गुरुवार, ३० जून, २०१६

जीवाभावाचा पार

आमचा उरणचा कुंभारवाडा अजूनही झाडाझुडपांच्या सावलीत आहे ही एक सुखद गोष्ट आहे. आमच्या वाडीतील घराभोवतीही काही जुनी झाडे आहेत. त्यातच घराच्या बाजूलाच एक पुरातन आंब्याचे झाड आहे. आम्ही १२ वर्षापूर्वी इथे नवीनच राहायला आलो तेव्हा माझ्या सासर्‍यांनी त्या आंब्याच्या झाडाला एक मोठा पार बांधून घेतला.आता हा पार म्हणजे आमची एक जीवाभावाची वास्तूच झाली आहे. आम्ही जॉइंट फॅमिली असल्याने हा पार म्हणजे मोकळ्या हवेतील आमच्या कुटुंबाचे स्नेहसंमेलनाचे ठिकाण म्हणा किंवा आमचा कट्टा म्हणा. घरातील लहान मुलांसाठी हा पार म्हणजे जणू मामाचे गावच.
झाड पुरातन आणि मोठा असल्याने पारावर गार सावली पहुडलेली असते. सुट्टीत आमच्या घरातील बच्चे कंपनी ह्या पारावर अनेक खेळ खेळतात. आंब्याच्या फांदीला बांधलेल्या दोरीच्या झोपाळ्यावर माझ्या मुली श्रावणी आणि राधा मनमुराद झोके घेतात. दोघी लहान असताना त्यांना भरवण्याचा कार्यक्रम बर्‍याचदा ह्याच पारावर चिऊ काऊ दाखवत व्हायचा. पुतण्या अभिषेक फुटबॉल व क्रिकेट खेळताना पार बॉल अडवून खेळाचा आनंद लुटत असतो. मधून मधून संध्याकाळी आम्ही घरातील सर्व मंडळी पारावर एकत्र बसून चणे, शेंगदाणे, भेळ भेळीचा बेत करतो व खात गप्पा मारत बसतो तेव्हा तो पारही सगळ्यांना एकत्र भेटून सुखावतो. महिन्यातून एकदा तरी रविवारी आम्ही पारावर एकत्र जेवायला बसतो. ह्या वनभोजन आणि सहभोजनामुळे जेवणाला वेगळाच आनंद व रुचकरपणा येतो.
घरात काही मोठे कार्यक्रम म्हणजे लग्न, बारशांसारखे असले किंवा मोठ्या प्रमाणात पाहुणे आले की ह्या पाराचा आम्हाला मोठा आधार असतो. मोठ्या प्रमाणात बाहेर बनणार्‍या जेवणाची तयारी ह्या पारावरच चालू असते. जेवण तयार झालं की सगळं जेवण पारावरच ठेवून पाराच्या समोरच्या भागात टेबल खुर्च्यांच्या पंगती मांडल्या जातात.
आमच्या गैरहजेरीत पारावर पशू पक्षी बागडत असतात. ह्याच आंब्याच्या झाडावर अनेक ढोली आहेत ज्यात ह्या साळुंख्याची कुटुंब राहतात. त्यामुळे त्यांचे संवाद त्यांची भांडण, त्यांचा लाडिकपण सगळाच ह्या पारावर चालू असतो. इतर अनेक पक्षांची हजेरी पारावर लागत असते.
असा हा आमचा जिव्हाळ्याचा पार सगळ्यांना गुण्या गोविंद्याने नांदवून घेणारा, कधी कंटाळा आला, मूड नसला, थकवा जाणवत असला की ह्या पारावर शांत जाऊन बसलं की ह्या पाराच्या सहवासात तो थकवा दूर पळून जातो. नवीन उत्साह निर्माण होतो.


Displaying DSC04005.JPG

Displaying DSC04005.JPG

मौज गणेशोत्सवाची

वळणदार सोंड, मोठाले सुपासारखे कान, बोलके आणि हसरे डोळे, चार हात आणि त्या हातात असणार्‍या वस्तू, मुकुट, पितांबराचा आकर्षक रंग, पुढ्यात बसलेले पिटुकले उंदीरमामा, कलाकुसर केलेली मखर अशा वैविध्यतेमुळे अगदी बालपणापासूनच बाप्पा आवडीचे. तशी काही माझी चित्रकला छान नव्हती पण चित्र काढायची समज आली तेव्हा बाप्पाचे खूप वेळा चित्र रेखाटले असेल. मला त्याची वेगवेगळी रूपं काढायला आवडायची. विशेष भर दिला जायचा कान, सोंड आणि मुकूटावर. गणपतीच्या दिवसांत येणार्‍या अंकातील, वर्तमान पत्रातील गणपतीचे फोटो पाहून तसे चित्र काढण्याचे प्रयत्न करायचे. मला वाटतं माझ्यासारखे बालपणी सगळ्यांनाच असे वाटत असावे.
माझ्या चुलत काकांच्या घरी आमच्या कुटूंबातील गणपती असल्यामुळे आमच्या घरी कधी गणपती बसवला नाही. त्यांच्याकडे राहण्याची सोय नसल्याने आम्ही बाप्पाचे दर्शन घेऊन परत येत असू. मला खूप वाटायचे की आपल्या घरी पण गणपती बाप्पाची स्थापना करावी. मी दर वर्षी आई-वडिलांकडे हट्ट करायचे की आपल्या घरी गणपती मांडूया. मग माझी समजूत घालण्यासाठी माझे वडील आमच्या हॉलमध्ये टेबल मांडून त्यावर घरातील गणपतीची तसबीर काढून लावायचे. बाप्पा समोर फळं, मिठाई मांडून ठेवायचे. आई हार घालून पुजा करायची. मला त्याने उत्साह येई आणि मी मग सजावटीचे काम करायचे. मखर करायला जमण्यासारखे नव्हते..मग चकाकीचे किंवा डिझाईनचे पेपर पाठी आणि टेबलला चिकटवायचे, कुंड्या बाजूला मांडायच्या. घरासमोर प्राजक्ताचा सडा असायचाच, मग ह्या फुलांच्या माळा करुन त्या पाठी सोडायच्या..असे करुन मी बाप्पा आपल्या घरी असल्याचे समाधान मानायचे. आई-वडील आरतीही करायचे मला घेऊन. आमच्या घरात मग हा बाप्पा पाच दिवस बसायचा टेबलवर. पाच दिवस झाले की वडील पुन्हा त्याला देवघरात त्याच्या स्थानी नेऊन बसवायचे.
टेबल वरून अजून एक आठवण झाली. आमच्या घरात एक टेबल होतं, त्याला मध्ये आरसा व बाजूला दोन खण होते. ते टेबल दरवर्षी आमच्याकडून गावातील एका कुटूंबात गणपती स्थापनेसाठी नेलं जायचं. त्या टेबलला आम्ही 'गणपतीचं टेबल' म्हणूनच नाव ठेवले होते.
गणपतीच्या दिवसांत आई-वडिलांबरोबर ओळखीच्या लोकांकडे गणपती बाप्पा पाहायला जायचे. प्रत्येकाचे वेगवेगळे रूप मनाला भावायचे. माझ्या आईचे शिक्षण तिच्या मामांच्या घरी झाले. गणेशोत्सवात आई एक दिवस राहण्यासाठी तिच्या मामांकडे वरळीला नेत असे. तो प्रवास मला आवडायचा. कारण उरण वरून मोरा बंदराला जाऊन लाँच मध्ये बसायचं, मग धक्क्यावर उतरलं की वडील मला आइस्क्रीमचा कप आणून द्यायचे. जाता-येता हा आइसक्रीमचा कप मला मिळायचा. आता रोज आइस्क्रीम मिळतं, पण तेव्हा दुर्मिळ असणार्‍या त्या आइस्क्रीमची चव अजून जिभेवर आहे.
वडील मुंबईतील बरेचसे सार्वजनिक गणपती आम्हाला दाखवायचे. त्या सार्वजनिक गणपतीचे देखावे, चलचित्र पाहण्यासाठी रांगेत उभे राहावे लागायचे. ते पाहण्यासाठी मला मुंबईला जायला खूप आवडायचे. आईच्या मामांच्या घरच्या गणपतीलाही मला खूप प्रसन्न वाटायचे व तिथली रात्र मला आवडायची. कारण रात्री तिथे मामांची लेक व जावई फुलांची कंठी, हार करत बसायचे, दूर्वा निवडायचे. पुठ्ठ्यावर ते दोर्‍याने सायलीच्या, चमेलीच्या कळ्या ओवून कंठी तयार करत. ते पाहण्यात, फुलांचा सुगंध अनुभवण्यात मी दंग व्हायचे.
आमच्या गावामध्ये माझी मावस बहीण राहते. तिच्या घरी गणपती असे. जरा मोठी झाल्यावर मुंबईचे दिवस सोडले तर बाकीचे दिवस मी ह्या मावस बहिणीकडे गणपतीची मौज करायला जात असे. तेव्हा गणपतीच्या पहिल्या दिवशी ताकीद असे की चंद्र पाहायचा नाही म्हणून..त्या दिवशी फक्त संध्याकाळपर्यंत जायचे. बाकी इतर दिवशी संध्याकाळ पासून रात्री १२-१ पर्यंत जागरण करायला मी तिथे थांबत असे. तेव्हा जागरणात आम्ही बायका व मुली मिळून झिम्मा, फेर, फुगड्या खेळायचो. फुगड्या खेळताना वेगवेगळे उखाणे घेतले जायचे, त्यातला आता एकच आठवतो.
'चुलीत भाजला पापड पापड .... चा नवरा माकड माकड' हाहा
झिम्म्यासाठी पुढील गाणे वेडे वाकडे आठवते ते असे. तुम्हाला परफेक्ट माहिती असेल तर नक्की प्रतिसादात टाका.
आंबा पिकतो, रस गळतो
कोकणचा राजा झिम्मा खेळतो
झिम पोरी झिम
कपाळाचा झिम
झिम गेला उडून
पोरी आल्या रुसून
सर सर गोविंदा येतो
मजवर गुलाल फेकीतो,
या रे गुलालांच्या लाल
आमच्या वेण्या झाल्यात लाल
घडव घडव रे सोनारा
माणिक मोत्यांच्या बिल्वरा
बिल्वराला खिडक्या
आम्ही बहिणी लाडक्या
लाड सांगू बाप्पाला
मोती सांगू काकाला
आता पुढचे आठवत नाही.
हे सगळे करताना मध्ये एक जण झांझर तर एक जण ढोलकी घेऊन वाजवत बसे त्या तालावर आम्ही फेरही धरत असू. फेर धरताना पुढील गाणे असायचे. अर्धवट येतेय ते लिहिते.
गणपती देवा, पडते मी पाया, काय मागू मागणं रे
काय मागू मागणं रे देवा, काय मागू मागणं रे ?
गळ्यातलं मंगळसूत्र अखंड राहूदे, हे माझं मागणं रे
हेच माझं मागणं रे देवा, हेच माझं मागणं रे
गणपती देवा, पडते मी पाया ...........
हातातला चुडा अखंड राहूदे, हेच माझं मागणं रे
हेच माझं मागणं रे देवा, हेच माझं मागणं रे
गणपती देवा, पडते मी पाया ...........
कपाळीच कुंकू अखंड राहू दे, हेच माझं मागणं रे
हेच माझं मागणं रे देवा, हेच माझं मागणं रे
गणपती देवा, पडते मी पाया ...........
पायातले पैंजण अखंड राहू दे, हेच माझं मागणं रे
हेच माझं मागणं रे देवा, हेच माझं मागणं रे
गणपती देवा, पडते मी पाया ...........
पायातली जोडवी अखंड राहू दे, हेच माझं मागणं रे
हेच माझं मागणं रे देवा, हेच माझं मागणं रे
गणपती देवा, पडते मी पाया ...........
हे गाणं तेव्हा फेर धरण्यासाठी म्हणून गायचो. तेव्हा त्याचा अर्थ कळत नव्हता आता तो समजतोय काय आहे ते स्मित
त्यानंतर कोंबडा - अक्का बाईचा कोंबडा पाटी खाली झाकला (पुढे कोणीतरी कंटिन्यू करा स्मित)
मग पिंगा, बसफुगडी. बसफुगडीला काहीतरी बसफुगडी पाय लंगडी असे गाणे असे.
बायकांचे खेळून झाले की पुरुष वर्गही मजा करत असे. तेव्हा पत्त्यांचे एवढे सोंग नव्हते. पुरुष मंडळी, तरुण मुले ढोलकी वाजवीत बाल्या डान्सही करत. नंतर गप्पा गोष्टी रंगत कधी बाप्पाच्या, तर कधी भुताखेताच्या हाहा
असे पाच दिवस मजा करत घालवले की मग विसर्जनाचा दिवस. हा दिवस मला खूप आवडे कारण आमच्या गावातल्या गणपतींचे विसर्जन समुद्र किनारी होत असे. तेव्हा समुद्र किनारी जाण्यासाठी आम्हाला विर्‍यातुन जावे लागे. तेव्हा विरा पाण्याने भरलेला असायचा. अश्या पाण्यातून फ्रॉक सावरत तर कधी त्याची पर्वा न करता डुबुक डुबुक करत जायला मला खूप आवडे. तेव्हा गावात फक्त ४ गणपती होते. सगळे गणपती एकत्र निघत आणि गणपती बाप्पा मोरया च्या गजरात विसर्जनास निघे. कधी कधी पाऊसही पडे, माझ्या उत्साहाला मग अजूनच उधाण. समुद्र किनारी गेल्यावर बाप्पाची आरती होई आणि मग प्रसाद वाटला जाई. हा प्रसादही कधी कधी पावसामुळे हातात भिजून जायचा व तसा भिजलेला प्रसाद खायलाही मजा येई.
लग्न झालं आणि सासरी आले. इथे मात्र माझी घरात गणपती असण्याची इच्छा पूर्ण केली बाप्पाने. सासरी नवसाचा म्हणून साखरचौथीचा गणपती मांडला जातो.  आता गणपतीच्या दिवसांत मला ती रुखरुख लागत नाही.
काळ बदलला तशी त्या काळची मौजही बदलत चालली आहे. हल्ली विभक्त कुटूंब पद्धतीमुळे घराघरांत गणपती आणला जातो. एकमेकांकडे जायला सवडही मिळत नाही. जागरणांसाठी काही ठिकाणी जुगार वाढू लागला आहे. छोटी मुले मोबाईल, काँप्युटर वर गेम खेळत जागरण करतात. पूर्वीचे फेर, झिम्मा आता लयाला चालले आहेत. आत्ताचा तरुण वर्ग बाल्या डान्स करू शकेल का हा प्रश्न पडतो आहे. पूर्वी गावातील गणपती एकत्र जायचे म्हणून एकमेकांसाठी थांबायचे. आता घराघरांत गणपती झाल्याने गर्दी वाढेल म्हणून आपला गणपती लवकर काढू ह्या धांदलीत गणपती बाप्पाच्या विसर्जनाचा दु:खमिश्रीत आनंद आपण गमावत चाललो आहोत.
हे झाले माझे अनुभव आणि मतं. सगळ्यांनाच असे अनुभव येत असतील असं नाही. शेवटी जमाना बदलतोय तसा गणेशोत्सवातही बदल होणारच. आनंदाची माध्यमं ही बदलत जाणारच. मात्र हे वाक्य कधीच बदलणार नाही -
"गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या!".
(मायबोली गणेशोत्सव २०१२ मध्ये प्रकाशीत)

स्वयंपाकातील विठोबा

प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलही गळे! पण मला माझ्या आवडत्या पाट्यावरवंट्याच्या बाबतीत एक म्हण तयार करावीशी वाटते - पाट्यावरवंट्यावर जिन्नसे रगडिता रूचिरस पाझरे'. हसू नका, पण बिचार्‍या पाट्यावरवंट्यावर मी कुठले गाणे ऐकले नाही, कुठली चांगली म्हण ऐकली नाही, म्हणून हा प्रयत्न.
पाट्यावरवंट्याची जोडी दिसायला काळी कुळकुळीत. जणू विठोबारखुमाईची जोडी. पाट्याचा आकारही मंदिरासारखा किंवा कौलारू घरासारखा. वरवंटाही अगदी लांबट गरगरीत. पूर्वी प्रत्येकाच्या घरात त्यांच्या ऐपतीनुसार किंवा आवडीनुसार पाट्यावरवंट्याचे छोटे किंवा मोठे आकारमान ठरलेले असायचे.
लहानपणी या पाट्यावरवंट्याचा बराच सहवास लाभला आहे. अगदी कळत नव्हते तेव्हा, बालपणात म्हणाल तर कुठलातरी पाला वाडीतून आणायचा आणि पाट्यावर वाटून ती मेंदी आहे का, रंग येतो का ते पाहायचं, कारण मेंदीची पानेच तेव्हा ओळखता यायची नाहीत. काही दिवसांनी मेंदीच्या पानांचा शोध माझ्या बालदृष्टीस लागला आणि त्यावर मी माझ्या इवल्याश्या बोटांनी मेंदीचा पाला रगडू लागले. तेव्हा खरंतर वरवंटा हातात यायचा नाही. जड असल्यानं फार कष्टानं तो उचलून घ्यायचा. कधीकधी ठेचताना हाताची बोटे वरवंट्याखाली सापडायची. कळ यायची पण मेंदीचा रंग ती कळ सुसह्य करायचा. रंग येण्यासाठी त्यात काथ, लिंबूरसही वाटायला घेत असत. मेंदीचा पाला वाटत असतानाच हात लाल होऊन जायचे. आताच्या बाजारी मेंदीपेक्षा तो वाटलेल्या मेंदीचा सुगंध, रंगच काही और असे.
pata-1.png
आई पाट्यावर वाटण वाटायची. ते पाहत असताना मलाही अनुकरण करावेसे वाटे. वरवंटा धरण्याइतपत हातात बळ आले तेव्हा कधीतरी चटणी वाटायला घ्यायचे. चटणीत कैरी / हिरवी चिंच किंवा करवंद, खोबर्‍याचे तुकडे किंवा खरवडलेले खोबरे, जाड मीठ, मिरची घ्यायचे. पहिले खोबर्‍याचे तुकडे ठेचायचे, मग त्यावर मिरची, कैरी / हिरवी चिंच किंवा करवंद, मीठ टाकून सगळे एकत्र ठेचायचे. मग ते सर्व जिन्नस पाट्याच्या खालच्या बाजूला घेऊन वरवंट्यानं घसपटून वाटत वरच्या भागावर न्यायचे. एकदा वाटून चटणी बारीक व्हायची नाही. मग परत वरचे वाटण खाली घेऊन अजून एकदोनदा वाटून ही चटणी बारीक वाटायची. ही चटणी आठवूनच तोंडाला पाणी सुटतं.
भाजी आणि मासे, मटणाच्या रश्शाचे वाटणही या पाट्यावर वाटल्यानं अगदी चविष्ट लागायचं. भाजी आणि माश्यांसाठी खोबरं, मिरच्या, आलं, लसूण हे सगळं एकत्र वाटून वाटण केलं जायचं, मटणासाठी, चवळी, छोले या भाज्यांसाठी आलं-लसूण असं वेगळं वाटण केले जायचं, तर अजून अख्खे कांदे आणि सुक्या खोबर्‍याची वाटी चुलीत भाजून दोघांचे एकत्र वाटण केले जायचे. भाजलेलं सुकं खोबरं ठेचताना मध्येच एखादा तुकडा तोंडात टाकायचा छंद होता मला. मग त्या खोबर्‍याची अप्रतिम चव वाटण कमी व्हायला कारणीभूत असायची. चुलीत भाजल्यानं कांदा-खोबरं काळं झालेलं असे. त्यामुळे हातही काळपट व्हायचे. मला गंमत वाटायची ती वाटण करून झाल्यावर आई जे पाट्यावरवंट्याला लागलेलं वाटण पाण्यानं काढायची त्याची. अर्धी वाटी वगैरे पाणी वरवंटा पाट्यावर ठेवून प्रथम वरवंटा तेवढ्याश्या पाण्यात धूत असे. मग तेच पाणी पाट्याच्या सर्व दिशांनी हातानं सरकवून वाटण गोळा करत ज्या बशीत वाटणाचा गोळा ठेवलेला असे, त्याच वाटीत ढकलत असे. मी याचं नंतर अनुकरण करू लागले.
pata3.jpg
उन्हाळ्यात चिंचा तयार होऊन काटळून (काटळून म्हणजे चिंचेतील बिया काढणं) झाल्या की त्याचे आई-आजी मीठ लावून गोळे करत असत. चि़ंचेच्या गोळ्यांसाठी जाड्या मिठाचा वापर करतात. हे जाडं मीठ आई-आजी पाट्यावर जाडसर वाटायच्या. मीपण हे मीठ वाटताना पाट्यावर मिठात हात घालून लुडबूड करायचे. पाट्यावरच्या खरडलेल्या मिठाचा तो खरखरीत स्पर्श कोवळ्या हातांना टोचणारा, पण सुखकारक वाटायचा. याच पाट्यावर आई-आजी चिंचेचे गोळे वळायच्या.
साबुदाण्याच्या खिचडीसाठी किंवा इतर कशासाठी लागणारा शेंगदाण्याचा कूट पाट्यावर छान भरडून निघत असे. थोडा जाडसर कूट असेल, तर अजून मजा यायची. भरडताना भाजलेल्या शेंगदाण्यांचा येणारा खरपूस वास त्या पाट्यालाही काही काळ बिलगून राही.
दिवाळीत साठ्याच्या करंज्या करतानाही करंजीचे पीठ कुटण्यासाठी पाट्यावरवंट्याचा उपयोग केला जायचा. अजून उपयोग व्हायचा, तो म्हणजे पापडाचे पीठ कुटण्यासाठी. हे काम भाऊ किंवा वडील किंवा आजूबाजूची एखादी दणकट बाई करायची. कारण हे ताकदीचं काम असायचं. पण सगळ्याच कामात लुडबुडायचं, ही सवय असल्यानं मीपण मध्येमध्ये बिचार्‍या पिठावर घाव घालायचा प्रयत्न करायचे. पण फार कठीण काम आहे, हे समजून पाय मागे घ्यायचे. पापडाचे घट्ट मळलेले पीठ कुटूनकुटून घेऊन ते जरा मऊ व्हायचे. मग त्याच्या लाट्या करून त्याचे पेढे, म्हणजे छोटे गोळे कापून पापड केले जायचे.
घरात कधी अक्रोड, बदाम सापडले की ते जाऊन पाट्यावरच वरवंट्याने फोडायचे, झाडावर येणारे गावठी बदामही लाल होऊन झाडावरून पडले, की ते आणून पाट्यावर फोडून त्यातली बी, म्हणजे गर खायचा. या बदाम फोडण्यानं पाटा लाललाल होऊन जात असे. पण पाट्याला चिकटलेला चिमूटभर गर खाण्यानंही परमानंद मिळत असे.
ही पाट्यावरवंट्याची जोडी नुसती अन्नपूर्णादेवीचीच मदत करत नसे, तर घरात कोणाला दुखलंखुपलं की झाडपाल्याची औषधं ठेचून, रगडून प्रथमोपचाराचं कार्यही करत असे. वैद्यकीयदृष्टीनं म्हणाल, तर घरातील बायकांना वेगळा व्यायाम करण्याचीही गरज भासत नव्हती. पाट्यावर वाटण वाटण्यासाठी लाइटची नव्हे तर श्रमाची गरज असे. त्यामुळे पंधरा मिनिटं पाटा-वरवंटा छान व्यायाम करवून घ्यायचा.
पूर्वी या पाट्यावरवंट्याचा धाकही असे घरोघरी. राग आला, की पाट्यावर ठेचून काढेन/आपटेन, वरवंटा घालेन डोक्यात/टाळक्यात अशा धमक्या घराघरातून ऐकू यायच्या.
पाट्याचा भरपूर वापर झाला, की पाट्याची टाकी, म्हणजे धार कमी होत असे. आठवड्यातून किंवा पंधरा दिवसांतून एकदातरी त्या काळी पाथरवट, किंवा पाट्याला टाकी लावणारे दारावर येत असत. त्यांची "टाकीयेsssssss " अशी हाक ऐकू आली की आई त्यांना बोलवून पाट्याला टाकी लावून घेत असे. ही टाकी लावणारा एक लोखंडी जाड तासणी पाट्यावर ठेवून त्यावर हातोडीनं ठकठक करत ठोकून गाळलेल्या जागा भराच्या तुटक रेषांप्रमाणे पूर्ण पाट्यावर टाकीच्या रेषा ठोकत. हे बघताना मला तसं करण्याची फार इच्छा होई. मी कधीतरी खेळ म्हणून आमच्या घरातली तासणी घेऊन हातोड्यानं तासणी पाट्यावर ठोकायचा प्रयत्न करायचे. पण पाटा फार शिस्तीचा कडक होता. ज्याचं काम त्यानंच करावे, या तत्त्वाचा. माझ्यासाठी कध्धीकध्धी त्यानं नरमाई म्हणून घेतली नाही आणि मला कधी एका शब्दाचीही गाळलेल्या जागेची रेषा बनवता आली नाही.
वयोवृद्ध पाटा कुटुंबाची सेवा करूनकरून मधून झिजायला लागायचा. पण तो आपलं कार्य शेवटपर्यंत सोडत नसे. स्वतःला मधून खड्डा पडला, तरी खालच्या किंवा वरच्या बाजूनं चांगले वाटण करून गृहिणीला आधार देत असे.
धार्मिक कार्यातही पाट्यावरवंट्याला घरच्या थोरामोठ्यांप्रमाणेच अगदी मानाचं स्थान असते. बारशात पाट्यावरच पाचवीचं पूजन केलं जातं. पिठाचे दिवे, मोदक, थापट्या, लाट्या ठेवून पाचवी पुजली जाते. बारशाला बाळाला पाळण्यात घालण्यापूर्वी वरवंट्याला कापड गुंडाळून, चेन घालून बाळाप्रमाणं नटवूनथटवून, त्याला पाळण्यात झोपवून, त्याचे लाड केले जातात. मग 'गोविंद घ्या, माधव घ्या'च्या पहिल्या राउंडला या वरवंट्याला बाळाप्रमाणे अलगद उचलून, खालीवर करून नामकरणाच्या विधीतही समाविष्ट केलं जातं.
अशी ही पाट्यावरवंट्याची जोडी आता नामशेष होत चालली आहे. त्याची जागा आता स्वयंपाकघरात अगदी ओट्यावर मिक्सरनं घेतली आहे. आजच्या धावपळीच्या जीवनात गरजच आहे या उपकरणाची. पण मला अजूनही त्या पाट्यावरवंट्याचं फार आकर्षण आहे. म्हणून आमच्या पडवीत मी अजून हा पाटावरवंटा जतन करून ठेवला आहे. वर्षातून एकदादोनदातरी वेळ मिळेल तेव्हा आणि लहर येईल तेव्हा मी या पाट्यावरवंट्यावर वाटण वाटते. साठ्याच्या करंजीचे पीठही मी दिवाळीत या पाट्यावरवंट्यावर कुटते. असं पीठ कुटताना किंवा वाटण वाटताना या स्वयंपाकातील विठोबासोबत बालपणात, रम्य वातावरणात गेल्यासारखं वाटतं.

सौ. प्राजक्ता पराग म्हात्रे

नक्की शेयर करा पण प्लिज नावासकट. हा लेख लोकसत्ता  च्या वास्तुरंग या पुरवणीत पूर्वप्रकाशीत झालेला आहे. 

बोंबीलास पत्र

पत्र क्र. १
प्रिय बोंबिल
मेहेंदी रंग लाती है सुख जाने के बाद ह्या ओळींप्रमाणे श्रावणांत झालेल्या तुझ्या विरहामुळे तुझ्याबद्दल दाटून आलेल्या भावना आज पत्राद्वारे व्यक्त करत आहे.
तसा तू आणि तुझे इतर फ्रेंडसर्कल म्हणजे कोलंबी, पापलेट, बांगडा, रावस, मांदेली आणि इतर बरेच बालपणापासूनचेच सोबती. सोबती म्हणण्यापेक्षा फॅमिली मेंबरच. बुधवार, शुक्रवार, रविवार ह्या दिवशी तर तुमचे येणे हक्काचेच असते. तुम्ही घरच्यांचे सगळ्यांचेच लाडके असल्याने जेव्हा जेव्हा तुम्ही घरी असता तेंव्हा घरी गोकुळ नांदत. म्हणजे सगळे खुप खुष असतात. लहान मुलांपासुन वृद्धांपर्यंत सगळ्यांना जरा दोन घास जास्त जातात.
बोंबिल अरे तू तर घरात सगळ्यांचाच सगळ्यात जास्त फेव्हरेट. माझ्या मोठ्या श्रावणीला पण आवडतोस. १ वर्षाच्या राधाने तर तुझ्याच पहिल्या घासाने मासे खाणे चालू केले.
आठवड्यात जेंव्हा वरच्या तिन दिवशी व्रत किंवा उपवास येतो न तेंव्हा तुम्ही न येण्याची खुप रुखरुख लागते रे. करमत नाही तुमच्या सगळ्यांशिवाय. इतके कसे रे तुम्ही प्रचंड टेस्टी? बर ताजेच नाही तर सुकवूनही तुम्ही चविष्टच लागता.
खर तर मला तुमचे आभार मानायचे आहेत. तुमच्या रेसिपीज लिहून लिहून मी मायबोलीवर मासेविषयावर प्रसिद्ध झाले आहे. सुरुवातीला तर माबोकरांना तळ्यात, हॉटेलमध्ये कुठेही मासे किंवा माश्यांची डिश दिसली की मी आठवायचे. तसे त्यांच्या लिखाणात, फोनवरील संभाषणात ते बोलतातही.
तुला एक गुपित सांगू का काही शाकाहारी मायबोलीकर तुझ्या चमचमीत रुपावर फिदा होऊन मांसाहारी बनलेत. फोनवर विचारतात ना मला रेसिपी.
तुझ्या खमंगपणामुळे, फोटोजनीक रुपामुळे आणि माबोवरच्या चिनुक्स आयडी मुळे तुझ्या रेसिपीज माहेर अंकात छापून आल्या तेंव्हा खुप आनंद झाला. सगळ्या मायबोलीकरांच्या प्रोत्साहनामुळेच मी तुझ्या ४४ मित्र-मैत्रीणींच्या रेसिपीज आत्तापर्यंत लिहू शकले. मला हा आकडा ५० वर न्यायचा आहे आणि मग तुमच्या सुंदर सुंदर पोझेस घेउन, तुमच्या रेसिपीज लिहून एक पुस्तकही छापायचे आहे. असे होईल हा विचार मी कधी स्वप्नातही केला नव्हता.
पण एक खंत ही मनात राहीली आहे. अरे काहीमाबोकरांना वाटत की मला माश्यांशिवाय काही येत नाही. मी रोज मासेच खात असेन. पण मी फक्त बुधवार, शुक्रवार आणि रविवारीच तुमचा आस्वाद घेते ना रे. बाकीच्या दिवशी अगदी प्युअर व्हेज. त्यात कधी कधी मंगळवारी अगदीच इच्छा झाली आणि घरातील अर्धी माणसे खातात म्हणून आणते. हाहा काहिंना वाटत की मी फक्त माश्यांच्याच रेसिपीज बनवते पण रोज घरी सकाळी माझ्या दोन मुलींसाठी मी वेगवेगळे शुद्ध शाकाहारी नाश्ता करते स्मित
माबोवर हल्ली माश्यांच्या विरोधात वगैरे काही लिहीले ना की मला वाटते हे मलाच टोचताहेत हाहा आता हेच बघ ना गणेशोत्सवाच्या पाकस्पर्धेच्या प्रस्तावनेत अगदी ठळक अक्षरात लिहील आहे - पदार्थ शाकाहारीच असावा.. अंडं, मांस, मासे आणि इतर सीफूड यापैकी काही वापरू नका. हे वाक्य खास माझ्यासाठीच लिहीलेय की काय असेच मला वाटले म्हणून मी तिथून क्षणात धुम ठोकून दुसर्‍या धाग्यावर गेले. पण तू वाईट वाटून घेऊ नकोस हा. मला माझ्या मनातल तुझ्यापुढे व्यक्त करायच होत म्हणून लिहीतेय. तुला दुखवायचा मला आजीबात विचार नाही. तू माझा एक सच्चा सोबती आहेस. आणिबाणिच्या प्रसंगातही तू मला साथ देतोस. अगदी ओला नाही मिळालास तरी सुका तरी माझ्या वाळवणीच्या डब्यात कायम साथीला असतोस. आपली ही सोबत कायमच राहणार ह्यात शंकाच नाही कारण कुठल्याही कारणाने तुमच्यावर पाणी सोडणे हे माझ्यासाठी अशक्य आहे.
तुमची खुप भरभराट होवो, खुप मासेसंख्या वाढो ही मनापासून सदिच्छा.
तुझीच
जागू
_________________________________________________________________________
पत्र क्र. २
प्रिय जागू
मलाही तुझ्या श्रावणातल्या विरहाने तुझी खुप आठवण येत होती. पहिला म्हणजे तुझ अभिनंदन आणि माझ्याकडूनही आभार की तू आम्हाला मायबोलीवर, मासिकात झळकवलस. माझ्या वेगवेगळ्या मित्र-मैत्रीणींची तू नेटवर ओळख करून दिलीस. तू बोलतेस ते बरोबर आहे मी ऐकतो ना. मायबोलीकरांनी आम्हाला पाहीले की तुझी आठवण काढतात ते.
तुझे गुपित वाचून मला गंमत वाटली आणि आमचे फॅन वाढल्याचे ऐकून आनंदही झाला. त्याच श्रेय तुलाही आहे कारण तू तशी आमची चविष्ट रंगरंगोटी करून आमचे फोटो काढून त्यांच्यापुढे सादर करतेस.
फक्त मी एक माझ्यापुरते सांगतो हा, तू ना माझे कालवण करून फोटो नको टाकू त्यामुळे मी आळसटलेला, थकला-भागलेला वाटतो. तू ना मला तळतेस तेंव्हा मी अगदी रुबाबदार, ताठ, सुट-बुट घातल्याप्रमाणे वाटतो.
मी ते मासे न खाणे वगैरेचे दु:ख नाही ग मानत कारण तुम्हा समुद्र किनारी लोकांचे मुख्य अन्नच मासे आहे हे जाणतो आम्ही. आमची मासे संख्या वाढावी म्हणून श्रावणात आमच्या प्रजननाच्या वेळी तुम्ही आम्हाला मुक्त सोडता. तुम्ही सगळी व्रत-वैकल्य, उपास-तपास करून मधल्य वारी आम्हाला जीवनदान देता याचीही जाणीव आहे आम्हाला. देवाने आम्हाला तुमचे अन्न म्हणूनच नेमले आहे आणि शेवटी त्याच्या मर्जीनेच आमच्या मासेजीवनाचे सार्थक होणार हे मी मानतो.
आमचे पाण्यातील जगही फार सुंदर आहे. आत शंख, शिंपले, समुद्री वनस्पती, आमच्याच रंगीबिरंगी जाती ह्या सगळ्यात फिरताना फार मजा वाटते. फक्त हल्ली जे समुद्रात प्रदुषण झाले आहे ना त्यामुळे खुप कोंडमारा होतो ग आम्हा सगळ्या माश्यांचा. नुसती माणसेच आमचे भक्षण नाही करत. समुद्रातले मोठे मोठे मासेही आम्हाला कच्चे गिळून टाकतात. तुम्ही निदान शिजवून छानस रुप देऊन आमची स्तुती तरी करता.
अग तू नको खंत करू आणि मलाही काही वाईट वगैरे नाही वाटले. शेवटी तू म्हटल्याप्रमाणे आपण दोघे घनिष्ट सोबती आहोत. मी तर तुझ्या घरातल्यांचा सगळ्यांचाच प्रिय. छोटीला मी आवडतो हे वाचून मी तिला खेळवतोय असेच छान वाटले.
चल आता कोळीमामा येतील मला न्यायला. सगळ्या माबोकरांना माझ्याकडून आणि माझ्या मित्रपरीवाराकडून धन्यवाद सांग आणि तुझ्या ५० रेसिपीज पूर्ण होऊन लवकरच तू आम्हाला पुस्तकात स्थान देशील अशी सदिच्छा. तुझ्या घरच्यांना नमस्कार आणि मुलांना आशिर्वाद.
तुझाच आवडीचा
बोंबिल.
(मायबोली डॉट कॉम वर एक स्पर्धा झाली होती पत्रलेखनाची त्यात लिहीलेली हे पत्रे)

बीज अंकुरे अंकुरे

मी एका शेतकरी कुटुंबातील मुलगी. माझे बालपण आमच्या शेताच्या सहवासात बागडण्यात गेले. आई-वडील दोघेही नोकरी सांभाळून शेती करायचे. माझी आई प्रार्थमिक शिक्षिका, वडील मुंबईत प्रीमियर कंपनीमध्ये नोकरीला होते. त्यांनी शेती सांभाळायची म्हणून कायम नाइट शिफ्ट केली. घरात माझा मोठा भाऊ व आजी असे आमचे कुटुंब होते. शेतकरी आणि शेत हे दोन्ही एकरूप झाले म्हणजे मोतीदार धान्याचे पीक शेतात डोलू लागते. आमच्या शेतात तांदळाचे पीक दरवर्षी रुबाबात मिरवत असे.


मे महिन्याच्या दाहक उन्हात मातीची ढेपळं खडखडीत वाळून शेतातील जमिनीला भेगा पडल्याने आकाशाकडे पाण्याच्या आशेने 'आ' वासून पावसाच्या प्रतीक्षेत असतात. ज्या पाच-सहा शेतांमध्ये तांदूळ पिकवला जायचा त्या शेतांपैकी एक शेत खास बी पेरणीसाठी असे. त्याला आम्ही 'राबाचे शेत' म्हणत असू. राब म्हणजे महिनाभर आधीपासून जमलेला पालापाचोळा ह्या शेतात टाकायचा आणि तो जाळायचा. त्यामुळे शेतातील तणाचे (गवत) बी जळून मातीही भुसभुशीत होते. राब लावला की सुकलेलं गवत वगैरे ताडताड आवाज करत पेटायचं, तेव्हा दिवाळीतील फटाके वाजल्याचा आनंद होत असे. ह्या आवाजाने छोटे पक्षीही आवाज करत इकडे तिकडे सैरभैर फिरत असत. मे महिना असल्याने वाडीत जिकडे तिकडे आंब्याचे बाठे पडलेले असत. मग आम्ही बच्चेकंपनी हे बाठे गोळा करायचो आणि त्या आगीमध्ये भाजून ते फोडून त्यातली कोय खायचो. कोय कडवट लागते पण त्याच्यावर पाणी प्यायले की आवळ्याप्रमाणे गोड चव येते. तो कडू रानमेवाही आम्ही चवी‌-चवीने खायचो.
राब हा मे महिन्याच्या दाहक उन्हात केला जाई. राबासकट सगळ्या शेतांची नांगरणी होत असे. मग प्रतीक्षा असे ती गार गार, हिरवे स्वप्न साकार करणार्‍या पावसाच्या सरींची. पण तेव्हा पाऊस फसवा नव्हता, वचन दिल्याप्रमाणे अगदी ७ जूनला बरोबर स्टेशनवर उतरायचा.
मी शाळेतून एकदा घरी आले की लगेच शेतात धाव घेत असे. पावसाच्या सरींना सुरुवात झाली, जमीन भिजली की राबाच्या शेतात भात (तांदळाचे बियाणे) पेरला जाई. भात पेरायला मी पण मध्ये मध्ये लुडबुड करत असे. तो मुठीत धरून फेकायला मौज वाटत असे. त्या भातकणांची टोके मुठीत हलकेच आवळून त्यांच्या खुणांची तळहातावर झालेली डिझाइन पाहणे हा तेव्हा छंदच होता. ते भातकणांचे टोचणेही तेव्हा सुखद वाटे.
काही दिवसांतच पेरलेल्या बियांतून कोवळे अंकुर निघत. जर जोरदार पाऊस पडला तर अंकुर पाणी साठल्यामुळे दिसायचे नाहीत. पण हलक्या सरी पडल्या तर अंकुर फुटलेले व हळूहळू नवीन जन्माला आलेली बाळरोपं बाळसं धरताना पाहून फार आनंद होत असे. अनेकदा ह्या कोवळ्या ओल्या रोपांवरून मी अलगद हात फिरवत असे. बाळसं धरलेल्या रोपांच्या शेताचा अगदी हिरवा गालिचाच तयार होत असे. ह्या गालिच्याला म्हणजेच त्या रोपांना आमच्याकडे 'आवण' म्हणतात. हे आवण तयार होईपर्यंत पाऊस चांगलाच जोर धरत असे. आवणाच्या शेतात बांध बांधला जाई त्यामुळे त्या शेतात पाणी साठून रोप चांगले वाढत असे.
जर कधी वरूण राजा रुसला आणि जास्त पाऊस झाला की पेरलेल्या बियाण्याचा नाश होत असे मग अशावेळी पुन्हा टोपलीत बियाण्याला मोड आणून शेतात टाकून त्याचे आवण करावे लागे. त्याला रो असे म्हणतात. मग हे गावात इतर कोणी केले आणि जास्त असेल तरी ते एकमेकांना दिले जाई.
एकदा का हे आवण तयार होत आले म्हणजे, ते इतर शेतांमध्ये रुजण्याएवढे वाढले, की इतर नांगरलेल्या शेतांमध्ये आळी फिरविली जात. आळी म्हणजे नांगराला फळी बांधून त्याने नांगरलेले शेत सपाट म्हणजे ढेपळे सारखी केली जात. फळी नसेल तर मोठ्या झाडाची एखादी मजबूत फांदी तोडून ती लावली जात असे. ह्या आळीवरती वजन ठेवणे आवश्यक असे. मग त्यावर एखादा मोठा दगड बांधला जाई किंवा घरातील लहान मुलांना बसविले जाई. आमच्या शेतांमध्ये आळी कधी फिरवायची ह्याची मी वाटच पाहत असे आळीवर बसण्यासाठी. मस्त गाडी गाडी खेळल्याची मजा यायची. सोबत ढवळ्या-पवळ्या व त्यांचा मालक कधी त्यांना ओरडत तर कधी मायेने गोड बोलून त्यांच्याकडून आळी फिरवून घेत. आळी फिरवताना पाऊसही यायचा. नाहीच आला तरी शेतातील चिखलयुक्त पाणी भिजवायचेच मला. पण तेव्हा कुठे त्याची तमा असे?
शेतांना आळी फिरवून झाली की लावणीची लगबग चालू होत असे. लावणी चालू झाली म्हणजे घरात काहीतरी सणवाराची लगबग आहे असे वाटे. लावणीच्या हंगामात आई शाळेला सुट्टी घ्यायची आठवडाभर. कारण शेतावर लावणीसाठी मजूर बायका-माणसे येत. घरातही आई-आजीची कामे उरकण्याची घाई होत असे. त्यांच्या चहा-पाण्याची सोय करावी लागे. आम्ही घरातील सगळेच ह्या माणसांबरोबर शेतात उतरायचो. कोणतेही शेताचे काम चालू करताना पहिला नारळ फोडून 'शेत चांगलं पिकू दे, ' म्हणून देवाला प्रार्थना केली जात असे व गोड प्रसाद वाटला जात असे. पहिला आवण खणण्याचा म्हणजे रोपे उपटण्याचा कार्यक्रम असे. आवणाच्या शेतात उतरण्या आधी वडील नारळ फोडत व सगळ्यांना जिलबी किंवा म्हैसूर वाटत. सगळ्यांचे तोंड गोड झाले की आवण उपटून त्यांची हातात मावेल इतकी जुडी बांधली जायची. त्याला आम्ही गुंडी किंवा मूठ म्हणायचो. शेतांमध्ये ढोपरापर्यंत पाणी असे. ह्या गुंड्या बांधून त्याच शेतात टाकायच्या व पुढे आवण उपटत जायचे. मागे राहणार्‍या गुंड्या पाण्यावर तरंगत असतात.
आवण खणताना एक वेगळाच सुगंध येतो भाताच्या रोपाचा. तेव्हा तो नेहमीचा वाटे पण आता कुठे आला तर जुन्या आठवणींनी मन गलबलून जाते. एकदा का आवण खणून झाले की मुठी मोठ्या टोपलीत गोळा केल्या जात व इतर शेतांमध्ये अंतरा-अंतरावर फेकल्या जात. हे फेकाफेकीचे काम करण्यातही मजा यायची. कधी कधी सैल बांधलेली मूठ फेकताना सुटून पसरत असे. मग ती तुझी, ती अमकीने बांधलेली असेल असा बायकांचा आरडाओरडा चालत असे. कोण काम जलद करतं, कोण हळू करतं ह्यावरही कुजबुज होत असे. ह्या दिवसांमध्ये पाऊस दिवसरात्र पडायचाच. मजूर मेणकापडाचे डोक्यावर टोक (टोपीसारखे बांधून) बांधून अंगभर झग्यासारखे सोडायचे. ह्या पोशाखाला इरला म्हणतात.
आई, वडील आणि भाऊ रेनकोट घालायचे. मलाही रेनकोट होता पण मला त्या मजुरांसारखा पोषाख आवडायचा म्हणून मी मिळेल ते प्लॅस्टिकचे कापड घेऊन त्यांच्यासारखे हट्टाने बांधून घ्यायचे. जोराचाच पाऊस आला की आई घरी जायला सांगायची पण मी कुठल्यातरी झाडाखाली जाऊन बसत असे.
मुठी फेकून झाल्या की लावणीला सुरुवात व्हायची.
लावणी करायला मला खूप आवडायची. मला लावणी ताला-सुरात केल्या सारखी वाटे. मनोरंजनासाठी बायका गाणी गात तर कुठल्या गोष्टी सांगत, नाहीतर कोणाला भूत दिसले, कोणी कोणाला मारले, कोणाची सासू छळते, कोणाची सून भांडखोर आहे, अशा जायचा बरसात चालू असे. पण माझे विश्व वेगळेच असे. मी कधी कलात्मक रोपे खोचत असे. मग घरातील, मजूर लोक माझे कोडकौतुक करत की किती भराभर लावते, किती छान लावते, हिनेच अर्धे शेत लावले. तेव्हा मला ते खरेच वाटायचे. ही रोपे जमिनीत रोवताना कधी कधी टणक मातीमुळे बोटे दुखायची. पण कोणाला सांगायचे नाही, नाहीतर ही मौज करायला मिळणार नाही, आपले कौतुक होणार नाही!
पहिल्या दिवशी शेतावरून संध्याकाळी घरी गेलो की पाय दुखायला सुरुवात होत असे. हे सगळ्यांनाच व्हायचे. अगदी रोज काम करणार्‍या मजुरांनाही सतत वाकून हा त्रास व्हायचा. तेव्हा आई सांगायची की तीन दिवस दुखतील. तीन दिवस सतत गेलो की नाही दुखणार. मग आई-आजी बाम वगैरे लावायच्या आणि मग मी पुन्हा दुसर्‍या दिवशी मौज करण्यासाठी शेतात जायचे.
सतत चिखलाच्या पाण्यात गेल्याने पायांच्या बोटांमध्ये, पायांना कुये व्ह्यायचे. त्याला रामबाण उपाय म्हणजे मेहेंदी लावणे आणि ग्रीस लावणे. बहुतेक मजुरांचे पाय तेंव्हा मेहेंदी लावल्याने लाल झालेले दिसायचे. माझे वडील शेतात जाण्यापूर्वीच ग्रिस लावून ठेवायचे.
रोपे लावून कंटाळा आला की शेताच्या बांधावरच्या मातीने भातुकलीची खेळणी बनवायची, शेताच्या बांधावर खेकड्यांची बिळे असत त्या बिळांमध्ये काहीतरी टाकणे, खेकड्यांच्या मागे लागणे अशा करामती करायचे. तसेच शेतातल्या चिखलात मनसोक्त खेळायचे. कधी त्यात उड्या मारायचे तर कधी थेट शेतात बसून पोहण्याची नक्कलही करायचे. हे पाहून मात्र घरच्यांचा ओरडा मिळायचा. मग तात्पुरते बंद करायचे. त्यांचे लक्ष नसले की परत चालू करायचे. शिवाय शेतात माखून झाल्यावर आमच्या विहिरीला जो थाळा होता त्या थाळ्याच्या स्वच्छ व गार पाण्यात चिखल काढण्यासाठी डुंबायला मिळायचे.
शेतावर काम करणार्‍या मजुरांसाठी सकाळी व दुपारी चहा व नाश्ता म्हणून टोस्ट किंवा बटर आणायची आई. हा चहा आणि खाऊ पावसापासून बचाव करत शेतावर आणावा लागे. मग एका झाडाखाली बसून सगळ्यांना चहा आणि टोस्ट किंवा बटर वाटले जात. हे वाटताना तसेच खाताना झाडाचे टपोरे थेंब मात्र चहा तसेच टोस्ट बटरांवर पडत. चहात टाकण्याआधीच ते थोडे नरम होत. त्याची एक वेगळीच मजा आणि चव लागायची. मला ती आवडायची.
ह्याच दरम्यान शेताच्या बांधावर करांदे, हळदी म्हणून रानकंद उगवायचे. भाऊ व वडील ही कंदमुळे खणून काढायचे. पण करांदे शिजवावे लागतात व कडू लागायचे म्हणून त्यात मला काही रस नव्हता. पण हळदी ह्या जरा चवीच्या व न शिजवता नुसत्या सोलून खायला मिळायच्या. अगदी लहान होते म्हणजे जेव्हा हळदीचा वेल मला ओळखता येत नव्हता तेव्हा पराक्रम करुन मी एक जंगली मुळी खणून सोलून खाल्ली होती आणि अर्धा दिवस घसा-तोंड खाजवल्यामुळे रडून काढला होता. आमच्या घराच्या समोर एक शेत होते तोच आमचा रस्ता होता शिवाय विर्‍याच्या (समुद्र मार्गाचा मोठा नाला) पाण्यामुळे शेताचे नुकसान व्हायचे त्यामुळे ते शेत रिकामे असायचे. पावसाचे उधाण म्हणजे जास्त पाऊस पडला की आमच्या समोरच्या शेतात विर्‍यातून गाभोळी भरलेले चिवणे नावाचे मासे येत. हे मासे पकडायला गावातील मुले-माणसे जाळी टाकत असत. मग त्यांनी पकडलेल्या माश्यांतून काही मासे आम्हाला देत असत. मग भर पावसात त्याचे आंबट घट्ट गरम गरम कालवण आणि गरम गरम भात म्हणजे स्वर्गसुख. मला हे मासे पकडायला जावे अशी फार इच्छा व्हायची. मी कधी कधी गळ घेऊन जायचे आणि माशांना गळ लावायचे पण कधीच माझ्या गळाला मासा लागला नाही.
शेते लावली तरी घरात जेवणापुरती भाजी मिळावी म्हणून शेताच्या बांधावर भेंडे, आणि बाहेर जी मोकळी जागा असे त्याला भाटी म्हणत त्यावर काकडी, घोसाळी, शिराळी, पडवळ ह्या वेलींचे मांडव चढवले जायचे. ह्या वेलींना लटकलेल्या भाज्या पाहण्यात खूप सुख वाटायचं. ह्या भाज्यांसोबत माझी गंमत म्हणजे भेंडीच्या झाडाला लागलेली कोवळी भेंडी तोडून खायची, काकड्यांच्या वेलीवरच्या कोवळ्या काकड्या शोधून त्यावर तिथेच ताव मारायचा. बांधावर गवतासोबत मुगाच्या वेलीही आपोआप यायच्या त्याला शेंगा लागल्या की त्याही हिरव्या शेंगा काढून त्यातील कोवळे मूग चघळत तोंडचाळा करत राहायचे. ह्या हंगामात मोकळ्या जागी गवताचे रान माजत असे.
शेते लावून झाली की ८-१५ दिवसांत रोपे अगदी तरतरीत उभी राहायची. ह्या रोपांना मग खत म्हणून युरिया किंवा सुफला मारला जयच. तो युरियाही हाताळायला फार मौज वाटायची. साबुदाण्यासारखा पण अजून चकचकीत असलेला युरिया हातात घेऊन सोडायला खूप गंमत वाटायची. लगेच काही दिवसांत शेतात आलेले तण काढण्याचा कार्यक्रम असे. तांदळाची रोपे न उपटू देता आजूबाजूचे तण काढले जाई. जर पावूस नाही पडला तर ह्या शेतांना विहिरीतून पंपाद्वारे पाणी सोडले जाई. अशावेळी शेते भरताना फार मजा वाटायची. विहिरीपासून ते शेतापर्यंतच्या आळ्यांमध्ये जोरात चालत जाणे, पाणी उडवणे अशी मस्ती त्या आळ्यातून करता येत असे.
ताठ झालेली हिरवीगार शेते पाहण्यातलं नेत्रसुख खूपच आल्हाददायक असत. सगळी मरगळ ह्या हिरव्या शेतांनी कुठल्या कुठे पळून जायची. ह्या हिरव्या रंगावर आकर्षून काही दिवसांनी रोपाच्या पातीचा आस्वाद घेण्यासाठी कीडही येत असे. तेव्हा पाऊस नाही हे पाहून वडील औषधांची फवारणी रोपांवर करत.
जुलै- ऑगस्टमध्ये झाडावर कणसे बागडताना दिसू लागायची. कणसे लागलेली पाहून खूप गंमत वाटायची. काही दिवसात ही कणसे बाळसे धरून तयार होत. कणसांवरील दाणे टिपण्यासाठी आता पोपटांची झुंबड उडायची. ह्या पोपटांना घाबरवण्यासाठी बुजगावणे शेतात काही अंतरा-अंतरावर लावावे लागत असे. माणसाच्या आकाराचे फक्त कापडाने केलेले बुजगावणे फार मजेशीर वाटायचे. लांबून खरच माणूस राखण करत आहे असे वाटायचे.
काही रोपांची कणसे लांब असायची. त्याला भेळ किंवा भेसळ म्हणायचे. म्हणजे ज्या जातीचा तांदूळ लावला आहे त्याच्या व्यतिरिक्त दुसर्‍या जातीच्या तांदळाची निघालेली कणसे. तांदळात अशा कणसांची भेसळ होऊ नये त्यासाठी ही लांब कणसे कापून वेगळी ठेवावी लागत.
कोजागरी पौर्णिमेला आपल्या शेतातील काही कणसे काढून ती उखळीवर सडून त्यांची कणी म्हणजे बरीक तुकडा करुन त्याची खीर केली जायची. आपल्या शेतातील पिकाचा हा नैवेद्य चंद्राला दाखवून आम्ही ती खीर प्रसाद म्हणून प्यायचो. शेतातील नवीन अन्नाची खीर म्हणून तिला नव्याची खीर म्हणत. दसर्‍याला ही कणसे सोन्याच्या म्हणजे आपट्याच्या आणि झेंडूच्या फुलांसोबत दारावरील तोरणात आपले वर्चस्व मिरवत असायची.
ऑक्टोबर-नोव्हेंबरच्या वेळेस कापणीची लगबग चालू होत असे. कापणीच्या वेळी हिवाळा चालू झालेला असे. कणसे आणि रोपे पिवळसर पडू लागली की ही कणसे तयार झाली समजायचे. सकाळच्या कोवळ्या उन्हात शेतातील पिकलेली शेते अजून सोनेरी दिसू लागत. चालताना होणार्‍या गवतावरील दवबिंदूच्या स्पर्शाने मन ताजेतवाने होत असे.
कापणीची सुरवातही नारळ फोडून व गोडाचे प्रसाद वाटून होत असे. मजूर आणि आम्ही घरातील सगळे कापणीला उतरायचो. पुन्हा बायकांच्या गप्पा, माझं कौतुक ह्या गोष्टी चालू असायच्या. माझ्या भावाचा स्पिड कापणीत चांगला होता. त्याचे पाहून मीही भराभर कापायला शिकत होते. हातात रोप घ्यायची आणि मुठीत भरतील एवढी कापून जमिनीवर काही अंतरा अंतरावर जमा करत जायची. कापताना ह्या रोपांना एक प्रकारचा गंध येत असे. तो अजूनही आठवण झाली की मनात दरवळतो. ह्या भराभर कापण्याच्या नादात बरेचदा धारदार पातीने तर कधी कापण्याचा खरळ हाताला लागायचा. खरळाने हात कापला गेला की लगेच वडील संध्याकाळी धनुर्वाताचे इंजेक्शन द्यायला डॉक्टर कडे न्यायचे. ते इंजेक्शन नको वाटायचे. कापणी नंतर पाय परत दुखायचे पण मला त्याचे काही वाटत नसे. निसर्गाच्या सानिध्यात ही दुखणी दुर्लक्षित होत असत. केवळ घरातली सगळी मंडळी शेतावर असत, घरात एकटी राहू नये म्हणून मला शेतावर शेतात जाऊन तिथे लुडबुड करुन आनंद घेता येत असे.
ज्या शेतांच्या बाजूला ताडगोळ्यांची झाडे असत. पाऊस पडल्यावर ह्या झाडांवर घसरण्याच्या भितीमुळे ह्या झाडांवर कोणी चढत नाही. मग पावसाळ्यात ह्या झाडावरची ताडफळे पडून त्याला कापणीपर्यंत मोड आलेले असत. त्याला मोडहाट्या म्हणतात. ही फळे कोयत्याने फोडायची आणि त्यातील कोंब खायचा. अहाहा माझा हा सगळ्यात आवडता खाऊ.
कापून झाले की साधारण एक आठवडा ही कणसे सुकवली जात. मग पुन्हा मजूर घेऊन ह्या कापलेल्या रोपांच्या गुंड्या वळल्या जात. ह्या गुंड्या एकत्र करुन त्याचे मोठे मोठे भारे बांधले जायचे. भारे बांधण्यासाठी बंध वापरले जायचे. हे घरात करावे लागायचे. हे बंध मागील वर्षीच्या पेंढ्याने करावे लागत. मलाही बंध वळता यायचे. हे बंध तळहातावर पिळून केले जात. त्यामुळे तळहात चांगलेच लालेलाल होऊन दुखत.
भारे वाहण्याचे काम मजूर करायचे कारण प्रचंड ओझं असत हे भारे म्हणजे. पण एकही हौस सोडायची नाही ना मग दोन तीन गुंड्यांचा एक हलका भारा बांधून तो डोक्यावर मोठ्या माणसांसारखा मिरवत जात मी खेळायचे. भारे उचलून झाले की शेतात काही कणसे पडलेली असायची मग ही कणसे टोपलीत गोळा करुन आणायची. ह्या कामात मात्र मी हिरीरीने भाग घ्यायचे. कारण ते मला झेपण्यासारखं होत. कणसं गोळा केली की सकाळी आजी चूल पेटवत असे त्या चुलीच्या निखार्‍यावर कणसे टाकली की त्याच्या फट्फट लाह्या निघत हा लाह्याही तेव्हा तोंडचाळा होता.
भारे ठेवण्यासाठी व झोडपणीसाठी घराजवळ खळगा केला जात असे. खळगा म्हणजे मोकळ्या जागी मध्येच थोडे खणून रुंद खळगा करुन तो खळगा व त्याच्या बाजूची पूर्णं जागा सपाट करुन सारवली जात असे. गुंड्या झोडण्यासाठी खळग्यात जाते किंवा मोठा दगड ठेवला जात असे. ह्या जात्यावर किंवा दगडावर भार्‍यातील एक एक गुंडी झोडून त्यातील तांदूळ खळग्यात जमा होत असे. घरातील सगळेच झोडणीच्या कामातही मदत करायचे. कौशल्य असलेले मजूर दोन्ही हातात एक एक गुंडी घेऊन सुद्धा झोडायचे. मी त्यांची कॉपी करायला जायचे आणि हात दुखून यायचे.
गुंड्या झोडून त्या एका बाजूला रचल्या जायच्या तर खळग्यात जमा झालेले धान्य गोळा करुन त्याची खळग्या बाहेरच्या अंगणात रास लावली जायची. झोडलेल्या गुंड्यांच्या पुन्हा बंधाद्वारे भारे बांधले जात. हे भारे एका बाजूला गोलाकार रचले जायचे. ह्या रचण्याला ठिकी म्हणतात. ठिकीतील धान्य काढून घेतलेल्या गवतकाड्यांना पेंडा म्हणतात. काही दिवस ही ठिकी आमच्याकडे असायचे तेव्हा ह्या ठिकीमध्ये आम्ही लपाछुपी खेळायचो. ठिकीवर उंच चढून उड्या मारायचो. पण खेळल्यानंतर खाज सुरू व्हायची. पण कोणाला तमा होती खेळण्यापुढे खाजेची? ह्याच ठिकीत आम्ही झाडावरचे चिकू काढूनही पिकत घालायचो. एकदा तर ह्या ठिकीमध्ये साप आला होता. तेव्हा मात्र काही दिवस घाबरून होतो. तेव्हा ह्या ठिकीतील भारे गावातील गुरे पाळणारे लोक आमच्याकडून घेऊन जायचे. ह्याच्यातील एखादं-दुसरा भारा आम्ही ठेवायचो. कारण पूर्वी ह्याच पेंड्याने भांडी घासली जायची. आंबे उरतवले की आंबे लवकर पिकण्यासाठी पेंड्यात रचून ठेवले जायचे. हा पेंडा तयार झाला की खास शेकोटी लावण्यासाठी पहाटे काळोखात उठून पाला पाचोळ्यावर पेंडा टाकून मी शेकोटी शेकायचे.
झोडणी करुन झाली की पाखडणी चालू व्हायची. पाखडणी म्हणजे झोडलेल्या धान्यांत राहिलेला पेंड्याचा भुगा, फुसकी भातकुणे पाखडायची. हा एक आकर्षक कार्यक्रम असायचा माझ्यासाठी. पाखडणी करताना रास केलेले तांदळाचे धान्य सुपात घेऊन हात उंच करुन वरून सुप चाळणीसारखा हलवत एका लाइनमध्ये लांब चालत सुपातील धान्य खाली रचायचे. ह्यामुळे हवेने धान्यातील पेंडा, भूसा उडून जायचा. जर त्या दिवशी हवा खेळती नसेल तर फॅनही लावला जायचा हा भूसा उडण्यासाठी. नंतर खाली एका रेषेत ठेवलेल्या भाताच्या धान्याला सुपाद्वारे हवा घालून राहिलेला भूसा काढला जायचा. हा सुप फिरवताना हात जिथे थांबेल तिथपर्यंत हवा जोरात घातली जायची. अगदी घूम घूम असा आवाज तेंव्हा सुपातून निघायाचा आणि त्यामुळे राहीलेला बराचसा कोंडा निघून जायाअ. ह्या सरळ राशीला हळद-कुंकू लावून, अगरबत्ती ओवाळून व नारळ फोडून पुजा केली जायची. अन्न घरी आले म्हणून गोड-धोड मजुरांना वाटले जायचे. त्यानंतर बायका सुपात भात घेऊन शेतातील भातात आलेले मोठे मोठे खडे काढून तो भात पोत्यात भरायच्या. पुरुष मजूर ह्या पोत्यांना सुतळ-दाभणा द्वारे शिवून एका ठिकाणी रचून ठेवायची.
मी अगदीच लहान होते तेव्हा गिरणी नव्हत्या आमच्या भागात त्यामुळे घरातील मोठ्या जात्यावर भात दळायला बसलेली आजी आठवते. तर उखळीवर पॉलिश करण्यासाठी असलेल्या मजूर बायकाही काहीश्या आठवतात. पण कालांतराने गिरणी आल्या. मग भातगिरणीत जाऊन तांदूळ कधी दळायला आणायचा ते विचारून दळण्याचा दिवस ठरे. पोती दळायला नेण्यासाठी खटारा बोलावला जाई. खटार्‍यातील पोती ढवळ्या-पवळ्या घुंगराच्या तालावर गिरणीपर्यंत पोहोचवत. गिरणीवाल्याला तांदूळ पॉलिश करुन हवा की नको ते सांगण्यात येई. गिरणीत भात दळला की तांदूळ, भाताचा कोंडा व तूस (टरफले) वेगवेगळा मिळे. घरात आम्ही येणार्‍या नवीन धान्याची वाट पाहत असायचो. घरी तांदूळ आले की पोती घरात उतरवल्या जायच्या. तांदूळ ठेवण्यासाठी तेव्हा सगळ्यांच्या घरात बांबूपासून बनवलेली मोठी कणगी असायची. माझ्या वडिलांनी तांदूळ ठेवण्यासाठी एका खोलीत कोठार बांधून घेतले होते. त्या खोलीला आम्ही कोठीची खोली म्हणायचो. कोठीत तांदूळ ठेवण्यापूर्वी तांदूळ चाळवण्यासाठी एक-दोन बायका मजुरीवर बोलवून तांदूळ चाळले जायचे. चाळलेल्या तांदळातून कणी (तुटलेले तांदूळ) निघायचे. हे तांदूळ वेगळ्या पोत्यात भरून ठेवले जात. कण्या दळून आणून त्यापासून भाकर्‍या केल्या जायच्या. तांदळामध्ये भांबुर्डा किंवा कढीलिंबाचा पाला टाकून पोती भरून तांदूळ कोठीत ठेवला जात असे. हे मुख्य अन्न आम्हाला वर्षभर साथ करायचे.
गिरणीतून आणलेला तूस आजी एका घमेलात ठेवून त्यावर मोठे अर्धवट जळलेले लाकूड ठेवत असे. रात्री निखार्‍याचे लाकूड ठेवले की धुमसत धुमसत तुसाची सकाळपर्यंत राख होत असे. मग ही राख चुरगळून चरचरीत होत असे. ही राख आजी एका बरणीत भरून ठेवत असे. तिच लहानपणी आम्ही मशेरी म्हणून वापरायचो.
गिरणीतून आणलेला कोंडा हा अतिशय पौष्टिक असे. ह्या कोंडयाचे आजी चुलीवर पेले बनवत असे. चवीला हे कडू-गोड लागत. पेले म्हणजे तांदळाचा रवा, कोंडा, गूळ घालून मिश्रण करुन ते छोट्या पेल्यांमध्ये वाफवायचे.
माझ्या अगदी बालपणीच्या आठवणीतल आठवत सुरुवातीला आमच्याकडे लाल तांदूळ पिकायचा. त्याला राता/पटणी म्हणत. हा चवीला गोड लागत असे. भात व भाकरी दोन्ही लाल नाचणीप्रमाणे व्हायच्या. ह्याचा भात गोड लागत असे. भाकरी रुचकर लागे. कालांतराने पंचायत समितीमध्ये कोलम, जया सारखे बियाणे येऊ लागले. मग एक शेत भाकरीसाठी पटणीचे ठेवून बाकीची पांढर्‍या तांदळाची लावू लागलो.
गिरणीतून भात आणला की आई त्याचा भात करायची आणि देवाला नैवेद्य दाखवायची. हा भात चिकट होत असे नवीन असल्याने. अशा तांदळांना नव्याचे तांदूळ म्हणत. हे तांदूळ नंतर कोठीत जुने करण्यासाठी ठेवत. तोपर्यंत मागील वर्षीचा तांदूळ संपेपर्यंत तो जेवणासाठी वापरत.
तर अखेर इतक्या अथक मेहनतीने तांदूळ आमच्या घरी येत असे. तेव्हा ताटात भात टाकला की सगळे किती मेहनतीने आपल्या घरात भात येतो ह्याची आठवण करुन द्यायचे मग आपोआप थोडी पोटात जागा व्हायची. पण ही शेती मला शालेय जीवनापर्यंत अनुभवता आली. कालांतराने गावांमध्ये कंपन्या आल्या आणि कॉन्ट्रॅक्ट बेसिस वर जास्त मजुरी देऊन मजूर घेऊ लागल्या. त्यामुळे शेतीसाठी मजूर मिळेनासे झाले. खत, बियाणे, औषधे सर्वच महागले. त्यामुळे शेती पूर्वीसारखी परवडत नव्हती.
आज कुठेही शेते दिसली की मन पूर्वीच्या त्या हिरव्या हिरव्या-सोनेरी दिवसांत बागडून येते. तो निखळ, निरागस आनंद त्या आठवणींत अजून गवसतो.

सौ. प्राजक्ता पराग म्हात्रे, उरण.
(हा लेख माहेर - ऑगस्ट २०१३ मध्ये प्रकाशीत झालेला आहे.)

खंड्या

आमच्या घराच्या परिसराभोवती असलेली झाडी व पावसाळी सुरू झालेला छोटा ओढा हिवाळ्यापर्यंत सजीव असल्याने आमच्या परिसरात अनेक पक्षी भक्ष्यांच्या, वसाहतीच्या आधारासाठी येतात. त्यातच वेगळे रूप, टोकदार लांब चोच आणि विशिष्ट निळा रंग ह्यामुळे खंड्या पक्षी लक्ष वेधून घेतो. त्याचा किर्रर्र असा गर्जना करणारा आवाज त्याच्या अस्तित्वाची दिशा क्षणात दाखवून देते.
आमच्या घराच्या मागच्या बाजूला मोठे ऐनाचे व करंजाचे झाड आहे. सकाळी खंड्या नेहमी करंजाच्या झाडाच्या एका फांदीवर बसलेला असतो. रोज तिच फांदी आणि तिच जागा ह्याच मला आश्चर्य वाटायचं. नंतर अंदाज लावला तो त्यावेळी येणार ऊन अंगावर घ्यायसाठी येत असावा. नंतर थोड्या वेळाने इकडे बघ, तिकडे बघ करत तो आजूबाजूच्या झाडांवर जातो. ह्यावेळी आपले भक्ष्य शोधत असतो. इंग्लिशमध्ये ह्याला किंगफिशर म्हणतात त्या नावाला जागून हा पक्षी पाणी असलेल्या जागांवर दिसतोच. पाण्यातले मासे, किडे ह्याचे खाद्य ठरलेले आहेच. जेव्हा ओढ्यात पाणी असते तेव्हा ओढ्यालगतच्या झाडावर हा गळ लावूनच जणू बसलेला असतो. भक्ष दिसताच पटकन डुबकी मारून मासा काढून पसार होतो. आमच्या ओढ्यातले पाणी संपले तरी खंड्याची रोज फेरी असतेच झाडावर. आमच्या घराभोवतालच्या इतर झाडांवरही हा मुक्त विहार करत असतो. कदाचित इतर झाडांवरच्या कीटकांच्या शोध घेत असेल. एक दिवस तर त्याची चोच मोठे भक्ष्य पकडून जास्त फाकलेली दिसली. लगेच कॅमेरा झूम करून पाहते तर साहेबांनी खेकडा पकडला होता चोचीत. त्याचे नांगे वगैरेही तोडलेले दिसले. ह्यावरून अगदी पटाईत मासेखाऊ आहे हे सांगायलाच नको.
१)
२)
रोजच त्याला मी दिसते त्यामुळे मला न घाबरता वेगवेगळ्या पोझ मध्ये हा मला फोटो काढून देतो. फोटो काढताना त्याच्या चेहर्‍यावर अनेक हावभाव निरखायला मिळतात. कधी करूण, कधी शोधक नजर असते, कधी क्रोधित तर कधी आनंदी. शेवटी पक्षांनाही असतातच ना भावना.
३) इकडे पण काही दिसत नाही
४) आज उपवास घडतोय की काय?
५) मला इथे भक्ष मिळत नाही आणि हिला फोटो काढायचे सुचतायत.
६) तिकडे काहीतरी दिसतय.
७) नाही काढून घ्यायचा मला फोटो.
८) घे बाई घे किती काढतेस ते काढ फोटो.
९) किती वेळ पोझ देत बसुन राहू? उन खातोय तो पर्यंत घे काढून.
१०) ए हे काय आहे वर??
११) वेलीचा पदर कसा छान दिसतोय बघ मला.
१२) पाण्यात काहीतरी हलतय.
१३) कोणता मासा असेल?
१४) टाटा.
(वरील लिखाण व दोन फोटो महाराष्ट्र टाईम्स च्या ठाणे पुरवणीत ११ मार्च २०१६ रोजी प्रकाशीत झाले आहेत.)

जिन्याची विहिर

नाती म्हटलं की डोळ्यासमोर येतात रक्ताची, मैत्रीची नाती. पण आपल्या आसपासच्या ज्या वास्तू असतात त्यांच्यासोबतही आपले जिव्हाळ्याचे, भावनिक नाते जोडले गेलेले असते. अशीच एक माझ्या लहानपणापासूनची माझ्या माहेरची वास्तू म्हणजे जिन्याची विहीर.
बालपणी आजी, वडील, आई, माझा मोठा भाऊ व मी असे आमचे कुटुंब. आई प्रार्थमिक शिक्षिका, (आता रिटायर्ड) वडील कुर्ल्याला प्रिमियर कंपनीत होते (आता व्हॉलेंटरी रिटायर्ड). वडिलांना ४ भाऊ व ५ बहिणी पण आत्या लग्न होऊन गेलेल्या व सगळे काका नोकरी निमित्ताने मुंबईमध्ये स्थायिक झालेले. पण केवळ वाडीची देखभाल व्हावी म्हणून वडील रोज कुर्ला ते उरण जाऊन येऊन करत. दिवसा वाडी, शेती सांभाळायची
म्हणून त्यांनी कायमची नाइट शिफ्ट स्वीकारली. ते रोज संध्याकाळी ७ ला घर सोडून मचव्याने मुंबईला जात आणि नाइट शिफ्ट करून सकाळी १० पर्यंत घरी येत. ते दुपारी १ ते ३ झोप काढत व बाकीची झोप प्रवासात घेत. ह्या वाडीशी त्यातील वास्तुंशी जुळलेल्या जिव्हाळ्यामुळे त्यांना नाईटशिफ्टचा थकावा कधी जाणवलेला वाटलाच नाही.
वडिलांनी ह्या वाडीकडे कधी व्यावसायिक दृष्टिकोनातून पाहिलेच नाही. भात पिकायचा तो पूर्णं वर्षभर पावण्या रावण्यांसकट सगळ्यांना पुरायचा. फळफळावळ वडील प्रत्येक सीझनला सगळ्या त्यांच्या भावंडांना मुंबईला स्वतः वाटायला जायचे. मळ्यातून जे उत्पन्न निघायचे ते वाडीचे डागडूगीकरण, गड्याच्या पगार भागवण्यापुरते असायचे.
आमची वाडी पाच एकराची होती. वाडीत शेती होती, दिवाळीत शेती कापली की हिवाळ्यात वडील गड्याच्या साहाय्याने भाज्यांचा मळा लावायचे. वाडीत फळफळावळही भरपूर होती. आंबे, फणस, चिकू, पेरू, नारळ, ताडगोळे, जांभळ, बोरं, करवंद, चिंचा, सीझनमध्ये अमाप यायच्या. माझे लहानपण जांभळा, बोरांच्या सावलीत जाऊन रानमेवा खाण्यात गेला आहे. ह्या सगळ्या झाडांना, मळ्याला, शेतीला ताजेतवाने ठेवणारी
आमच्या वाडीतील वास्तू म्हणजे आमची अनोखी जिन्याची विहीर.
वाडी माझ्या आजोबांनी घेतली होती. जेव्हा वाडी घेतली तेव्हा आधीपासूनच त्यात एक विहीर होती. विहीर १०० वर्षापूर्वीची असल्याचा दावा आहे. ह्या विहिरीचे वैशिष्ट्य म्हणजे विहिरीत आत उतरण्यासाठी विहीरीच्या बाहेरून दोन खास जिने आहेत. जिन्याच्या सुरुवातीच्या कठड्यांना वळणदार नक्षी आहे.
जिने उतरले की एक त्यात एक आपण उभे राहू शकतो असा हौद आहे. त्याला कमान आहे. त्या कमानीखालच्या कट्यावर बसले की पाण्यात हात घालता येतात. विहिरीत उतरायचे असले की ह्या हौदातूनच उतरायचे. ह्या हौदाला व जिन्याला लागून दोन खांब बसवलेले आहेत. त्यावर बसता, उभे राहता येते. शिवाय हौदाचा कट्टा आहे. विहिरीच्या कडेलाच पूर्वी पाणी ओढण्याची मोट होती. ही मी कधी पाहिली नाही पण
थोरामोठ्यांच्या गप्पांत त्याचा नेहमी उल्लेख येतो. बैल जुंपून पूर्वी शेतीला मोटीचे पाणी दिले जाई.
कालांतराने सरकारची शेतीसाठी वापरण्यात येणाऱ्या पाण्याच्या पंपाची योजना आली. आजोबांनी तेव्हा तिथे पंप बसविला. पंपाला एक खोली केली. रहाटाच्या जागी एक थाळा बांधला. पंपाचे तोंड थेट पाणी साठवायच्या थाळ्यात.
थाळ्याला दोन भोगदे आहेत. त्या भोगद्यातून शेतीच्या दोन्ही दिशांना पाटाद्वारे पाणी जाते. पंपाला इतका फोर्स आहे की आपण त्या पाण्याखाली हात धरला की बॅलंस न राहता हात प्रेशरने खाली जातो. पाच एकरच्या जमिनीला ही विहीर पंपाच्या साहाय्याने हिरवीगार ठेवत होती. पावसाळ्यात विहीर पूर्ण भरायची कधी कधी हाताने पाणी काढता यायचे. जिन्याची शेवटून तिसरी पायरी शिल्लक राहील इतके पाणी
भरायचे. हौद तर दिसायचाच नाही.
विहिरीच्या थाळ्यात व आतील हौदात माझ बालपण गेल. ह्या विहिरीने माझ्याशी मैत्रीच नात जोडल होत. आमचे घर विहिरीपासून १. ५ किलोमीटरवर होते. तेव्हा घरात नळ नव्हता. शाळेत जायच्या आधीच आई व आजी दोघी विहिरीवरून पाणी भरून आणायच्या. डोक्यावर त्या हंड्यांच्या राशी आणि हातात एक कळशी असे त्या दोघींच गौळण रूप मला खुप आवडायच. मलाही मग अनुकरण करावस वाटायच. मी आईकडे पाणी भरण्यासाठी
हट्ट करायचे तेव्हा मग आई माझ्या हातात एक तांब्या द्यायची. तो तांब्या घेऊन मी आईसोबत पाणी आणायला जायचे. भांडी व कपडे आई विहिरीवरच्या थाळ्यातच धुवायची. भाऊ लहान होता तेव्हा तोही जायचा आईला पाणी काढून देण्यासाठी. कारण पंप सारखा लावता यायचा नाही. तो शिंपण्यासाठीच वापरात यायचा. मीही मग लुडबूड करायला जायचे थाळ्यात मज्जा करायला. काही दिवसांतच वडिलांनी विहिरीच्या बाजूला
एक पाण्याची टाकी बसवली व त्या टाकीचे पाणी पाईपलाईनद्वारे आमच्या घरातील नळात येऊ लागले. तेव्हापासून फक्त जेव्हा लाइट नसेल तेव्हाच आम्हाला पाणी भरण्यासाठी विहिरीवर जावे लागे. पण त्यामुळे विहिरीची संगत काही कमी नाही झाली. उलट जसजसे माझे वय वाढत गेले तसतशी ती वाढतच गेली.
उन्हाळ्यात शाळेतून आले की मी वडीलांच्या बरोबर शेतावर जात. मग वडिलांनी पंप चालू केला, त्याचे शिंपणे उरकत आले की मी थाळ्याच्या दोन्ही बाजूचे भोगदे दगडे, मोठी पाने लावून बंद करायचे. स्विमिंग पुल प्रमाणे थाळ्यात पाणी साचवून मनसोक्त डुंबायचे. गार गार पाण्यात सुरुवातीला थंडी लागायची पण नंतर सवय होऊन निघू नये असेच वाटायचे. हिवाळ्यात संध्याकाळी ह्याच थाळ्यात मग आई
कोथिंबीर, मुळा, मेथी ह्या लागवड केलेल्या भाज्यांची मुळे धुवायची. ती धुवायलाही मी मध्ये मध्ये लुडबुडायचे. आमच्या विहिरीत मासेपण होते. मधून मधून भाऊ आणि त्याचे मित्र गळ लावून मासेही पकडत. मलाही हा गळ ध्ररायला मज्जा वाटे. पण अजून एकही त्या विहिरीतील मासा माझ्या गळाला लागला नाही.
शाळेत जायला लागल्यावर माझी खेळाची अभ्यासाची आवडती जागा म्हणजे पायऱ्या उतरून गेल्यावर असणारा हौद. हौदात गेल्यावर गार गार वाटायच. उन्हाची झळ तिथे पोहोचत नाही. ह्या हौदात मी अभ्यास करायचे, खेळायचे. कविता, गाणी म्हणायचे. कधी कधी तर रुसून पण त्या हौदात जाऊन बसायचे. मी तशी पाहिल्यापासूनच धाडसी होते. भूत वगैरे मी कधी मानलेच नाही. त्यामुळे बिनधास्त एकटी बसायचे. तसेही वडील व
गडी वाडीत असायचे. ते मधून मधून मला बघून जायचे.
विहिरीच्या जवळच एक साखरबाठी ह्या जातीचा आंबा होता. हा आंबा सगळ्यात वेगळा. आकाराने लहान, ह्याचा रंग हिरवाच असायचा पिकला की फक्त नरम व्हायचा. आतून पांढराच. पिवळा रंग नव्हताच. पण चव मात्र साखरेसारखी गोड म्हणून तो साखरबाठी आंबा. ह्या आंब्याचे बरेचशे आंबे ह्या हौदात, जिन्यावर व विहिरीत पडायचे. हे आंबे गोळा करण्या साठी मी सकाळी जायचे व हौदातून, पायरीतून गोळा करायचे. विहिरीत
पडलेले आंबे लामण्याने मोठी माणसे काढायची. एखादा आंबा राहिलाच तर त्याचा वास हौदातील पाण्यात मिसळायचा. ह्या विहिरीने त्या आंब्याची मधुरात चाखली आहे. कालांतराने ते आंब्याचे झाड वार्धक्याने गेले. पण त्याच्या आठवणी अजून जिभेवर आहेत. विहिरीच्या पाण्यात मिसळलेल्या आहेत.
आमच्या वाडीत ताडाची भरपूर झाडे होती. ताडाच्या पेंडी उतरवणारा माणूस यायचा. तोच विकायला न्यायचा. पण एका वेळी एवढे ताडगोळे काढून विकणे शक्य नसायचे मग ते ताजे राहावेत यासाठी त्या पेंडी वडील विहिरीत टाकून ठेवायचे. ते टाकताना बघायलाही मला खुप गंमत वाटायची. त्या टाकल्या की अस वाटायच की आता बुडणार. पण त्या चक्क तरंगायच्या.
दिवाळी, मे महिन्याची सुट्टी म्हणजे आमच्याकडे काका-आत्यांच्या कुटुंबाची जत्राच. माझी २०-२५ चुलत भावंडे एकत्र यायची. मग काय दिवसा मुक्कामपोस्ट फक्त विहीर आणि वाडी. माझ्या वडिलांनी ह्याच विहिरीत माझ्या सर्व चुलत भावंडांना, भावाला पोहायला शिकवले. मी सगळ्या भावंडात सर्वात लहान. त्यामुळे मी बघत बसायचे. वडील त्या भावंडांना दोरी बांधायचे आणि विहिरीत उडी मारायला लावायचे.
एखादा घाबरला, उडी मारली नाही तर सरळ त्याला आत ढकलायचे. हे दृश्य मात्र मला खुप भीतिदायक वाटायचे. माझ्या भावाला वडिलांनी तो अवघा ४ वर्षांचा असतानाच पोहायला शिकवले. मलाही त्यांनी शिकवण्याचा प्रयत्न केला. पण एकदा अशीच सगळी भावंडे विहिरीत उतरली होती. मला वडिलांनी विहिरीत टायर वर बसवून इतर भावंडांच्या हाती सुपूर्द करून वर दुसऱ्या एका भावाला दोरीने बांधून टाकण्यासाठी
गेले. वडिलांनी त्या भावाला विहिरीत ढकलले त्याच्या उडीने पाणी घुसळून माझा टायर उलटा झाला. माझे डोके खाली व पाय वरती झाले. तेवढ्यात माझ्या आत्तेबहिणीने पाहिले आणि माझे पाय घट्ट पकडून ठेवले व वडिलांना हाक मारली. वडिलांनी लगेच विहिरीत उडी मारली व मला बाहेर काढले. त्या दिवसापासून मी कधीच विहिरीत उतरले नाही. पण आतील हौदावर बसून विहिरीत पाय सोडून बसायचे.
पुढे मी मोठी झाल्यावर वडिलांना मदत करायला मी सुद्धा शिंपण करायचे. पाटात येणारे पाणी सगळ्या शेतात, झाडांना एक एक पाट उघडून फिरवायचे. अहाहा काय धन्यता वाटायची झाडांना पाणी पाजून त्यांना जीवनदान देण्यात! गावातील लोक म्हणायचे की ह्या विहिरीला मोठे झरे आहेत. पण ते कधी मला लहानपणी दिसले नाहीत. कारण दिसायची वेळच त्या विहिरीने कधी आणले नाही. सदा त्या हौदापर्यंत भरलेली
असायची. पाच एकराच्या वाडीला पाणी शिंपूनही तिने स्वतः कधी तळ गाठला नाही.
अशी ही आमची विहीर. आम्हाला सतत साथ देणारी हिने सदैव आमच्या वाडीला आपल्या जीवनाचा पुरवठा केला आहे. भाज्या पिकवल्या आहेत, शेती पिकवली आहे, फळबागा फुलवल्या आहेत. माणसे-जनावरांची तहान भागवली आहे. आम्हाला अंगा खांद्यावर खेळवले आहे.
आता जागेच्या विभागण्या व काही काही भाग विकला गेल्याने ही विहीर आमची राहीली नाही पण त्या आठवणी अजून ओल्या आहेत.