले असायचे त्यातल्या एका सुस्वभावी बटरवाल्याला नेहमी बोलवायचो म्हणून तो आला की आपला बटरवाला आला असे उद्गार निघायचे.
९) हिवाळा, उन्हाळ्यात गोळेवाल्याची गाडी फिरायची. टिंग टिंग वाजले की आम्ही मे महिन्याच्या सुट्टीत एकत्र जमलेली भावंड २५ पैसे, ५० पैसे घेऊन रस्त्यावर धावत सुटायचो. जर कधी जास्त भावंडे जमलेले असलो तर कोणीतरी त्या गोळेवाल्याची गाडीच अंगणात घेऊन यायचो. गोळे वाला प्रत्येकाच्या आवडीनुसार लाल, ऑरेंज, हिरवा, पिवळा असे कलर गोळ्यावर ओतून द्यायचा. गोळा संपेपर्यंत गोळेवाल्याला सोडायचे नाही. जरा का गोळ्यातला रस संपला की लगेच गोळा त्याच्यासमोर धरायचा मग तो त्यावर रंगाची बाटली ओतायचा. असा हा गोळेवाला रंगिबिरंगी थंडगार आस्वाद देऊन टिंग टिंग करत परत जायचा. गोळे वाल्याप्रमाणेच कुल्फीवाला यायचा. त्याच्याकडे कवटही मिळायचे. अंड्याच्या आकारासारखे. ते जरा महाग म्हणजे ५० पैसे किंवा १ रुपयाला असायचे. तेही मधून मधून घ्यायला आवडायचे. तसेच तो रिकाम्या कुल्फीच्या साच्यात आणि त्या कवटात जे दुधाच मिश्रण भरायचा ते पाहायला गंमत वाटायची. रिकाम्या साच्यात भरलेलं दुधाच मिश्रण त्याच डब्यातून आइसक्रीम होऊन बाहेर यायाचं तेव्हा जादू झाल्यासारखी वाटायची. अर्थात तो आधी लावलेले साचे बाहेर काढायचा हे नंतर कळू लागलं.
१०) अजून एक इंटरेस्टिंग फेरीवाला म्हणजे भंगारवाला. ह्याच्यासाठी काय काय जमा करून ठेवलेले असे. कुठे पडलेले लोखंडाचे तुकडे, डबे, बाटल्या काय काय ते सगळं जमा करायचं. तो रद्दी पण घ्यायचा म्हणून घरात जमा झालेले वर्तमान पत्र, रिझल्ट लागल्यानंतर कोरी पाने काढून राहिलेल्या वह्या द्यायच्या. (तेव्हा कोरी पाने जमवून बाईंडींङ करून एक वही रफ वही म्हणून केली जायची) मग भंगारवाला हे सगळं सामान त्याच्या त्या स्प्रिंगवाल्या काट्यात अडकवायचा आणि आपण काटेकोरपणे पाहायचे किती वजन होते ते. मग झालेल्या वजनाचे पैसे त्याने दिले की किती मोठी कमाई झाल्यासारखी वाटायची. मग त्या कमाईचा खाऊ आणला जायचा. एक प्लास्टीकवालाही फिरायचा. तो प्लास्टीकवर लसूण द्यायचा. पण हा लसूण इतका बारीक असायचा की सोलताना नखं दुखायची.
११) माझी अजून एक आवडती फेरीवाली म्हणजे बोवारीण/बोहारीण. पाठीवर कपड्यांचं गाठोडं, डोक्यावर भांड्यांची टोपली आणि हातात एखादं लहान मूल घेऊन भांडीय्ये$$$$$$ करत ती यायची. पंधरा दिवसांनी ते महिन्यांनी हिची फेरी ठरलेली असायची. ती आली की घरातील सगळे जुने कपडे बाहेर निघायचे. मग ती कुठे फाटलंय का, किती उसवलंय वगैरे अगदी नीट पाहून घ्यायची. साड्या, पँट असतील तर मोठं भांड म्हणजे बालदी किंवा टब द्यायची छोट्या कपड्यांवर छोटी भांडी त्यात स्टीलच्या चमच्या, कालथ्या पासून ते टोपांपर्यंत काही वस्तू असायच्या. तिला कपडे कितीही द्या तरी सांगायची एक साडी बघा असेल तर, एखादा शरट तरी. खूप घासाघीस करून नंतर ती एखादं भांड, द्यायची. तिची टोपली पाहायलाही मला खूप आवडायचं. वेगवेगळी भांडी त्या टोपलीत रचलेली असायची. ही जवळ जवळ अर्धातास तरी मुक्काम ठोकायची. मग कधी जेवणाच्या वेळेवर आली तर जेवण नाहीतर चहापाणी करून जायची.
अशा प्रकारे अनेक फेरीवाले पूर्वी दारावर येत असत ज्यांचे लहानपणी आपल्याला कुतूहल वाटायचे. आताही भंगारवाले, चादरवाले, कांदावाले येतात पण आता ते कुतूहल राहिले नाही म्हणण्यापेक्षा त्यांना बोलवायलाही वेळ नसतो. तुमच्याकडे येणार्‍या तुमच्या आठवणीतल्या फेरीवाल्यांविषयीही नक्की शेयर करा.
सौ. प्राजक्ता प. म्हात्रे
इतर ठिकाणी लेख शेयर करताना नावासकट शेयर करावे ही नम्र विनंती.

गुरुवार, १४ जुलै, २०१६

ओल्या मातीच्या कुशीत

पावसाच्या सरी येऊन जमिनीला भिडल्या, की बालपणीच्या अनेक जुन्या आठवणी सरींसारख्या बरसू लागतात. पाऊस आणि माझं एक जिव्हाळ्याचं नातं आहे.
मी शेतकरी कुटुंबातील मुलगी आहे. माझे आई-वडील दोघेही नोकरी सांभाळून शेती करायचे. शेतकरी आणि पावसाचं एक जिवाभावाचं नातं असतं. मे महिना आला की शेतकरी वाट पाहू लागतात ते काळ्या ढगांची, गार गार वार्‍याची, मातीला सुगंध देणार्‍या, बी-बियाणांचे मातृत्व स्वीकारणार्‍या पहिल्या सरीची.
पावसाचे आगमन आपल्या शेतांमध्ये होणार म्हणून आम्ही मे महिन्यापासूनच वर्षाऋतूच्या स्वागताच्या तयारीला लागायचो. मे महिन्याच्या दाहक उन्हात मातीची ढेपळं खडखडीत वाळून शेतातील जमिनीला भेगा पडल्याने आकाशाकडे पाण्याच्या आशेने 'आ' वासून पावसाच्या प्रतिक्षेत असतात. आमच्या शेतात तांदूळ पिकवला जायचा. पाच-सहा शेतांपैकी एक शेत खास म्हणजे बी पेरणीसाठी असे. त्याला आम्ही 'राबाचे शेत' म्हणत असू. राब म्हणजे महिनाभर आधीपासून जमलेला पालापाचोळा ह्या शेतात टाकायचा आणि तो जाळायचा. त्यामुळे शेतातील तणाचे (गवत) बी जळून मातीही भुसभुशीत होते. हा राब जाळताना, जाळलेल्या पाल्याच्या धुराचा एक वेगळाच गंध येतो. रस्त्याने जाताना आजही कुठे तो वास आला की मला पूर्वीची जुनी मैत्रीण भेटल्याप्रमाणे आनंद होतो. राब करताना आम्हा बच्चेकंपनीची त्यात लुडबुड असायचीच. राब लावला की सुकलेलं गवत वगैरे ताडताड आवाज करत पेटायचं, तेव्हा दिवाळीतील फटाके वाजल्याचा आनंद होत असे. ह्या आवाजाने छोटे पक्षीही आवाज करत इकडे तिकडे सैरभैर फिरत असत. मे महिना असल्याने वाडीत जिकडे तिकडे आंब्याचे बाठे पडलेले असत. मग आम्ही बच्चेकंपनी हे बाठे गोळा करायचो आणि त्या आगीमध्ये भाजून ते फोडून त्यातली कोय खायचो. कोय कडवट लागते पण त्याच्यावर पाणी प्यायले की आवळ्याप्रमाणे गोड चव येते. तो कडू रानमेवाही आम्ही चवी‌-चवीने खायचो.
राब हा मे महिन्याच्या दाहक उन्हात केला जाई. राबासकट सगळ्या शेतांची नांगरणी होत असे. मग प्रतीक्षा असे ती गार गार, हिरवे स्वप्न साकार करणार्‍या पावसाच्या सरींची. पण तेव्हा पाऊस फसवा नव्हता, वचन दिल्याप्रमाणे अगदी ७ जूनला बरोबर स्टेशनवर उतरायचा. ७ जूनची मी वाढदिवसासारखी वाट बघायचे. कारण पहिल्या सरीत चिंब भिजायला मिळायचे. पहिल्या पावसात भिजल्यावर त्वचेची रोगराई निघून जाते म्हणून आई स्वतः ह्या पहिल्या पावसात मला भिजायला सांगायची. पहिला पाऊस मातीला येऊन भिडला की जो अनोखा सुगंध दरवळतो तो माझ्या मनाला अजून भिडतो. त्या पहिल्या सरी, तो मातीचा सुगंध आणि ते पावसात-
ये रे ये रे पावसा, तुला देतो पैसा
पैसा झाला खोटा, पाऊस आला मोठा
ये गं ये गं सरी, माझे मडके भरी
सर आली धावून, मडके गेले वाहून
हे गाणं गुणगुणत, गुणगुणत कसलं, मोठ्याने ओरडतच मनसोक्त भिजायचे. त्या गार गार सरींनी कधी कधी थंडी पण वाजायची. पण त्या कुडकुडण्याचा आनंद विलक्षण होता.
मी शाळेतून एकदा घरी आले की लगेच शेतात धाव घेत असे. पावसाच्या सरींना सुरुवात झाली, जमीन भिजली की राबाच्या शेतात भात (तांदळाचे बियाणे) पेरला जाई. भात पेरायला मी पण मध्ये मध्ये लुडबुड करत असे. तो मुठीत धरून फेकायला मौज वाटत असे. त्या भातकणांची टोके मुठीत हलकेच आवळून त्यांच्या खुणांची तळहातावर झालेली डिझाइन पाहणे हा तेव्हा छंदच होता. ते भातकणांचे टोचणेही तेव्हा सुखद वाटे.
काही दिवसांतच पेरलेल्या बियांतून कोवळे अंकुर निघत. जर जोरदार पाऊस पडला तर अंकुर पाणी साठल्यामुळे दिसायचे नाहीत. पण हलक्या सरी पडल्या तर अंकुर फुटलेले व हळूहळू नवीन जन्माला आलेली बाळरोपं बाळसं धरताना पाहून फार आनंद होत असे. अनेकदा ह्या कोवळ्या ओल्या रोपांवरून मी अलगद हात फिरवत असे. बाळसं धरलेल्या रोपांच्या शेताचा अगदी हिरवा गालिचाच तयार होत असे. ह्या गालिच्याला म्हणजेच त्या रोपांना आमच्याकडे 'आवण' म्हणतात. हे आवण तयार होईपर्यंत पाऊस चांगलाच जोर धरत असे. आवणाच्या शेतात बांध बांधला जाई त्यामुळे त्या शेतात पाणी साठून रोप चांगले वाढत असे.
एकदा का हे आवण तयार होत आले म्हणजे, ते इतर शेतांमध्ये रुजण्याएवढे वाढले, की इतर नांगरलेल्या शेतांमध्ये आळी फिरविली जात. आळी म्हणजे नांगराला फळी बांधून त्याने नांगरलेले शेत सपाट म्हणजे ढेपळे सारखी केली जात. फळी नसेल तर मोठ्या झाडाची एखादी मजबूत फांदी तोडून ती लावली जात असे. ह्या आळीवरती वजन ठेवणे आवश्यक असे. मग त्यावर एखादा मोठा दगड बांधला जाई किंवा घरातील लहान मुलांना बसविले जाई. आमच्या शेतांमध्ये आळी कधी फिरवायची ह्याची मी वाटच पाहत असे आळीवर बसण्यासाठी. मस्त गाडी गाडी खेळल्याची मजा यायची. सोबत ढवळ्या-पवळ्या व त्यांचा मालक कधी त्यांना ओरडत तर कधी मायेने गोड बोलून त्यांच्याकडून आळी फिरवून घेत. आळी फिरवताना पाऊसही यायचा. नाहीच आला तरी शेतातील चिखलयुक्त पाणी भिजवायचेच मला. पण तेव्हा कुठे त्याची तमा असे?
शेतांना आळी फिरवून झाली की लावणीची लगबग चालू होत असे. लावणी चालू झाली म्हणजे घरात काहीतरी सणवाराची लगबग आहे असे वाटे. लावणीच्या हंगामात आई शाळेला सुट्टी घ्यायची आठवडाभर. कारण शेतावर लावणीसाठी मजूर बायका-माणसे येत. घरातही आई-आजीची कामे उरकण्याची घाई होत असे. त्यांच्या चहा-पाण्याची सोय करावी लागे. आम्ही घरातील सगळेच ह्या माणसांबरोबर शेतात उतरायचो. कोणतेही शेताचे काम चालू करताना पहिला नारळ फोडून 'शेत चांगलं पिकू दे,' म्हणून देवाला प्रार्थना केली जात असे व गोड प्रसाद वाटला जात असे. पहिला आवण खणण्याचा म्हणजे रोपे उपटण्याचा कार्यक्रम असे. आवणाच्या शेतात उतरण्या आधी वडील नारळ फोडत व सगळ्यांना जिलबी किंवा म्हैसूर वाटत. सगळ्यांचे तोंड गोड झाले की आवण उपटून त्यांची हातात मावेल इतकी जुडी बांधली जायची. त्याला आम्ही गुंडी किंवा मूठ म्हणायचो. शेतांमध्ये ढोपरापर्यंत पाणी असे. ह्या गुंड्या बांधून त्याच शेतात टाकायच्या व पुढे आवण उपटत जायचे. मागे राहणार्‍या गुंड्या पाण्यावर तरंगत असतात. आवण खणताना एक वेगळाच सुगंध येतो भाताच्या रोपाचा. तेव्हा तो नेहमीचा वाटे पण आता कुठे आला तर जुन्या आठवणींनी मन गलबलून जाते. एकदा का आवण खणून झाले की मुठी मोठ्या टोपलीत गोळा केल्या जात व इतर शेतांमध्ये अंतरा-अंतरावर फेकल्या जात. हे फेकाफेकीचे काम करण्यातही मजा यायची. कधी कधी सैल बांधलेली मूठ फेकताना सुटून पसरत असे. मग ती तुझी, ती अमकीने बांधलेली असेल असा बायकांचा आरडाओरडा चालत असे. कोण काम जलद करतं, कोण हळू करतं ह्यावरही कुजबुज होत असे. ह्या दिवसांमध्ये पाऊस दिवसरात्र पडायचाच. मजूर मेणकापडाचे डोक्यावर टोक (टोपीसारखे बांधून) बांधून अंगभर झग्यासारखे सोडायचे. आई-वडील रेनकोट घालायचे. मलाही रेनकोट होता पण मला त्या मजुरांसारखा पोषाख आवडायचा म्हणून मी मिळेल ते प्लॅस्टिकचे कापड घेऊन त्यांच्यासारखे हट्टाने बांधून घ्यायचे. जोराचाच पाऊस आला की आई घरी जायला सांगायची पण मी कुठल्यातरी झाडाखाली जाऊन बसत असे.
मुठी फेकून झाल्या की लावणीला सुरुवात व्हायची. लावणी करायला मला खूप आवडायची. मला लावणी ताला-सुरात केल्या सारखी वाटे. मनोरंजनासाठी बायका गाणी गात तर कुठल्या गोष्टी सांगत, नाहीतर कोणाला भूत दिसले, कोणी कोणाला मारले, कोणाची सासू छळते, कोणाची सून भांडखोर आहे, अशा खबरांची बरसात चालू असे. पण माझे विश्व वेगळेच असे. मी कधी कलात्मक रोपे खोचत असे. मग घरातील, मजूर लोक माझे कोडकौतुक करत की किती भराभर लावते, किती छान लावते, हिनेच अर्धे शेत लावले. तेव्हा मला ते खरेच वाटायचे. ही रोपे जमिनीत रोवताना कधी कधी टणक मातीमुळे बोटे दुखायची. पण कोणाला सांगायचे नाही, नाहीतर ही मौज करायला मिळणार नाही, आपले कौतुक होणार नाही! रोपे लावून कंटाळा आला की शेताच्या बांधावरच्या मातीने भातुकलीची खेळणी बनवायची, तसेच शेतातल्या चिखलात मनसोक्त खेळायचे. कधी त्यात उड्या मारायचे तर कधी थेट शेतात बसून पोहण्याची नक्कलही करायचे. हे पाहून मात्र घरच्यांचा ओरडा मिळायचा. मग तात्पुरते बंद करायचे. त्यांचे लक्ष नसले की परत चालू करायचे. शिवाय शेतात माखून झाल्यावर आमच्या विहिरीला जो थाळा होता त्या थाळ्याच्या स्वच्छ व गार पाण्यात चिखल काढण्यासाठी डुंबायला मिळायचे.
शेतावर काम करणार्‍या मजुरांसाठी सकाळी व दुपारी चहा व नाश्ता म्हणून टोस्ट किंवा बटर आणायची आई. हा चहा आणि खाऊ पावसापासून बचाव करत शेतावर आणावा लागे. मग एका झाडाखाली बसून सगळ्यांना चहा आणि टोस्ट किंवा बटर वाटले जात. हे वाटताना तसेच खाताना झाडाचे टपोरे थेंब मात्र चहा तसेच टोस्ट बटरांवर पडत. चहात टाकण्याआधीच ते थोडे नरम होत. त्याची एक वेगळीच मजा आणि चव लागायची. मला ती आवडायची.
ही अशी वर्षाऋतूतील लावणी आठवडाभर चाले. पावसातली शेतावरची मौज त्या ८-१० दिवसांत मी अगदी पुरेपूर करून घेत असे. ह्या दिवसांत रात्री जास्त अभ्यास करावा लागे.
शेतीची लावणी झाली तरी वर्षाऋतूचा आनंद त्याच्या समाप्तीपर्यंत मी लुटत असे. आमच्या घरासमोरच मुख्य रस्त्याला लागून विरा (समुद्राला मिळणारा मोठा नाला) आहे. हा विरा धोधो पावसात तुडुंब भरून वाहत असे व त्याचे रस्त्यावर गुडघाभर पाणी साचत असे. हा वाहणारा विरा माझ्या मौजेसाठी वरदानच असे. ह्या तुडुंब वाहणार्‍या विर्‍यामुळे शाळेत जाताना त्या डोफाभर पाण्यात डुबुक डुबुक करत चालण्याचा आनंद मिळायचाच शिवाय भिजल्यामुळे शाळेतून शिक्षकही घरी लवकर सोडायचे. कधी कधी तर पावसाने जास्तच जोर धरला तर घरातूनच मला शाळेला सुट्टी मिळे, कारण विर्‍याच्या पाण्याला लोट येत असे. माणसे विर्‍याच्या दिशेने खेचली जायची म्हणून आई-वडील मला शाळेत पाठवायचेच नाहीत. मग काय दिवसभर पावसाची मजा अनुभवायची. अंगणासमोरच्या जमलेल्या पाण्यात होड्या सोडायच्या, शेवंती, अबोली, जास्वंदी, मोगरा ह्या सारख्या झाडांची बोखे, फांद्या तोडून पावसात लागवड करायची. आईला सुट्टी असेल तर आई अशा गारेगार वातावरणात गरम गरम बटाटेवडे, कांदाभजी बनवायची. ते खाण्याच्या मजेचे काही वर्णन करायलाच नको.
पाऊस सुरू झाला म्हणजे पावसाची मोठी आठवण म्हणजे बाहेर तसेच घरात फिरणारी जनावरे. आमच्या घरात दरवर्षी न चुकता सूर्यकांडार येत असे. कधी कधी वडील, भाऊ आजूबाजूच्या लोकांना बोलवून त्यांना मारत असत तर कधी त्यांना जीवनदान देत असत. लहान असताना पावसाळ्यातल्या ह्या सूर्यकांडारींची मात्र मला भीती वाटायची. कारण ही चावली तर सूर्य उगवायच्या आत माणूस मरतो, हे मनावर बिंबले होते. तसे इतर सापही असायचे फिरत आजूबाजूला. अजूनही असतात. त्यात नाग, अजगर, फुरशा, धामण, पाणशिरडा, नानेड्या ह्यांचा समावेश असायचा. ह्यांची कधी जास्त भीती वाटली नाही. त्यातले पाणशिरडा आणि नानेड्या हे तर निरुपद्रवीच.
पावसात एक खेळ असायचा तो म्हणजे अंगणात येणार्‍या खेकड्यांना कोणाकडून तरी पकडून घेऊन त्यांना दोरा लावायचा आणि आपल्याला हवे तिथे फिरवायचा. पाणी डबक्यात, शेतात साठले की बेडकांची डराव-डराव रात्री चालू होत असे. पावसाळ्यात दिवे लागले की पंखवाल्या माश्या घराचा ताबा घेत. ह्या खूप सतावायच्या. ह्यांच्या बंदोबस्तासाठी आई बल्ब/ट्यूब खाली परातीत पाणी ठेवत असे. मग बल्ब/ट्यूबचे प्रतिबिंब पाण्यात पाहून माशा त्या पाण्यात पडून मरायच्या. डासांसाठी धुरी केली जायची. ह्या धुरीत धूर होण्यासाठी ओले गवत टाकले जायचे. त्याचा एक विशिष्ट वास यायचा.
पावसात येणारे सुखद कीटक म्हणजे काजवे. हे काजवे रात्री झाडावर दिवाळीच्या लाइटिंग प्रमाणे झगमगत. त्यांचा तो हिरवा कंदील मला अजून मोहक वाटतो. पूर्वी त्या बिचार्‍या काजव्यांना पकडून मी काचेच्या छोट्या डबीत ठेवत असे तर कधी त्यांचा प्रकाश पाहण्यासाठी पूर्ण काळोख करत असे.
असा हा वर्षाऋतू. अजूनही आठवणी थांबवायला मन तयार होत नाही. खूप काही लिहावंस वाटतं. पावसाळ्यातला हिरवागार होणारा निसर्ग, चिखलात उगवणारी कमळे, विर्‍यांतून शेतात येणारे मासे, पावसात हाताने पाणी काढता येईल इथवर भरणारी विहीर, उगवणारी रानफुले व ती गोळा करण्याचा माझा छंद, पावसाळी भाज्यांची लागवड, करांदे, हळदी अशी कंदमुळे खणणे, पावसाळी रानभाज्या, पावसातली ओली प्राजक्ताची फुले, मला घाबरवणारा विजांचा गडगडाट, सोसाट्याचा वादळी वारा, टप टप पडलेल्या गारा, पावसातले सणवार आणि अजून कितीतरी गोष्टी वर्षाऋतूने माझ्या सुखद आठवणींच्या गाठोड्यात जोपासून ठेवल्या आहेत.
सौ.प्राजक्ता म्हात्रे
मायबोली दिवाळी अंक २०१४ मध्ये प्रकाशीत