बुधवार, ६ डिसेंबर, २०१७

मायबाप समुद्र

क्षितिजावर अथांग पसरलेला, शंख, शिंपले-मोती, मासे, अनेक पाण वनस्पतींची जीवसृष्टी आपल्या उदरात पालन-पोषण करत सदा चैतन्यमय असणारा सागर ह्याबद्दल कितीही लिहिले तरी त्याच्या अफाट गुणवत्तेपुढे कमीच आहे. ह्याच्या अमर्याद आकाराप्रमाणेच ह्याच रूपही तितक्याच तोला-मोलाच. ह्याच्या रूपाला नूर चढतो तो सूर्यास्ताच्या सोहळ्याला. मावळतीचा सूर्य एखाद्या लावण्यवतीच्या कुंकवासारखा आकाशाच्या कपाळी लावण्यमय होतो. स्वतःच्या तेजोमय लाल-केशरी रंगाची तो आभाळात उधळण करत आपल्या सोनं किरणांनी सागराला सोनेरी करतो. अशातच एखादी बोट त्या क्षितिजाला टेकलेल्या सूर्यबिंबासमोरून जाते आणि काही पक्षी जणू चित्र उभारणीसाठीच तिथून भिरभिरतात. हे दृश्य म्हणजे सृष्टीचा कलाअविष्कार.

समुद्राच आणि माझं बालपणापासूनचं सख्य. आमच्या शाळेच्या सुट्ट्या आम्ही भावंडं उरण-नागांवच्या समुद्र किनारीच दंगा-मस्ती करत मजेत घालवायचो. माझ्या माहेरच्या घरापासून समुद्रावर चालत जायला २० मिनिटे लागल्याने आम्ही सुट्टीला आलेली सगळी चुलतं भावंडं पायीच रमत गमत समुद्र किनारी जायचो. त्यावेळी पर्यटकांची गर्दी नसायची. फक्त रवीवारी थोडी-फार गर्दी. बाकीच्या दिवशी जे येत ते सगळे गावातीलच ओळखीचे चेहरे असायचे. त्यामुळे अजिबात असुरक्षितात न वाटता आम्ही मनमुराद धमाल करायचो. समुद्राच्या पाण्यात पाय टाकले की जीव कसा शांत होत असे. लाटा येत असतील तिथे एकाच जागी उभे राहून लाट आत जाताना वाळू सरकून तिथे खड्डा पडणं खूप गमतीशीर वाटायचं. एकमेकांना भिजवणे, किल्ला करणे, वाळूत नावे काढणे, खेकड्यांच्या पिलांच्या मागे धावणे, शंख, शिंपले, गोळा करणे, क्रिकेट, प्लेट फेकणे, पकडा पकडी, लंगडी असे जेवढे खेळता येतील तेवढे खेळ समुद्राच्या अंगा खांद्यावर खेळायचो. समुद्रही मग फेसाळून आनंदात हसताना दिसायचा.
खेकड्यांची बिळे आणि त्यांनी तयार केलेली नक्षी
नशिबाने माझं लग्नही उरणमधल्या कुंभारवाड्यातच झालं आणि माझी समुद्रकिनार्‍याशी ताटातूट न होता अधिक जवळीक झाली कारण माझ्या पतीलाही समुद्र अतिशय प्रिय आहे. लग्न ठरल्यानंतरची आमची पहिली भेट समुद्रकिनारीच झाली. आता सुट्टी असली की मुलींना फिरायला न्यायची ही हक्काची आणि त्यांचीही आवडती जागा आहे. हल्ली रोजच इथे गोळेवाले, मके वाले, भेळ-पुरीवाले असतात त्यामुळे खाऊचीही चंगळ असते. इतर वेळीही कधी कंटाळा आला, मरगळ वाटली की आम्ही समुद्रकिनारी जाऊन दगडांवर शांत त्या अफाट समुद्राचे रूप न्याहाळत बसतो त्यामुळे शरीरात एक नवीन ऊर्जा तयार होते. थकवा कुठे पळून जातो ते कळत नाही. नवीन उत्साह मनात निर्माण होऊन पुन्हा ताजेतवाने झाल्याची जाणीव होते. पूर्वी आभाळमाया ही झी टीव्ही वर एक मालिका लागायची. त्यात असलेले समुद्रालगतचे घर, तो समुद्र व त्याचा सूर्यास्त पाहायला मला खूप आवडायचा व ते पाहण्यासाठी म्हणून खास मी ती सिरीयाला पाहायचे.
हल्ली सुट्टी असली की आम्ही दोघे सकाळी समुद्र किनारी चालायला जातो. सकाळच्या प्रहरीही समुद्राच्या सौंदर्याचे गुणगान करावे ते थोडेच. शांत वातावरण आणि त्यात सागर लाटांचा विशिष्ट लहर ध्वनी वातावरण धुंद करून टाकतो. फेसाळणार्‍या लाटा अधिक शुभ्र दिसतात तर पाणी अगदी नितळ निळेशार दिसते. मासेमारीच्या बोटी समुद्रात शोभून दिसतात तर जाळे लावणे काढण्याचे काम समुद्रात अधिक रंगत आणते. कोवळी किरणे समुद्रात व समुद्रकिनारी अलगद येऊन टेकतात. त्यातच मध्ये मध्ये काही पक्षी आपले भक्ष्य शोधत पाण्यात डुबक्या मारतात तर काही विहार करत निशाणा लावून ठेवतात. पक्ष्यांच्या माळा आकाशातील शुभ्र प्रकाशात विहरत असताना दिसतात.
किनारा
समुद्र पक्षी
समुद्राचा सण म्हणजे नारळी पौर्णिमा. ह्या दिवशी समुद्राला विशेष महत्त्व असते. तुफान क्षमवून आमच्या मासेमारीच्या धंद्यासाठी तुझ्या पदरात येणार्‍या आमच्या सर्व माणसांचे रक्षण कर म्हणून ह्या दिवशी कोळी व आग्री लोकही समुद्राला नारळ अर्पण करतात, त्याची पूजा करतात. माझ्या लहानपणी समुद्रावर नारळीपौर्णिमेच्या दिवशी समुद्र किनारी कुस्तीची स्पर्धा व्हायची ती पाहण्यासाठी खूप गर्दी व्हायची. तसेच सगळे नारळ समुद्राला अर्पण करायला यायचे. नारळ बर्‍याचदा लाटेबरोबर रिटर्न गिफ्ट म्हणून परत यायचे ते पाहतानाही गंमत वाटायची. ह्याच दिवशी समुद्रकिनारी भेळ-पुरीवाला, गोळेवाला, मकेवाला, खेळणीवाले असायचे. ह्या दिवशी जास्त आकर्षण असायचं ते मक्याच. तेव्हा गावठी कडक मके मिळायचे. ते दातांची रस्सीखेच करत खाताना अधिक चविष्ट लागायचे.
गणपती विसर्जनाच्या दिवशी समुद्राचे वातावरण प्रसन्न असायचे. गावातील पाच-सहा गणपती मिळून वाजत गाजत गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या आणि भजनांच्या गजरात विसर्जनासाठी समुद्रावर यायचे. समुद्रही लाटांवर लाटा वाजवत त्या भजन-आरतीला साथ द्यायचा. प्रत्यक्ष बाप्पा आपल्यात विलीन होणार ह्याचा आनंद समुद्राच्या रोमरोमात भिनलेला दिसायचा. विसर्जन झाले की सोबत आणलेला फळांचा, नारळाचा प्रसाद सगळ्यांना वाटला जायचा. त्या प्रसादातला पपनीस तो इतर दिवशी न खाता त्याच दिवशी खाल्ला जायचा.
जोराचा वारा पाऊस आला की समुद्रही दंगा करायला लागतो. नेटमध्ये बॉलिंगची प्रॅक्टिस करतात अगदी तसाच खेळ. मोठ-मोठाल्या लाटा आणून किनार्‍याच्या दगडांवर आपटवून पुन्हा लाट आत घेणे . ह्या खेळात समुद्राच्या उंच आदळणार्‍या लाटा पाहताना एखादा साहसी खेळ आपण पाहत आहोत असे वाटते. जवळ उभे असलो तर ह्या लाटा आपल्यावर तुषारांची उधळणं करण्याचा खोडकरपणा करत आपल्याला चिंब करतात. मन रमविण्यासाठी अनेक जण समुद्रकिनार्‍याची साथ पसंत करतात. अनेक युगलांच्या प्रेमाचा साक्षीदार हा अथांग सागर आहे.
समुद्र म्हणजे मासेखाऊ माणसांसाठी मांसाहारी खाद्याची खाण आणि मासेमारीवर आधारीत असलेल्या कुटुंबांचा समुद्र म्हणजे पोटा-पाण्याचा आधार. खडकांवर येणारे कालवं, खुबड्या, पालकं, खेकडे यांवरही गावातील काही कुटुंबाची उपजीविका चालते. हे प्रकार जेवणात असले म्हणजे जेवणाची डिशही स्पेशल बनून जाते.
कालवं काढताना
मोठ मोठ्या बंदरासाठीही मालाची वाहतूक समुद्रातून मोठ मोठ्या बोटींमार्फत होते. समुद्र हे वाहतुकीच व्यवसायाचे साधन असल्याने ह्या व्यवसायाशी निगडित सर्वांसाठीच समुद्र मायबाप आहे. समुद्रातील प्रवासी बोटींमुळे प्रवासी आरामात प्रवास करतात. बोटींचे व्यवसायही ह्याच समुद्रामुळे शक्य आहेत. कोणत्याही बांधकामासाठी लागणारी वाळू हा समुद्र आपल्याला उपलब्ध करून देतो. समुद्रातील शिंपल्यातील मोती ही कल्पनाही तो जितका सुंदर दिसतो तितकीच सुंदर वाटते.
समुद्रातील शंख शिंपल्यांपासून सूदर वस्तू बनवून त्या द्वारेही छोटासा उद्योग करतात कलाकार मंडळी.
समुद्रातील शंख पूजेतील शंखध्वनीसाठी आणि शोभेसाठीही वापरतात.
अशा अनेक धाग्यांनी समुद्राशी आपले जीवन विणले गेले आहे. पण आजकाल आपल्या ह्या मायबाप समुद्रात, समुद्रकिनारी प्रदूषण, कचर्‍याचे जाळे पडत चालले आहे. कचरा कुंड्या असूनही लोक कचरा त्यात टाकत नाहीत. निर्माल्यासकट प्लास्टीकच्या पिशव्याही समुद्रात सोडतात त्या एकतर खोल समुद्रात जाऊन तिथल्या जीवसृष्टीला हानी करतात नाहीतर समुद्रकिनारी येऊन अडकतात. ह्याला कुठेतरी आळा बसला पाहिजे आपल्या निसर्गनिर्मित ह्या अथांग संपत्तीचे आपणच जतन केले पाहिजे.
दिनांक ४ डिसेंबर २०१७ च्या महाराष्ट्र दिनमान वर्तमानपत्रात प्रकाशीत.
https://4.bp.blogspot.com/-0-J-OoOC8Yw/WiRAZ7hx-rI/AAAAAAAACdY/GU--wA0Ms...

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा