शनिवार, ६ एप्रिल, २०१९

पाय-या पाय-यांचा जिना

पायरी ही घराची किंवा कोणत्याही वास्तूची शोभा असते. दुसऱ्या शब्दात म्हणायचं तर पायरीशिवाय घर किंवा कोणतीही वास्तू अपुरीच. घर असो, मंदिर असो वा कार्यालय असो प्रत्येक वास्तूत पायरी वरूनच प्रवेश केला जातो. पायऱ्या जास्त झाल्या की त्याचे रूपांतर जिन्यातहोते . पूर्वी लाकडाच्या पायऱ्या करून बनवलेले जीने असायचे. माझ्या माहेरी उरण -नागांव मध्ये एकमजली घर होत. तेव्हा घराच्या बाहेरून जिन्याची पद्धत होती. आमचा लाकडी फळ्यांचा जीनाही घराच्या बाहेर ४-५ सिमेंटच्या पायऱ्यांच्या आधारावर विराजमान होता. माळ्यावरच्या खोल्या जास्त वापरात नव्हत्या पण ह्या जिन्यावर चढणे- उतरणे हा लहानपणी एक खेळ होता. अजूनही आठवलं की त्याचा तो चॉकलेटी गुळगुळीत स्पर्श मनाला जाणवतो. वापरून वापरून त्या फळ्या अगदी गुळगुळीत झाल्या होत्या. जिन्याच्या दोन साइडच्या उभ्या लांबलचक फळीत विशिष्ट अंतरावर त्यात फळ्या घट्ट रुतली अशा खाचा पाडून त्यात आडव्या फळ्या घालून हा जीना तयार केलेला होता. त्या काळी बहुतांशी असे जीने असायचे. अजूनही काही जुन्या घरांमध्ये आणि बिल्डिंगांमध्ये असे जीने जुनी ठेव म्हणून अस्तित्वात आहेत. जीना घराच्या बाहेरच्या बाजूने असल्याने पावसाळ्यात घराच्या छपरावरून पुढे सरकवत त्याला ताडपत्री लावली जायची पण दंगेखोर पाऊस मात्र वाऱ्याच्या मदतीने बरेचदा त्याला ओलेचिंब करून टाकायचा. मग जिन्यालाही मस्ती यायची आणि पावसाच्या चिकटीने आमचे पाय घसरायचे त्यामुळे आमचे जिन्यावर येणे जाणे फक्त काम असेल तरच असायचे. काही वर्षांनी तर मधल्या मधल्या एक दोन फळ्याही मोडक्या झाल्या तेव्हा तर खेळायला अजून मजा यायची आणि त्या वयात तो थरार खेळ वाटायचा. कारण एक पायरी गाळून तिसऱ्या पायरीवर पाय टाकून वर खाली जायलालागायचं. हा जीना इतका मनात रुतलेला होता की मला जिन्याची स्वप्नेही पडायची. स्वप्नात जीना तुटला किंवा मी त्यावरून पडले अशी स्वप्ने असायची तर कधी चांगली खेळत असल्याचीही असायची.
हा लाकडी जीना खराब झाला म्हणून वडिलांनी नंतर घराच्या अंगणात येईल असा सिमेंटचा जीना करून घेतला. त्यावर रेलिंग लावले. हा जीना सुंदर होता. कारण जीना संपतो तिथे ओटीला लागूनच थोडा चौकोन ओटीला लागून उप ओटी म्हणावी असा भाग आला. त्यालाही उतरायला अजून चार पायऱ्या आल्या. मग हा जीना माझ्यासाठी अभ्यासाची जागा आणि करमणुकीची जागा झाली. जिन्यातील पायरीवर बसून अभ्यास ही व्हायचा आणि ह्या आभाळाखालील खुल्या जिन्यावर बसून आमच्या आवारातली झाड-फुल पाहत बसत माझा निसर्गासोबत सहवास वाढायचा. जिन्याच्या समोरच एक आंबट गोड चव असलेले लव फळाचे झाड होते. ह्याची फळे खायला अनेक पक्षी येत. त्यात मला जास्त वेडे राघू हे पक्षी खूप यायचे. त्यांच्या हालचाली मी न्याहाळत बसायचे. वेडे राघू हे नाव मला आता कळलं. तेव्हा मी त्यांना छोटे पोपट समजायचे. थोड्या दिवसांनी ह्या जिन्यावर कुंड्या ठेवून आणि वेली सोडून त्यालाही निसर्गाची साथ दिली. जिन्यावर माझा बगिचा सुंदर दिसत होता. दिवाळीत ओटी बरोबरच जिन्याच्या पायऱ्यांवरही आम्ही पणत्या लावायचो त्यामुळे तो रोषणाईतला जीना झगमगून जात असे.


लग्न झाल्यावर सासरी उरणच्या कुंभारवाड्यातल्या घरातही एकमजली घर होत व त्यातही किचन मध्ये माळ्यावर एक थोडा सरळ लाकडी जीना होता.सरळ जिन्याची सवय नसल्याने सुरुवातीला मी हळू हळूच चढायचे आणि उतरायचे. ह्या जिन्यावरून टीव्हीही दिसायचा. कधी कधी आम्ही ह्या जिन्याच्या पायरीवर बसून टीव्ही पाहायचो. याच पायऱ्यांवर सकाळचा चहा घेतला जायचा.संध्याकाळी सगळे एकत्र आले की चहासाठी आम्ही काही जण पायरीत तर काही किचनमध्ये चटया टाकून बसायचो. ह्या जिन्याचा सहवास एक वर्ष घडला त्यानंतर आम्ही सगळे कुंभारवाड्यातच बांधलेल्या नवीन घरी रहायला गेलो. तेही एकमजलीच आहे. ह्यात जीना हे घराच मध्यभागी आकर्षण म्हणूनच आहे. ह्या जिन्याला ग्रॅनाइट आणि मार्बलच्या गुळगुळीत लाद्या आहेत. शिवाय डंबेल्सही संगमरवरी आहेत. माझ्या दोन्ही मुलींचा श्रावणी आणि राधाचा जन्म ह्याच घरात झाला. त्या रांगायला लागल्या तेव्हा त्या दोघींचीही ही आवडती राइड झाली होती.रांगत रांगत जीना चढायला जायच्या त्यामुळे सतत एकाच लक्ष असायला लागायचं. कधी कधी त्यांना हा जीना चढू उतरू देऊन खेळूही द्यायचो. हा जीना किचन आणि हॉल दोन्हीच्या मध्ये असल्याने कुठेही काही कार्यक्रम चालू असेल तरी जिन्यात बसून सगळ्यात सामील होता येते. कधी सुट्टीवर असले तर संध्याकाळी नवरा किंवा मुलींची वाट बघण्यासाठी ओटीवरची पायरीच आपलीशी वाटते. ह्या ओटी-अंगण जोडणाऱ्या मोकळ्या पायरीवर बसून सकाळच्या गार हवेत निसर्गाची लीलया पाहतानाही खूप समाधान वाटत. आमच्या ह्या पायरीवरही मुली कधी कधी कुंड्या ठेवून त्यांना हिरवा ओलावा देतात. पाढव्याची गुढीची पूजा ह्याच पायरीवर झाल्याने पायरीही मंगलमय होते तर दिवाळीतले दिवे ह्या पायऱ्या आपल्या ओंजळीत तेवत असताना फार प्रसन्न वाटते.

असे का कुणास ठाऊक सोफा, खुर्च्यांपेक्षा पायरीवर बसणं जास्त आपलंसं, आरामदायी वाटत. कारण पायरीवर बसताना कुठल्याही प्रकारे शिष्टाचाराचे आसन घालावे लागत नाही. दिवस रात्र ह्या जिन्यांवरून आपली ये-जा चालू असते खालून वर आणि वरून खाली जाण्यासाठी जीना भक्कम आधार देत असतो. घराच्या दोन भागांना जोडून त्यांच्याशी संधान बांधून देणारा जीना असतो. शेवटी जीवनाचे अनेक चढ-उतारात ह्या जिन्याच्या सहवासात होत असतात व चढ उताराचा समतोल कसा राखावा हा आयुष्यातील मथितार्थ या पायऱ्याच शिकवतात.        
सौ. प्राजक्ता पराग म्हात्रे, उरण.
prajaktaparag.uran@gmail.com                                    
                              


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा