शुक्रवार, १७ जून, २०१६

उरण चिरनेर येथिल ऐतिहासिक महागणपती

रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यात चिरनेर हे एक गाव पनवेल पासून २२ किलो मिटर तर उरण शहरापासून १६ किलोमिटर अंतरावर निसर्गाच्या सानिध्यात वसलेल खेडेगाव. आजूबाजूला डोंगर, तळी, खाडी ने आच्छादलेल हे छोटस खेडं.
ह्याच गावात एक जागृत, ऐतीहासीक महागणपतीचं देवस्थान आहे. देवळाच्या दिशेला जाताना गावात गल्ली गल्लीतून आत शिरताना कुंभारकामाचे नमुने पहायला मिळतात.
उरण-चिरनेर गावचे हे मंदीर ऐतीहासीक नोंदीतले आहे. ह्या देवळाने इतिहास जोपासला आहे. यादव राजवटीच्या काळात महाराष्ट्रावर परकीयांचे आक्रमण झाले. यादवांचे राज्य अल्लाउद्दिनने १२९४ मध्ये उडविले. सुलतानशाही आणि पोर्तुगिजांच्या आक्रमणाने गणपतीच्या मुर्ती तळ्यात, विहिरीत आणि जमिनीत लपविण्यात आल्या. अशाच मार्गाने चिरनेरचा गणपतीही तळ्यात लपविण्यात आला अशी नोंद आहे.
चिरनेर येथील गणपतीच्या मंदिराची स्थापना नानासाहेब पेशवे यांच्या कारकिर्दित झाली. त्यांचे सुभेदार रामाजी महादेव फडके हे पेशव्यांप्रमाणेच गणेशभक्त होते. धर्मासाठी छळ करणार्‍या पोर्तुगीजांचा पुढे पेशव्यांनी पराभव केला. नानासाहेब पेशव्यांनी उरण व पाली ही आंग्र्यांची ठिकाणे घेतली. सुभेदार व पेशवे सुभेदार रामजी फडके यांना चिरनेर गावच्या तळ्यातील गणपतीने दृष्टांत दिला की मी तळ्यात उपडा पडलो आहे. वर काढून माझी प्रतिष्ठापना करा. मग तळ्यामध्ये मुर्तीची शोधाशोध सुरू झाली व गणेशमुर्ती तळ्यात सापडली. ह्या तळ्याला देवाचे तळे नाव पडले.
सुभेदार रामाजी फडके यांनी तळ्यातून काढलेल्या गणपतीचीच्या मुर्तीची हेमाडपंथीय धाटणीच्या मंदिरात प्रतिष्ठापना करण्यात आली. ह्या गणपतीला महागणपती संबोधण्यात येते. आता मंदीरावर बाहेरून प्लास्टरचे काम केले आहे.
उरण-चिरनेर येथिल महागणपतीच्या देवळाचा आकार १७ x १७ इतका आहे. आतील गाभारा १२ x १२ फुट आहे. गाभार्‍याचा दरवाजा पूर्वाभिमुख आहे. दरवाज्यावर गणेशपट्टी दिसुन येते. देवळाचा घुमट गोलाकार असून मुख्य घुमटाच्या चार बाजूला चबुतरे आहेत. मंदीराचा कळस गोलाकार घुमटावर बसविला आहे. मंदीरातील मूर्ती ७ फुट व रुंदी ३.५ फुट आहे. मुर्ती भव्य व शेंदूरचर्चित आहे. गणेशाची सोंड डावीकडे वळलेली आहे.
आतील घुमट
मुषक
चिरनेरच्या महागणपतीची मूर्ती तिळातिळाने वाढते अशी भाविकांची श्रद्धा आहे. हा गणपती नवसाला पावतो अशी ह्याची ख्याती पुर्ण उरण परीसरात आहे. त्यामुळे आता इथे भक्तगणांची संख्या वाढली आहे. पुर्वी चिरनेर गावातील लोक न्यायनिवाडा करण्यासाठी गणपतीला कौल लावायचे. माघी गनेशुत्सव व संकष्ट चतुर्थीला गणेशमूर्तिला सजवण्यात येते. तिला चांदीचा मुकुट चढविण्यात येतो. कालांतराने ह्या चांदीच्या मुकूटाचे सोन्याच्या मुकुटात रुपातर होईल ह्यात शंकाच नाही.
उरण-चिरनेरच्या ह्या महागणपतीने स्वातंत्र्य लढ्यात सहभाग घेउन त्याचे चटकेही सोसले आहेत. त्यामुळे चिरनेरच्या महागणपतीच्या मंदीराची गणना भारताच्या ऐतिहासिक मंदीरामध्ये होते.
इंग्रज राजवटीत चिरनेर गावात मोठे जंगल होते अजूनही आहे. त्या काळी चिरनेर गावातील बर्‍याचशा लोकांचा व्यवसाय, त्यांच्या पोटापाण्याची सोय ही जंगलावर अवलंबून होती. जंगलातील मध, सुकी लाकडे, फळे, रानभाज्या, शिकार विकून स्थानिक आपला गुजारा करत असत. पण इंग्रजांनी देशात जंगलावर स्थानिकांना बंदी घातली. त्यामुळे येथिल स्थानिकांचे पोटापाण्याचे हाल होऊ लागले. देशभरातील जंगलावर अवलंबून असणार्‍या सर्व कुटुंबांवर हिच परिस्थिती ओढावली होती. त्या अनुषंघाने १९३० साली देशभार जंगल सत्याग्रह पुकारला गेला. ह्या जंगलसत्याग्रहाला उरण-चिरनेरच्या स्थानिकांनी भरगोस पाठिंबा दिला.
अहिंसेच्या मार्गाने जाणार्‍या ह्या सत्याग्रहाचे रुप हिंसेत बदलले. दिनांक २५ सप्टेंबर १९३० रोजी चिरनेरच्या अक्कादेवीच्या माळरानावर ब्रिटिशांच्या हुकुमावरुन स्थानीक पोलिसांनी गोळीबार केला. त्या गोळीबारात काही स्थानिक शहीद झाले. मग ह्या गोळीबारातील तपासणी दरम्यान चिरनेर गावचे काही रहिवासी आरोपी म्हणून पकडले गेले. गावात पोलीस चौकी नव्हती म्हणून चिरनेरच्या महागणपतीच्या देवळात ह्या आरोपींना कोंडण्यात आले व देवळाच्या दगडी खांबांना त्यांना करकचून बांधून त्यांना मारहाण केली. पण गणपतीचा आशिर्वाद पाठीशी असल्याने कोणीही देशभक्त माफीचा साक्षिदार झाला नाही. या सामान्य माणसांनी स्वातंत्र्य लढ्याचा इतिहास घडविला गणपतीच्या आशिर्वादाने. उरण-चिरनेरच्या महागणपतीच्या देवळा समोर हया शहिद स्वातंत्र्य वीरांचे हुतात्मा स्मारक बांधले आहे.
अक्कादेवीच्या जंगलातील गोळीबार थांबल्यावर गावात भितीचे वातावरण झाले होते. पोलिसांनी केलेल्या गोळीबारामुळे आपले सहकारी, आप्त स्वर्गवासी झाले ह्याची तळमळ चिरनेर गावच्या बाळाराम रामजी ठाकुर ह्या तरुणाच्या रक्तात भिनत होती. पोलिसांवर सुड उगवण्यासाठी, त्यांची निर्भत्सना करत तो निधड्या छातीने देवळाजवळ आला. तेंव्हा पोलिस खात्यातील एका पोलिसाने बाळाराम ठाकुरच्या दिशेने नेम धरला. बाळाराम सभामंडपाच्या दरवाज्याजवळ उभा होता. पण पोलिसाचा नेम चुकला व गोळी सभामंडपाच्या गजाला लागली. बाळाराम ठाकुर ह्यांचा हात जखमी झाला. नंतर त्याच्यावर उपचार झाले. ह्या लोखंडी गजाची खुण अजुनही देवळाच्या गजाला जिवंत आहे. ग्रामस्थ ही निशाणी त्या गजाला वेगळा रंग देऊन शाबुत ठेवतात.
तर असा हा उरण-चिरनेर गावचा गणपती नवसाला पावणारा गणपती, तिळातिळाने वाढणारा म्हणून ह्याची ख्याती उरण, मुंबई, पुणे, पनवेल येथे काही प्रमाणात पसलरेली आहे. माबोकरांनीही त्याचे दर्शन घ्यावे.
बाकी जंगल सत्याग्रहाचा इतिहास खुप मोठा आहे. तो चिरनेरगावच्या लेखकाच्या मार्गदर्शनाखाली मी वेगळा लिहिण्याचा प्रयत्न करेन.
सदर लेखनासाठी उरण चिरनेर गावचे लेखक श्री. वसंत भाऊ पाटील यांच्या पुस्तकाचा काही अंशी आधार घेतला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा