शनिवार, ५ मे, २०१८

मधुर, मोहक ताडगोळे

आकाशाला भिडायला निघालेली, सरळ उंच वाढलेलं खोड त्यावर झुबकेदार टोकेरी पात्यांची भारदस्त झाडे म्हणजे ताड. ह्या ताडाच्या फळांच म्हणजे ताडगोळ्यांचं आणि माझा लहानपणापासून अतिशय सख्य. ताडगोळे म्हटल्यावरच माझ्या मनात शांत आणि मधुर भाव उमटतात. वाचताना कदाचित हे तुम्हाला हास्यास्पद वाटेल पण असच आहे हे पुढच्या लिखाणावरून कदाचित तुमच्यापर्यंत पोहोचेल.
उरणला नागांवात माझ्या माहेरी वाडीत ताडाची ७-८ उंच झाडे होती. काही ठिकाणी एकमेकांना सोबत देत दोन-तीन झाडे एकत्र कुटुंब पद्धतीत होती तर कोणी एकटेच शांतताप्रीय, एखादे आपल्याच तोर्‍यात तर कोणी सदा प्रसन्न सळसळते. दुपारच्या भर उन्हात जरी ह्या झाडाखाली गेलं तरी ही भक्कम झाडे स्वतः उन्हाच्या झळा सोसत मातृभूमीवर शीतल सावलीचे छत्र धरून असायची . संध्याकाळ झाली की मग स्वतःही शांत होऊन खट्याळ वार्‍यासोबत दंगामस्ती करत असायची.

ताडगोळे तयार झाले की चार-आठ दिवसातून एकदा ताडाच्या पेंडी काढणारा माणूस यायचा. सोबत त्याचीच आई किंवा बायको असायची. ताडावर चढण्याची कला ही फार साहसी असते. कमरेला कोयता ठेवायचं एक लाकडी साधन दोरीने बांधलेलं असायचं त्याला कोयता अडकवलेला असायचा आणि हाताला मोठाला दोरखंड अडकवण्यापुरता बांधून पायात जाड दोरीच झाडाच्या खोडला पाय फाकतील इतक्या आकाराच वर्तुळ अडकवून पाय फाकवून त्या वर्तुळाच्या दोरीवर उभे राहून त्या महावृक्षाला कडक मिठी मारत हा माणूस झपाझप त्याच्या गाभ्यापर्यंत पोहोचायचा. 


आता एवढ्या उंच मजल मारली तरी तिथे उभे राहणेही सोपे नाही कारण ताडाच्या झावळीच्या देठाला करवतीसारख्या दातांच्या धारदार कडा असतात त्या सांभाळून उभे राहावं लागतच शिवाय भर म्हणून कधी कधी मुंग्यांची वारुळे आणि उंदीरच सामनाही करावा लागतो. पुढेही कसरतच असते. तयार झालेली ताडफळे ओळखायची त्याला दोरखंड बांधायचा मग हळुवार पेंडीचे देठ तोडून दोरखंड हातात धरून ती पेंड लामण्याप्रमाणे पण हळुवार खाली सोडायची. दोरखंड मात्र अजून पेंडी काढायच्या असतील तर हातात तसाच ठेवायचा आणि ह्या हातातल्या टोकाने पुन्हा दुसरी पेंड बांधून घ्यायची. खाली जे कोणी उभे असेल ते पेंडीला बांधलेला दोरखंड सोडायचे. त्या पेंडीला मोकळे केले की दोरखंड परत वर खेचून घ्यायचा आणि दुसरी बांधलेली पेंड खाली सोडायची. एका पेंडीला कमीत कमी तीन-चार आणि जास्तीत जास्त २० ताडफळे असतात त्यामुळे ह्या पेंडी वजन असतात. कधी कधी ५-६ पेंडीही एका झाडावर निघायच्या. पेंडी काढून झाल्या की दोरखंड खाली टाकून चढलेला माणूस झपाझप पायातील दोर्‍याच्या वर्तुळाच्या आधारे खाली यायचा.





चढणारा माणूस उतरला की लगेच तिथेच ताडगोळे सोलले जायचे. एक मोठी टोपली त्यात करंज झाडाचा हिरवागार पाला पसरलेला असायचा. ह्या पाल्याने गारवा येऊन ताडगोळ्यांचा ताजेपणा टिकायला मदत होते. ताडगोळे जिथे सोलायचे तिथे एक गोणपाट पसरवायचे त्यावर लाकडी ओंडका ताडफळे धरण्यासाठी आणि काढणार्‍याच्या हातात कोयता अशी साधने असायची. ताडगोळे काढण्याची कला ही सोपी नसते. 
नारळावर कुठेही घाव बसला तरी चालतो पण ताडफळाला नेमक्या जागी घाव बसून तासणे आवश्यक असते नाहीतर नाजूक ताडगोळा फुटून त्याचे पाणी निघून जाते. 


ताडफळे तासणार्‍याचा हात चांगलाच सरावलेला असायचा त्यामुळे तो भरभर हे ताडगोळे काढून टोपली भरायची. रिकामी ताडफळे जाळण्यासाठी सुकायला ठेवली जायची. काढलेले ताडगोळे मोजले जायचे मग भाव ठरवून ताडगोळे काढणाराच ते विकत घ्यायचा आणि त्याची घरची मालकीण ते बाजारात विकायला न्यायची. तेव्हा ५ रु. डझन ने बाजारात ताडगोळे विकले जायचे तेही महाग वाटायचे. वाडीत एक ताड मोहाचा होता. मोहाचा म्हणजे त्यातील पाणी अती मधुर आणि गर अगदीच चविष्ट. हे ताडगोळे वडील कधीच विकायचे नाहीत. ते घरात आणि पाहुणे मंडळींसाठी असायचे. बरेचदा काका- आत्या कडेही ह्या ताडगोळ्यांची भेट जायची.

ताडगोळे काढायला सुरुवात केली की वडील आम्हा भावंडांना सांगायचे "टोपलीजवळ बसून राहा व हवे तेवढे ताडगोळे खा". माझं ताडगोळा हे अतिशय प्रिय फळ. कोवळे ताडगोळे गोंडस गुलाबी तर तयार झालेले ताडगोळे पांढरे शुभ्र अगदी मोहक दिसायचे. 
मी मनसोक्त त्यावर ताव मारायचे. ताडगोळ्यांचे अतिरिक्त प्रमाण बाधक असते ही आईची सूचना असायचीच पण ताडगोळ्यांच्या बाबतीत "जी ललचाये, राहा ना जाये" हा प्रकार होता. ह्यातले जून ताडगोळे असले की ते चावायला कडक आणि खोबर्‍यासारखे लागायचे ते चाळा म्हणून खायला बरे वाटायचे. ताडगोळे अगदीच जे कोवळे असायचे ते फळातून काढणे शक्य नसायचे. मग त्याचा वरचा भाग कापला जायचा ताडगोळे दिसे पर्यंत. एका ताडगोळ्यात तीन ते चार ताडगोळे असतातच. मग अशा गोळ्यात बोट घालून ते फोडायचं आणि डायरेक्ट तोंडात त्याचे पाणी आणि बोटानेच कुस्करून तोंडात ओढलेला गर अप्रतिम लागायचा. त्याला आम्ही फुरकी मारून खाणे म्हणायचो म्हणून ते फुरकीचे ताडगोळे. आम्ही शेवटी खास अशी फळे तोडून ठेवायला सांगायचो. जे ताडगोळे काढलेले असायचे त्या ताडफळाचा जो वरचा कोवळा गाभा असतो तोही खातात. त्याला आम्ही मोग म्हणतो. हे मोग जरा कडवट असतात. पण काहीच नसले की टाईमपास म्हणून बरे लागतात. हे मोठ्या माणसांना जास्त आवडायचे.
कधी कधी भरपूर पेंडी उतरवल्या जायच्या. मग एका वेळी एवढे ताडगोळे तासणे शक्य नसायचं. अशावेळी वडील व भाऊ मिळून ह्या पेंडी विहिरीत टाकायचे . आश्चर्य म्हणजे ह्या पेंडी पाण्यात तरंगायच्या. मला तर रामाने बांधलेल्या सेतूच्या दगडांचीच आठवण व्हायची आणि मी ही मग खार बनून एखादी छोटीशी तीन-चार फळांची पेंड विहिरीत टाकायचे. हा कार्यक्रम पाहायला मला खूप गंमत वाटायची. कारण पेंडींची वजनदार उडी आणि ते पाण्यात पडल्यावर येणार धब्ब आवाज आणि उडणारे पाणी हे पाहणं नयनरम्य असायचं. पाण्यात राहिल्याने ताडगोळे ताजेच राहायचे. मग जेव्हा हव्या तेव्हा पेंडी काढल्या जायच्या.

अंदाजे एप्रिल - मे महिन्यांत ताडपत्रींची (ताडाची पाने) म्हणजे ताडकांची तोडणी असायची. ही ताडकं मला मोराच्या पिसार्‍यासारखे वाटतात. अगदी नाचण्यासाठी सिद्ध झालेला मोराचा पिसाराच जणू. हे तोडताना ताडकं ठेवून बाजूच्या जास्त तयार झालेली ताडकं तोडायची. ताडकं तोडून खाली रचून ती उडून जाऊ नये म्हणून त्यावर ताडकांचे करवतीसारखे असणारे अवजड देठ ठेवायचे आणि ही ताडके काही दिवस सुकवायची.

 ही ताडके झोपडीच्या छतासाठी, अंगणाच्या छपरासाठी अथवा पडवीच्या पावसाळी बांधणीसाठी गरजेची असायची. ही ताडकं गरजवंत घेऊन जायचे. गरिबांच्या झोपड्यांना वडील फुकटच देऊन टाकायचे. ताडकांच्या धारदार कडांच्या देठांचा कुंपण बांधायला उपयोग व्हायचा. हे कुंपण सुशोभित दिसायचे.
सगळ्याच पेंडी काही ताडावरून काढल्या जायच्या नाहीत. काही जून व्हायच्या त्या तशाच झाडावर पिकायच्या. साधारण जून-जुलै मध्ये ही फळे पिकली की केशरी रंगाची होतात आणि खाली पडतात ह्यांना एक वेगळाच गोड वास येतो. अजूनही त्या फळांची आठवण झाली की पावसाळा आणि त्या फळांच्या गंधाच्या स्मरणलहरींची चलबिचल होते. ह्या फळाचा रस चघळण्यातही एक सुगंधी आनंद असायचा. ह्या पिकलेल्या फळाचा केशरी रस काढून त्याचे काही सुगरणी घावानं, गुलगुल्यांसारखे पदार्थ बनवायच्या. त्या पदार्थांना तो विशिष्ट सुगंध असायचा. एक-दोन फळे पुरी होत असत पदार्थासाठी. बाकीची फळे तशीच पावसाळी चिखलात पडून रुतायची. कापणीचा हंगाम आला की ह्या फळांची मुळे जमीनीत रुतलेली असायची. ती उपटून काढायची. ह्याला आम्ही मोडहाट्या म्हणतो. आता ह्या फळाचा वरील मांसल भाग जाऊन सोललेल्या नारळाप्रमाणे टणक जमिनीच्या रंगाशी एकरूप झालेले असायचे. ते कोयत्याने बरोबर मध्ये फोडायचे मग त्यातून अतिशय चविष्ट गर निघतो. हा खाणे म्हणजे परमानंद. मी बरेचदा दुपारी, संध्यकाळी कधीही लहर आली की कोयता घ्यायचे आणि ह्या मोड हाट्या शोधून तोडून त्यांचा आस्वाद घ्यायचे.


जी फळे तशीच रुतलेली रहायची त्याला पुढे कोंब फुटून त्याची रोपे तयार व्हायची. बरं अजून ह्याच्या आस्वादाची तपश्चर्या पूर्ण झाली नाही. ह्या रोपांमध्ये जी खोल मुळे रुतली जातात ती एक-दीड फुटाची असतात. ती खणून काढली जातात व ती कापून उकडून खाल्ली जातात. ह्या प्रकाराला तरले म्हणतात. प्रचंड मेहनतीने हे तरले खणून काढले जातात. सगळीच मुळे काढली जात नाहीत. न काढलेली रोपे तशीच रुजून पुढे त्यांचे मोठ्या ताडात रूपांतर होते. आता कोणी म्हणेल कशाला ही रोपे काढतात तर ही खूप जवळ जवळ असतात आणि ती इतकी जवळ वाढू शकत नाहीत म्हणूनच निसर्गाने ही व्यवस्था केली असावी.
ह्या ताडांमध्ये एक लेंडी ताड असायचा. लेंडीताड म्हणजे त्याला फळे धरायची नाहीत फक्त लेंड्या लागायच्या. ज्या सुकल्या की जळणासाठी वापरल्या जायच्या. ही ताडाची नर जात. परागीभवन होऊन फळ लागण्यासाठी एखादा लेंडीताड जवळपास असायला हवा.

ताडाची झाडे उंच असल्याने त्यावर वीज पडण्याचा धोका असतो. ताडावर वीज पडली की ताडकं जळून पांढरी पडलेली दिसायची. असा ताड मृत होतो. असे अचानक फळते, खेळते झाड पांढरे पडलेले दिसले की आम्हा सगळ्यांच्याच जीवाला लागायचे. हे झाड तोडण्यात यायचे. ह्याचे भरभक्कम खोड पाण्याचा विरा (नाला) ओलांडून जाण्यासाठी छोट्या पुलाचे आव्हान स्वीकारून सोबत देई.
ताडाची कोवळी झावळी सुंदर दिसते. तिचा रंग पांढरा आणि त्याला हिरवी किनार साडीच्या किनारी प्रमाणे दिसते. तिचा स्पर्शही गुळगुळीत असतो. एक वर्ष आमच्याकडे एक कातकरी जोडपं कामाला होत. हे जोडपं ताडाच्या कोवळ्या पात्यांपासून वेगवेगळ्या कलाकृती बनवत असे. तेव्हा त्यांनी पात्यांची चटई, केसाच्या अंबाड्याची वेणी केलेली मला आठवते. तेव्हा ते प्रकार मला खूप भावले होते पण ते करण्याइतपत वा ती कलाकृती समजण्याइतपत माझं वय नव्हत. परप्रांतात अशा ताडाच्या पात्यांच्या अनेक कलाकृती बनविल्या जातात.
ताडाच्या पात्यांचे धागे काढून आई वडील शेतातील भाजीच्या जुड्या बांधायला घ्यायचे. तसेच ह्या ताडाच्या पातीच्या धाग्यात बकुळफुलांचाही सुगंध ओवला जातो. पात्या सुकल्या अगदीच तुटलेल्या वगैरे असल्या की त्या जळणासाठी वापरल्या जायच्या.
सुगरण पक्षी ताडाच्या पात्यांना  आपले घरटे तयार करतात.  पक्षांसाठीही ते आश्रयस्थान आहे. 
ताडापासून ताडीही काढली जाते. एक वर्ष वडिलांनी ताडी काढणार्‍या माणसाला सांगून तो प्रयोग केला होता. ताडाला फळे येणारा गाभा थोडा कापून त्यावर मडके ठेवले जाते. मग त्या मडक्यात ताडाचा रस पाझरतो ती ताडी. ही ताडी ताजीच चांगली असते. शिळी झाली की ती आंबूस होते. ताडी औषधी असते असे म्हणतात. आंबवण्याच्या पदार्थात ताडी घालायचे असे काहीतरी आता आठवते. पण हे ताडी प्रकरण वडिलांना पटले नाही कारण त्या गाभ्याची फळे नष्ट होतात आणि नंतर आमच्याकडे कधी ताडी लावायला बोलावले गेले नाही. आता बरीच झाडे जुनी होऊन गेली आणि नवीन असली तरी ताडगोळे काढणारी माणसेच मिळत नाहीत.
तर असा हा ताड आपल्या अनेक प्रकारे माणसाला पुरेपूर उपयोगी पडणारा. ठोस उत्पन्नाचे साधन नसल्याने ह्या झाडांकडे आता समाजात दुर्लक्ष होत आहे. मला वाटत सार्वजनिक रस्त्यावर होणार्‍या विदेशी पाम ट्री च्या ऐवजी अशी Borassus flabellifer हे शास्त्रिय नाव असणारी ताडाची वा नारळाची झाडे लावावीत ज्याने शहरांच नंदनवन होईल.
आता सासरी उरण-कुंभारवाड्यात ताड आमच्या वाडीत नसले तरी काही ठिकाणी ही झाडे आहेत. त्यांच्या भेटी येतात. माहेर वरूनही येतात. मग ताडगोळे दिसले की मन पुन्हा बालपणात धावतं. ताडांच्या झाडांमधून बागडून येत. ताडगोळ्यातला पाणी अलगत डोळ्यांत जागा घेतं. माझ्या पतींना हे माहीत असल्याने ते माझ्यासाठी बाजारातूनही घेऊन येतात. मुलींनाही आवडतात. पण मी जेव्हा बाजारात जाते तेव्हा मात्र मला ते घ्यावेसे वाटत नाहीत कारण ताडाच्या छत्राखालीच ताडगोळे काढून करंज पाल्याच्या हिरव्या स्पर्शाने हवे तसे गुलाबी-सफेद, लुसलुशीत ताडगोळे खाण्यातला आनंद पैशाने विकत घेता येत नाही.
हा लेख दिनांक ४ मे २०१८ च्या झी मराठी दिशा या साप्ताहीकात प्रकाशित झालेला आहे.