गुरुवार, ३० जून, २०१६

बीज अंकुरे अंकुरे

मी एका शेतकरी कुटुंबातील मुलगी. माझे बालपण आमच्या शेताच्या सहवासात बागडण्यात गेले. आई-वडील दोघेही नोकरी सांभाळून शेती करायचे. माझी आई प्रार्थमिक शिक्षिका, वडील मुंबईत प्रीमियर कंपनीमध्ये नोकरीला होते. त्यांनी शेती सांभाळायची म्हणून कायम नाइट शिफ्ट केली. घरात माझा मोठा भाऊ व आजी असे आमचे कुटुंब होते. शेतकरी आणि शेत हे दोन्ही एकरूप झाले म्हणजे मोतीदार धान्याचे पीक शेतात डोलू लागते. आमच्या शेतात तांदळाचे पीक दरवर्षी रुबाबात मिरवत असे.


मे महिन्याच्या दाहक उन्हात मातीची ढेपळं खडखडीत वाळून शेतातील जमिनीला भेगा पडल्याने आकाशाकडे पाण्याच्या आशेने 'आ' वासून पावसाच्या प्रतीक्षेत असतात. ज्या पाच-सहा शेतांमध्ये तांदूळ पिकवला जायचा त्या शेतांपैकी एक शेत खास बी पेरणीसाठी असे. त्याला आम्ही 'राबाचे शेत' म्हणत असू. राब म्हणजे महिनाभर आधीपासून जमलेला पालापाचोळा ह्या शेतात टाकायचा आणि तो जाळायचा. त्यामुळे शेतातील तणाचे (गवत) बी जळून मातीही भुसभुशीत होते. राब लावला की सुकलेलं गवत वगैरे ताडताड आवाज करत पेटायचं, तेव्हा दिवाळीतील फटाके वाजल्याचा आनंद होत असे. ह्या आवाजाने छोटे पक्षीही आवाज करत इकडे तिकडे सैरभैर फिरत असत. मे महिना असल्याने वाडीत जिकडे तिकडे आंब्याचे बाठे पडलेले असत. मग आम्ही बच्चेकंपनी हे बाठे गोळा करायचो आणि त्या आगीमध्ये भाजून ते फोडून त्यातली कोय खायचो. कोय कडवट लागते पण त्याच्यावर पाणी प्यायले की आवळ्याप्रमाणे गोड चव येते. तो कडू रानमेवाही आम्ही चवी‌-चवीने खायचो.
राब हा मे महिन्याच्या दाहक उन्हात केला जाई. राबासकट सगळ्या शेतांची नांगरणी होत असे. मग प्रतीक्षा असे ती गार गार, हिरवे स्वप्न साकार करणार्‍या पावसाच्या सरींची. पण तेव्हा पाऊस फसवा नव्हता, वचन दिल्याप्रमाणे अगदी ७ जूनला बरोबर स्टेशनवर उतरायचा.
मी शाळेतून एकदा घरी आले की लगेच शेतात धाव घेत असे. पावसाच्या सरींना सुरुवात झाली, जमीन भिजली की राबाच्या शेतात भात (तांदळाचे बियाणे) पेरला जाई. भात पेरायला मी पण मध्ये मध्ये लुडबुड करत असे. तो मुठीत धरून फेकायला मौज वाटत असे. त्या भातकणांची टोके मुठीत हलकेच आवळून त्यांच्या खुणांची तळहातावर झालेली डिझाइन पाहणे हा तेव्हा छंदच होता. ते भातकणांचे टोचणेही तेव्हा सुखद वाटे.
काही दिवसांतच पेरलेल्या बियांतून कोवळे अंकुर निघत. जर जोरदार पाऊस पडला तर अंकुर पाणी साठल्यामुळे दिसायचे नाहीत. पण हलक्या सरी पडल्या तर अंकुर फुटलेले व हळूहळू नवीन जन्माला आलेली बाळरोपं बाळसं धरताना पाहून फार आनंद होत असे. अनेकदा ह्या कोवळ्या ओल्या रोपांवरून मी अलगद हात फिरवत असे. बाळसं धरलेल्या रोपांच्या शेताचा अगदी हिरवा गालिचाच तयार होत असे. ह्या गालिच्याला म्हणजेच त्या रोपांना आमच्याकडे 'आवण' म्हणतात. हे आवण तयार होईपर्यंत पाऊस चांगलाच जोर धरत असे. आवणाच्या शेतात बांध बांधला जाई त्यामुळे त्या शेतात पाणी साठून रोप चांगले वाढत असे.
जर कधी वरूण राजा रुसला आणि जास्त पाऊस झाला की पेरलेल्या बियाण्याचा नाश होत असे मग अशावेळी पुन्हा टोपलीत बियाण्याला मोड आणून शेतात टाकून त्याचे आवण करावे लागे. त्याला रो असे म्हणतात. मग हे गावात इतर कोणी केले आणि जास्त असेल तरी ते एकमेकांना दिले जाई.
एकदा का हे आवण तयार होत आले म्हणजे, ते इतर शेतांमध्ये रुजण्याएवढे वाढले, की इतर नांगरलेल्या शेतांमध्ये आळी फिरविली जात. आळी म्हणजे नांगराला फळी बांधून त्याने नांगरलेले शेत सपाट म्हणजे ढेपळे सारखी केली जात. फळी नसेल तर मोठ्या झाडाची एखादी मजबूत फांदी तोडून ती लावली जात असे. ह्या आळीवरती वजन ठेवणे आवश्यक असे. मग त्यावर एखादा मोठा दगड बांधला जाई किंवा घरातील लहान मुलांना बसविले जाई. आमच्या शेतांमध्ये आळी कधी फिरवायची ह्याची मी वाटच पाहत असे आळीवर बसण्यासाठी. मस्त गाडी गाडी खेळल्याची मजा यायची. सोबत ढवळ्या-पवळ्या व त्यांचा मालक कधी त्यांना ओरडत तर कधी मायेने गोड बोलून त्यांच्याकडून आळी फिरवून घेत. आळी फिरवताना पाऊसही यायचा. नाहीच आला तरी शेतातील चिखलयुक्त पाणी भिजवायचेच मला. पण तेव्हा कुठे त्याची तमा असे?
शेतांना आळी फिरवून झाली की लावणीची लगबग चालू होत असे. लावणी चालू झाली म्हणजे घरात काहीतरी सणवाराची लगबग आहे असे वाटे. लावणीच्या हंगामात आई शाळेला सुट्टी घ्यायची आठवडाभर. कारण शेतावर लावणीसाठी मजूर बायका-माणसे येत. घरातही आई-आजीची कामे उरकण्याची घाई होत असे. त्यांच्या चहा-पाण्याची सोय करावी लागे. आम्ही घरातील सगळेच ह्या माणसांबरोबर शेतात उतरायचो. कोणतेही शेताचे काम चालू करताना पहिला नारळ फोडून 'शेत चांगलं पिकू दे, ' म्हणून देवाला प्रार्थना केली जात असे व गोड प्रसाद वाटला जात असे. पहिला आवण खणण्याचा म्हणजे रोपे उपटण्याचा कार्यक्रम असे. आवणाच्या शेतात उतरण्या आधी वडील नारळ फोडत व सगळ्यांना जिलबी किंवा म्हैसूर वाटत. सगळ्यांचे तोंड गोड झाले की आवण उपटून त्यांची हातात मावेल इतकी जुडी बांधली जायची. त्याला आम्ही गुंडी किंवा मूठ म्हणायचो. शेतांमध्ये ढोपरापर्यंत पाणी असे. ह्या गुंड्या बांधून त्याच शेतात टाकायच्या व पुढे आवण उपटत जायचे. मागे राहणार्‍या गुंड्या पाण्यावर तरंगत असतात.
आवण खणताना एक वेगळाच सुगंध येतो भाताच्या रोपाचा. तेव्हा तो नेहमीचा वाटे पण आता कुठे आला तर जुन्या आठवणींनी मन गलबलून जाते. एकदा का आवण खणून झाले की मुठी मोठ्या टोपलीत गोळा केल्या जात व इतर शेतांमध्ये अंतरा-अंतरावर फेकल्या जात. हे फेकाफेकीचे काम करण्यातही मजा यायची. कधी कधी सैल बांधलेली मूठ फेकताना सुटून पसरत असे. मग ती तुझी, ती अमकीने बांधलेली असेल असा बायकांचा आरडाओरडा चालत असे. कोण काम जलद करतं, कोण हळू करतं ह्यावरही कुजबुज होत असे. ह्या दिवसांमध्ये पाऊस दिवसरात्र पडायचाच. मजूर मेणकापडाचे डोक्यावर टोक (टोपीसारखे बांधून) बांधून अंगभर झग्यासारखे सोडायचे. ह्या पोशाखाला इरला म्हणतात.
आई, वडील आणि भाऊ रेनकोट घालायचे. मलाही रेनकोट होता पण मला त्या मजुरांसारखा पोषाख आवडायचा म्हणून मी मिळेल ते प्लॅस्टिकचे कापड घेऊन त्यांच्यासारखे हट्टाने बांधून घ्यायचे. जोराचाच पाऊस आला की आई घरी जायला सांगायची पण मी कुठल्यातरी झाडाखाली जाऊन बसत असे.
मुठी फेकून झाल्या की लावणीला सुरुवात व्हायची.
लावणी करायला मला खूप आवडायची. मला लावणी ताला-सुरात केल्या सारखी वाटे. मनोरंजनासाठी बायका गाणी गात तर कुठल्या गोष्टी सांगत, नाहीतर कोणाला भूत दिसले, कोणी कोणाला मारले, कोणाची सासू छळते, कोणाची सून भांडखोर आहे, अशा जायचा बरसात चालू असे. पण माझे विश्व वेगळेच असे. मी कधी कलात्मक रोपे खोचत असे. मग घरातील, मजूर लोक माझे कोडकौतुक करत की किती भराभर लावते, किती छान लावते, हिनेच अर्धे शेत लावले. तेव्हा मला ते खरेच वाटायचे. ही रोपे जमिनीत रोवताना कधी कधी टणक मातीमुळे बोटे दुखायची. पण कोणाला सांगायचे नाही, नाहीतर ही मौज करायला मिळणार नाही, आपले कौतुक होणार नाही!
पहिल्या दिवशी शेतावरून संध्याकाळी घरी गेलो की पाय दुखायला सुरुवात होत असे. हे सगळ्यांनाच व्हायचे. अगदी रोज काम करणार्‍या मजुरांनाही सतत वाकून हा त्रास व्हायचा. तेव्हा आई सांगायची की तीन दिवस दुखतील. तीन दिवस सतत गेलो की नाही दुखणार. मग आई-आजी बाम वगैरे लावायच्या आणि मग मी पुन्हा दुसर्‍या दिवशी मौज करण्यासाठी शेतात जायचे.
सतत चिखलाच्या पाण्यात गेल्याने पायांच्या बोटांमध्ये, पायांना कुये व्ह्यायचे. त्याला रामबाण उपाय म्हणजे मेहेंदी लावणे आणि ग्रीस लावणे. बहुतेक मजुरांचे पाय तेंव्हा मेहेंदी लावल्याने लाल झालेले दिसायचे. माझे वडील शेतात जाण्यापूर्वीच ग्रिस लावून ठेवायचे.
रोपे लावून कंटाळा आला की शेताच्या बांधावरच्या मातीने भातुकलीची खेळणी बनवायची, शेताच्या बांधावर खेकड्यांची बिळे असत त्या बिळांमध्ये काहीतरी टाकणे, खेकड्यांच्या मागे लागणे अशा करामती करायचे. तसेच शेतातल्या चिखलात मनसोक्त खेळायचे. कधी त्यात उड्या मारायचे तर कधी थेट शेतात बसून पोहण्याची नक्कलही करायचे. हे पाहून मात्र घरच्यांचा ओरडा मिळायचा. मग तात्पुरते बंद करायचे. त्यांचे लक्ष नसले की परत चालू करायचे. शिवाय शेतात माखून झाल्यावर आमच्या विहिरीला जो थाळा होता त्या थाळ्याच्या स्वच्छ व गार पाण्यात चिखल काढण्यासाठी डुंबायला मिळायचे.
शेतावर काम करणार्‍या मजुरांसाठी सकाळी व दुपारी चहा व नाश्ता म्हणून टोस्ट किंवा बटर आणायची आई. हा चहा आणि खाऊ पावसापासून बचाव करत शेतावर आणावा लागे. मग एका झाडाखाली बसून सगळ्यांना चहा आणि टोस्ट किंवा बटर वाटले जात. हे वाटताना तसेच खाताना झाडाचे टपोरे थेंब मात्र चहा तसेच टोस्ट बटरांवर पडत. चहात टाकण्याआधीच ते थोडे नरम होत. त्याची एक वेगळीच मजा आणि चव लागायची. मला ती आवडायची.
ह्याच दरम्यान शेताच्या बांधावर करांदे, हळदी म्हणून रानकंद उगवायचे. भाऊ व वडील ही कंदमुळे खणून काढायचे. पण करांदे शिजवावे लागतात व कडू लागायचे म्हणून त्यात मला काही रस नव्हता. पण हळदी ह्या जरा चवीच्या व न शिजवता नुसत्या सोलून खायला मिळायच्या. अगदी लहान होते म्हणजे जेव्हा हळदीचा वेल मला ओळखता येत नव्हता तेव्हा पराक्रम करुन मी एक जंगली मुळी खणून सोलून खाल्ली होती आणि अर्धा दिवस घसा-तोंड खाजवल्यामुळे रडून काढला होता. आमच्या घराच्या समोर एक शेत होते तोच आमचा रस्ता होता शिवाय विर्‍याच्या (समुद्र मार्गाचा मोठा नाला) पाण्यामुळे शेताचे नुकसान व्हायचे त्यामुळे ते शेत रिकामे असायचे. पावसाचे उधाण म्हणजे जास्त पाऊस पडला की आमच्या समोरच्या शेतात विर्‍यातून गाभोळी भरलेले चिवणे नावाचे मासे येत. हे मासे पकडायला गावातील मुले-माणसे जाळी टाकत असत. मग त्यांनी पकडलेल्या माश्यांतून काही मासे आम्हाला देत असत. मग भर पावसात त्याचे आंबट घट्ट गरम गरम कालवण आणि गरम गरम भात म्हणजे स्वर्गसुख. मला हे मासे पकडायला जावे अशी फार इच्छा व्हायची. मी कधी कधी गळ घेऊन जायचे आणि माशांना गळ लावायचे पण कधीच माझ्या गळाला मासा लागला नाही.
शेते लावली तरी घरात जेवणापुरती भाजी मिळावी म्हणून शेताच्या बांधावर भेंडे, आणि बाहेर जी मोकळी जागा असे त्याला भाटी म्हणत त्यावर काकडी, घोसाळी, शिराळी, पडवळ ह्या वेलींचे मांडव चढवले जायचे. ह्या वेलींना लटकलेल्या भाज्या पाहण्यात खूप सुख वाटायचं. ह्या भाज्यांसोबत माझी गंमत म्हणजे भेंडीच्या झाडाला लागलेली कोवळी भेंडी तोडून खायची, काकड्यांच्या वेलीवरच्या कोवळ्या काकड्या शोधून त्यावर तिथेच ताव मारायचा. बांधावर गवतासोबत मुगाच्या वेलीही आपोआप यायच्या त्याला शेंगा लागल्या की त्याही हिरव्या शेंगा काढून त्यातील कोवळे मूग चघळत तोंडचाळा करत राहायचे. ह्या हंगामात मोकळ्या जागी गवताचे रान माजत असे.
शेते लावून झाली की ८-१५ दिवसांत रोपे अगदी तरतरीत उभी राहायची. ह्या रोपांना मग खत म्हणून युरिया किंवा सुफला मारला जयच. तो युरियाही हाताळायला फार मौज वाटायची. साबुदाण्यासारखा पण अजून चकचकीत असलेला युरिया हातात घेऊन सोडायला खूप गंमत वाटायची. लगेच काही दिवसांत शेतात आलेले तण काढण्याचा कार्यक्रम असे. तांदळाची रोपे न उपटू देता आजूबाजूचे तण काढले जाई. जर पावूस नाही पडला तर ह्या शेतांना विहिरीतून पंपाद्वारे पाणी सोडले जाई. अशावेळी शेते भरताना फार मजा वाटायची. विहिरीपासून ते शेतापर्यंतच्या आळ्यांमध्ये जोरात चालत जाणे, पाणी उडवणे अशी मस्ती त्या आळ्यातून करता येत असे.
ताठ झालेली हिरवीगार शेते पाहण्यातलं नेत्रसुख खूपच आल्हाददायक असत. सगळी मरगळ ह्या हिरव्या शेतांनी कुठल्या कुठे पळून जायची. ह्या हिरव्या रंगावर आकर्षून काही दिवसांनी रोपाच्या पातीचा आस्वाद घेण्यासाठी कीडही येत असे. तेव्हा पाऊस नाही हे पाहून वडील औषधांची फवारणी रोपांवर करत.
जुलै- ऑगस्टमध्ये झाडावर कणसे बागडताना दिसू लागायची. कणसे लागलेली पाहून खूप गंमत वाटायची. काही दिवसात ही कणसे बाळसे धरून तयार होत. कणसांवरील दाणे टिपण्यासाठी आता पोपटांची झुंबड उडायची. ह्या पोपटांना घाबरवण्यासाठी बुजगावणे शेतात काही अंतरा-अंतरावर लावावे लागत असे. माणसाच्या आकाराचे फक्त कापडाने केलेले बुजगावणे फार मजेशीर वाटायचे. लांबून खरच माणूस राखण करत आहे असे वाटायचे.
काही रोपांची कणसे लांब असायची. त्याला भेळ किंवा भेसळ म्हणायचे. म्हणजे ज्या जातीचा तांदूळ लावला आहे त्याच्या व्यतिरिक्त दुसर्‍या जातीच्या तांदळाची निघालेली कणसे. तांदळात अशा कणसांची भेसळ होऊ नये त्यासाठी ही लांब कणसे कापून वेगळी ठेवावी लागत.
कोजागरी पौर्णिमेला आपल्या शेतातील काही कणसे काढून ती उखळीवर सडून त्यांची कणी म्हणजे बरीक तुकडा करुन त्याची खीर केली जायची. आपल्या शेतातील पिकाचा हा नैवेद्य चंद्राला दाखवून आम्ही ती खीर प्रसाद म्हणून प्यायचो. शेतातील नवीन अन्नाची खीर म्हणून तिला नव्याची खीर म्हणत. दसर्‍याला ही कणसे सोन्याच्या म्हणजे आपट्याच्या आणि झेंडूच्या फुलांसोबत दारावरील तोरणात आपले वर्चस्व मिरवत असायची.
ऑक्टोबर-नोव्हेंबरच्या वेळेस कापणीची लगबग चालू होत असे. कापणीच्या वेळी हिवाळा चालू झालेला असे. कणसे आणि रोपे पिवळसर पडू लागली की ही कणसे तयार झाली समजायचे. सकाळच्या कोवळ्या उन्हात शेतातील पिकलेली शेते अजून सोनेरी दिसू लागत. चालताना होणार्‍या गवतावरील दवबिंदूच्या स्पर्शाने मन ताजेतवाने होत असे.
कापणीची सुरवातही नारळ फोडून व गोडाचे प्रसाद वाटून होत असे. मजूर आणि आम्ही घरातील सगळे कापणीला उतरायचो. पुन्हा बायकांच्या गप्पा, माझं कौतुक ह्या गोष्टी चालू असायच्या. माझ्या भावाचा स्पिड कापणीत चांगला होता. त्याचे पाहून मीही भराभर कापायला शिकत होते. हातात रोप घ्यायची आणि मुठीत भरतील एवढी कापून जमिनीवर काही अंतरा अंतरावर जमा करत जायची. कापताना ह्या रोपांना एक प्रकारचा गंध येत असे. तो अजूनही आठवण झाली की मनात दरवळतो. ह्या भराभर कापण्याच्या नादात बरेचदा धारदार पातीने तर कधी कापण्याचा खरळ हाताला लागायचा. खरळाने हात कापला गेला की लगेच वडील संध्याकाळी धनुर्वाताचे इंजेक्शन द्यायला डॉक्टर कडे न्यायचे. ते इंजेक्शन नको वाटायचे. कापणी नंतर पाय परत दुखायचे पण मला त्याचे काही वाटत नसे. निसर्गाच्या सानिध्यात ही दुखणी दुर्लक्षित होत असत. केवळ घरातली सगळी मंडळी शेतावर असत, घरात एकटी राहू नये म्हणून मला शेतावर शेतात जाऊन तिथे लुडबुड करुन आनंद घेता येत असे.
ज्या शेतांच्या बाजूला ताडगोळ्यांची झाडे असत. पाऊस पडल्यावर ह्या झाडांवर घसरण्याच्या भितीमुळे ह्या झाडांवर कोणी चढत नाही. मग पावसाळ्यात ह्या झाडावरची ताडफळे पडून त्याला कापणीपर्यंत मोड आलेले असत. त्याला मोडहाट्या म्हणतात. ही फळे कोयत्याने फोडायची आणि त्यातील कोंब खायचा. अहाहा माझा हा सगळ्यात आवडता खाऊ.
कापून झाले की साधारण एक आठवडा ही कणसे सुकवली जात. मग पुन्हा मजूर घेऊन ह्या कापलेल्या रोपांच्या गुंड्या वळल्या जात. ह्या गुंड्या एकत्र करुन त्याचे मोठे मोठे भारे बांधले जायचे. भारे बांधण्यासाठी बंध वापरले जायचे. हे घरात करावे लागायचे. हे बंध मागील वर्षीच्या पेंढ्याने करावे लागत. मलाही बंध वळता यायचे. हे बंध तळहातावर पिळून केले जात. त्यामुळे तळहात चांगलेच लालेलाल होऊन दुखत.
भारे वाहण्याचे काम मजूर करायचे कारण प्रचंड ओझं असत हे भारे म्हणजे. पण एकही हौस सोडायची नाही ना मग दोन तीन गुंड्यांचा एक हलका भारा बांधून तो डोक्यावर मोठ्या माणसांसारखा मिरवत जात मी खेळायचे. भारे उचलून झाले की शेतात काही कणसे पडलेली असायची मग ही कणसे टोपलीत गोळा करुन आणायची. ह्या कामात मात्र मी हिरीरीने भाग घ्यायचे. कारण ते मला झेपण्यासारखं होत. कणसं गोळा केली की सकाळी आजी चूल पेटवत असे त्या चुलीच्या निखार्‍यावर कणसे टाकली की त्याच्या फट्फट लाह्या निघत हा लाह्याही तेव्हा तोंडचाळा होता.
भारे ठेवण्यासाठी व झोडपणीसाठी घराजवळ खळगा केला जात असे. खळगा म्हणजे मोकळ्या जागी मध्येच थोडे खणून रुंद खळगा करुन तो खळगा व त्याच्या बाजूची पूर्णं जागा सपाट करुन सारवली जात असे. गुंड्या झोडण्यासाठी खळग्यात जाते किंवा मोठा दगड ठेवला जात असे. ह्या जात्यावर किंवा दगडावर भार्‍यातील एक एक गुंडी झोडून त्यातील तांदूळ खळग्यात जमा होत असे. घरातील सगळेच झोडणीच्या कामातही मदत करायचे. कौशल्य असलेले मजूर दोन्ही हातात एक एक गुंडी घेऊन सुद्धा झोडायचे. मी त्यांची कॉपी करायला जायचे आणि हात दुखून यायचे.
गुंड्या झोडून त्या एका बाजूला रचल्या जायच्या तर खळग्यात जमा झालेले धान्य गोळा करुन त्याची खळग्या बाहेरच्या अंगणात रास लावली जायची. झोडलेल्या गुंड्यांच्या पुन्हा बंधाद्वारे भारे बांधले जात. हे भारे एका बाजूला गोलाकार रचले जायचे. ह्या रचण्याला ठिकी म्हणतात. ठिकीतील धान्य काढून घेतलेल्या गवतकाड्यांना पेंडा म्हणतात. काही दिवस ही ठिकी आमच्याकडे असायचे तेव्हा ह्या ठिकीमध्ये आम्ही लपाछुपी खेळायचो. ठिकीवर उंच चढून उड्या मारायचो. पण खेळल्यानंतर खाज सुरू व्हायची. पण कोणाला तमा होती खेळण्यापुढे खाजेची? ह्याच ठिकीत आम्ही झाडावरचे चिकू काढूनही पिकत घालायचो. एकदा तर ह्या ठिकीमध्ये साप आला होता. तेव्हा मात्र काही दिवस घाबरून होतो. तेव्हा ह्या ठिकीतील भारे गावातील गुरे पाळणारे लोक आमच्याकडून घेऊन जायचे. ह्याच्यातील एखादं-दुसरा भारा आम्ही ठेवायचो. कारण पूर्वी ह्याच पेंड्याने भांडी घासली जायची. आंबे उरतवले की आंबे लवकर पिकण्यासाठी पेंड्यात रचून ठेवले जायचे. हा पेंडा तयार झाला की खास शेकोटी लावण्यासाठी पहाटे काळोखात उठून पाला पाचोळ्यावर पेंडा टाकून मी शेकोटी शेकायचे.
झोडणी करुन झाली की पाखडणी चालू व्हायची. पाखडणी म्हणजे झोडलेल्या धान्यांत राहिलेला पेंड्याचा भुगा, फुसकी भातकुणे पाखडायची. हा एक आकर्षक कार्यक्रम असायचा माझ्यासाठी. पाखडणी करताना रास केलेले तांदळाचे धान्य सुपात घेऊन हात उंच करुन वरून सुप चाळणीसारखा हलवत एका लाइनमध्ये लांब चालत सुपातील धान्य खाली रचायचे. ह्यामुळे हवेने धान्यातील पेंडा, भूसा उडून जायचा. जर त्या दिवशी हवा खेळती नसेल तर फॅनही लावला जायचा हा भूसा उडण्यासाठी. नंतर खाली एका रेषेत ठेवलेल्या भाताच्या धान्याला सुपाद्वारे हवा घालून राहिलेला भूसा काढला जायचा. हा सुप फिरवताना हात जिथे थांबेल तिथपर्यंत हवा जोरात घातली जायची. अगदी घूम घूम असा आवाज तेंव्हा सुपातून निघायाचा आणि त्यामुळे राहीलेला बराचसा कोंडा निघून जायाअ. ह्या सरळ राशीला हळद-कुंकू लावून, अगरबत्ती ओवाळून व नारळ फोडून पुजा केली जायची. अन्न घरी आले म्हणून गोड-धोड मजुरांना वाटले जायचे. त्यानंतर बायका सुपात भात घेऊन शेतातील भातात आलेले मोठे मोठे खडे काढून तो भात पोत्यात भरायच्या. पुरुष मजूर ह्या पोत्यांना सुतळ-दाभणा द्वारे शिवून एका ठिकाणी रचून ठेवायची.
मी अगदीच लहान होते तेव्हा गिरणी नव्हत्या आमच्या भागात त्यामुळे घरातील मोठ्या जात्यावर भात दळायला बसलेली आजी आठवते. तर उखळीवर पॉलिश करण्यासाठी असलेल्या मजूर बायकाही काहीश्या आठवतात. पण कालांतराने गिरणी आल्या. मग भातगिरणीत जाऊन तांदूळ कधी दळायला आणायचा ते विचारून दळण्याचा दिवस ठरे. पोती दळायला नेण्यासाठी खटारा बोलावला जाई. खटार्‍यातील पोती ढवळ्या-पवळ्या घुंगराच्या तालावर गिरणीपर्यंत पोहोचवत. गिरणीवाल्याला तांदूळ पॉलिश करुन हवा की नको ते सांगण्यात येई. गिरणीत भात दळला की तांदूळ, भाताचा कोंडा व तूस (टरफले) वेगवेगळा मिळे. घरात आम्ही येणार्‍या नवीन धान्याची वाट पाहत असायचो. घरी तांदूळ आले की पोती घरात उतरवल्या जायच्या. तांदूळ ठेवण्यासाठी तेव्हा सगळ्यांच्या घरात बांबूपासून बनवलेली मोठी कणगी असायची. माझ्या वडिलांनी तांदूळ ठेवण्यासाठी एका खोलीत कोठार बांधून घेतले होते. त्या खोलीला आम्ही कोठीची खोली म्हणायचो. कोठीत तांदूळ ठेवण्यापूर्वी तांदूळ चाळवण्यासाठी एक-दोन बायका मजुरीवर बोलवून तांदूळ चाळले जायचे. चाळलेल्या तांदळातून कणी (तुटलेले तांदूळ) निघायचे. हे तांदूळ वेगळ्या पोत्यात भरून ठेवले जात. कण्या दळून आणून त्यापासून भाकर्‍या केल्या जायच्या. तांदळामध्ये भांबुर्डा किंवा कढीलिंबाचा पाला टाकून पोती भरून तांदूळ कोठीत ठेवला जात असे. हे मुख्य अन्न आम्हाला वर्षभर साथ करायचे.
गिरणीतून आणलेला तूस आजी एका घमेलात ठेवून त्यावर मोठे अर्धवट जळलेले लाकूड ठेवत असे. रात्री निखार्‍याचे लाकूड ठेवले की धुमसत धुमसत तुसाची सकाळपर्यंत राख होत असे. मग ही राख चुरगळून चरचरीत होत असे. ही राख आजी एका बरणीत भरून ठेवत असे. तिच लहानपणी आम्ही मशेरी म्हणून वापरायचो.
गिरणीतून आणलेला कोंडा हा अतिशय पौष्टिक असे. ह्या कोंडयाचे आजी चुलीवर पेले बनवत असे. चवीला हे कडू-गोड लागत. पेले म्हणजे तांदळाचा रवा, कोंडा, गूळ घालून मिश्रण करुन ते छोट्या पेल्यांमध्ये वाफवायचे.
माझ्या अगदी बालपणीच्या आठवणीतल आठवत सुरुवातीला आमच्याकडे लाल तांदूळ पिकायचा. त्याला राता/पटणी म्हणत. हा चवीला गोड लागत असे. भात व भाकरी दोन्ही लाल नाचणीप्रमाणे व्हायच्या. ह्याचा भात गोड लागत असे. भाकरी रुचकर लागे. कालांतराने पंचायत समितीमध्ये कोलम, जया सारखे बियाणे येऊ लागले. मग एक शेत भाकरीसाठी पटणीचे ठेवून बाकीची पांढर्‍या तांदळाची लावू लागलो.
गिरणीतून भात आणला की आई त्याचा भात करायची आणि देवाला नैवेद्य दाखवायची. हा भात चिकट होत असे नवीन असल्याने. अशा तांदळांना नव्याचे तांदूळ म्हणत. हे तांदूळ नंतर कोठीत जुने करण्यासाठी ठेवत. तोपर्यंत मागील वर्षीचा तांदूळ संपेपर्यंत तो जेवणासाठी वापरत.
तर अखेर इतक्या अथक मेहनतीने तांदूळ आमच्या घरी येत असे. तेव्हा ताटात भात टाकला की सगळे किती मेहनतीने आपल्या घरात भात येतो ह्याची आठवण करुन द्यायचे मग आपोआप थोडी पोटात जागा व्हायची. पण ही शेती मला शालेय जीवनापर्यंत अनुभवता आली. कालांतराने गावांमध्ये कंपन्या आल्या आणि कॉन्ट्रॅक्ट बेसिस वर जास्त मजुरी देऊन मजूर घेऊ लागल्या. त्यामुळे शेतीसाठी मजूर मिळेनासे झाले. खत, बियाणे, औषधे सर्वच महागले. त्यामुळे शेती पूर्वीसारखी परवडत नव्हती.
आज कुठेही शेते दिसली की मन पूर्वीच्या त्या हिरव्या हिरव्या-सोनेरी दिवसांत बागडून येते. तो निखळ, निरागस आनंद त्या आठवणींत अजून गवसतो.

सौ. प्राजक्ता पराग म्हात्रे, उरण.
(हा लेख माहेर - ऑगस्ट २०१३ मध्ये प्रकाशीत झालेला आहे.)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा