शुक्रवार, १९ मे, २०१७

आग्री विवाह सोहळ्यातील पारंपारीक वडे

आगरी जातीमध्ये लग्न म्हणजे एक धुमशान सोहळा. दाग-दागिने, थाट-माट, असंख्य पाहुण्यांची गजबज त्याच बरोबर आगरी लोकांचे लग्नातील खास जेवण व भोकाचे वडे हे विशेष असते. हे भोकाचे वडे उरण येथे जास्त प्रचलित आहेत. लग्न ठरताच लग्नाच्या तयारीच्या चर्चेत वड्यांची चर्चा अग्रेसर असते. ऐपत व आप्तांच्या गोतावळ्यानुसार वड्यांच्या मापनाचा अंदाज घेतला जातो. मोठ्या टोपल्या व रवळी (छोटी उभट टोपली) ची ऑर्डर दिली जाते.




वडे करण्यात निष्णात अशा काही बुजुर्ग बायका गावामध्ये असतात त्यांना भेटून साधारण किती माणसे येतील याचा अंदाज सांगून त्यांच्याकडून वड्याच्या सामानाची यादी घेतली जाते. साधारण गहू आणि तांदूळ सम प्रमाणात घेतले जातात.
ज्याप्रमाणे नवरीचा नूर चढण्यासाठी काही दिवस आधीपासून तयारी चालू असते तशीच एकीकडे वड्यांची तयारी चालू होते. साधारण १५-२० दिवस आधी तांदूळ व गहू आणून ठेवले जातात. हे तांदूळ व गहू निवडण्यासाठी एक खास दिवस ठरवून शेजार-पाजारच्या स्त्रियांना खास ह्या निवडण्याच्या कामासाठी आमंत्रण दिले जाते. बायका जमल्या की गहू तांदळाची पोती त्यांच्यापुढे ठेवली जातात. निवडता निवडता हळदी कुंकवाचा कार्यक्रमही चालतो. प्रत्येक सवाष्णीला हळद कुंकू, फुल दिले जाते. खाऊची डिश व चहा किंवा सरबत देऊन हा निवडण्याचा छोटासा समारंभ पार पाडला जातो.
लग्नाला ७-८ दिवस राहिले असताना वड्यांचे तांदूळ धुवण्याचा कार्यक्रम केला जातो. ह्या कार्यक्रमाची पूर्व तयारी म्हणजे पाण्याची सोय, टोपल्या, रोवळी , तांदूळ धुण्यासाठी मोठे गंज (मोठी टोपे), बालद्या एकत्र आणून ठेवल्या जातात.


सर्व प्रथम ज्या ठिकाणी तांदूळ धुणार म्हणजे नळ/विहीर वगैरे तिथे नारळ-कलश, पानाचा विडा, नारळ ठेवून घरातील मुख्य स्त्रिया त्याची पूजा करतात. हा विधी बुज्रुर्ग बायकांच्या मार्गदर्शनाखाली होतो.
ज्या टोपल्यांमधे आणि रोवळीमधे धुतलेले तांदुळ ठेवायचे असतात त्या भोवती रांगोळी काढली जाते.
जिचे किंवा ज्याचे लग्न ठरले आहे त्याला किंवा तिला कुंकू लावून, थोडी वाटीत हळद ओली करून गालावर दोन बोटे लावली जातात. उरलेली हळद इतर जण एकमेकांच्या दंगामस्ती करत लावून एन्जॉय करतात. सगळ्या सवाष्णींना हळद-कुंकू, फुल आणि गोड खाऊ वाटला जातो. मोठ्या टोपात अगर बालदीत तांदूळ घेऊन २-२ किंवा ३-४ जणींचा ग्रुप करून टीम वर्कने तांदूळ धुण्याचे काम केले जाते.
तांदूळ धुऊन झाले की मोठ्या टोपल्यांमध्ये फडके टाकून ते निथळण्याकरिता ठेवतात.
पाणी ठिबकायचे बंद झाले की घरातील एका कोपर्यात रांगोळी काढून पाट मांडले जातात. मग मध्ये रवळी ठेवून बाजूला तांदूळ भरल्या टोपल्या ठेवल्या जातात. ह्या टोपल्यांना हळद कुंकू लावून त्यावर कापड झाकण देऊन त्यावर बोरीच्या झाडाच्या फांद्या शास्त्र म्हणून ठेवल्या जातात.
दुसर्या दिवशी हे तांदूळ उन्हात थोडे वाळवले जातात.
वाळलेले तांदूळ एका गोणीत भरून ठेवतात. गिरणमालकाची अपॉइंटमेंट आधीच घेतली जाते. धुतलेले तांदूळ व गहू घेऊन ३-४ बायका व घरातील १-२ पुरुष मंडळी गिरणीकडे रवाना होतात. गिरणवाल्यांनी वड्याच्या पिठात भेसळ होऊ नये म्हणून गिरण साफ केलेली असते. मंगलकार्याचे पीठ दळायचे म्हणून दळण घेऊन आलेल्या सवाष्णी गिरणीची पुजा करतात.
त्यानंतर गिरणीत गहू व तांदूळ घालून त्याचे रवाळ पीठ दळले जाते. घरी आल्यावर ह्या गोणी व्यवस्थित एका ठिकाणी ठेवल्या जातात. मध्येच पीठ चाळवण्याचे काम करून पीठ व्यवस्थित पुन्हा पोत्यात भरून ठेवले जाते.
लग्नाच्या दोन दिवस आधी वा आदल्या दिवशी वडे करण्याचा बेत ठरलेला असतो. ज्या दिवशी वडे करायचे त्याच्या आदल्या दिवशी गावात जाऊन "उद्या सकाळी पीठ मळायला आणि संध्याकाळी वडे काढायला या" असे आमंत्रण लग्नघरातील एखाद्या व्यक्तीमार्फत गावभर फिरते. सूर्यनारायणांचे आगमन होण्यापूर्वीच वडे-निष्णात सुगरण हजर असते. तिच्या मार्गदर्शनाखाली पीठ मळले जाते. स्त्रिया लाइनमध्ये आपल्या समोर पराती वा ताटे व पीठ मळण्यासाठी पाणी घेऊन आपल्या लगबगीच्या गप्पागोष्टी करत असतात.
आग्री जमातीच्या लग्नामध्ये लग्नाच्या विधीच्या प्रसंगांना अनुसरून एक स्त्री गाणं म्हणते. ह्या गाणे म्हणणार्या स्त्रीला धवलारीण म्हणतात. तिलाही तितक्याच मानाने बोलावले जाते. धवलारीण प्रत्येक विधी, प्रसंगाला अनुसरून आगरी भाषेत गाणं म्हणते. गाण्यात नवरा/नवरीचे, त्याच्या घरातल्या सगळ्या कुटुंबातील माणसांची नावे विधीसाठी जमलेल्या स्त्रियांची समाविष्ट केली जातात.
पीठ मळायच्या वेळीही धवलारीण गाणी म्हणण्यास सज्ज असते. पीठ मळण्यासाठी गरम पाण्याचा मोठा गज चुलीवर चढविला जातो.
ह्या पाण्यात किंवा पिठात धणेपुड, जिरेपुड, पापड खार, मीठ इ. टाकण्याचे काम मुख्य वडे माहीतगार महिलेच्या हस्तेच केले जाते.

हे पाणी सुक्या पिठात थोडे थोडे टाकत लाटणीच्या साहाय्याने प्रार्थमीक स्वरूपातील पीठ कालवले जाते. हे थोडे घट्टच ठेवतात. मग हे पीठ परातीत घेऊन ते जमलेल्या स्त्रियांच्या परातीत थोडे थोडे मळण्यासाठी दिले जाते.
पीठ मळून झाले की एक स्त्री हे मळलेले पीठ मोठ्या टाकीमध्ये जोरदार आपटून जमा करते. असे आपटल्याने पीठ अजून सैल होते. टाकी भरली की वर जळता कोळसा टाकून त्यावर थोडे तेल ओतून टाकीचे झाकण लावले जाते. जमलेल्या स्त्रियांना हळदकुंकू चहा-नाश्ता दिला जातो. व वडे तळण्यासाठी ४-५ तासानंतरची वेळ दिली जाते.
वडे तळण्यासाठी गावातील काही घरांमध्ये मोठे तवे/कढई असतात. त्या त्यांच्याकडून आणून ठेवलेल्या असतात.
वडे करण्यापूर्वी आपले वडे चांगले निर्विघ्न व्हावे, बिघडू नये अशी मनोकामना मनी बाळगून चुलीच्या पूजेची तयारी केली जाते.
रांगोळ्या काढून त्यावर ३-४ चुली मांडल्या जातात. चुलींची हळद-कुंकू, फुल वाहून पुजा केली जाते.
चुली पेटवून त्यावर मोठे तवे चढवून तेल तापविले जाते. पहिले पाच वडे नवरा मुलगा किंवा नवरी मुलीच्या हस्ते कढईत सोडले जातात. तोपर्यंत हळू हळू गावातील स्त्रिया जमा होतात व ४-५ चुलींभोवती वडे सोडायला व तळायला हौशेने सज्ज होतात. पीठ पुन्हा परातीत घेऊन थोडे पाण्याने सैल करून घेतले जाते. हाताला पाणी लावून पिठाचा गोळा हातात चपटा करून मध्ये भोक पाडून सटासट वडे तेलात सोडले जातात.


मोठ्या काठ्यांची टोके निमुळती करून त्या काठ्या वडे उलटण्यासाठी व काढण्यासाठी वापरतात.

वडे लालसर खरपूस झाले की टोपलीत काढले जातात.
हे तळत असताना खरपूस खमंग वास परिसरात दरवळत असतो. वडे ठेवण्यासाठी एक वेगळी खोली आधीच तयार ठेवलेली असते. त्यात कापड अंथरून त्यावर तळलेले वडे थंड करण्यासाठी पसरवले जातात.
वडे करण्यासाठी आलेल्या सर्व स्त्रियांना, गावातल्या प्रत्येक घरात वड्यांची भेट दिली जाते. आल्या-गेल्या पाहुण्यांना ह्या वड्यांचा आस्वाद दिला जातो. दुपारच्या वेळेत चहा बरोबर तर संध्याकाळी मटण, जवळा, चवळी/वाटाण्याच्या भाजी बरोबर वडे पानात वाढले जातात.
आगरी जमातीत देवांच्या मानासाठी हे वडे व तांदळाच्या फेण्या नैवेद्यात ठेवल्या जातात. मंडपातील तसेच लग्न ठिकाणातील दारकशीलाही फेण्या व वड्यांचे तोरण बांधले जाते.
तर असे हे सगळ्या गावकर्यांना आपल्या आनंदात सामावून, विविध विधी करून तयार झालेले रुचकर भोकाचे वडे लग्नघरातील मेजवानीत रंगत आणतात.

सौ. प्राजक्ता पराग म्हात्रे.
हे लेखन ऑगस्ट २०१६ च्या माहेर अन्नपूर्णा ह्या अंकात प्रकाशीत झालेले आहे.

१३ टिप्पण्या:

  1. काय जबरदस्त दिसताहेत अगदी तोंडाला पाणी सुटल फोटो पाहुन.
    सुंदर लेख सुंदर फोटो.

    उत्तर द्याहटवा
  2. वड्यांसासारखाच चविष्ट आणि खुसखुशीत लेख..
    फोटो मस्तच!

    उत्तर द्याहटवा
  3. छान माहिती
    तांदूळाच्या फेण्या कशा करायच्या याचा व्हिडिओ व माहिती द्याल का
    धन्यवाद

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. धन्यवाद. तांदळांच्या फेण्यांची फोटोसकट माहीती लवकरच देईन.

      हटवा
  4. Ek madit chukleli gosht Manje.....
    Te tandul girnit n neta gharich jatini vr dar dalale jatat ... Ani ha karyakram haldicya adlya divashi kartat. Tyala chun dalane ase. Mhantat.
    Ani Tya sathi Sarv baykana aamtran dile jate. Ani Sobat dhavla ganarin pn aste

    उत्तर द्याहटवा
  5. प्रत्युत्तरे
    1. चुकीची माहीती नाही ओ. आमच्याइथे आता जातीच राहीली नाहीत त्यामुळे चुन दळायला गिरणीतच नेतात. धन्यवाद प्रतिसादाबद्दल.

      हटवा