नारळाचे झाड म्हणजे कल्पतरूच. त्याच्या पात्या, खोड, नारळ, त्याचे साल, करवंटी अगदी सगळ्याचाच वापर करता येतो. नारळ पाणी म्हणजे तर अमृतासारखेच. नारळाची उंच ऐटदार झाडे कोकण किनार पट्टीवर दाटीवाटीने मिरवताना दिसतात त्यामुळे कोकण किनारपट्टीवर बर्याच लोकांचे नारळ व नारळाच्या झाडापासून मिळणार्या इतर उत्पन्नांवर उपजीवीका चालते. नारळाच्या झाडाच्या पात्यांतील काड्यांपासून झाडू तयार होतो. झावळ्यांपासून चटई प्रमाणे झाप तयार करतात, नारळाच्या खोडाचा पुलासाठी उपयोग होतो. ही सगळी माहीती आपण अभ्यासक्रमात शिकतच असतो. पण नारळाच्या झाडापासून अजुन एक उत्पन्न्/पेय निघते ते म्हणजे निरा/माडीगेल्या मे महिन्यात आम्ही मुरुडला हवापालट करण्यासाठी गेलो होतो. मुरुडच्या समुद्रकिनार्यावर गाडीतून उतरलो. मुरुडच्या किनार्यावर असणार्या सगळ्याच हॉटेल्स्/वस्तीगृहांभोवती अगदी उंच उ ऐटदार नारळाची झाडे तोर्यात मिरवत आहेत. माझी नजर नेहमीच अशा झाडापानांकडे असल्याने मान उंचावल्या उंचावल्या मला नारळाच्या झाडावर बुजगावण्याप्रमाणे मडकी लटकलेली दिसली आणि प्रचंड गंमत वाटली.
निरा/माडी काढतात हे माहीत होते पण प्रत्यक्ष पाहण्याचा कधी योग आला नव्हता. माझ्या कॅमेर्याने मला लगेच हिंट दिली आणि आता ह्याची प्रक्रिया जाणूनच घ्यायची हे मनाशी ठरविले. पतीराजांना मनीची इच्छा प्रकट केली कारण त्यांची मदत लागणारच होती. आम्हाला जे हॉटेल मिळाले त्या मालकाला निरा बद्दल विचारले. त्याच्याकडून आनंदाची बातमी मिळाली ती म्हणजे सकाळी ७ ला निरा काढायला माणूस येतो तेंव्हा तुम्हाला प्रत्यक्ष पहायला मिळेल. माझा आनंद द्विगूणीत झाला आणि झोपतानाही मला समुद्र किनारी जाण्यापेक्षा निरा उतरवताना पहायला जायच आहे हा विचार मनात रेंगाळत होता.
सकाळी लवकरच उठून ६.३० वाजताच मिस्टर व माझी श्रावणी मिळून आम्ही बाहेर पडलो. रस्त्यावरचा मस्त गरम चहा आणि बिस्कीट असा किनार्यावर बसुन नाश्ता करत निरा उतरवणार्या माणसाची वाट पाहत बसलो. काही वेळातच हातात कोयता, कमरेला प्लॅस्टीकची कळशी बांधलेला माणूस त्या हॉटेलच्या आवारात आला आणि कुठेही न पाहता झप झप सरळ नारळाच्या झाडावर चढू लागला. माझी कॅमेरा काढण्याची घाई उडाली. कॅमेरा ऑन करे पर्यंत तो झाडाच्या शेंड्यावर चढला.
झाडावर लावलेल मडक काढल, त्यात साठलेल द्रव त्याने कळशीत काढल.
परत ते मडक दुसर्या ठिकाणी काहीतरी कापून वगैरे लावल आणि झपाझप परत खाली आला. मग माझ्या मिस्टरांनी त्याला सांगितले की आम्हाला ह्या निरा/माडीची माहीती हवी आहे कशी काढतात ती. मी झपाझप दिसतील ते फोटो काढतच होते. तो खुष झाला. असे पर्यटक कदाचीत त्याला क्वचीतच भेटत असतील. त्याने आमच्यासाठी त्याच्या मोलमजुरीच्या वेळेतला थोडा वेळ दिला आणि निरा/माडी तयार करण्याची पुर्ण प्रक्रिया सांगितली.
निरा तयार करण्यासाठी लागणारे काही साहित्य :
कोयता -चांगला धारदार असतो.
मडके - हे वर टांगण्यासाठी मातीचेच असते.
सांबर शिंग किंवा मजबूत काठी - सांबार प्राण्याची शिंग भरपुर टणक असते.
कोयता -चांगला धारदार असतो.
मडके - हे वर टांगण्यासाठी मातीचेच असते.
सांबर शिंग किंवा मजबूत काठी - सांबार प्राण्याची शिंग भरपुर टणक असते.
काटेसावरीचा कोंब - काटेसावरीच्या झाडाचा कोवळया फांदीचा सोललेला कोंब. हा खाताही येतो. त्याने मला त्यातील थोडा तुकडा खायलाही दिला. तशी काही विशेष चव नसते. पण ह्याला चिकटपणा असतो.
दोरी - पोय गुंडाळण्यासाठी
कळशी - निरा उतरवण्यासाठी
कळशी - निरा उतरवण्यासाठी
माड बाजला म्हणजे त्याच्या फुलांचा कोंब यायला लागला की निरा/माडीकाढायची सुरुवात करता येते. निरासाठी मडके शक्यतो संध्याकाळी लावतात. फुलोर्याचा जो कोंब असतो त्याला पोय म्हणतात.
ती पोय तयार झाली की पोय उघडू नये म्हणजे फुलू नये म्हणून तिला दोरीने घट्ट बांधण्यात येते. त्याच्या टोकाला कोयत्याने आडवी चिर देऊन टोकाकडचा भाग खालच्या दिशेने निमुळत्या आकारात कापला जातो जेणेकरून द्रव खालच्या बाजूला पाझरेल.
ती पोय तयार झाली की पोय उघडू नये म्हणजे फुलू नये म्हणून तिला दोरीने घट्ट बांधण्यात येते. त्याच्या टोकाला कोयत्याने आडवी चिर देऊन टोकाकडचा भाग खालच्या दिशेने निमुळत्या आकारात कापला जातो जेणेकरून द्रव खालच्या बाजूला पाझरेल.
असे कापल्यावर त्या पोयवर सांबर शिंगने ठोकले जाते. त्यानंतर सावरीचा चिकट बोंड कापलेल्या भागावर फिरवतात. त्यामुळे पोयीतून द्रवाचा फवारा न उडता खालच्या दिशेने गळून मडक्यात पडते.
मग मडक्याचे तोंड पोयच्या टोकाला लाऊन मडके पोयला टांगले जाते. त्यामुळे रात्रभर माडाच्या पोयीतून निरे/माडीचा होणारा स्त्राव मडक्यात जमा होत असतो.
सकाळी सुर्योदय झाल्यावर निरा काढणारा व्यक्ती आपल्या कमरेला एक कळशी बांधतो. नारळावर चढून म़डक्यात जमलेली निरा आपल्या कळशीत ओततो. मडके बाजूला कुठेतरी अडकवून पुन्हा त्याच पोयला थोडी टोकाला चिर देतो, सांबर शिंगने ठोकतो, सावरीचे बोंड घासतो व मडके पुन्हा लावून ठेवतो. फक्त पुन्हा बांधण्याची गरज नसते. ही प्रक्रिया पोयीतून निरे/माडीचा स्त्राव होईपर्यंत म्हणजे जवळ जवळ एक महीना एका पोगीमार्फत चालू राहते.
ही पोगी संपत आली आहे तरी अजुन प्रक्रिया चालू आहे.
निरा काढणारा लगेच झपाझप नारळाच्या झाडावरून खाली येतो. जवळ जवळ अर्धी कळशी भरलेली निर्[आ बाटल्यांमध्ये किंवा दुसर्या भांड्यामध्ये टाकुन पुन्हा सरसर दुसर्या माडावर तिच प्रक्रिया करण्यासाठी चढतो. ही प्रक्रिया दिवसातून तिन वेळाही करता येते असे म्हणतात.
ही निरा नंतर कोणाची पर्सनल ऑर्डर असेल तर त्यांना दिली जाते नाहीतर माडी विक्री केंद्रावर नेली जाते.
निरा म्हणजेच त्वरीत काढलेल्या माडाच्या द्रवाने कधीच नशा चढत नाही उलट ती शित गुणाची असल्याने आरोग्यदायी असते. मात्र ५-६ तासांनी निरेला मादकपणा येतो व ती माडी विक्री केंद्रावर नेऊन त्यात काही धंदेवाईक माडीवाले त्यात त्यात चुना तसेच इतर नशेचे पदार्थ टाकून माडीला अजून मादक बनवतात. ताजी निरा मात्र गोड, साधारण ताडगोळ्याच्या पाण्यासारखी व आंबूस लागते.
माडाप्रमाणेच ताडाची ताडी, शिंदीची निरा काढली जाते. काही ठिकाणी माडाच्या झाडापासून काढलेल्या निरेला माडीच म्हणतात तर काही ठिकाणी निरा म्हणतात. निरा/माडीमुळे कोकण किनारपट्टीच्या रहिवाश्यांना उद्योगाचे साधन मिळाले आहे. मुरुडला जागोजागी परवान्याची माडी विक्री केंद्रे आहेत. माडी काढणारा प्रत्येक माडाचे साधारण २५ रुपये घेतो अथवा कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने अथवा भाडेतत्वावर माडीची झाडे घेतो. त्यालाही उपजीवीकेचे साधन मिळते. शिवाय माडाच्या मालकाला निरा/माडी विकून उत्पन्न मिळते. पण निरा/माडी काढल्यामुळे नारळाला नारळ मात्र लागत नाहीत. नारळाच्या उत्पादनासाठी वेगळी नारळाची झाडे शिल्लक ठेवावी लागतात.
एकंदर देवाची करणी आणि नारळात पाणी त्याही आधी देवाची करणी आणि पोय मध्ये पाणी म्हणायला हरकत नाही.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा