सोमवार, २९ जानेवारी, २०१८

बोरांचे दिवस

डिसेंबर - जानेवारी महिन्यात आमच्या उरण येथील नागांवातील वाडीमध्ये बोरांचा घमघमाट सुटलेला असायचा. डिसेंबरच्या सुरुवातीलाच अधून मधून एक-दोन लालसर-कच्चट बोरे पडायची मग आम्ही समजायचो की आता थोडे दिवसांत पिकलेल्या बोरांचे सडे झाडाखाली पडणार. माझी आई ह्या बोरे मोहोत्सवासाठी सज्ज असायची. तिच्या टोपल्या वाटच पाहत असायच्या त्यांचं रितेपण भरून काढण्यासाठी. आई प्रार्थमिक शिक्षिका होती. पण शाळेतल्या जबाबदार्‍या पार पाडून ती घरच्या-वाडीतल्या कामांतही लक्ष घालायची. झाडा-फुलांत रमायची. चिंचा-बोरांच्या सीझनला तिची लगबग असायची. वाडीत पाच-सहा बोरांची झाडे होती. प्रत्येक बोराचे खास वैशिष्ट्य असायचं. एक पिठूळ तर एक एकदम गोड गराची, एक अगदीच आंबट तर एक आंबट गोड, एक बोर अशी होती जी पूर्ण लाल झाल्यावरच गोड व्हायची. एका बोरीच्या झाडावर बारीक आणि कडू बोरे लागायची तिला आम्ही चीनीबोर म्हणायचो. ती कडवट लागायची. प्रत्येकाचा आकारही थोड्याफार फरकाने वेगळा असायचा. गोल, लांबट, मोठी, छोटी असे प्रकार असायचे.

बोरांचा सडा पडायला लागला की आई सकाळी आम्हाला घेऊन बोरे गोळा करायची. मग संध्याकाळी बोरे हालविण्यासाठी माणूस यायचा. वर चढून तो गदा गदा बोराचे झाड हालवायचा मग बोरे टपाटप खाली पडायची. ह्या बोरांच्या पावसाचे टणक फटके खाताना गंमत यायची. संध्याकाळी गावातील भावाचे मित्र व माझ्या काही मैत्रिणी आमच्याकडे खेळायला यायच्या त्यांनाही आई ह्या बोरे गोळा करण्याच्या कार्यक्रमात सामील करून घ्यायची. प्रत्येकाच्या हातात एखादे वाडगे, छोटे टोप, पिशवी, टोपली असे गोळा करण्याचे साधन दिले जायचे. मध्यावर एक मोठी टोपली बोरांची वाट पाहत असायची. प्रत्येकाच्या हातातलं भांड भरलं की त्या टोपलीत ओतायचं आणि पुन्हा भरायला लागायचं. बसून-वाकून ही बोरे गोळा करताना तेव्हा गंमत यायची. बोरे गोळा करण्या बरोबर सगळ्यांचा बोरे खाण्याचा कार्यक्रमही एकीकडे चालू असायचा आणि सोबत गप्पा-गोष्टी मजाही. कधी कधी खाऊ-चहा पण असायचा. हे वेचताना काटे लागायचे म्हणून सगळ्यांना चप्पल सक्तीचे असायचे.
रोज सगळ्या झाडावरची बोरे गोळा करणे शक्य नसायचं म्हणून प्रत्येक झाड एक-दोन दिवस आड असा बेत रचलेला असायचा. बोरे गोळा झाली की आई बोरे गोळा करणार्‍या मुलांना पसा भरून बोरे द्यायची, कुणाला जास्त हवी असतील तर जास्तही द्यायची. इतर वेळी म्हणजे सकाळी-दुपारी हिच लहान मुले आमच्या बोरींच्या झाडाखालून हवी तेवढी पडलेली बोरे गोळा करून न्यायची त्यांना आमच्या घरातील कोणीच काही बोलत नसे. पण कोणी दगड मारून पाडायला लागले की मात्र आजीचा ओरडा असायचा त्यांना कारण दगड मारल्याने कच्ची बोरे पडायची.
संध्याकाळी आई वेगवेगळ्या प्रकारच्या बोरांच्या टोपल्या ओटीवर आणून ठेवायची. दोन-तीन घाऊक दरात बोरे विकत घेणार्‍या बायका ठरलेल्या होत्या. त्या रोज येऊन रोजच त्याची किंमतींत घासाघीस करून घेऊन जायच्या. मोठी पाटी पन्नास रुपये, छोटी तिस रुपये त्यापेक्षा छोटी वीस रुपये असा इतक्या मेहनतीचा चिनीमिनी बोरांसारखाच तो भाव असायचा. कधी ह्या बायका येणार नसल्या तर वडील स्वतः सकाळी बाजारात घाऊक घेणाऱ्या बायकांना ही बोरे देऊन यायचे. बरे सगळीच बोरे विकायची नाहीत तर त्यातल्या बोरांच्या नातेवाइकांना, गावकर्‍यांना, आईच्या शाळेत, माझ्या मैत्रिणींना, वडिलांच्या कंपनीत पिशव्या भरून भेटी दिल्या जायच्या. इतक्या मेहनतीच्या फळांच्या आंबट-गोड भेटींतून आपुलकी अधिक रुचकर व्हायची.
Photo:

Photo:
गोळा केलेली बोरे आयती खाण्या पेक्षा प्रत्यक्ष बोराच्या झाडाखाली जाऊन गोळा करून खाल्लेल्या बोरांना जास्त चव लागते असे माझे मत म्हणून मी बरेचदा बोरीखाली जाऊन बोरे खायचे. मला विचित्र सवय होती चप्पल न घालून चालण्याची. मी शेतातल्या बोरींमध्ये तशीच जायचे. पायांना लागणारी ठेपळे आणि काट्यांमुळे त्या बोरी स्मरणात राहायच्या. पण लागले तर लागूदे त्यात काय एवढं असा तेव्हाचा स्वभाव त्यामुळे बोरांपुढे काटे-ढेपळांकडे दुर्लक्षच व्हायचं. मला लाल होऊन सुकत आलेली बोरे खायला खूप आवडायची आणि ती फक्त झाडाखालीच राहिली असल्यामुळे मिळायची. बोरे चुलीत भाजून खाण्याचे प्रकारही आम्ही चाळा म्हणून करायचो. जास्तच बोरे असली तर ती मीठ लावून उन्हात वाळवायची. ह्या वाळवलेल्या बोरांची चव अप्रतिम.
Photo:

Photo:

एवढंसं बोर असलं तरी संक्रांतीला ह्या बोराला भारी मान हो! कुणाकडे हळदी कुंकू असले की आमच्याकडून बोरे नेली जायची. आधी आईला सांगूनच ठेवलेलं असायची. सुगडीत, हळदी कुंकवाच्या वाणासोबत बोरं तोर्‍यात मिरवायची. बोर न्हाणांतही लहान बाळांच्या डोक्यावरून गडगडाट पडताना बोरे बालिश व्हायची व चिमुरड्यांच्या ओंजळीत दडून बसायची .
पूर्वी शाळेच्या आवारातही ही बोरे विकायला बायका जायच्या तेव्हा मुलांची झुंबड पडायची. मुलांचे खिसे बोरांनी भरलेले असायचे. मधल्यासुट्टीतला आवडता खाऊ असायचा बोरे म्हणजे. आंबट चिंबट बोरे खाताना मुलांचे चेहरेही बोरांसारखेच व्हायचे.
बोरे संपल्यावर आम्हा लहान मुलांचा एक वेगळाच उद्योग असायचा तो म्हणजे बोरांच्या बिया ज्यांना हाट्या म्हणतात त्यातील दाणे काढणे. एका बी मध्ये दोन-तीन-चार असे दाणे असायचे. दोन दगडं घेऊन त्यावर ह्या हाट्या फोडून खाण्यात दंग व्हायला व्हायचं. चार दाणे एका हाटीत मिळाले की श्रीमंत वाटायचं. ह्या दाण्यांची चिकी करतात असे ऐकलेले खूप वेळा वाटीत जमा करून चिकी करावी असा बेत केलेला पण मध्ये मध्ये खाल्ल्याने कधी वाटी भरलीच नाही.
बोरे संपली की बोरांचे डुखण म्हणजे थोडे वरून कटिंग केले जायचे. कापलेल्या फांद्या कुंपणाला लावल्या जायच्या त्यामुळे सुरक्षित कुंपण व्हायचे. बोरांच्या झाडांवर चढण्याचा खेळही चालायचा लहानपणी. खालच्या खोडाला काटे नसल्याने झाडावर चढून खेळता यायचे. बोरांच्या झाडावर कावळ्याचे घरटे बरेचदा दिसायचे. शत्रूपासून संरक्षणासाठी कावळे कुटुंब ह्या काटेरी झाडाची निवड करत असावे. कच्च्या बोरांना जरा मांस चढलं की पोपटांची झुंबड ते खायला यायची व मनसोक्त आस्वाद घेऊन जायची.
आता बोरींची झाडे जुनी झाल्यामुळे काही अशीच वाळून गेली तर काही वाटण्या व घरे झाल्यामुळे काटेरी बोरींची झाडे तोडलीही गेली. आईलाही आता झेपले नसतेच वयामुळे. पण आता बाजारात गावठी बोरे कमी व अहमदाबादी बोरे, अ‍ॅप्पल बोरांचा सुळसुळाट झाला आहे. पण ह्या गावठी बोरांची रुची बाजारी संकरीत बोरांना लागत नाही ज्यांचे बालपण ह्या गावठी बोरांमध्ये आपले आंबट-चिंबट-गोड अशा रुचीच्या अनुभवांत मागे राहीले आहे.
दिनांक २९/०१/२०१८ च्या महाराष्ट्र दिनमान या वर्तमानपत्रात प्रकाशित.


४ टिप्पण्या: