प्रत्येकाच्या घराची, इमारतीची किंवा एखाद्या बंगल्याचीही आवडती वास्तू म्हणजे गच्ची. पूर्वी फक्त बिल्डिंगला गच्ची असायची. पण आता दारात अंगण असले तरी टुमदार बंगले, घरे या सगळ्यांच्या माथ्यावर गच्ची आकाशाच्या छपराखाली नांदताना दिसते. ही गच्ची पाऊस झेलत, उन्हाचे चटके खात एखाद्या कर्त्या व्यक्ती प्रमाणे कर्ती वास्तूच म्हणा ना. लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत सगळ्यांनाच ही गच्ची प्रिय स्थान असते. अहो किती जबाबदार्या पार पाडते ही गच्ची. सूर्योदयापूर्वीच गच्चीचा दरवाजा उघडलेला असतो. गच्चीवरील मोकळ्या हवेत मॉर्निंग वॉक, व्यायामासह गच्चीच्या नित्य कार्याला सुरुवात होते. घरातल्या तान्ह्या बाळांना डी व्हिटामिनसाठी गच्ची कोवळ्या प्रकाशकिरणांनी उबेत घेते. कडक ऊन आलं की मात्र गच्चीला बरीच वाळवणाची काम असतात. घरातले कपडे वाळवणे, तसेच घरातली धान्ये मधून मधून वाळवणे, सगळेच वाळवण्याचे प्रकार घरातील गृहिणी गच्चीवरच करते. त्यामुळे गृहिणीसाठी गच्चीचे महत्त्वाचे स्थान म्हणजे स्वयंपाक घराच्या पाठोपाठ असते. ही वाळवण झाली की संध्याकाळी घरातील बाळगोपाळ मंडळी खेळासाठी गच्चीवर धावून येतात. गच्चीचा अगदी कोपरा नी कोपरा बाललीला, खेळांनी दणदणून जातो. अगदीच ऊन गेले की घरातील वृद्धांसाठी मोकळी हवा घेण्याचे गच्ची म्हणजे आधार स्थान.
बरं ही गच्ची फक्त माणसांनाच नाही तर निसर्गातील विविध घटकांनाही सामावून घेते. अनेक वृक्षप्रेमी आपल्या गच्चीत कुंड्यांमध्ये झाडे लावतात. हल्ली टेरेस गार्डनिंगही खूप प्रचलित झाले आहे. त्यामुळे बर्याच गच्चीत अगदी मोठ्या झाडांसकट हिरवाई पसरलेली दिसते. ह्या वृक्षांवर पक्षी बागडताना दिसतात. संपूर्ण इमारत, घर, बंगल्याला पाणी देणार्या पाण्याच्या टाकीचा भारही गच्ची समाधानाने पेलत असते.
सणसमारंभासाठी गच्ची समारंभगृहाची भूमिका बजावते. बरेचसे इमारतीचे सार्वजनिक कार्यक्रम गच्चीवर खेळीमेळीच्या वातावरणात साजरे केले जातात. घरातीलही काही लहान कार्यक्रम गच्चीवर साजरे केले जातात. गच्चीवर खेळणार्या हवेत पतंग उडविण्यात वेगळीच मजा असते. दिवाळीत गच्चीवर पणत्या लावल्या की खालून गच्चीत चांदण्या अवतरल्याचा भास होतो. ऊन, पाऊस, थंडी झेलणारी गच्ची काळोख्या रात्रीच्या चांदण्यात आणि पौर्णिमेच्या चंद्रप्रकाशात तेजोमय होत असते. कोजागिरी पौर्णिमा तर गच्चीसाठी खासच दिवस असतो. भला मोठा चंद्र गच्चीवरून एखाद्या कंदिलासारखा भासतो. दूध, खीर नैवेद्यासकट घरातील लहानांपासून थोरांपर्यंतची संपूर्ण कुटुंबाची वा सगळ्यांनाच सामावणारी पौर्णिमेची पार्टी गच्चीत साजरी होताना गच्ची सुखावून जाते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा