अंगण म्हणजे घराचंच एक अंग जे घराबाहेर असूनही घराइतकंच जिव्हाळ्याचं असत. ऊन, पाऊस, दव झेलत आकाशाच्या प्रेमात पडलेलं असत. प्राजक्ताच्या सड्याच्या सुगंधी रांगोळीने ते बहरलेलं असत, रातराणीच्या सुगंधाने दरवळलेलं असत, गार गार वार्याच्या झुळूकेने शहारलेलं असत, कधी चंद्रदीपात तेवत असत तर कधी चांदण्यांचं शीतल पांघरूण घेऊन शांत पहुडलेलं असत.
हल्ली वाढत चाललेल्या बिल्डिंगमुळे अंगणं लोप पावत चालली आहेत व आधुनिक घर/बंगल्यांच्या रचनेतील अंगणांचे स्वरूप बदलले आहे. आमच्या उरणमध्ये अजून काही पारंपरिक तर काही बदलत्या स्वरूपातली अंगण संस्कृती कुठे कुठे जपली आहे ह्याच समाधान वाटत. पण पूर्वीच्या अंगणांची शान काही औरच होती.
दिवाळीची चाहूल लागली की अंगणाची डागडुगी, नूतनीकरणाला सुरुवात व्हायची. घरासमोरचा अंगणाचा चौरस पट्टा उखळला (जागीच कुदळीने खणत जाणे ) जायचा. अंगण अजून बाळसेदार करायचं असेल तर त्यावर अजून माती टाकली जायची. ह्याच बरोबर घरातील स्त्रिया व मुलींचा रांगोळीचा कलाविष्कार जपणारा ओटा गादीप्रमाणे मातीचा थर रचून घराच्या पायरीच्या समोर चौरस आकारात उभारला जायचा. मग लाकडाची चोपई किंवा लोखंडी घणाने (लेव्हल करण्याची साधने) अंगण आणि ओट्याची जमीन चोपून समांतर मऊ केली जायची. त्यावर पाणी मारून जमिनीला एकजीव करून ठेवले जायचे. गोठ्यातून शेण आणून ठेवले जाई. ह्या जमिनीला आई-आजीच्या मायेच्या हाताने/खराट्याने शेण सारवलं जयाचं. त्यांच्या त्या प्रेमळ, उबदार स्पर्शाने अंगणाला पूर्णत्व येऊन ते सुखावत असे. सारवण्याने आई/आजी किंवा सारवणार्या स्त्रियांच्या शेणा-मातीतल्या कलाकुसरीच दर्शन व्हायचं. अंगणात शेण सारवल्यावर एक सुंदर बोट फिरवल्याची नक्षी तयार व्हायची. त्या शेणाची कधी घृणा न वाटली नाही उलट सारवल्यावर अंगण स्वच्छ सुबक दिसे. सुकल्या नंतरही जो मंद वास यायचा त्याचा वास अजूनही स्मरणात आहे. असा मायेचा स्पर्श अंगणाला १५ दिवसांनी किंवा महिन्याने आवर्जून होत असे.
अंगणाच्या कडेला लावलेली झाडे-झुडपे अंगणाला साडीचा किनार असल्याप्रमाणे शोभा देत असत. अंगणासमोर असलेलं तुळशी वृंदावनाने अंगण मंगलमय होत असे. रात्री तुळशी वृंदावनात तेवत असलेला दिव्यामुळे व अगरबत्तीच्या सुगंधाने काळोखातील अंगणालाही प्रसन्नता लाभत असे.
घरातील बाळगोपाळांसाठी अंगण म्हणजे मैदानच. बाळांचे पाय दुडुदुडू अंगणात धावू लागले की अंगणालाही गुदगुल्या व्हायच्या. बालपणी दाणे खायला आलेल्या चिऊ-काऊना निरखता निरखता अंगणातच बाळाचं न्हाऊ-माखू व्हायचं . बायकांच्या पापड, लोणची, सांडगे, अशा विविध प्रकारच्या वाळवणीच्या प्रकारांच्या घमघमाटाने अंगण स्वादमय होऊन जायचे. शाळांच्या सुट्टीचे दिवस आले की अंगणात पाहुण्यांची रेलचेल वाढायची. मग सकाळपासूनच बाळ-गोपाळांनी अंगण दुमदुमून निघे. विविध प्रकारचे खेळ अंगणात खेळले जायचे. पकडा पकडी, लगोरी, डबाईसपैस, विठी दांडू, गोट्या, मामाच पत्र हरवलं, पैता पैता, भातुकली, बाहुला-बाहुलीच लग्न अशा अनेक खेळांना उधाण येई. तहान-भूक विसरून, भर उन्हातही हे खेळ रंगायचे. संध्याकाळी घरातील मोठ्या व्यक्तीही ह्या मुलांमध्ये सामील व्हायच्या, गप्पा-गोष्टी रंगायच्या. कोणीतरी नकला करून, कलात्मक पद्धतीने मुलांना गोष्ट सांगायचे. मुलंही उत्सुकतेने कान टवकारून ह्या गोष्टी ऐकायचे. पूर्वी बाहेर गार हवा असायची म्हणून अंगणात खाटा टाकून गप्पा गोष्टी मारत घरातील माणसे झोपायचीही. अशा भरभराटीने अंगण आनंदात न्हाऊन निघत असे.
अंगणाच आणि घरातील काही सण समारंभांच घट्ट नात असायचं. तसे चंद्र-चांदण्या हे अंगणाचे नेहमीचेच सोबती. पण कोजागिरी पौर्णिमेला मात्र चंद्र आपली अलौकिक किरणे अंगणात पसरून अंगण तेजोमय करायचा. ह्या दिवशी चंद्राच अंगणात खास स्थान असायचं. त्याची अंगणात पूजा व्हायची, नैवेद्याचे दूध चंद्रकिरणात अधिक चांदणशुभ्र भासायचं. घरातील मंडळींच्या गप्पा-गोष्टींना, गाण्यांच्या मैफिलींत तो भला मोठा चंद्रही मिसळून जायचा.
अंगणाच आणि घरातील काही सण समारंभांच घट्ट नात असायचं. तसे चंद्र-चांदण्या हे अंगणाचे नेहमीचेच सोबती. पण कोजागिरी पौर्णिमेला मात्र चंद्र आपली अलौकिक किरणे अंगणात पसरून अंगण तेजोमय करायचा. ह्या दिवशी चंद्राच अंगणात खास स्थान असायचं. त्याची अंगणात पूजा व्हायची, नैवेद्याचे दूध चंद्रकिरणात अधिक चांदणशुभ्र भासायचं. घरातील मंडळींच्या गप्पा-गोष्टींना, गाण्यांच्या मैफिलींत तो भला मोठा चंद्रही मिसळून जायचा.
दिवाळी म्हणजे अंगणासाठी मोठा सण. दिवाळीच्या पहाटे व रात्री अंगणात फटाक्यांची आतषबाजी होत असते. तासानं तास बसून घरातील स्त्रिया अंगणातल्या ओट्यावर ठिपक्यांची रांगोळी काढून त्यात रंग भरण्यात मग्न होत असत. ह्या रांगोळीमुळे अंगणाला साज चढत असे. रात्री रांगोळीजवळ, तुळशीवृंदावनात व घराच्या ओटीवरल्या पणत्यांनी अंगणात तारका उतरल्याचा भास होई. दिवे लागले की त्या दिव्यांचा व फटाक्यांचा आनंद घेण्यासाठी घरातील सर्व मंडळी अंगणात जमत. अंगणही ह्या सर्व फटाक्यांचा दाह आनंदाने स्वीकारायचं. सकाळी उठलं की अंगणात पडलेल्या फटाक्यांना खराट्याने झाडले की अंगण पुन्हा स्वच्छ, टापटीप दिसायचं. बळीप्रतीपदेला अंगणात शेणाचे गोळे मांडून पूजा व्हायची. शेणाच्या गोळ्यांवर झेंडू, कुर्डूच्या फुलांचे तुरे शोभून दिसायचे. अंगणात धार्मिक वातावरण तयार व्हायचं ह्या पूजेने. दिवाळी नंतर येणारे तुळशीचे लग्न म्हणजे अंगणातला मजेशीर सण. खर्या लग्ना सारखं तुळशीच अक्षता टाकून, अंतरपाट धरून लग्न लावून मग फराळ वाटायचा, फटाके वाजवायचे त्यामुळे अंगणात सगळ्यांचीच धमाल असायची.
पूर्वी मुला-मुलींची लग्नेही हॉलवर न होता मुलीच्या अंगणातच व्हायची. तेव्हाचे मंगल कार्यालयच ते. लग्नाच्या आठ दिवसापूर्वीपासूनच अंगणात मंडप उभारणीला सुरुवात व्हायची. लग्नाच्या दोन दिवस आधी मंडपाच्या सजवण्याची लगबग चालू व्हायची. केळीचे दारकस म्हणजे फुल आलेली दोन केळीची झाडे अंगणात जिथे प्रवेश केला जातो तिथे लावून मंडपाचे प्रवेशद्वार उभारले जायचे. मांडव स्थापनेच्या दिवशी गावकरी जमून मंडपाला झेंडू आणि आंब्याच्या पानांनी सजवले जायचे. ह्या मंडपशाकारणीने अंगणाचे रूपही नववधूप्रमाणे दिसू लागायचे . लग्न समारंभातील मुला -मुलीकडचा मांडव म्हणजे अंगणातील धुमशान. हळद झाल्यावर रात्री बेंजो च्या तालावर लहान, मोठे, म्हातारे सगळेच आप्त-मित्रमंडळी मांडव डान्स चा बेफाम आनंद घ्यायचे. ह्या सर्व प्रथा अजून आहेत पण अंगणाची जागा इतर वास्तूंनी घेतली आहे.
अस हे रुबाबदार अंगण घराच शान असायचं. ज्यांनी अंगण अनुभवलं आहे त्यांच्या मनाच्या डोहात ह्या अंगणाच्या स्मृती नक्कीच तरंगत असतील.
दिनांक ५/११/२०१७ च्या लोकसत्ता वास्तूरंग मध्ये प्रकाशीत.
http://www.loksatta.com/vasturang-news/the-spaces-around-the-house-1580300/
http://www.loksatta.com/vasturang-news/the-spaces-around-the-house-1580300/
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा