ह्या सुट्टीत नेपाळ किंवा कुलू मनाली किंवा काश्मिर ह्या पैकी कुठे जायचे असे ठरता ठरता शेवटी काश्मिरवर शिक्कामोर्तब झाला. आम्ही तिन जोडपी आणि पिल्लावळ असे आम्ही नेहमीच जातो. माझी मुलगी पावणे दोन वर्षाची असल्याने तसेच इतरांनाही जास्त दगदग नको होती म्हणून सगळ्यांनीच वैष्णौदेवी-कतरा गाळण्याचे ठरवून त्या प्रमाणे आमचे पॅकेज इझी गो मध्ये बुक केले. ११ मे ते १७ मे असा हा सगलीचा कालावधी ठरवला गेला.
इथला मे-जून चा कडक उन्हाळा नकोसा होऊन काश्मिर सहलीची स्वप्ने मनाला शितलता देत होती. बर्फाचे डोंगर, बर्फात खेळणे, मस्त थंडी, झाडाला लागलेले सफरचंद, काश्मिरी ड्रेस अशा स्वप्नांचे तरंग वारंवार डोळ्यासमोर उमटून गारवा येत होता. काश्मिरला जायचे दिवस जवळ आले तसे नेण्यासाठी लागणार्या सामानाची जुळवा जुळव चालू झाली. सगळ्या ओळखीच्या लोकांकडून अनुभवी व बिनअनुभवी सल्ले येऊ लागले. कोणी म्हणे तिथे खुप थंडी असते तर कोणी म्हणे आपल्या सारखेच वातावरण असते. पण आम्ही थंडीच्या कपड्यांची जास्त जुळवाजुळव केली. आमची, दोन्ही मुलींची सगळ्या किरकोळ आजारांवरील आठवतील तशी औषधांची एक छोटी बॅग भरायला सुरुवात केली. पिल्लावळ तर खुपच उत्सुक झाली होती. दोन दिवस जायला बाकी होते आणि नेमकी छोट्या राधाला ताप यायला सुरुवात झाली. मन थोडे विचलीत झाले. इथे उन तर तिथे थंडी. तिथे हिला अजुन त्रास तर होणार नाही ना? प्लॅन कॅन्सल करावा का? माझ्या मनातला निसर्गमय कोपराही मधूनच डोकावत होता. त्यातून एक चांगली गोष्ट म्हणजे औषधाने फरक पडत होता. मिस्टरांनी व इतर सगळ्यांनीच धीर दिला की इथल्या उष्णतेमुळे होणारा त्रास तिथल्या थंड वातावरणात कमी होईल. आदल्या दिवशी डॉक्टरांनीही ग्रीन सिग्नल दिला. रात्री १.५ वाजे पर्यंत उरले सुरले सामान बॅग मध्ये भरण्याचे काम चालूच होते. खरे तर राधाची काळजी व सकाळी लवकर जाण्याच्या विचारांनी झोपच लागत नव्हती.
इतर दिवशी ९ वाजता उठणार्या माझ्या मुली काश्मिरला जायचेय (राधासाठी बाहेर फिरायला जायचेय) ऐकताच पहाटे ४ वाजता उठल्या व उफाळून आलेल्या आनंदात भराभर तयारीही केली. राधा फ्रेश वाटतेय हे पाहून माझा जीव भांड्यात पडला. सकाळी ९ ची फ्लाईट होती ७ वाजता एअर पोर्टवर पोहोचायचे होते त्यामुळे घरातून ५.३० ला घराला व घरातील मंडळींना टाटा करुन निघालो. एअरपोर्टवर जाण्यासाठी आम्ही भा़ड्याची सुमो केली होती. त्यात सगळ्यांचे सामान बांधून गणपती बाप्पा मोरया चा नारा चढवून आम्ही एअरपोर्टवर बरोब्बर पावणेसातला पोहोचलो. विमानतळावर येणारी-जाणारी विमाने पाहण्यात श्रावणी-राधा गुंग होत्या. तिथले सगळे सोपस्कर पूर्ण करुन आम्ही विमानात बसलो व ९ वाजता आमचे विमान सुटले. विमान व्हाया अमृतसर होते. अमृतसरच्या विमानतळावर उतरत असताना कुठे सुवर्णमंदीर दिसते का ह्याचा शोध आम्हा सगळ्यांच्या सुप्त नजरा घेत होत्या.
अमृतसर वरून निघून साधारण २ वाजता आमचे विमान श्रीनगरला पोहोचले.
अमृतसर वरून निघून साधारण २ वाजता आमचे विमान श्रीनगरला पोहोचले.
खाली उतरता उतरताच कोणीतरी ओरडल तो बघा बर्फाचा डोंगर. दूरवर बर्फाच्छदीत डोंगर चमकताना दिसत होता. तो पाहताच वॉव, आहाहा, मस्तच असे उद्गार सगळ्यांच्या तोंडी डोंगराप्रमाणेच उंचाऊ लागले. तिथे काळ्या ढगांनी आभाळ भरून आल होत. गार गार वारा हिंदोळे घेत होता. आमच्या स्वागतासाठी काश्मिरच्या गार वर्षाबिंदूंची बरसात होणार होती.
मुंबईच्या गरम वातावरणामुळे आम्ही साधे कपडे घालूनच गेलो होतो. पण श्रीनगरच्या विमानतळावर उतरल्याबरोबर थंडीने कुडकुडू लागलो. राधाला मी लगेच शॉल मध्ये गुंडाळून घेतले. श्रावणीला मफ्लर गुंडाळून दिला. इझी गो ट्रॅव्हलचा ड्रायव्हर आमची वाट पाहत विमान तळावर थांबला होता. कुडकुडत्या थंडीतही मी तिथला निसर्ग न्याहाळत होते. गाडीत जाउन बसल्यावर जरा थंडी कमी जाणवू लागली.
आम्ही घेतलेल्या पॅकेजनुसार आम्ही पहिले दोन दिवस श्रीनगरमध्ये दल लेक मधील हाउसबोट मध्ये राहणार होतो. मुले तर फारच उत्साही होती हाउसबोट साठी. श्रीनगर विमानतळावरुन आम्ही दल लेकच्या दिशेने निघालो. तेंव्हा मला लगेच जाणवले आपल्या निसर्गापेक्षा कितीतरी वेगळा हा निसर्ग आहे. हवा, पाणी, दगड, झाडे सगळ्याचे दृष्टीने. महाराष्ट्रातून फिरताना जशी आपल्याला जागोजागी आंबा, फणस, काजू, चिंचेची झाडे दिसतात तशी इथे अॅप्पल, आक्रोडची झाडे होती. आपल्या महाराष्ट्रात जशी सोनमोहोर, पर्जन्य वृक्षाची झाडे दिसतात तशी इथे भले मोठे बुजुर्ग चिनार वृक्षाची झाडे दिसत होती. अर्थात ह्या दिवशी मला ह्या झाडांची नावे कळली नव्हती. ती पुढे हळू हळू कळली. महाराष्ट्रात जास्वंदीची झाडे जशी कुंपणाला फुललेली असतात तशी इथल्या घरांच्या समोर झुबक्यांनी आलेली गुलाबाची मोठ्ठी मोठ्ठी फुले दिमाखात आपल्या काश्मिरचे सौंदर्य दरवळवत होती. मध्ये मध्ये तर काही बारीक पिवळी फुलेही डुलत होती.
दिड ते दोन तासात आम्ही दल लेक ला पोहोचलो. गाडीतून उतरलो तेंव्हा जाणवले की विमानतळावरील थंडी अजून आनंदात उफाळून आमच्याबरोबर येऊन स्वतःचा आनंद द्विगुणीत करत आहे. बच्चे कंपनीने थंडीवर मात करत हौसेवर ताबा मिळवला. राधा पण शिकारातून हाऊसबोट पर्यंत जाताना मम मम करत आपला आनंद व्यक्त करत होती. शिकारा चालवणारे सकळेच कश्मिरी त्यांच्या गोड भाषा शैलीचा वापर करतात. अगदी आदराने आणि आपलेपणाने आपल्याशी बोलतात. त्यांच्या प्रत्येकाच्या तोंडात एकच वाक्य बसलेल असत ते आम्हाला मजेशीर वाटल. साब "कश्मिर का मौसम और बंबई का फॅशन का कुछ अंदाजा नही लगा सगते वज मिनटोमे बदल जाता है."
पाउस पडून गेल्याने तापमान खुपच थंड झाले होते. वातावरणही ढगाळच होते. कुडकुडत आम्ही हाउसबोट मध्ये जाऊन हाउसबोटमधल्या रुमचा ताबा घेतला.
हाउसबोट मध्ये गेल्यावरही राधा सारखी तळे दाखवायला बाहेर न्यायला लावत होती. पण प्रचंड गारवा होता. आम्ही सगळ्यांनी आमचे उबदार कपडे घातले आणि जेवायला गेलो. जेवणाची सोय हाउस बोटच्याच बाजूच्या मागच्या आवारात होती. जेवणा दरम्यान परत पाउस चालू झाला आणि पुन्हा थंडीची लाट अधीक जाणवू लागली. आम्ही जेवण आटोपताच आपाअपल्या रुम मध्ये जाऊन राधाला औषधाचा डोस देउन ब्लॅकेंट्स वगैरे घेउन आराम करायला बसलो. रुम मध्ये २४ तास गरम पाणी होते हे एखाद्या वाळवंटात पाण्याचा खड्डा पाहण्यासारखे सुखद होते.
एखाद तास आराम करुन मग शिकार्यातून दल लेक मधील मार्केट पहायला जाण्याचा पुढचा प्लॅन होता. पण प्रचंड न सहन होणार्या थंडीमुळे राधाला अधिक त्रास होऊ नये म्हणून आम्ही नवरा-बायको दोघांनी हा प्लॅन रद्द केला. श्रावणी मात्र तिच्या काका-काकींबरोबर मज्जा करायला निघून गेली. गरमा गरम कबाब वगैरे खाउन ते सगळे परत आले आणि आम्ही खुप काही मिस केल करुन आम्हाला टुक टुक माकड केलं. ती संध्याकाळ पुर्ण काळोखी होती. आता असेच वातावरण राहीले तर आपण कसे काश्मिर पहायचे हा प्रश्न आमच्यापुढे होता.
दुसरा दिवस उजाडला तो उन्हाची किरणे पसरत. त्यामुळे खुप हायसे वाटले. बाहेर गेलो तेंव्हा स्वच्छ तळे सभोवतारी हिरव्यागार डोंगरांच्या रांगा, त्यावर आलेले काहिसे ढग, तलावात फिरणार्या शिकारा दिसू लागल्या.
सकाळी येथे बरेच व्यापारी येतात. हे व्यापारी पण गोड बोलीच्या शैलीचेच असतात. एक केसर विकणारा व्यापारी आला होता. त्याने केसरचे फुलही आणले होते. हे पाहताना फार कुतुहल वाटत होते.
काही वेळाने एक फुलांनी भरलेली शिकारा दिसली. माझ्या आनंद त्या गगनचुंबी पर्वतरांगांप्रमाणे फुलला होता. वेगवेगळ्या प्रकारची फुले घेऊन त्या शिकार्यातील व्यापारी त्या फुलांचे कंद विकण्यासाठी घेउन आले होते.
त्या व्यापार्याने सगळ्या फुलांचे अलबम, बिया व कंद दाखवली. त्यात हिरवे तसेच इतर गुलाब अजुन वेगवेगळ्या फुलांचे फोटो दाखवले. त्यात आपल्याकडे असणारे मे फ्लॉवर, वेगवेगळ्या लिलिही होत्या. ही फुले आपल्याइथे होतील की नाही याची मी त्याला शंका विचारली तेंव्हा त्याने ३० ते ३५ डिग्री पर्यंत हवामानात ही फुले येतात असे त्याने सांगितल्याने मी काही कंद त्याच्याकडून घेतले. शिकारामधील एक त्याच्या भाषेतील न्युईन गुलाब नामक फुल आणले. हे फुल गुलाबासारखेच व गावठी गुलाबाचा वास असणारे होते.
ह्या निसर्ग सौंदर्याने, फुलांनी आदल्या दिवशीचा ताण कुठल्या कुठे पळून गेला.
आमच्या ड्रायव्हरने माहीती दिली की थंडीत येथ बर्फ होऊन त्यावर मुले फुटबॉल खेळतात. एकदा एका पुढार्याने आत बर्फावरून गाडी पण नेली होती.
दुसर्या दिवशी सूर्यप्रकाशातील वातावरणातून शिकारातून जाताना तलावातील स्वच्छ पाणी , आत मध्ये काही वेली व छोटे छोटे मासे पाहताना मन प्रसन्न झाल होत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा