बुधवार, २९ जून, २०१६

किल्लीने उडविलेली खिल्ली

सोमवारची पहाट उजाडली आणि दिवाळीची ४ दिवसांची लागून आलेली सुट्टी संपुष्टात आली. तशी बर्‍याच दिवसांनी लागून सुट्टी असल्याने रूटीनची कामे करण्यासाठी मेंदू आणि शरीरावर थोडा आळसच चढला होता. पण ऑफिसला पोहोचायचे आहे ही गोष्ट भानावर येताच सगळा आळस खराट्याने झाडतात तसा झाडून टाकला. माझ्यातल्या विदाऊट लाइट, चार्जिंगच्या मानवी यंत्राने भराभर कामाचा रहाटगाडा आटोपायला सुरुवात केली.
ऑफिससाठी घराबाहेर पडताना निसर्गालाही अजून दिवाळीच्या सुट्टीचा आम चढल्याचे ढगाळ वातावरणामुळे जाणवत होते. ४ दिवस मुलींसोबत सतत जवळीक साधल्याने टाटा करताना मुलींचा रडवेला चेहरा अ‍ॅक्टीवाची चावी सुरू करताना अडथळाच आणत होताच.
हेल्मेट विसरून गाडीवर बसण्याचा व सासर्‍यांनी वा मुलींनी हाक मारून ते घेण्यासाठी पुन्हा गेटमधून धावत येण्याचा कार्यक्रम पहिल्या दिवशीही मी पार पाडला. हेल्मेट, सनकोट, रेनकोट, डब्याची पिशवी, मोबाईल ह्या गोष्टींपैकी काहीतरी विसरणे आणि घरातील कोणीतरी गेटपर्यंत गेल्यावर माझ्या लक्षात आणून देणे हाही माझ्या रूटीनचाच एक भाग स्मित पण घरातल्या माणसांच्या माझ्यावर आज काय विसरली हे निघताना ठेवण्याच्या वॉच मुळे मी अजून एकही दिवस ह्यापैकी कुठली वस्तू ऑफिसपर्यंत नेण्यापासून वंचित राहिले नाही ह्याबद्दल माझे करावे तेवढे कौतुक कमीच आहे.
तर गाडी सुरू केली आणि पेट्रॉलच्या काट्याकडे पाहिले तर तो लाल रंगाच्या रेषेबरोबर खेळत होता. घरापासून ७-८ मिनिटांच्या अंतरावर पेट्रोलपंप आहे पण ट्रॅफिक सिग्नलपेक्षा उच्च अडथळ्याचे काम करून तिथे पोहोचायला १५ मिनिटे लावतेच.
पेट्रोलपंपावरही आज पांगापांग होती. पेट्रोलपंपवाल्या मालकासाठी ही गोष्ट चिंताजनक असली तरी माझ्यासाठी चांगली गोष्ट होती कारण माझा नंबर लगेच दुसरा लागला. स्मित (ही आनंदी स्मायली आहे) ऑफिसला उशीर होतोय ह्या जाणिवेने पटापट गाडीची चावी काढून डिकीला लवून डिकी उघडून चावी हातात घेतली. नेहमीच्या सवयी प्रमाणे उशीर होऊ नये म्हणून एकावेळी अनेक कामे करण्याची खुबी असल्याने डिकीत ठेवलेल्या पर्स मधून एकीकडे पैसे काढत होते तर एकीकडे पेट्रोलवाल्याला आपले लक्ष मीटरवर आहे हे धमकावण्यासाठी माशीनच्या काट्याकडे पाहत होते. पेट्रोल भरून होताच तिथल्या पेट्रोलपंप वरील माणसाने लगेच सुटे पैसे परत दिले ते पर्स मध्ये ठेवून आपल्याला किती घाई आहे हे स्वतःलाच बजावण्यासाठी धाडकन डिकी बंद केली. बंद करताक्षणीच डिकीला लावलेली चावी गायब झालेली दिसली. मी पेट्रोल भरणार्‍यालाच उलट पटकन विचारले चाबी किधर गयी? लगेच माझ्या लक्षात आले पर्स उघडताना चावी पर्समध्ये किंवा डिकीत राहिली. हे भगवान! इतरवेळी मी डिकीलाच चावी ठेवते पण आज नियतीने माझ्या स्मार्टनेसचा कचरा करायचा ठरवीला होता. कधी नव्हे ते पेट्रोल भरणार्‍या माणसाकडून मला लेक्चर ऐकावे लागले अरे मॅडम अशी कशी चावी गाडीत ठेवलीत? हातात ठेवायचीत ना ! आता पुढच्या प्रोसेस साठी त्यांचीच मदत लागणार होती म्हणून चिडीचूप ऐकले.
पाठी एक २०-२५ शीतला मुलगा पेट्रोल भरण्यासाठी उभा होता. त्याचे पेट्रोल भरून झाल्यावर पेट्रोल भरणार्‍याने त्याच्याकडील चाव्या डिकीला लावून पाहिल्या पण कुठलीही चावी लागली नाही. पाठीमागे असलेल्या मुलाने माझ्या बाजूला गाडी लावली आणि तोही इतर लोकांच्या चाव्या लावून पाहू लागला. त्या दिवशी एका चावी मुळे माझ्या सबलेची अबला अवस्था झाल्याने तो माझ्या मदतीसाठी स्वतःचे फोन कॉल अटेंड करत थांबला. माझी पर्सही आत अडकल्याने मोबाइलही बिचारा कावर्‍या-बावर्‍या अवस्थेत आतच राहिला. त्याच मुलाच्या हातातील मोबाईल मी मागितला त्याने बॅलंस नाही, रेंज नाही अशी कारणे न देता मदतीचा मोबाईल पुढे केला. आजकालची तरुण मुलं टवाळ असतात, त्यांना अजिबात माणुसकी राहिली नाही असे शेजारी-पाजारी इतर लोक किती खोट्ट बोलतात याचा प्रत्यय मला ह्या मुलाकडे पाहून आला. सगळीच नसतात बरे तशी मुले अस सगळ्यांना सांगावस वाटलं. मोबाइलवरून लगेच नवर्‍याला फोन लावला व झाला प्रकार सांगून घरातून दुसरी किल्ली आणण्यासाठी सांगितले. अशा वेळी नवरा आपली वकिलीमुळे उरण मध्येच जास्त असतो दूर नोकरी निमित्त जावे लागत नाही व तो अशा संकटकाळी दत्त म्हणून उभा राहतो ह्याचे मला फार भाग्य वाटले आणि नेहमीच वाटते. :स्मितः
फोन करून झाल्यावर थांबलेल्या त्या गुड बॉय सारख्या मुलाला मी जायला सांगितले व मी गाडी पंपच्या एका बाजूला लावली. ह्या वेळी पेट्रोलपंप वरील माणसेही मधून मधून बर्‍याच चाव्या लावून पाहत होती. आता मला सगळी दुनियाच चांगली, सेवाभावी वृत्तीची वाटू लागली. स्मित जिथे उभी राहिले तिथला निसर्ग माझे मन रमविण्यासाठी चांगला बहरला होता. रानगवतावर रानफुले फुलली होती, त्यावर फुलपाखरे कदाचित मला बरे वाटावे म्हणून इकडून तिकडे पळत होती. पण आज चक्क माझे त्यात मन रमत नव्हते. आज माझी निसर्ग सौंदर्याची पूर्ण नजर अ‍ॅक्टीवाच्या चावीवर खिळली होती. नवर्‍यालाही माझ्यासारखाच ट्रॅफिक चा अडथळा आला असणार हे कळत होते. पण अजून शंका येत होत्या जर दुसरी चावी घरातून पण हरवली अ सेल तर? किंवा तिही चुकून माझ्या पर्समध्येच असेल तर? असे झाले असेल तर नवर्‍याचा हेंडसाळपणावर ओरडा खावा लागणार, घरी गेल्यावर घरातील व्यक्ती अजून सल्ल्यांचा भडिमार करतील, शिवाय ऑफिसला उशीर होतोय म्हटल्यावर खोटे कधी बोलू नये हे मनामध्ये बालपणापासूनचे रुजवलेले ब्रीदवाक्य पाळत असल्याने ऑफिसमध्ये बॉस मॅडम, कलीग्जमध्ये किल्ली आपली खिल्ली उडवणार ह्याचे वेगळे टेन्शन. अशी सगळी विचारधारा मनात वाहत असताना नवर्‍याची गाडी लांबूनच दिसली आणि एकदम दिलसे हायसे वाटले. नवर्‍याने हसतच माझ्या हातात किल्ली दिली वरून पेट्रोल भरलेस का अशी विचारपूस केली. मी त्या किल्लीने डिकीत पडलेली किल्ली काढली आणि ती किल्ली मला एखादी नकाशावरून शोधून काढलेल्या मौल्यवान वस्तूसारखी वाटली. पुन्हा नवर्‍याने आणलेली चावी मी नवर्‍याकडेच देऊन वर पुन्हा अशा प्रसंगी उपयोगी येईल अशा अविर्भावात नवर्‍याला दिली हाहा आणि नवरा घाईघाईत कामासाठी निघून गेला. खरे हाशहुश काय असते ते त्या क्षणी समजले. स्मित आता बंद निसर्गमय मनही ह्या किल्लीने उघडले आणि निसर्गातली फुले, फुलपाखरे मला बागडताना सुंदर दिसू लागली. ऑफिसमध्ये पोहोचायला उशीर झाला पण बॉस मॅडम मीटिंगमध्ये बिझी असल्याने घडलेली मूर्खपणाची हकीकत सांगावी लागली नाही.
आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात अशा स्वतःच्या चुकीमुळे कधी ना कधी अशा घटना घडत असतात. पण आपण शक्य तितके सतर्क राहावे असा वरून माझ्याकडून तुम्हा सर्वांना सल्ला हाहा

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा