प्रत्येक लहान मुलीचा जिव्हाळ्याचा खेळ म्हणजे भातुकली. आईच्या उबदार सहवासात आई ज्या काही पाककलेच्या किंवा घरातील कामांच्या क्रिया करते त्याचे हुबेहूबअनुकरण भातुकलीच्या खेळामध्ये मुली उतरवत असतात. भातुकलीची आईबरोबर नाळ जुळलेली असते म्हणूनच तर भातुकलीचा खेळ मुलींसाठी जिव्हाळ्याचा असतो असे मला वाटते.
माझी भातुकली आमच्या पडवीत किंवा ओटीवर मांडली जायची त्यामुळे पडवीत खेळत असले तर तिथे असलेल्या दरवाज्याना पडदे लाव, ह्या खुंटी पासून त्या खुंटीपर्यंत घरातील चादरी आणून बांधून खोली बनवायची. मध्येच एखादा लहान बाळाचा झोपाळा बांधायचा, खुर्च्या टेबल एकत्र करून त्यावर चादरी टाकून तंबू सारखी रूम बनवायची असे नाना पसार्याचे उद्योग चालू असायचे.
पूर्वी आमच्या उरणमध्ये खेळण्यांची दुकाने नव्हती. त्यामुळे सुरुवातीला माझ्याकडे भातुकलीची विकतची खेळणी नसायची. घरात नको असलेल्या डब्या, झाकणे, करवंट्या, शिंपल्या हीच माझी भातुकली असायची. तीन शिंपल्यांची किंवा छोट्या दगडांची चूल, त्यात छोट्या छोट्या काठ्या टाकून केलेली चूल ही भातुकलीची महत्त्वाची भूमिका बजावत असे. मग तिला धरून तिच्या आसपास झाकणांच्या, सोड्याच्या बिल्ल्यांच्या बश्या, तवा, झाकण्या, करवंट्यांच्या टाक्या किंवा पाणी साठवण्याचे साधन, आइसक्रीमच्या चपट्या काठ्यांचे चमचे, कालथे, काड्यांच्या पळ्या असे काय काय तो कल्पनाशक्तीनुसार संसार मांडला जायचा. देवपूजेसाठी एखाद्या दगडाची स्थापना केली जायची. त्यावरही मनात असलेल्या श्रद्धेनेच फुले पाने वाहिली जायची . जेवणाचे जिन्नसही मोकळ्या निसर्गातलेच असायचे. भाजीसाठी कुठलातरी पाला काढून आणायचा. दगडावर वाटण वाटायचं, बिल्ल्याच्या साहाय्याने पाने गोल कापून त्या चपात्या किंवा भाकर्या म्हणून समजायच्या, चिंचेच्या पाला जवळा समजायचा अशा नाना कल्पना त्या भातुकलीत खेळल्या जायच्या.
आमच्याइथे दत्तजयंतीच्या दिवशी यात्रा असते. त्या यात्रेत खूप खेळणी विकायला येतात. त्यात स्टीलची, प्लास्टीकची भातुकलीची खेळणी असायची. अजूनही इतर खेळणी डोळ्यांसमोर येतात ती म्हणजे पाणी भरलेला हवेत आपटायचा फुगा. त्याची दोरीही ताणेल अशी रबरी असायची. ती फटाफट मारताना खूप मजा यायची. हा पाणी वाला फुगा मला वडील दर वर्षी आणायचेच. सोबत असायच्या पेपेर्या, फुंकर मारून पिपेरीतूनबाहेर येणारे पोपट, साधे फुगे, वार्यावर फिरणारी कागदी चक्र. ह्यांचीही गंमत यायची. ते धरून धावत सुटलं की चक्र गरागरा फिरत असे. मेणबत्ती घालून चालणारी पत्र्याची बोट तर नेहमीच हिट. शिवाय पूर्वी शिंपल्यांपासून बनवलेल्या बाहुल्या यायच्या त्या मला खूप आवडायच्या. छोटे छोटे पाळणेही मन मोहून टाकायचे. छोटी कपाटे, फ्रीज, मिक्सर, हे प्रकारही मोहात पाडायचे. ह्या सर्वातलं दरवर्षी आलटून पालटून आई-वडील माझ्यासाठी घ्यायचेच. एक वर्ष उडणारे विमान आणलं होत. पण ते लगेच खराब झाल्याने मी खट्टू झाली होते. एक वर्ष असाच आईने मला जत्रेतून भातुकलीचा स्टीलचा सेट आणला होता. त्यात चूल (त्या काळी भातुकलीत पण चूल असायची) पक्कड, गाळणी टोपे, ताटल्या, चिमटा, हंडा, कळशी,बालदी व इतर काही खेळणी होती. मी एक दिवस आमच्या ओटीवर खेळणी खेळत बसले होते आणि बराच वेळ खेळून झालं म्हणून खेळणी तशीच ठेवून झोपायला गेले. झोपेतून उठल्यावर थोड्या वेळाने येऊन पाहते तर माझी खेळणी गायब. खेळणी चोरीला गेलेली पाहून मला खूप रडायला आलं आणि वाईट वाटलं. नंतर मला वेड लागलं ते मातीची खेळणी बनावयाचं. बांधावरची माती काढून तिची भांडी बनवून ती सुकवून ती खेळायला घ्यायचे. ही भांडी स्वतःच्या हाताने घडवलेली थेट मातीशी सलगी करून असल्याने त्या काळ्या कुळकुळीत भांड्यांबद्दल विशेष कौतुक असायचे. घरातल्यांकडूनही ह्या कलाकुसरीबद्दल शाबासकी मिळायची.
एकदा कोणीतरी लाकडाची खेळणी आणून दिली होती ते आठवत. त्यात पिंप, उखळी मूस, जातं, चूल, बरण्या, पोळीपाट-लाटणं अशी खेळणी होती. ही खेळणी विशेष आकर्षक होती. त्यांचा स्पर्शही मुलायम वाटायचा.
थोडी मोठी झाल्यावर माझी भातुकली थेट खर्या चुलीवर आणि घरातल्या खर्या भांड्यांबरोबर चालू झाली. ह्यात आई घरातील पोहे, भिजवलेले कडधान्य, तांदूळ असा जिन्नस द्यायची आणि मी खरोखरीचे जेवण करायचे. ते जेवण पानचट असले तरी स्वतः केलंय म्हणून मी आवडीने खायचे आणि घरातलेही थोडंसं खाऊन कौतुक करायचे.
आता मुलींसाठी भातुकली घेताना कुठली घ्यावी ही निवड करावी लागते इतके भातुकलीचे प्रकार आले आहेत मार्केट मध्ये. अजूनही आमची तशीच जत्रा असते आणि त्यात भरपूर खेळणी असतात त्यांतूनही दर वर्षी एखादा भातुकलीचा सेट मुलींसाठी येतोच. त्याच सोबत इतर खेळणीही येतात, शिवाय आजकाल घरबसल्या ऑनलाईनही मागवायची सोय झाली आहे. आधुनिक खेळण्यांत बार्बीची भातुकली, ओट्यासकट किचनसेट, पूर्ण घर, त्यामध्ये रूम, असे खूपप्रकार येतात. ह्या खेळण्यांतून आता चूल बाद झाली आहे आणि त्याची जागा गॅस, हॉब, कुकिंग रेंज आणि ओव्हन अशा आधुनिक साधनांनी घेतली आहे. खेळण्यांसोबत प्लास्टीकच्या भाज्या, चिकन, मासे, तयार पदार्थाचे नमुनेही मिळतात.
माझ्या सासूबाईंनी माझ्या मोठ्या मुलीला अष्टविनायक यात्रेवरून पितळ आणि तांब्याची भातुकलीतील खेळणी आणली होती. त्यात डबे, टोपे, ताटे, तवा, पोळीपाट- लाटणं अशी खेळणी होती. ह्या धातूंच्या खेळण्याची श्रीमंती काही औरच.पाहताच प्रेमात पडावी अशी ही तांब्या पितळ्यांच्या खेळण्यांची घडण बनवलेली असतात. पुढे मी श्रावणी आणि छोट्या राधासाठीही पुण्यातील तुळशी बागेतून अशी तांब्या पितळेची खेळणी आणली. त्यात बंब, घंगाळ, टाक्या अशी नामशेष होत असणारी भांडीही आणली होती. ती पाहून मलाही गंमत वाटायची. दोघींनाही काका-काकी, मामा-मामीकडून आणि आत्यांकडून अनेक असे भातुकलीचे प्रकार येतात त्या नवीन खेळण्यात तितक्याच नवीन उत्साहाने भातुकलीच्या संसारात दंग होतात व जुनी खेळणी अडगळीत पडून त्याचे कालांतराने दान केले जाते.
मोठ्या श्रावणीच्या हातात खरे खुरे पदार्थ करण्याइतपत बळ आलं आहे त्यामुळे ती आता यू ट्यूब वर पाहून अनेक वेगवेगळे प्रकार बनवत असते. मलाही जेव्हा गॅस पेटवायला येऊ लागला तेव्हापासून मी पुस्तकाची पाने न पाने चाळून नवीन नवीन रेसिपी करायचे त्याची आठवण होते. माझं बालपण मी तिच्यात पाहते तर छोट्या राधाच्या भातुकलीत वर्तमानातली आई दिसते. ती हुबेहुब भातुकलीत माझी नक्कल करत असते. सगळे डायलॉगही जसेच्या तसे असतात. ह्या दोघींच्या भातुकलीत माझ्या बालपणातील व वर्तमान काळातील प्रतिबिंब मी आनंदाने पाहत असते.

हा लेख दिनांक १६ डिसेंबर २०१७ च्या लोकसत्ता - वास्तुरंग पुरवणीमध्ये प्रकाशीत झालेला आहे.
https://www.loksatta.com/vastu-lekh-news/bhatukali-children-indoor-games...
https://www.loksatta.com/vastu-lekh-news/bhatukali-children-indoor-games...
१)
२)
३)
४)
५)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा