सोमवार, १८ डिसेंबर, २०१७

भातुकली

प्रत्येक लहान मुलीचा जिव्हाळ्याचा खेळ म्हणजे भातुकली. आईच्या उबदार सहवासात आई ज्या काही पाककलेच्या किंवा घरातील कामांच्या क्रिया करते त्याचे हुबेहूबअनुकरण भातुकलीच्या खेळामध्ये मुली उतरवत असतात. भातुकलीची आईबरोबर नाळ जुळलेली असते म्हणूनच तर भातुकलीचा खेळ मुलींसाठी जिव्हाळ्याचा असतो असे मला वाटते.
माझी भातुकली आमच्या पडवीत किंवा ओटीवर मांडली जायची त्यामुळे पडवीत खेळत असले तर तिथे असलेल्या दरवाज्याना पडदे लाव, ह्या खुंटी पासून त्या खुंटीपर्यंत घरातील चादरी आणून बांधून खोली बनवायची. मध्येच एखादा लहान बाळाचा झोपाळा बांधायचा, खुर्च्या टेबल एकत्र करून त्यावर चादरी टाकून तंबू सारखी रूम बनवायची असे नाना पसार्‍याचे उद्योग चालू असायचे.
पूर्वी आमच्या उरणमध्ये खेळण्यांची दुकाने नव्हती. त्यामुळे सुरुवातीला माझ्याकडे भातुकलीची विकतची खेळणी नसायची. घरात नको असलेल्या डब्या, झाकणे, करवंट्या, शिंपल्या हीच माझी भातुकली असायची. तीन शिंपल्यांची किंवा छोट्या दगडांची चूल, त्यात छोट्या छोट्या काठ्या टाकून केलेली चूल ही भातुकलीची महत्त्वाची भूमिका बजावत असे. मग तिला धरून तिच्या आसपास झाकणांच्या, सोड्याच्या बिल्ल्यांच्या बश्या, तवा, झाकण्या, करवंट्यांच्या टाक्या किंवा पाणी साठवण्याचे साधन, आइसक्रीमच्या चपट्या काठ्यांचे चमचे, कालथे, काड्यांच्या पळ्या असे काय काय तो कल्पनाशक्तीनुसार संसार मांडला जायचा. देवपूजेसाठी एखाद्या दगडाची स्थापना केली जायची. त्यावरही मनात असलेल्या श्रद्धेनेच फुले पाने वाहिली जायची . जेवणाचे जिन्नसही मोकळ्या निसर्गातलेच असायचे. भाजीसाठी कुठलातरी पाला काढून आणायचा. दगडावर वाटण वाटायचं, बिल्ल्याच्या साहाय्याने पाने गोल कापून त्या चपात्या किंवा भाकर्‍या म्हणून समजायच्या, चिंचेच्या पाला जवळा समजायचा अशा नाना कल्पना त्या भातुकलीत खेळल्या जायच्या.
आमच्याइथे दत्तजयंतीच्या दिवशी यात्रा असते. त्या यात्रेत खूप खेळणी विकायला येतात. त्यात स्टीलची, प्लास्टीकची भातुकलीची खेळणी असायची. अजूनही इतर खेळणी डोळ्यांसमोर येतात ती म्हणजे पाणी भरलेला हवेत आपटायचा फुगा. त्याची दोरीही ताणेल अशी रबरी असायची. ती फटाफट मारताना खूप मजा यायची. हा पाणी वाला फुगा मला वडील दर वर्षी आणायचेच. सोबत असायच्या पेपेर्‍या, फुंकर मारून पिपेरीतूनबाहेर येणारे पोपट, साधे फुगे, वार्‍यावर फिरणारी कागदी चक्र. ह्यांचीही गंमत यायची. ते धरून धावत सुटलं की चक्र गरागरा फिरत असे. मेणबत्ती घालून चालणारी पत्र्याची बोट तर नेहमीच हिट. शिवाय पूर्वी शिंपल्यांपासून बनवलेल्या बाहुल्या यायच्या त्या मला खूप आवडायच्या. छोटे छोटे पाळणेही मन मोहून टाकायचे. छोटी कपाटे, फ्रीज, मिक्सर, हे प्रकारही मोहात पाडायचे. ह्या सर्वातलं दरवर्षी आलटून पालटून आई-वडील माझ्यासाठी घ्यायचेच. एक वर्ष उडणारे विमान आणलं होत. पण ते लगेच खराब झाल्याने मी खट्टू झाली होते. एक वर्ष असाच आईने मला जत्रेतून भातुकलीचा स्टीलचा सेट आणला होता. त्यात चूल (त्या काळी भातुकलीत पण चूल असायची) पक्कड, गाळणी टोपे, ताटल्या, चिमटा, हंडा, कळशी,बालदी व इतर काही खेळणी होती. मी एक दिवस आमच्या ओटीवर खेळणी खेळत बसले होते आणि बराच वेळ खेळून झालं म्हणून खेळणी तशीच ठेवून झोपायला गेले. झोपेतून उठल्यावर थोड्या वेळाने येऊन पाहते तर माझी खेळणी गायब. खेळणी चोरीला गेलेली पाहून मला खूप रडायला आलं आणि वाईट वाटलं. नंतर मला वेड लागलं ते मातीची खेळणी बनावयाचं. बांधावरची माती काढून तिची भांडी बनवून ती सुकवून ती खेळायला घ्यायचे. ही भांडी स्वतःच्या हाताने घडवलेली थेट मातीशी सलगी करून असल्याने त्या काळ्या कुळकुळीत भांड्यांबद्दल विशेष कौतुक असायचे. घरातल्यांकडूनही ह्या कलाकुसरीबद्दल शाबासकी मिळायची.
एकदा कोणीतरी लाकडाची खेळणी आणून दिली होती ते आठवत. त्यात पिंप, उखळी मूस, जातं, चूल, बरण्या, पोळीपाट-लाटणं अशी खेळणी होती. ही खेळणी विशेष आकर्षक होती. त्यांचा स्पर्शही मुलायम वाटायचा.
थोडी मोठी झाल्यावर माझी भातुकली थेट खर्‍या चुलीवर आणि घरातल्या खर्‍या भांड्यांबरोबर चालू झाली. ह्यात आई घरातील पोहे, भिजवलेले कडधान्य, तांदूळ असा जिन्नस द्यायची आणि मी खरोखरीचे जेवण करायचे. ते जेवण पानचट असले तरी स्वतः केलंय म्हणून मी आवडीने खायचे आणि घरातलेही थोडंसं खाऊन कौतुक करायचे.
आता मुलींसाठी भातुकली घेताना कुठली घ्यावी ही निवड करावी लागते इतके भातुकलीचे प्रकार आले आहेत मार्केट मध्ये. अजूनही आमची तशीच जत्रा असते आणि त्यात भरपूर खेळणी असतात त्यांतूनही दर वर्षी एखादा भातुकलीचा सेट मुलींसाठी येतोच. त्याच सोबत इतर खेळणीही येतात, शिवाय आजकाल घरबसल्या ऑनलाईनही मागवायची सोय झाली आहे. आधुनिक खेळण्यांत बार्बीची भातुकली, ओट्यासकट किचनसेट, पूर्ण घर, त्यामध्ये रूम, असे खूपप्रकार येतात. ह्या खेळण्यांतून आता चूल बाद झाली आहे आणि त्याची जागा गॅस, हॉब, कुकिंग रेंज आणि ओव्हन अशा आधुनिक साधनांनी घेतली आहे. खेळण्यांसोबत प्लास्टीकच्या भाज्या, चिकन, मासे, तयार पदार्थाचे नमुनेही मिळतात.
माझ्या सासूबाईंनी माझ्या मोठ्या मुलीला अष्टविनायक यात्रेवरून पितळ आणि तांब्याची भातुकलीतील खेळणी आणली होती. त्यात डबे, टोपे, ताटे, तवा, पोळीपाट- लाटणं अशी खेळणी होती. ह्या धातूंच्या खेळण्याची श्रीमंती काही औरच.पाहताच प्रेमात पडावी अशी ही तांब्या पितळ्यांच्या खेळण्यांची घडण बनवलेली असतात. पुढे मी श्रावणी आणि छोट्या राधासाठीही पुण्यातील तुळशी बागेतून अशी तांब्या पितळेची खेळणी आणली. त्यात बंब, घंगाळ, टाक्या अशी नामशेष होत असणारी भांडीही आणली होती. ती पाहून मलाही गंमत वाटायची. दोघींनाही काका-काकी, मामा-मामीकडून आणि आत्यांकडून अनेक असे भातुकलीचे प्रकार येतात त्या नवीन खेळण्यात तितक्याच नवीन उत्साहाने भातुकलीच्या संसारात दंग होतात व जुनी खेळणी अडगळीत पडून त्याचे कालांतराने दान केले जाते.
मोठ्या श्रावणीच्या हातात खरे खुरे पदार्थ करण्याइतपत बळ आलं आहे त्यामुळे ती आता यू ट्यूब वर पाहून अनेक वेगवेगळे प्रकार बनवत असते. मलाही जेव्हा गॅस पेटवायला येऊ लागला तेव्हापासून मी पुस्तकाची पाने न पाने चाळून नवीन नवीन रेसिपी करायचे त्याची आठवण होते. माझं बालपण मी तिच्यात पाहते तर छोट्या राधाच्या भातुकलीत वर्तमानातली आई दिसते. ती हुबेहुब भातुकलीत माझी नक्कल करत असते. सगळे डायलॉगही जसेच्या तसे असतात. ह्या दोघींच्या भातुकलीत माझ्या बालपणातील व वर्तमान काळातील प्रतिबिंब मी आनंदाने पाहत असते.
हा लेख दिनांक १६ डिसेंबर २०१७ च्या लोकसत्ता - वास्तुरंग पुरवणीमध्ये प्रकाशीत झालेला आहे. 
https://www.loksatta.com/vastu-lekh-news/bhatukali-children-indoor-games...
१)
२)
३)
४)
५)

बुधवार, ६ डिसेंबर, २०१७

मायबाप समुद्र

क्षितिजावर अथांग पसरलेला, शंख, शिंपले-मोती, मासे, अनेक पाण वनस्पतींची जीवसृष्टी आपल्या उदरात पालन-पोषण करत सदा चैतन्यमय असणारा सागर ह्याबद्दल कितीही लिहिले तरी त्याच्या अफाट गुणवत्तेपुढे कमीच आहे. ह्याच्या अमर्याद आकाराप्रमाणेच ह्याच रूपही तितक्याच तोला-मोलाच. ह्याच्या रूपाला नूर चढतो तो सूर्यास्ताच्या सोहळ्याला. मावळतीचा सूर्य एखाद्या लावण्यवतीच्या कुंकवासारखा आकाशाच्या कपाळी लावण्यमय होतो. स्वतःच्या तेजोमय लाल-केशरी रंगाची तो आभाळात उधळण करत आपल्या सोनं किरणांनी सागराला सोनेरी करतो. अशातच एखादी बोट त्या क्षितिजाला टेकलेल्या सूर्यबिंबासमोरून जाते आणि काही पक्षी जणू चित्र उभारणीसाठीच तिथून भिरभिरतात. हे दृश्य म्हणजे सृष्टीचा कलाअविष्कार.

समुद्राच आणि माझं बालपणापासूनचं सख्य. आमच्या शाळेच्या सुट्ट्या आम्ही भावंडं उरण-नागांवच्या समुद्र किनारीच दंगा-मस्ती करत मजेत घालवायचो. माझ्या माहेरच्या घरापासून समुद्रावर चालत जायला २० मिनिटे लागल्याने आम्ही सुट्टीला आलेली सगळी चुलतं भावंडं पायीच रमत गमत समुद्र किनारी जायचो. त्यावेळी पर्यटकांची गर्दी नसायची. फक्त रवीवारी थोडी-फार गर्दी. बाकीच्या दिवशी जे येत ते सगळे गावातीलच ओळखीचे चेहरे असायचे. त्यामुळे अजिबात असुरक्षितात न वाटता आम्ही मनमुराद धमाल करायचो. समुद्राच्या पाण्यात पाय टाकले की जीव कसा शांत होत असे. लाटा येत असतील तिथे एकाच जागी उभे राहून लाट आत जाताना वाळू सरकून तिथे खड्डा पडणं खूप गमतीशीर वाटायचं. एकमेकांना भिजवणे, किल्ला करणे, वाळूत नावे काढणे, खेकड्यांच्या पिलांच्या मागे धावणे, शंख, शिंपले, गोळा करणे, क्रिकेट, प्लेट फेकणे, पकडा पकडी, लंगडी असे जेवढे खेळता येतील तेवढे खेळ समुद्राच्या अंगा खांद्यावर खेळायचो. समुद्रही मग फेसाळून आनंदात हसताना दिसायचा.
खेकड्यांची बिळे आणि त्यांनी तयार केलेली नक्षी
नशिबाने माझं लग्नही उरणमधल्या कुंभारवाड्यातच झालं आणि माझी समुद्रकिनार्‍याशी ताटातूट न होता अधिक जवळीक झाली कारण माझ्या पतीलाही समुद्र अतिशय प्रिय आहे. लग्न ठरल्यानंतरची आमची पहिली भेट समुद्रकिनारीच झाली. आता सुट्टी असली की मुलींना फिरायला न्यायची ही हक्काची आणि त्यांचीही आवडती जागा आहे. हल्ली रोजच इथे गोळेवाले, मके वाले, भेळ-पुरीवाले असतात त्यामुळे खाऊचीही चंगळ असते. इतर वेळीही कधी कंटाळा आला, मरगळ वाटली की आम्ही समुद्रकिनारी जाऊन दगडांवर शांत त्या अफाट समुद्राचे रूप न्याहाळत बसतो त्यामुळे शरीरात एक नवीन ऊर्जा तयार होते. थकवा कुठे पळून जातो ते कळत नाही. नवीन उत्साह मनात निर्माण होऊन पुन्हा ताजेतवाने झाल्याची जाणीव होते. पूर्वी आभाळमाया ही झी टीव्ही वर एक मालिका लागायची. त्यात असलेले समुद्रालगतचे घर, तो समुद्र व त्याचा सूर्यास्त पाहायला मला खूप आवडायचा व ते पाहण्यासाठी म्हणून खास मी ती सिरीयाला पाहायचे.
हल्ली सुट्टी असली की आम्ही दोघे सकाळी समुद्र किनारी चालायला जातो. सकाळच्या प्रहरीही समुद्राच्या सौंदर्याचे गुणगान करावे ते थोडेच. शांत वातावरण आणि त्यात सागर लाटांचा विशिष्ट लहर ध्वनी वातावरण धुंद करून टाकतो. फेसाळणार्‍या लाटा अधिक शुभ्र दिसतात तर पाणी अगदी नितळ निळेशार दिसते. मासेमारीच्या बोटी समुद्रात शोभून दिसतात तर जाळे लावणे काढण्याचे काम समुद्रात अधिक रंगत आणते. कोवळी किरणे समुद्रात व समुद्रकिनारी अलगद येऊन टेकतात. त्यातच मध्ये मध्ये काही पक्षी आपले भक्ष्य शोधत पाण्यात डुबक्या मारतात तर काही विहार करत निशाणा लावून ठेवतात. पक्ष्यांच्या माळा आकाशातील शुभ्र प्रकाशात विहरत असताना दिसतात.
किनारा
समुद्र पक्षी
समुद्राचा सण म्हणजे नारळी पौर्णिमा. ह्या दिवशी समुद्राला विशेष महत्त्व असते. तुफान क्षमवून आमच्या मासेमारीच्या धंद्यासाठी तुझ्या पदरात येणार्‍या आमच्या सर्व माणसांचे रक्षण कर म्हणून ह्या दिवशी कोळी व आग्री लोकही समुद्राला नारळ अर्पण करतात, त्याची पूजा करतात. माझ्या लहानपणी समुद्रावर नारळीपौर्णिमेच्या दिवशी समुद्र किनारी कुस्तीची स्पर्धा व्हायची ती पाहण्यासाठी खूप गर्दी व्हायची. तसेच सगळे नारळ समुद्राला अर्पण करायला यायचे. नारळ बर्‍याचदा लाटेबरोबर रिटर्न गिफ्ट म्हणून परत यायचे ते पाहतानाही गंमत वाटायची. ह्याच दिवशी समुद्रकिनारी भेळ-पुरीवाला, गोळेवाला, मकेवाला, खेळणीवाले असायचे. ह्या दिवशी जास्त आकर्षण असायचं ते मक्याच. तेव्हा गावठी कडक मके मिळायचे. ते दातांची रस्सीखेच करत खाताना अधिक चविष्ट लागायचे.
गणपती विसर्जनाच्या दिवशी समुद्राचे वातावरण प्रसन्न असायचे. गावातील पाच-सहा गणपती मिळून वाजत गाजत गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या आणि भजनांच्या गजरात विसर्जनासाठी समुद्रावर यायचे. समुद्रही लाटांवर लाटा वाजवत त्या भजन-आरतीला साथ द्यायचा. प्रत्यक्ष बाप्पा आपल्यात विलीन होणार ह्याचा आनंद समुद्राच्या रोमरोमात भिनलेला दिसायचा. विसर्जन झाले की सोबत आणलेला फळांचा, नारळाचा प्रसाद सगळ्यांना वाटला जायचा. त्या प्रसादातला पपनीस तो इतर दिवशी न खाता त्याच दिवशी खाल्ला जायचा.
जोराचा वारा पाऊस आला की समुद्रही दंगा करायला लागतो. नेटमध्ये बॉलिंगची प्रॅक्टिस करतात अगदी तसाच खेळ. मोठ-मोठाल्या लाटा आणून किनार्‍याच्या दगडांवर आपटवून पुन्हा लाट आत घेणे . ह्या खेळात समुद्राच्या उंच आदळणार्‍या लाटा पाहताना एखादा साहसी खेळ आपण पाहत आहोत असे वाटते. जवळ उभे असलो तर ह्या लाटा आपल्यावर तुषारांची उधळणं करण्याचा खोडकरपणा करत आपल्याला चिंब करतात. मन रमविण्यासाठी अनेक जण समुद्रकिनार्‍याची साथ पसंत करतात. अनेक युगलांच्या प्रेमाचा साक्षीदार हा अथांग सागर आहे.
समुद्र म्हणजे मासेखाऊ माणसांसाठी मांसाहारी खाद्याची खाण आणि मासेमारीवर आधारीत असलेल्या कुटुंबांचा समुद्र म्हणजे पोटा-पाण्याचा आधार. खडकांवर येणारे कालवं, खुबड्या, पालकं, खेकडे यांवरही गावातील काही कुटुंबाची उपजीविका चालते. हे प्रकार जेवणात असले म्हणजे जेवणाची डिशही स्पेशल बनून जाते.
कालवं काढताना
मोठ मोठ्या बंदरासाठीही मालाची वाहतूक समुद्रातून मोठ मोठ्या बोटींमार्फत होते. समुद्र हे वाहतुकीच व्यवसायाचे साधन असल्याने ह्या व्यवसायाशी निगडित सर्वांसाठीच समुद्र मायबाप आहे. समुद्रातील प्रवासी बोटींमुळे प्रवासी आरामात प्रवास करतात. बोटींचे व्यवसायही ह्याच समुद्रामुळे शक्य आहेत. कोणत्याही बांधकामासाठी लागणारी वाळू हा समुद्र आपल्याला उपलब्ध करून देतो. समुद्रातील शिंपल्यातील मोती ही कल्पनाही तो जितका सुंदर दिसतो तितकीच सुंदर वाटते.
समुद्रातील शंख शिंपल्यांपासून सूदर वस्तू बनवून त्या द्वारेही छोटासा उद्योग करतात कलाकार मंडळी.
समुद्रातील शंख पूजेतील शंखध्वनीसाठी आणि शोभेसाठीही वापरतात.
अशा अनेक धाग्यांनी समुद्राशी आपले जीवन विणले गेले आहे. पण आजकाल आपल्या ह्या मायबाप समुद्रात, समुद्रकिनारी प्रदूषण, कचर्‍याचे जाळे पडत चालले आहे. कचरा कुंड्या असूनही लोक कचरा त्यात टाकत नाहीत. निर्माल्यासकट प्लास्टीकच्या पिशव्याही समुद्रात सोडतात त्या एकतर खोल समुद्रात जाऊन तिथल्या जीवसृष्टीला हानी करतात नाहीतर समुद्रकिनारी येऊन अडकतात. ह्याला कुठेतरी आळा बसला पाहिजे आपल्या निसर्गनिर्मित ह्या अथांग संपत्तीचे आपणच जतन केले पाहिजे.
दिनांक ४ डिसेंबर २०१७ च्या महाराष्ट्र दिनमान वर्तमानपत्रात प्रकाशीत.
https://4.bp.blogspot.com/-0-J-OoOC8Yw/WiRAZ7hx-rI/AAAAAAAACdY/GU--wA0Ms...

हळद्या

आमच्या घराबाहेरच्या हिरव्या परिसरात अनेक पक्षी आपल्या उदरनिर्वाहासाठी, बागडण्यासाठी येत असतात.त्या सगळ्यात एक लक्षवेधी पक्षी येतो जो आला की घरातल्या व्यक्तींना/बच्चे कंपनीला हाका मारून तो दाखवण्यासाठी जमवले जायचे. माझी कॅमेरा घेऊन फोटो काढण्यासाठी धडपड चालू असायची. पिवळा धम्मक रंग व त्या पिवळ्यावर तितकाच शोभणारा भडक काळा रंग पंखांवर असणारा, लाल-गुलाबी सुबक चोच, पाणीदार डोळ्यांचा लावण्यवान असा हा हळद्या याचे क्वचित होणारे आगमन आमच्यासाठी एखाद्या सेलिब्रेटी प्रमाणे असायचे. सुरुवातीला हा हळद्या फोटो काढायला जाम भाव खायचा. कॅमेरा धरला की लगेच दुसऱ्या फांदीवर, पानाआड नाहीतर सरळ दुसऱ्या झाडावर आड जाऊन बसायचा. पण हळू हळू त्याला आमच्या पेरू, आंबा जांभळाच्या झाडांचा की आमचाच कोण जाणे! लळा लागला आणि तो वारंवार येऊ लागला. समाधानकारक अन्न व निश्चिंत निवाराही त्याचे मुख्य कारण असणार. आता आम्ही एकमेकांना परिचित होत गेल्याने तो फोटो साठी मला चांगल्या पोझही देऊ लागला. अगदी मन भरेपर्यंत फोटो काढून देतो हल्ली. मला तर वाटू लागलं की हा फोटो काढण्यासाठी नटून थटून येतो की काय इतका रुबाबदार आणि देखणा दिसतो. हिरव्या पानांमध्ये हळदी रंग अजून उठावदार दिसतो. एक दिवस तर आमच्या बेडरूमच्या खिडकीजवळ असलेल्या पेरू च्या झाडावर संध्याकाळी निवांत बसलेला दिसला. काढ गं बाई हवे तेवढे तुला फोटो अशा आविर्भावात वाटला मला. मी ही संधी साधून बरेच फोटो काढून घेतले आणि स्वयंपाकाला लागले. उरकून वर गेले आणि सवयीप्रमाणे सहजच झाडावर पाहील तर त्या पेरूच्या झाडावर मला पिवळा टेनिसचा बॉल अडकल्याचा भास झाला. उत्सुकतेपोटी मी टॉर्च घेतली आणि पाहिलं तर हळद्या साहेबच आपल्या शरीराचा चेंडूसारखा आकार करून गाढ झोपी गेलेत. नंतर वाचनात आलं की पक्षी असे चेंडू करून झोपतात. त्या दिवशी हळद्या आपल्या झाडावर वस्तीला आहे ह्याचा एखादा आवडता पाहुणा आपल्या घरी राहायला आलाय असा आनंद झाला होता. माझ्या मुलीही मधून मधून टॉर्च घेऊन हळद्या झोपलाय की उडाला हे मधून मधून पाहायच्या. पण हवेतल्या गारवेने तो छान निद्रिस्त झाला होता. सकाळी मात्र तो आपल्या दिनचर्येसाठी लवकर उठून गायब झाला होता. पण ती संध्याकाळ आणि ती रात्र आमच्यासाठी अविस्मरणीय ठरली. अजूनही तो अधून मधून हजेरी लावतो. आता तर मादीही दिसू लागली आहे. कदाचित त्याचंच कुटुंबही असेल ते.
१)
२)
३)
४)
५)
६)
७)
८)
९)
१०)
११)

पक्षी वैभव

उगवणार्या सूर्याबरोबर पक्ष्यांच्या गोड किलबिलाट आमची पहाट मंगलमय होते. आमच्या घराच्या आजूबाजूला असलेल्या झाडीमुळे अनेक पशू पक्ष्यांच्या सहवासाचा आम्हाला आनंद घेता येतो.
सकाळी पहिले की पक्षी ह्या झाडावरून त्या झाडावर बागडत असतात, काही पक्षी कोवळ्या किरणांच्या उबेत फांद्यांवर आरामात पहुडलेले असतात तर काही स्वतःची साफसफाई करत असतात. कुणी दाण्या-पाण्याची सोय करण्यात गुंग असतात तर कुणी मस्ती करण्यात दंग असतात. पक्षांचे निरीक्षण करताना बर्यााच गमती जमती अनुभवता येतात.
आमच्या बागेतील जाम, चिकू, आंबा, पेरू, तुती अशा फळझाडांवर पक्षाच राज्य असत. पाऊण भाग त्यांचा तर पाव भाग आमचा असतो. सकाळी खारूताईंचा ग्रुप आणि पोपटांचा थवा जमांवर पोपटपंची करत फळांची मेजवानी लुटत असतात. प्राजक्ताचा सडा पडावा तसा जामांचा सडा पडतो ह्या फौजेमुळे. रात्रीही पाकोळ्या, वटवाघळांची झुंड येऊन जाते. सातभाई तर भाई नावाला जागत सात-आठ जणांची गँग आंब्याच्या झाडावर मोहोर, कैरीच्या दिवसांत धाड टाकतात. पक्षांना त्यांचं अन्न निवारा मिळतो ह्याच आम्हाला समाधान मिळत. घरातील कोणीही फळांवर तुटून पडलेल्या पक्षांना हाश हुश करून पिटाळून लावत नाहीत. कारण निसर्गाने त्यांच्यासाठी ठेवलेला तो वाटा आहे हे सगळ्यांना माहीत आहे.
पोपट
१)
२)
खाटीक
३)
झाडांना पाणी घालण्यासाठी आम्ही पाइप लावतो. कधी एखादा लिक होऊन त्यातून फवारा उडत असेल तर ह्या कारंज्यात बुलबुल, दयाळ पक्षी शॉवर बाथ घेतात. कावळे आपली तहान भागवतात. ही गंमत पाहताना गारेगार वाटत. कावळेही नळावर बसून नळातून थिबकणारे थेंब प्राशन करतात. आम्ही उन्हाळ्यात पक्षांसाठी बागेत आणि टेरेसवरही पाणी ठेवतो पसरट भांड्यांमध्ये जेणेकरून पक्षी तहानले राहू नयेत. ह्या कामात पुतण्या आणि माझ्या मुली अग्रेसर असतात.
४)
मी हौशी फोटोग्राफर आहे. ह्या पक्षांनी माझ्या फोटोग्राफीच्या छंदाला अधिक प्रोत्साहन दिले आहे. साळूंखी, दयाळ, सूर्यपक्षी, कावळे, बुलबुल, भारद्वाज, खंड्या हे नियमित दिसणारे पक्षी. बाकी पक्षी अधून मधून हजेरी लावतात. वारंवार ह्या पक्षांच निरीक्षण केल्याने मला ह्या सगळ्याच पक्षांचा लळा लागला आहे. ह्या पक्षांनाही माझी इतकी सवय झाली आहे की ते मला पोज देतात अस वाटत कारण बरेचदा त्यांची नजरही माझ्या म्हणजे कॅमेर्यासच्या डोळ्यात असते. फोटो काढताना त्यांचे हावभावही ओळखीचे वाटतात. कधी त्यांच्या चेहर्यावर ही नक्की काय करतेय हे कुतूहल असत कधी तुला काय करायचे ते कर आम्ही आमचं काम करतो असा बेफिकीरपणा तर सूर्यपक्षी, शिंपी, नाचरा असे काही पक्षी मला अजिबात वेळ नाही च्या तोर्यायत ह्या फांदीवरून त्या फांदीवर तुरु तुरू उडतच असतात.
शिंपी
५)
सूर्यपक्षी
६)
दयाळ
७)
८)
होला
९)
शिक्रा
१०)
११)
पक्षांच्या वेगवेगळ्या बदलणार्या आवाजावरून त्यांचे मूड टिपता येतात. भारद्वाज सकाळी अशा आवाजात बोलतात की जणू शंखध्वनी फुंकला जातोय असा त्यांचा आवाज घुमतो. दयाळ कोणाच्या अध्यात ना मध्यात असे शांतपणे गोड गळ्याने बागडत असतात. कोकिळ पक्षांची कुहु कुहु कधी शांतपणे तान लावून असते तर कधी अगदी घाई गडबडीत असल्यासारखी. खंड्याची ललकारी तो कुठे उडतोय हे लगेच सुचीत करते. बुलबलची कुजबुज पण गोड असते. शिंपी पक्षाची च्युईट च्युईट विशिष्ट लयीत लक्ष वेधत असते. तांबट आपल्या तांबट कामाच्या चुबुक चुबुक आवाजा सोबत लपंडाव खेळत असतो. हा कुठे बसलेला आहे ते दिसणं फार मुष्किल. आवाज स्पष्ट खणखणीत असतो पण पानांचाच हिरवा रंग आणि छोटा आकार त्यात अतिशय चपळ असल्याने हा एका जागी स्थिर नसतो.
आमच्या आंब्याच्या एका झाडावरील ढोलींमध्ये साळुंख्यांची वस्ती आहे. ह्या समूहातच असतात त्यामुळे ह्यांचे एक मेकांशी न पटून वादावादी होत असते. ह्यांची आवाज चढवून कचकच भांडणे चालू असतात. भांडणाची कारणे बर्या चदा ढोलीतील एखादा कपड्याचा तुकडा, गवत अशीच काहीतरी वाटतात. बरं नुसत्या भांडून ह्या शांत बसत नाहीत तर एक मेकांना जमिनीवर लोळवत कुस्ती खेळतात. साळूंख्या इतर पक्षांपेक्षा जास्त धीट असतात हे जेव्हा त्यांच्यावर संकट येत तेव्हा प्रत्यक्षात दिसत. पक्षांप्रमाणेच सापांच्याही काही जाती आमच्याकडे फिरत असतात. त्यातील धामण ही सरळ झाडावर चढून ह्या पक्षांच्या ढोलीत, घरट्यांमध्ये घुसून त्यातली अंडी, पिले फस्त करण्याच्या हेतूने झाडावर चढतात. धामण किंवा कोणताही साप दिसला की कावळे, पोपट, खारी आणि साळुंख्या यांचा एकच आरडाओरडा चालू होतो. त्यात साळुंख्यांचा अगदी गळ्यातून चिरकलेला मोठा आवाज येतो. त्या अशा ओरडल्या की साप आला हे आम्हाला समजते. इतर पक्षी फक्त सापाच्या आसपास ओरडत असतात पण साळुंख्या मात्र तडक सापांवर वार करतात. त्यांच्यातली माता धाडसी वृत्ती घेऊन अंडी पिलांचे संरक्षण करण्यासाठी स्वतःचा बचाव करत सापाला टोचतात. सापही साळुंख्यांपासून लपण्याच्या प्रयत्नात असतो. कधी कधी तो टोचण्यामुळे जखमीही होतो. कधी साप जिंकतो तर कधी साळुंख्या हे थरार नाट्य बरेचदा चालू असत. एकदा सापाने साळुंखीला आख्खी गिळताना आम्ही पाहील आणि आम्ही दोन दिवस झोपू शकलो नाही इतका अस्वस्थपणा आला होता.
साळुंखी
१२)
१३)
१४)
बुलबुलांचे आणि आमचे काही वर्षापासून घट्ट नाते झाले आहे. आमच्या घरात सुरक्षित वाटत, ह्या माणसांकडून काही आपल्याला धोका नाही म्हणून आमच्या घरातील झुंबरावर गेले ७-८ वर्षे नियमित बुलबुल पक्षी घरटे बांधून बाळंतपणे करतात. जणू माहेरीच येतात बाळंतपणाला. त्यांची घरटे विणण्याची धडपण, कलाकुसर, एकमेकांची साथ, बाळ जन्मल्यावरची त्यांची अती दक्षतेतील लगबग थक्क करणारी असते. आमच्या घरात ते बुलबुल दांपत्य नवीन जीव जन्माला देऊन उडायला शिकतात, खायला शिकतात ह्याचा आनंद आम्हा घरातल्या सगळ्यांनाच होतो.
१५)
१६)
bulbul3.jpg
१७)
Bulbul11.JPG
काळ्या डोक्याचे बुलबुलही बागडताना दिसतात.
१८)
पावसाळ्यात आमच्या आवारात शेतातील पाणी जाण्यासाठी एक ओढा आहे. ह्या ओढ्यात डिसेंबर पर्यंत काही प्रमाणात पाणी असते. त्यामुळे पाणकोंबड्या आमच्या घराच्या मागील बाजूच्या झाडांवर गुण्या गोविंद्याने राहतात. ह्या पाणकोंबड्या सूर्य उगवताच आमच्या घराभोवती गोल प्रदक्षिणा घालत आपले भक्ष्य शोधत फिरतात. ह्या फिरताना अशा तोर्याळत फिरतात की जणूकाही कॅटवॉकच करत आहेत. पण ह्यांना जेव्हा पिले होतात तेव्हा त्यांच्यातील मातृत्वामुळे त्या पिलांसोबत त्यांचे रक्षण करत सावधगिरीने चालतात. ह्यांची पिले म्हणजे जणू काळा कापसाचा गोळाच. ह्या कधी लांब गेलेल्या दिसल्या नाहीत. त्यांच्या तेवढ्या ठरलेल्या परिसरातच ह्या फिरतात.
१९)
२०)
सकाळी खंड्या नेहमी करंज्याच्या झाडाच्या एका फांदीवर बसलेला असतो. रोज तिच फांदी आणि तिच जागा ह्याच मला आश्चर्य वाटायचं. नंतर अंदाज लावला तो त्यावेळी येणार ऊन अंगावर घेण्यासाठी येत असावा. ह्यावेळी आपले भक्ष्यही तो शोधत असतो. जेव्हा ओढ्यात पाणी असते तेव्हा ओढ्यालगतच्या झाडावर हा डोळ्याचे गळ लावूनच जणू बसलेला असतो. पाण्यातले मासे, किडे ह्याचे खाद्य ठरलेले आहेच. ओढ्यातले पाणी संपले तरी खंड्याची रोज फेरी असतेच झाडावर. आमच्या घराभोवतालच्या इतर झाडांवरही हा मुक्त विहार करत असतो.
२१)
२२)
२३)
ह्या झाडावरून त्या झाडावर बागडून लक्ष वेधून घेणारा हळद्या हा मात्र आमच्यासाठी सेलिब्रेटी असतो. हा मधूनच कधीतरी दिसतो. पण आला की आपलाच वाटतो. पिवळा धमक रंग व त्या पिवळ्यावर तितकाच शोभणारा भडक काळा रंग पंखांवर असणारा, लाल-गुलाबी सुबक चोच, पाणीदार डोळ्यांचा लावण्यवान असा हळद्या जणू पक्षांतील हीरोच. पहिला मी फोटो काढायचे तेव्हा हा घाबरून उडायचा. मग त्याला हळू हळू सवय झाली आणि आता तो जणू नटून थटून येऊनच फोटो काढून देत असतो.
२४)
२५)
२६)
कोकीळ/कोकिळा आणि भारद्वाज देखील आता जवळ गेले तरी उडून जात नाहीत. माणसाळल्याप्रमाणेच राहतात. कोकीळ तर ४-५ च्या थव्याने एका झाडावर असतात. कोकिळ गुंजन सुरू झाले की परिसर मंत्र मुग्ध होतो. कोकीळ-कोकिळा यांची विणीच्या हंगामातली अंडी कावळ्याच्या घरात घालण्यासाठीचे युक्तिवादही मला झाडावर पाहायला मिळाले आहेत.
कोकीळा
२७)
२८)
कोकीळ
२९)
३०)
भारद्वाज
३१)
३२)
सकाळी किचनमध्ये असते तेव्हा किचनच्या खिडकीसमोर असलेल्या पेरू-चिकूच्या झाडावर हमखास स्वर्गीय नर्तक काही दिवसांपूर्वी यायचा. माझ्या स्वयंपाक करण्याची गडबड तर ह्याची भक्ष्य पकडण्याची. हा एकटाच दिसल्याने खूप अप्रूप वाटायचं. हाही पक्षी दिसायला सुंदर. रंग चॉकलेटी आणि डोकं काळ, डोळे चमकदार, लांब शेपूट आणि डोक्यावर तुरा असा रुबाबशीर पक्षी. मध्येच गॅस बंद करून ह्याचे फोटो काढण्याची माझी लगबग चालू व्हायची. सध्या तो दिसत नाही. पण काही दिवस फिरतीला जाऊन परत आपल्या आवडत्या ठिकाणी येतात हे पक्षी.
३३)
३४)
धनेश जेव्हा प्रथम दिसला तेव्हा एवढा मोठा पक्षी आपल्याकडे येतो ह्याच खूप कुतूहल वाटलेलं. आम्ही लक्ष ठेवायचो. त्याचा किंकाळल्यासारखा मोठा आवाज त्याची दिशा लगेच दाखवतो. आमच्या आंब्याचे जे ढोलीचे झाड आहे त्यावर हे धनेश आले की साळुंखी आणि पिंगळ्यांची आरडा ओरड चालू होते. आमच्या कबिल्यात यायचे नाही असे हे पक्षी धनेशला बजावत असतात. हळू हळू धनेशची जोडी दिसू लागली. आता ४-५ धनेश येतात आणि किलकिलत करत फिरत असतात.
३५)
३६)
ढोलीत वास्तव्य असणारे पिंगळे सूर्योदयालाच झाडांच्या फांद्यांवर येतात आणि त्यांच्या पकाक पकाक आवाजात कुजबूज चालू करतात. आई-बाबा आणि पिले असे कुटुंब फांद्यांवर एकमेकांवरील प्रेम आणि लाडिक रागाचे चाळे करण्यात दंग असतात. बाळांना रागे भरणं, पंखात घेणं, बाळांनी लाडात येणं हे वात्सल्य प्रेम पाहताना मन पाझरत. हे फोटो काढताना अनेक हावभाव व्यक्त करतात हे त्यांच्या फोटोवरून स्पष्ट दिसत. आणि कितीही वेळ फोटो काढले तरी ते न कंटाळता तितक्याच नवलाईने माझ्याकडे पाहत असतात.
३७)
३८)
३९)
पाऊस चालू झाला की काही पाहुणे पक्षीही आमच्या परिसरात पाहुणचाराला येतात. जोरदार सरींनी शेते भरली की आमच्या कुंपणाच्या बाहेर एक पडीक शेत आहे त्यात पाणी साचत व उधाण आले की ह्यात मासेही येतात. ह्या शेतात हेरॉन (बगळे) जातीचे काही पक्षी माशांवर ताव मारायला येतात. त्यात एक चित्रबलाक येतो. पांढरे-सोनेरी बगळे व नाइट हेरॉन येतात. नाइट हेरॉनने तर गेले दोन वर्षे आपली वस्तीच केली आहे या शेतात एका करंज्याच्या मोठ्या झाडावर. दोन तीन जोडपी इथे राहतात आता कायमची.
४०)
४१)
४२)
साधारण ऑगस्ट मध्ये आमच्या कुंपणा शेजारच्या आवारातील मोकळ्या जागेत गवत वाढले की त्यावर कीटक येतात. ह्या कीटकांचा आस्वाद घेण्यासाठी वेडे राघू आणि ठिपकेवाल्या मुनीया ह्या सुंदर पक्षांचे आगमन होते. वेडे राघू घिरट्या घालून अचूक भक्ष्य पकडतात ती कसब वाखाणण्याजोगी असते. होलाही ह्याच दिवसांत दिसतात आमच्याकडे. गवतावरील कीटक खाण्यार्याग पक्षांचे विजेच्या तारेवर पावसाळी स्नेहसंमेलन भरते. तुम्हाला खरे नाही वाटणार पण ह्या संमेलनात वेडे राघू, मुनिया, खाटीक, साळुंखी, बुलबुल, खंड्या हे चक्क एकत्र एका तारेवर हितगुज करत असतात.
४३)
४४)
४५)
हे संमेलन पाहताना जे समाधान वाटत ते शब्दात सांगणं कठिण आहे. पक्षी एकात्मता पाहून मनात पक्षांबद्दलचा आदर दुणावतो. प्रत्येक पक्षाच्या वेगवेगळ्या लकबींमधून काही बोध घ्यावा असे ह्यांचे वर्तन मनाला भिडते.
हा लेख १७ जून २०१७ रोजी लोकसत्ता वास्तुरंग पुरवणीत प्रकाशीत झालेला आहे.