बुधवार, ६ नोव्हेंबर, २०१९

आगरी गझलकार डॉ. कैलास सोमनाथ गायकवाड



जातीने आगरी नसले तरी आचरणाने आगरी संस्कृती अंगिकारणारे, आगरी गझलकार डॉ. कैलास सोमनाथ गायकवाड यांना सलाम.


सन १९६६ साली डॉ. कैलास गायकवाड यांचे वडील श्री सोमनाथ गायकवाड हे आपल्या कुटुंबासह पालघर जिल्ह्यातून प्रार्थमिक शिक्षकाच्या नोकरीच्या निमित्ताने नेरुळ गावी भाड्याची जागेत राहायला आले. नेरूळ गाव हे बहुसंख्य आगरी जातीतील कुटुंबांचे गाव. कैलास यांचा जन्म १९७६ साली त्यांच्या आजोळी कल्याण येथे झाला. बाळ कैलास आणि आई सुमन यांनी माहेरचे कोडकौतुक पुरवून घेऊन पुन्हा आग्री कुटुंबांच्या सहवासात नेरूळच्या राहत्या घरी आले.

बालपणापासूनच त्यांच्यावर आगरी समाजातील संस्कार घडत गेले. आगरी राहणीमान, भाषा,चालीरीती, संस्कृती या सगळ्यांची कैलास यांच्या आयुष्यावर छाप पडत गेली. शेजार-पाजारच्या आगरी समूहानेही ह्या गायकवाड कुटुंबाला आपलेसे करून घेतले. गावातील आगरी कुटुंबांतील प्रत्येक सणवार, घरगुती कार्यक्रमांमध्ये मायेने ओथंबून भरलेल्या आग्री कुटुंबांनी कैलास यांच्या कुटुंबाला आपल्यातीलच मानून मान-सन्मान दिला. गायकवाड कुटुंबही आवडीने ह्या कार्यक्रमांत सहभागी होऊ लागले व त्यामुळे त्यांचे एकमेकांचे ऋणानुबंध घट्ट होऊ लागले. पालघर जिल्ह्यातील वातावरणही काहीसे असेच शेती, गावासारखे असल्याने व अशाच माणसांसारखे असल्याने गायकवाड कुटुंबाला आगरी समूहात वावरताना कधी परकेपणा जाणवला नाही व आगरी लोकांनी कधी जाणवून दिला नाही.  डॉ. कैलास मोठे होत गेले तसे आजूबाजूच्या आगरी समूहात मिसळू लागले. कैलास हे नेरूळमधीलच शाळेत शिकल्याने त्यांचे शाळेतील व गावातील मित्रमंडळीही आगरीच होते.
त्यावेळी नेरूळ किंवा नवी मुंबई विकसीत झालेली नव्हती. वाशीच फक्त थोडीफार सुसज्ज झालेली होती. गावातील होळी, पालखी, जत्रा, जत्रेच्या वेळी तरवा काढणे या सगळ्यात गायकवाड कुटुंब सामील होत असे. कैलास लहान असताना त्यांची आई त्यांना शेजारच्या आगरी मैत्रिणींच्या सल्ल्याने कैलास यांना भक्तिणीकडे न्यायची तिथे उतारा केला जायचा किंवा विबूत दिली जायची त्यामुळे गायकवाड कुटुंब व कैलास नेरुळच्या आगरी वसाहतीच्या प्रत्येक बाबीशी एकरूप झाले होते. त्यावेळी आपल्या गावातील आगरी मित्रांसोबत कैलास खाडीत मासे पकडायला जायचे, मिठागरात जायचे, मऊ चिखलात खुबे पकडायला जायचे, म्यालवना म्हणजे सुकी लाकडे गोळा करायला जायचे, गोवऱ्याही थापायचे. गावात कोणाचे घर बांधायचे असेल तर सगळे मित्र मिळून बांधकामाला मदत करायचे. अंगण करायला मदत करायचे त्यामुळे ते नेरूळ गावातील माती, खाड्यांशीही एकरूप झाले होते. असे हे सवंगडी एकत्र बागडताना त्यांची मनेही एकमेकांत गुंतत गेली.मैत्री अधिक फुलत गेली. कुणीही कुणाच्याही घरी हक्काने जाऊन गप्पा मारायचे, खेळायचे. कायम आगरी कुटुंबाच्या सहवासात राहून कैलास आणि त्यांच्या आई-वडिलांनीही आपली मूळ भाषा सोडून कशी व कधी आगरी भाषा आत्मसात केली हे त्यांचे त्यांनाच कळले नाही. कैलास व त्यांचे आईवडील हे घरात आगरी भाषेतच एकमेकांशी बोलतात हे मला आगरी भाषेला सोन्याचे दिवस आल्यासारखे वाटते. डॉ. कैलास यांनी आपले लग्नही आगरी पद्धतीतील रीतीभाती पूर्ण करूनच केले. त्यांच्या  पत्नीनेही आगरी भाषा आत्मसात केली व त्यांची मुलगीही आपोआपच करणार. 

कैलास साधारण सातवीत होते तेव्हा नवी मुंबईत सिडको मार्फत वसाहती बांधण्यास सुरुवात झाली, गावांच शहरीकरण चालू झालं. नेरुळगावतही ठेकेदार येऊ लागले काही गावातलेच ठेकेदार झाले, सप्लायर झाले मग त्यांच्यासोबत त्यांच्या मदतीला कैलासही मित्रांसोबत सुट्टीच्या दिवशी जात असत. हळू हळू इमारती झाल्या मग लोक राहायला येऊ लागले, कॉलनी संस्कृती वाढीस लागली. नेरूळ व लगतच्या गावांचे शहरीकरणात स्थित्यंतर होताना पाहणारे कैलास हे साक्षीदार आहेत व गावा पासून शहरीकरणाचा प्रवास कैलास यांनी अनुभवलेला आहे.

कैलास यांना लहानपणीच वाचनाची आवड निर्माण झाली होती कारण त्यांचे वडील व भाऊ त्यांना वाचनासाठी चांदोबा, चंपक अशी पुस्तके आणून द्यायचे. तसेच शाळेत  होणाऱ्या क्रीडा स्पर्धांमध्येही नंबर येणाऱ्या विद्यार्थ्यांना वाचनाची गोडी लागावी म्हणून पुस्तके बक्षीस म्हणून देत असत. कैलास यांना दरवर्षी बक्षीस मिळायचे व ही पुस्तकेही कैलास वाचून काढायचे. कैलास यांची वत्कृत्वकलाही बहरत होती. त्यांनी १ ली ते १० वी पर्यंत वत्कृत्व स्पर्धेतील बक्षीस घेण्यात बाजी मारली. पुढे पुढे कैलास यांना वाचनाची इतकी सवय झाली की ते पुस्तकांचा फडशा पाडू लागले. रामायण, महाभारत, बायबल कुराण असे धार्मिक ग्रंथ म्हणा की बाबा कदम, बाबूराव अर्नाळकर, गुरुनाथ नाईक अशी पुस्तके वाचल्याने त्यांच्या ज्ञानडोहाची पातळी वाढू लागली.


कैलास यांचे शालेय जीवनशिक्षा विद्यामंदिर नेरुळ इथे चालू होऊन विद्याप्रसारक हायस्कूल बेलापूर, मॉडर्न महाविद्यालय वाशी पर्यंत येऊन त्यांनी डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेज येथून एम. बी. बी. एस ची डिग्री घेतली. आता कैलास यांच्या नावा अगोदर डॉक्टर ही पदवी जोडली गेली. डॉ. कैलास यांची प्रथम प्रार्थमिक आरोग्य केंद्र साई-माणगाव या रायगड जिल्ह्यातील अतिदुर्गम भागात वैद्यकीय अधिकारी म्हणून नेमणूक झाली. २००३ सालापासून ऐरोली, कोपरखैरणे अशा ठिकाणी अपघात वैद्यकीय अधिकारी म्हणून सेवा देऊन ते सीबीडी येथे नागरी आरोग्य केंद्र येथे वैद्यकीय अधिकारी म्हणून सेवेत रुजू झाले.

डॉ. कैलास हे मनमिळावू व दुसर्याच्या हाकेला नेहमी धावून जाणारे आहेत. आपले कार्य सांभाळत डॉ. कैलास समाजाचे भान राखून समाज सेवेसाठी नेहमी तत्पर असतात. कर्मकांड, बुवाबाजी, धर्माच्या नावाखाली माजवले जाणारे चुकीचे अवडंबर, अंधश्रद्धा याविरोधात ते आहेत. त्यांचा विज्ञानावर विश्वास आहे. त्यांनी अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कार्यात सक्रिय सहभाग घेतला या कामामुळे डॉ. नरेंद्र दाभोळकर यांचा सहवास त्यांना लाभला याचा त्यांना अभिमान आहे.


डॉ. कैलास यांनी विविध आरोग्य शिबिरे, जनजागृतीपर व्याख्याने केली. आमच्या उरणच्या इनरव्हिल क्लब ऑफ उरण च्या माध्यमातून २ वेळा गर्भाशयाच्या कर्करोगाच्या तपासणी (पॅप्समियर) केली ज्याचा अनेक महिलांनी लाभ घेतला. ही शिबिरे घेत असताना डॉ. कैलास स्वतःचा कधीही प्रचार करत नाहीत किंवा स्वतःची वाहावाह ही करून घेत नाहीत.





निःस्वार्थी, निर्व्याज भावनेने ते आपली सेवा जनतेला देत असतात. गुजरात राज्यातील अंकलेश्वर या इस्नोट गावात त्यांनी १४ जणांच्या टीम सोबत १४ दिवसांचे शिबीर भरवले होते ज्याचा जवळपास ८००० रुग्णांनी लाभ घेतला. त्यात ४०० हून अधिक मोतीबिंदू शस्त्रक्रिया पार पडल्या, खुब्याच्या सांधा बदलण्याची शस्त्रक्रिया केली गेली.नेरूळ बेलापूर या शाळांची वैद्यकीय जबाबदारी डॉ. कैलास यांच्यावर होती. त्यांनी शालेय विद्यार्थ्यांसाठी जीवन प्रशिक्षण शिबिरे घेतली. एच. आय. व्ही. सारख्या समस्येवर विद्यार्थ्यांमध्ये जनजागृतीचे काम केले. ७ एप्रिल ला जागतिक आरोग्य दिनी आरोग्य विभागात काम करणाऱ्या प्रत्येक केडर - श्रेणीला समाविष्ट केले जाते त्या कार्यक्रमाचे उत्कृष्ट सादरीकरण डॉ. कैलास यांनी केले व त्यामुळे नवी मुंबई मनपा आयुक्तांसह उपस्थित आरोग्य महासंचालक डॉ. सुभाष साळुंखे यांच्याकडून त्यांनी वाहवा मिळवली. सन २०१०-२०११ या वर्षी नवी मुंबई महानगरपालिकेचा उत्कृष्ट वैद्यकीय अधिकारी म्हणून सन्मानित करण्यात आले. सी. बी. डी. च्या नागरी आरोग्य केंद्राचा ब्लॉग बनवून आंतरजालावर प्रकाशीत करणारे ते पहिले वैद्यकीय अधिकारी असून त्याची दखल टाईम्स ऑफ इंडियाने विशेष वृत्तांताद्वारे घेतली.


डॉ. कैलास यांना लेख, कविता गझल लिहिण्याचा छंद आहे. आपल्या छंदाच्या निर्मिती बद्दल डॉ. कैलास सांगतात श्री अण्णा त्रिभुवन हे गझलकार त्यांच्या दवाखान्यात येत असत. ते डॉ. कैलास यांना नेहमी वाचताना पाहायचे व त्यांनी डॉ. कैलास यांची साहित्या प्रती गोडी ओळखली. त्यांनी त्यांच्याकडील एक गझल चे पुस्तक डॉ. कैलास यांना वाचायला दिले व काही गझलही त्यांना ऐकवीत होते पण थोड्या वेळाने डॉ. कंटाळले व त्यांनी कंटाळा आल्याचे अण्णांना बोलून दाखवले त्याने श्री अण्णा त्रिभुवन रागावले व म्हणाले प्रसुती समयी एक एक कळ जशी आईला लागते तशी एक एक ओळ गझलेची निघते. त्यानंतर त्यांनी डॉ. कैलास यांना चॅलेंज केले की मी एक गझलेची ओळ देतो तुम्ही ७ दिवसांत दुसरी लिहून दाखवा. ती ओळ होती "चेहऱ्याची चांगली ही रीत नाही" त्यानंतर डॉ. विसरून गेले पण ७ दिवसांनी श्री अण्णा त्रिभुवन आले आणि त्यांनी गझलेची ओळ पूर्ण झाली का विचारले. डॉ. कैलास यांनी त्यांच्याकडे थोड्या वेळाची मुदत मागितली व लगेच दुसरी ओळ तयार करून दिली.

चेहऱ्याची चांगली ही रीत नाही
अंतरीचे दुःख तो लपवीत नाही.

अण्णांना ही ओळ खूप आवडली व त्यांनी डॉ. कैलास यांचे कौतुक केले व गझल पूर्ण करून नित्य गझल लिहिण्यासाठी प्रेरित केले. त्यानंतर ही गझल पूर्ण करून डॉ. कैलास यांनी सुरेश भट वेबसाइटवर ती प्रकाशीत केली. नंतर ते लेख, प्रवास वर्णन, कविता, गझल लिहून मायबोली, मनोगत, ऐसी अक्षरे अशा आंतरजालावरील वेबसाइटवर प्रकाशीत करू लागले. मायबोलीवर त्यांनी गझलांचे उपक्रमही घेतले. हे सगळे लिहिताना त्यांच्या ऋदयस्थानी दडलेल्या आगरी बोलीभाषेत आपण का लिहू नये असा विचार आला आणि त्यांनी २०११ साली पहिली आगरी गझल एका ज्वलंत विषयावर लिहिली "पलाट साडेबाराचा". ते अत्यंत आनंदाने सांगतात की आगरी भाषेत कोणीही गझल लिहिलेली पाहण्यात नव्हती. आग्री भाषेतील गझलेला जन्म डॉक्टर कैलास यांनी दिला. सन २०११ साली गोव्याला घनश्याम भेंडे यांच्या अध्यक्षतेखाली गझल संमेलन झाले होते त्यात बहुभाषिक मुशायऱ्यात सर्वप्रथम पलाट साडेबाराचा ही आगरी गझल डॉ. कैलास यांनी सादर केली. त्या गझलेला संमेलनात प्रचंड प्रतिसाद मिळाला. ती गझल पुढील प्रमाणे.


भानगरींना कारन झाला,पलाट साडेबाराचा
शिरकोचा म्होटा घोटाला,पलाट साडेबाराचा

कंचे व्यावारान दलाली,आवरि नय गवनार कवा
डिलींग मधला म्होटा गाला,पलाट साडेबाराचा

धा मजल्याचा टॉवर झाला,गावाचे त्या बाजूला
मिनी चरवला पयला माला,पलाट साडे बाराचा

लाईट ,पानी ,रस्ता सगला कॉलनीन रानार्‍यांना
आमचे दारासमोर नाला,पलाट साडेबाराचा

चिकन्,मटन्, दारु ना मच्छी,बायेरचे मित्रांसाठी
खोपटान ठेवू बापाला,पलाट साडेबाराचा

जमीन नाही,पलाट नाही,किती किती मी सहन करु?
तरास आपापले जिवाला,पलाट साडेबाराचा

धरुन ''कैलास'' या जगानी,बाप कुनाला बनेवला
व्हता कुनाचा,लाभ कुनाला,पलाट साडेबाराचा.

--डॉ.कैलास गायकवाड.

डॉ. कैलास यांनी १९ आगरी व्यक्तीवर ' बटवा ' हा व्यक्तिचित्रण संग्रह लिहिला आहे. कळवा,बेलापूर पट्ट्यांतील आगरी समाजातील सामाजिक, आर्थिक, नैतिक स्थित्यंतरे दर्शविणारी जतर ही कादंबरी डॉ. कैलास यांनी खुबीने लिहिली आहे. त्यांचा अस्वस्थ प्रतिबिंब हा गझल संग्रह प्रकाशीत झालेला आहे. गजलोत्सव, अखिल भारतील गझल संमेलन विशेषांक, मराठी गझल - सुरेश भटांनंतर, मुस्लिम मराठी संमेलन विशेषांकात त्यांच्या गझल प्रकाशित झाल्या आहेत.

आगरी संस्कृतीबद्दल बोलताना डॉ. कैलास म्हणतात मी पाहिलेली आग्री संस्कृती ही मातृसत्ताक आहे. घरात आई ही मुख्य असते. ती पूर्ण घराची जबाबदारी सांभाळते. आईच घरातील सगळ्या कार्यक्रमाचीही सूत्र हाती घेते. आगरी कुटुंबातील वडील किंवा मुलगा आपली मिळकत आणून आईकडे देतात व आई खर्चाचे नियोजन सांभाळते. आईला प्रत्येक कार्यात मान असतो. लग्न, पूजा, शेतीच्या नांगरणीची, पेरणी, धान्याच्या पूजेला आईला पहिला मान असतो. आगरी संस्कृती महिलांचा  सन्मान करणारी आहे. विविध सण, कार्यक्रमातील त्यांच्या रिती पर्यावरणाला धरून आहेत. डॉ. कैलास म्हणतात आग्री लोक हे रांगडे, रोखठोक, हातच न राखून बोलणाऱ्या गुणवैशिष्ट्यासकट मोकळ्या मनाचे, प्रेमळ आहेत. ते वडील किंवा शिक्षकांना एकेरी संबोधत असले तरी त्यामागे त्यांची भावनिक जवळीक आहे. जीवनाचे सार सांगणारे आगरी बोलीभाषेत काही शब्द आहेत ते अन्य कोणत्याही भाषेत नाहीत असे डॉक्टर म्हणतात. या बोलीतील स्मशानगीते, धवलगीते खूपच भावणारी आहेत. 


तर असे हे डॉ. कैलास सोमनाथ गायकवाड हे जन्माने आगरी नसले तरी त्यांना आगरी लोकांबद्दल अत्यंत जिव्हाळा आहे व ते आपले  समूहाबाबतच आदर, जिव्हाळा आपल्या लेखणीतून व्यक्त करत आहेत. त्यांना अनेक बारकावे ह्या बोलीभाषेबाबत ज्ञात आहेत. त्यांच्या हातून आगरी समूहाच्या कौतुकाचे अमर्याद लेखन होवो व त्यांनी आचरणात आणलेला आगरी बाणा त्यांच्या आयुष्यात प्रगतीची, सुख-समाधान-समृद्धीची बरसात करू दे ही शुभकामना. 

सौ. प्राजक्ता पराग म्हात्रे, उरण (कुंभारवाडा)
prajaktamhatre.77@gmail.com

अग्रसेन २०१९ दिवाळी अंकात प्रकाशित.






५ टिप्पण्या:

  1. अत्यंत वास्तववादी आणि डॉ कैलास यांच्या कौतुकास्पद कामगिरींची सखोल माहिती देणारा लेख. डॉ कैलास यांचे विविध पैलू समोर आणताना, कुठे ही अतितायी लिखाण नसणारा हा लेखनप्रपंच. अप्रतिम.

    उत्तर द्याहटवा
  2. सुरेख वर्णन.......
    दखल पात्र लेख......
    काही बाबी मला ही सांगाव्याशा वाटतात ......

    *डॉ कैलास गायकवाड*
    हे केवळ थोर व्यक्तिमत्वच नसून एक झंजावात आहेत.

    दूरदरशीपणा, वैचारिक स्पष्टोक्ती, समजुतदारपणा, त्यांच्या वर्तनातून, बोलण्यातून ओसंडून वाहतात.

    कुणीही मदतीची साद घातली तरी, निस्वार्थपणे मदत करतातच. त्यामध्ये देखील साद घालणार्या व्यक्तीच्या आकलनापुढे मदत करून त्या व्यक्तीस जबाबदारीने निर्णय घेण्यास मदत झाल्याचे निदर्शनास येते व ती व्यक्ती कायमची ऋणी होते.

    अजून एक बाब लक्षात येण्या सारखी आहे ती म्हणजे ते नेहमी जगाच्यी पुढे राहतात. आधुनिक तंत्रज्ञान, आधुनिक संदर्भ, आधुनिक विचारसरणी केवळ आत्मसातच करीत नाहीत तथापि आचरणातही सर्व बाबींचा अंतर्भाव करतात.

    सर्व धर्मगंथान्मध्ये Gratitude and Forgiveness या दोन बाबी अंगीकारण्याबद्दल आवर्जून लिहिले असते तथापि त्याचे आचरण कसे करावे हे डॉ कैलास गायकवाड यांच्याकडून शिकावे.

    भाषेवर प्रभुत्व म्हणजे काय ....या साठी एकदा डॉ कैलास यांच्याशी कोणत्याही विषयास अनुसरून चर्चा करावी.

    खेळ, साहित्य, कला, राजकारण, सादरीकरण, माणुसकी,भाषा, सद्भावना, इत्यादि सर्वच गुणांवर प्रभुत्व असलेल्या या थोर व्यक्तिमत्त्वास मानाचा सलाम ������

    उत्तर द्याहटवा
  3. आदरणीय मोरेसर आणि रत्नेश ...

    या चांगल्या शब्दांसाठी कायम आपल्या ऋणांत आहे. __/\__

    उत्तर द्याहटवा