बुधवार, ६ नोव्हेंबर, २०१९

आगरी गझलकार डॉ. कैलास सोमनाथ गायकवाड



जातीने आगरी नसले तरी आचरणाने आगरी संस्कृती अंगिकारणारे, आगरी गझलकार डॉ. कैलास सोमनाथ गायकवाड यांना सलाम.


सन १९६६ साली डॉ. कैलास गायकवाड यांचे वडील श्री सोमनाथ गायकवाड हे आपल्या कुटुंबासह पालघर जिल्ह्यातून प्रार्थमिक शिक्षकाच्या नोकरीच्या निमित्ताने नेरुळ गावी भाड्याची जागेत राहायला आले. नेरूळ गाव हे बहुसंख्य आगरी जातीतील कुटुंबांचे गाव. कैलास यांचा जन्म १९७६ साली त्यांच्या आजोळी कल्याण येथे झाला. बाळ कैलास आणि आई सुमन यांनी माहेरचे कोडकौतुक पुरवून घेऊन पुन्हा आग्री कुटुंबांच्या सहवासात नेरूळच्या राहत्या घरी आले.

बालपणापासूनच त्यांच्यावर आगरी समाजातील संस्कार घडत गेले. आगरी राहणीमान, भाषा,चालीरीती, संस्कृती या सगळ्यांची कैलास यांच्या आयुष्यावर छाप पडत गेली. शेजार-पाजारच्या आगरी समूहानेही ह्या गायकवाड कुटुंबाला आपलेसे करून घेतले. गावातील आगरी कुटुंबांतील प्रत्येक सणवार, घरगुती कार्यक्रमांमध्ये मायेने ओथंबून भरलेल्या आग्री कुटुंबांनी कैलास यांच्या कुटुंबाला आपल्यातीलच मानून मान-सन्मान दिला. गायकवाड कुटुंबही आवडीने ह्या कार्यक्रमांत सहभागी होऊ लागले व त्यामुळे त्यांचे एकमेकांचे ऋणानुबंध घट्ट होऊ लागले. पालघर जिल्ह्यातील वातावरणही काहीसे असेच शेती, गावासारखे असल्याने व अशाच माणसांसारखे असल्याने गायकवाड कुटुंबाला आगरी समूहात वावरताना कधी परकेपणा जाणवला नाही व आगरी लोकांनी कधी जाणवून दिला नाही.  डॉ. कैलास मोठे होत गेले तसे आजूबाजूच्या आगरी समूहात मिसळू लागले. कैलास हे नेरूळमधीलच शाळेत शिकल्याने त्यांचे शाळेतील व गावातील मित्रमंडळीही आगरीच होते.
त्यावेळी नेरूळ किंवा नवी मुंबई विकसीत झालेली नव्हती. वाशीच फक्त थोडीफार सुसज्ज झालेली होती. गावातील होळी, पालखी, जत्रा, जत्रेच्या वेळी तरवा काढणे या सगळ्यात गायकवाड कुटुंब सामील होत असे. कैलास लहान असताना त्यांची आई त्यांना शेजारच्या आगरी मैत्रिणींच्या सल्ल्याने कैलास यांना भक्तिणीकडे न्यायची तिथे उतारा केला जायचा किंवा विबूत दिली जायची त्यामुळे गायकवाड कुटुंब व कैलास नेरुळच्या आगरी वसाहतीच्या प्रत्येक बाबीशी एकरूप झाले होते. त्यावेळी आपल्या गावातील आगरी मित्रांसोबत कैलास खाडीत मासे पकडायला जायचे, मिठागरात जायचे, मऊ चिखलात खुबे पकडायला जायचे, म्यालवना म्हणजे सुकी लाकडे गोळा करायला जायचे, गोवऱ्याही थापायचे. गावात कोणाचे घर बांधायचे असेल तर सगळे मित्र मिळून बांधकामाला मदत करायचे. अंगण करायला मदत करायचे त्यामुळे ते नेरूळ गावातील माती, खाड्यांशीही एकरूप झाले होते. असे हे सवंगडी एकत्र बागडताना त्यांची मनेही एकमेकांत गुंतत गेली.मैत्री अधिक फुलत गेली. कुणीही कुणाच्याही घरी हक्काने जाऊन गप्पा मारायचे, खेळायचे. कायम आगरी कुटुंबाच्या सहवासात राहून कैलास आणि त्यांच्या आई-वडिलांनीही आपली मूळ भाषा सोडून कशी व कधी आगरी भाषा आत्मसात केली हे त्यांचे त्यांनाच कळले नाही. कैलास व त्यांचे आईवडील हे घरात आगरी भाषेतच एकमेकांशी बोलतात हे मला आगरी भाषेला सोन्याचे दिवस आल्यासारखे वाटते. डॉ. कैलास यांनी आपले लग्नही आगरी पद्धतीतील रीतीभाती पूर्ण करूनच केले. त्यांच्या  पत्नीनेही आगरी भाषा आत्मसात केली व त्यांची मुलगीही आपोआपच करणार. 

कैलास साधारण सातवीत होते तेव्हा नवी मुंबईत सिडको मार्फत वसाहती बांधण्यास सुरुवात झाली, गावांच शहरीकरण चालू झालं. नेरुळगावतही ठेकेदार येऊ लागले काही गावातलेच ठेकेदार झाले, सप्लायर झाले मग त्यांच्यासोबत त्यांच्या मदतीला कैलासही मित्रांसोबत सुट्टीच्या दिवशी जात असत. हळू हळू इमारती झाल्या मग लोक राहायला येऊ लागले, कॉलनी संस्कृती वाढीस लागली. नेरूळ व लगतच्या गावांचे शहरीकरणात स्थित्यंतर होताना पाहणारे कैलास हे साक्षीदार आहेत व गावा पासून शहरीकरणाचा प्रवास कैलास यांनी अनुभवलेला आहे.

कैलास यांना लहानपणीच वाचनाची आवड निर्माण झाली होती कारण त्यांचे वडील व भाऊ त्यांना वाचनासाठी चांदोबा, चंपक अशी पुस्तके आणून द्यायचे. तसेच शाळेत  होणाऱ्या क्रीडा स्पर्धांमध्येही नंबर येणाऱ्या विद्यार्थ्यांना वाचनाची गोडी लागावी म्हणून पुस्तके बक्षीस म्हणून देत असत. कैलास यांना दरवर्षी बक्षीस मिळायचे व ही पुस्तकेही कैलास वाचून काढायचे. कैलास यांची वत्कृत्वकलाही बहरत होती. त्यांनी १ ली ते १० वी पर्यंत वत्कृत्व स्पर्धेतील बक्षीस घेण्यात बाजी मारली. पुढे पुढे कैलास यांना वाचनाची इतकी सवय झाली की ते पुस्तकांचा फडशा पाडू लागले. रामायण, महाभारत, बायबल कुराण असे धार्मिक ग्रंथ म्हणा की बाबा कदम, बाबूराव अर्नाळकर, गुरुनाथ नाईक अशी पुस्तके वाचल्याने त्यांच्या ज्ञानडोहाची पातळी वाढू लागली.


कैलास यांचे शालेय जीवनशिक्षा विद्यामंदिर नेरुळ इथे चालू होऊन विद्याप्रसारक हायस्कूल बेलापूर, मॉडर्न महाविद्यालय वाशी पर्यंत येऊन त्यांनी डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेज येथून एम. बी. बी. एस ची डिग्री घेतली. आता कैलास यांच्या नावा अगोदर डॉक्टर ही पदवी जोडली गेली. डॉ. कैलास यांची प्रथम प्रार्थमिक आरोग्य केंद्र साई-माणगाव या रायगड जिल्ह्यातील अतिदुर्गम भागात वैद्यकीय अधिकारी म्हणून नेमणूक झाली. २००३ सालापासून ऐरोली, कोपरखैरणे अशा ठिकाणी अपघात वैद्यकीय अधिकारी म्हणून सेवा देऊन ते सीबीडी येथे नागरी आरोग्य केंद्र येथे वैद्यकीय अधिकारी म्हणून सेवेत रुजू झाले.

डॉ. कैलास हे मनमिळावू व दुसर्याच्या हाकेला नेहमी धावून जाणारे आहेत. आपले कार्य सांभाळत डॉ. कैलास समाजाचे भान राखून समाज सेवेसाठी नेहमी तत्पर असतात. कर्मकांड, बुवाबाजी, धर्माच्या नावाखाली माजवले जाणारे चुकीचे अवडंबर, अंधश्रद्धा याविरोधात ते आहेत. त्यांचा विज्ञानावर विश्वास आहे. त्यांनी अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कार्यात सक्रिय सहभाग घेतला या कामामुळे डॉ. नरेंद्र दाभोळकर यांचा सहवास त्यांना लाभला याचा त्यांना अभिमान आहे.


डॉ. कैलास यांनी विविध आरोग्य शिबिरे, जनजागृतीपर व्याख्याने केली. आमच्या उरणच्या इनरव्हिल क्लब ऑफ उरण च्या माध्यमातून २ वेळा गर्भाशयाच्या कर्करोगाच्या तपासणी (पॅप्समियर) केली ज्याचा अनेक महिलांनी लाभ घेतला. ही शिबिरे घेत असताना डॉ. कैलास स्वतःचा कधीही प्रचार करत नाहीत किंवा स्वतःची वाहावाह ही करून घेत नाहीत.





निःस्वार्थी, निर्व्याज भावनेने ते आपली सेवा जनतेला देत असतात. गुजरात राज्यातील अंकलेश्वर या इस्नोट गावात त्यांनी १४ जणांच्या टीम सोबत १४ दिवसांचे शिबीर भरवले होते ज्याचा जवळपास ८००० रुग्णांनी लाभ घेतला. त्यात ४०० हून अधिक मोतीबिंदू शस्त्रक्रिया पार पडल्या, खुब्याच्या सांधा बदलण्याची शस्त्रक्रिया केली गेली.नेरूळ बेलापूर या शाळांची वैद्यकीय जबाबदारी डॉ. कैलास यांच्यावर होती. त्यांनी शालेय विद्यार्थ्यांसाठी जीवन प्रशिक्षण शिबिरे घेतली. एच. आय. व्ही. सारख्या समस्येवर विद्यार्थ्यांमध्ये जनजागृतीचे काम केले. ७ एप्रिल ला जागतिक आरोग्य दिनी आरोग्य विभागात काम करणाऱ्या प्रत्येक केडर - श्रेणीला समाविष्ट केले जाते त्या कार्यक्रमाचे उत्कृष्ट सादरीकरण डॉ. कैलास यांनी केले व त्यामुळे नवी मुंबई मनपा आयुक्तांसह उपस्थित आरोग्य महासंचालक डॉ. सुभाष साळुंखे यांच्याकडून त्यांनी वाहवा मिळवली. सन २०१०-२०११ या वर्षी नवी मुंबई महानगरपालिकेचा उत्कृष्ट वैद्यकीय अधिकारी म्हणून सन्मानित करण्यात आले. सी. बी. डी. च्या नागरी आरोग्य केंद्राचा ब्लॉग बनवून आंतरजालावर प्रकाशीत करणारे ते पहिले वैद्यकीय अधिकारी असून त्याची दखल टाईम्स ऑफ इंडियाने विशेष वृत्तांताद्वारे घेतली.


डॉ. कैलास यांना लेख, कविता गझल लिहिण्याचा छंद आहे. आपल्या छंदाच्या निर्मिती बद्दल डॉ. कैलास सांगतात श्री अण्णा त्रिभुवन हे गझलकार त्यांच्या दवाखान्यात येत असत. ते डॉ. कैलास यांना नेहमी वाचताना पाहायचे व त्यांनी डॉ. कैलास यांची साहित्या प्रती गोडी ओळखली. त्यांनी त्यांच्याकडील एक गझल चे पुस्तक डॉ. कैलास यांना वाचायला दिले व काही गझलही त्यांना ऐकवीत होते पण थोड्या वेळाने डॉ. कंटाळले व त्यांनी कंटाळा आल्याचे अण्णांना बोलून दाखवले त्याने श्री अण्णा त्रिभुवन रागावले व म्हणाले प्रसुती समयी एक एक कळ जशी आईला लागते तशी एक एक ओळ गझलेची निघते. त्यानंतर त्यांनी डॉ. कैलास यांना चॅलेंज केले की मी एक गझलेची ओळ देतो तुम्ही ७ दिवसांत दुसरी लिहून दाखवा. ती ओळ होती "चेहऱ्याची चांगली ही रीत नाही" त्यानंतर डॉ. विसरून गेले पण ७ दिवसांनी श्री अण्णा त्रिभुवन आले आणि त्यांनी गझलेची ओळ पूर्ण झाली का विचारले. डॉ. कैलास यांनी त्यांच्याकडे थोड्या वेळाची मुदत मागितली व लगेच दुसरी ओळ तयार करून दिली.

चेहऱ्याची चांगली ही रीत नाही
अंतरीचे दुःख तो लपवीत नाही.

अण्णांना ही ओळ खूप आवडली व त्यांनी डॉ. कैलास यांचे कौतुक केले व गझल पूर्ण करून नित्य गझल लिहिण्यासाठी प्रेरित केले. त्यानंतर ही गझल पूर्ण करून डॉ. कैलास यांनी सुरेश भट वेबसाइटवर ती प्रकाशीत केली. नंतर ते लेख, प्रवास वर्णन, कविता, गझल लिहून मायबोली, मनोगत, ऐसी अक्षरे अशा आंतरजालावरील वेबसाइटवर प्रकाशीत करू लागले. मायबोलीवर त्यांनी गझलांचे उपक्रमही घेतले. हे सगळे लिहिताना त्यांच्या ऋदयस्थानी दडलेल्या आगरी बोलीभाषेत आपण का लिहू नये असा विचार आला आणि त्यांनी २०११ साली पहिली आगरी गझल एका ज्वलंत विषयावर लिहिली "पलाट साडेबाराचा". ते अत्यंत आनंदाने सांगतात की आगरी भाषेत कोणीही गझल लिहिलेली पाहण्यात नव्हती. आग्री भाषेतील गझलेला जन्म डॉक्टर कैलास यांनी दिला. सन २०११ साली गोव्याला घनश्याम भेंडे यांच्या अध्यक्षतेखाली गझल संमेलन झाले होते त्यात बहुभाषिक मुशायऱ्यात सर्वप्रथम पलाट साडेबाराचा ही आगरी गझल डॉ. कैलास यांनी सादर केली. त्या गझलेला संमेलनात प्रचंड प्रतिसाद मिळाला. ती गझल पुढील प्रमाणे.


भानगरींना कारन झाला,पलाट साडेबाराचा
शिरकोचा म्होटा घोटाला,पलाट साडेबाराचा

कंचे व्यावारान दलाली,आवरि नय गवनार कवा
डिलींग मधला म्होटा गाला,पलाट साडेबाराचा

धा मजल्याचा टॉवर झाला,गावाचे त्या बाजूला
मिनी चरवला पयला माला,पलाट साडे बाराचा

लाईट ,पानी ,रस्ता सगला कॉलनीन रानार्‍यांना
आमचे दारासमोर नाला,पलाट साडेबाराचा

चिकन्,मटन्, दारु ना मच्छी,बायेरचे मित्रांसाठी
खोपटान ठेवू बापाला,पलाट साडेबाराचा

जमीन नाही,पलाट नाही,किती किती मी सहन करु?
तरास आपापले जिवाला,पलाट साडेबाराचा

धरुन ''कैलास'' या जगानी,बाप कुनाला बनेवला
व्हता कुनाचा,लाभ कुनाला,पलाट साडेबाराचा.

--डॉ.कैलास गायकवाड.

डॉ. कैलास यांनी १९ आगरी व्यक्तीवर ' बटवा ' हा व्यक्तिचित्रण संग्रह लिहिला आहे. कळवा,बेलापूर पट्ट्यांतील आगरी समाजातील सामाजिक, आर्थिक, नैतिक स्थित्यंतरे दर्शविणारी जतर ही कादंबरी डॉ. कैलास यांनी खुबीने लिहिली आहे. त्यांचा अस्वस्थ प्रतिबिंब हा गझल संग्रह प्रकाशीत झालेला आहे. गजलोत्सव, अखिल भारतील गझल संमेलन विशेषांक, मराठी गझल - सुरेश भटांनंतर, मुस्लिम मराठी संमेलन विशेषांकात त्यांच्या गझल प्रकाशित झाल्या आहेत.

आगरी संस्कृतीबद्दल बोलताना डॉ. कैलास म्हणतात मी पाहिलेली आग्री संस्कृती ही मातृसत्ताक आहे. घरात आई ही मुख्य असते. ती पूर्ण घराची जबाबदारी सांभाळते. आईच घरातील सगळ्या कार्यक्रमाचीही सूत्र हाती घेते. आगरी कुटुंबातील वडील किंवा मुलगा आपली मिळकत आणून आईकडे देतात व आई खर्चाचे नियोजन सांभाळते. आईला प्रत्येक कार्यात मान असतो. लग्न, पूजा, शेतीच्या नांगरणीची, पेरणी, धान्याच्या पूजेला आईला पहिला मान असतो. आगरी संस्कृती महिलांचा  सन्मान करणारी आहे. विविध सण, कार्यक्रमातील त्यांच्या रिती पर्यावरणाला धरून आहेत. डॉ. कैलास म्हणतात आग्री लोक हे रांगडे, रोखठोक, हातच न राखून बोलणाऱ्या गुणवैशिष्ट्यासकट मोकळ्या मनाचे, प्रेमळ आहेत. ते वडील किंवा शिक्षकांना एकेरी संबोधत असले तरी त्यामागे त्यांची भावनिक जवळीक आहे. जीवनाचे सार सांगणारे आगरी बोलीभाषेत काही शब्द आहेत ते अन्य कोणत्याही भाषेत नाहीत असे डॉक्टर म्हणतात. या बोलीतील स्मशानगीते, धवलगीते खूपच भावणारी आहेत. 


तर असे हे डॉ. कैलास सोमनाथ गायकवाड हे जन्माने आगरी नसले तरी त्यांना आगरी लोकांबद्दल अत्यंत जिव्हाळा आहे व ते आपले  समूहाबाबतच आदर, जिव्हाळा आपल्या लेखणीतून व्यक्त करत आहेत. त्यांना अनेक बारकावे ह्या बोलीभाषेबाबत ज्ञात आहेत. त्यांच्या हातून आगरी समूहाच्या कौतुकाचे अमर्याद लेखन होवो व त्यांनी आचरणात आणलेला आगरी बाणा त्यांच्या आयुष्यात प्रगतीची, सुख-समाधान-समृद्धीची बरसात करू दे ही शुभकामना. 

सौ. प्राजक्ता पराग म्हात्रे, उरण (कुंभारवाडा)
prajaktamhatre.77@gmail.com

अग्रसेन २०१९ दिवाळी अंकात प्रकाशित.






रविवार, ३ नोव्हेंबर, २०१९

सणावारांची बाजारपेठ

काही दिवसांपूर्वी बाजारपेठेलगत असलेल्या हॉस्पिटलमध्ये किरकोळ आजारामुळे एक दिवस राहण्याचा योग आला. आम्ही ज्या खोलीमध्ये होतो, त्या खिडकीतून बाहेर बाजारपेठेत चाललेली वर्दळ, खरेदी-विक्री, भाज्या, फळे पाहत विरंगुळा होत होता. दुसर्‍या दिवशी पहाटे उठले आणि खिडकीजवळ गेले, तर अगदी भकास वाटू लागले. फक्त कोरडा रस्ता दिसत होता. ना फळे, फुले, ना भाज्या, ना लोकांची गर्दी. पहिल्यांदाच बाजारपेठेला अस बिनाअलंकार पाहिले आणि अस्वस्थ वाटले. पण हा अस्वस्थपणा थोड्याच वेळात दूर झाला. हळूहळू दुकानदार, रस्त्यावरचे गाडीवाले, भाजीच्या टोपल्या घेऊन बसणार्‍या बायका असे आपआपल्या जागी जमू लागले. स्वतःच्या जागेची झाडलोट चालू झाली, रस्त्यावर पाणी शिंपडणे चालू झाले. धंदा चांगला व्हावा म्हणून अगरबत्त्या लावून प्रार्थनापूर्वक पूजाही होत होत्या. त्या अगरबत्त्यांचा धूर हवेत मंद एका सुरात वाहत होता. हे सगळे दृश्य पाहून मला सकाळची भूपाळी आठवत होती. आता प्रसन्न वाटू लागले होते. एकीकडे पिवळ्या केळ्यांची गाडी, तर कुठे कांदे-बटाटे, कुठे लाल लाल टोमॅटो तर कुठे सगळ्या हिरव्या पालेभाज्या, कुठेतरी मध्येच डोकावणारी फुले, शेंदरी गाजर, मक्याची अर्धवट सोलून ठेवलेली मोत्यासारखी कणसे, डाळिंब, संत्री, पेरू, चिकू अशी विविधरंगी फळे रचत रस्त्याला रंगीबेरंगी साजशृंगार चढला. थोड्याच वेळात गिर्‍हाईकही चालू झाले. खरेदी-विक्री दरम्यानची संभाषणे चालू झाली आणि हळूहळू मार्केट नेहमीसारखे आपलेसे वाटू लागले.

बाजार म्हणजे आपल्या सगळ्यांचाच आयुष्याचा एक महत्त्वाचा भाग. आमच्या उरणमध्ये भाजी मार्केट, मच्छी मार्केट, फूल मार्केट आहेच शिवाय रस्त्याच्या दुतर्फा मोठ्या दुकानांसमोर रोज फळे, भाज्या, फुले. ऑफिसला जाताना लागणारा मार्केटचा देखावा मला नेहमीच आवडतो. फळे, फुले, किराणा, औषधे, मासे, कपडे, करमणुकीच्या विविध वस्तू, खेळणी, भांडी अशी अनेक दुकाने मार्केटमध्ये कित्येक वर्षे आपले बस्तान बांधून नांदत असतात. गिर्‍हाईक हाच देव मानून दुकानदार व्यवहारामार्फत गिर्‍हाइकाची सेवा करत असतात.
सणासुदीच्या दिवसांत मार्केटमध्ये जाणे मला जास्त आवडते. प्रत्येक सणाची वेगवेगळी वैशिष्ट्ये बाजारात दिसत असतात. चैत्र महिन्यातील गुढीपाढव्याला साखरेच्या माळांनी मार्केटला गोडवा आलेला असतो. हल्ली छोट्या गुढ्याही दुकानांत नटून सजून बसलेल्या असतात. फूलवाल्यांकडे झेंडूच्या फुलांना विशेष महत्त्व आलेले असते.
ज्येष्ठातली वटपौर्णिमा सुवाशिणींचा सण. ह्या सणाला बाजारपेठेत फणसाच्या राशी लागतात. फणस कापून गरे विकणाऱ्याभोवती तर बायकांचा गराडाच असतो. नवीन नवऱ्यांसाठी लागणाऱ्या परड्या बुरूड बायका विकत असतात. नवीन नवऱ्यांच्या आया आपल्या मुलीची ओवश्याची परडी तिच्या आयुष्यात सुखाचे दान मिळावे म्हणून मनोभावे खरेदी करताना दिसतात. ओवशात लागणारी फळे ही त्या हंगामाचीच असतात - म्हणजे फणस, जांभूळ, करवंदे, आंबा, अळू ह्या फळांना बाजारात मान असतो आणि ह्या मानाला साजेसे त्यांचे भावही चढलेले असतात. जोडीला केळी, चिकू अशा फळांच्याही कॉलर टाईट असतात. खण-नारळांच्या सामानालाही उधाण आलेले असते. आजकाल वडाच्या फांद्यांनी तर बाजार भरलेला दिसतो. पण त्याऐवजी वडाच्या झाडाची रोपे विकायला येऊन ती दारोदारी लावली जावीत व ज्यांना शक्य नाही त्यांनी वडाच्या चित्राची पूजा करावी, जशी देवतांच्या प्रतिमेची केली जाते, अशी ईश्वरचरणी प्रार्थना आहे जेणेकरून वडाच्या झाडांना हानी पोहोचणार नाही.
आषाढातल्या एकादशीला बाजारात साक्षात जणू पांडुरंगच प्रसन्न असतो. जास्त गडबड गोंधळ नसतो, पण जागोजागी भुईमुगाच्या शेंगा, अळूच्या मुळ्या, कोनफळ, रताळी अशी मातीतली कंद वारीत आल्याप्रमाणे विठोबाच्या रंगात मिसळलेली दिसतात.
श्रावण महिन्यात बाजारपेठेतही 'श्रावणमासी हर्ष मानसी' वातावरण असते. जागोजागी रानभाज्यांची हिरवळ पसरलेली असते. नागपंचमीला नागाच्या सुबक मूर्ती फणा काढून दर्शन देत असतात. नागोबाला वाहण्यासाठी लागणाऱ्या वेली जुड्यांमध्ये जणू पदर खोचूनच बसलेल्या असतात. राखीबंधनाच्या राख्यांची हंगामी दुकाने रंगीबेरंगी, विविध आकारातील राख्यांनी सुशोभित झालेली असतात. थोड्याच दिवसांत येणाऱ्या गोकुळाष्टमीसाठी सजलेल्या हंड्या नटखट कान्हा दही चोरताना डोळ्यासमोर आणतात.
भाद्रपद महिना म्हणजे गणेशोत्सवाचा जल्लोश! या दिवसांत बाजारपेठांतील गल्ली अन गल्ली मंगलमय रूप धारण करते. जिकडे तिकडे अत्तरांचा व उदबत्त्यांचा सुगंध, फळांच्या गाड्यांवर फळांच्या सुबक राशी, फूलमार्केटमध्ये सजावटीची फुले, कंठ्या नि दूर्वा, सुगंधी फुलांनी मार्केट इतके मंगलमय झालेले असते की तिथून पाय पुढे निघत नाहीत. काही सजावटीची दुकाने तोरणांनी, माळांनी घराघरांतील गणेशाचे स्वागत करायला सज्ज झालेली असतात. हलवायांच्या दुकानांत मोदकांच्या सुबक राशी रचल्या जातात. सीडीची दुकाने गणेशभक्तीच्या गीतांनी सुरेल झालेली असतात. गणपतीच्या आगमनापूर्वीचे दोन दिवस तर बाजारपेठ तुडुंब भरलेली असते. गणेशमूर्तीही बाजारातील दुकानांमध्ये आपापल्या मेकअपवर फायनल टच मारून मखरात विराजमान होण्यासाठी तयार होत असतात.
आश्विन महिन्यातली नवरात्र बाजारपेठ झगमगीत करते. जागोजागी देवीसाठी लागणारे पूजेचे सामान, रंगीबेरंगी दांडिया आणि गरब्याचे चमकदार आणि उठावदार असे रंगीत घागरे यांनी बाजारपेठेत फेर धरलेला असतो. ह्या दिवसांत उपवासासाठी मोठमोठाले भोपळे ठिय्या मांडून बसलेले असतात. अगदी आजीबाईच्या भोपळ्याच्या गोष्टीची आठवण आल्याशिवाय राहत नाही.
कोजागरी पौर्णिमेचा चंद्रही बाजारपेठेत आपल्यासाठी आज काय गंमत आहे हे डोकावून नक्की पाहत असेल. प्रत्येक घरात किंवा सोसायटीत कोजागरीनिमित्त होणाऱ्या पार्टीसाठी खास मेनू आखले जातात. त्यात मसाला दूध हे तर नैवेद्य म्हणून चंद्राचे प्रतिबिंब आपल्यात सामावून घेण्यासाठी आतुर असते. ह्या दिवशी सकाळीच दूध आणून ठेवावे लागते. संध्याकाळपर्यंत बाजारात दुधाचा तुटवडा झालेला असतो. किराण्याच्या व खाऊच्या दुकानांमध्ये मसाला दुधाच्या मसाल्याच्या लहान-मोठ्या डब्यांना ह्या दिवशी खास मान देऊन पुढे आणलेले असते. भाजी मार्केटमध्ये उकडीच्या शेंगा, रताळी असे सामान भरपूर आलेले असते.
आपल्या घरात जसा दिवाळीचा उत्साह असतो, तसाच उत्साह बाजारपेठेत असतो. काही ठिकाणी उटण्याचा सुगंध दरवळत असतो. जागोजागी विक्रीसाठी ठेवलेल्या रंगीबेरंगी कंदिलांमुळे बाजारपेठ सजून जाते, तर रात्री तारका अवतरल्यागत बाजारपेठ झगमगून जाते. ठिकठिकाणी फटाक्यांची दुकाने व त्याभोवती बालगोपाल आपल्या पाल्यांसह फटाके घेताना त्यांच्या चेहर्‍यावर फुलबाजे फुललेले दिसतात. पद्धतशीर लावलेल्या रांगोळ्यांच्या ढिगांनी बाजारपेठेला रंगांनी न्हाऊन टाकलेले असते. लक्ष्मीपूजनाच्या, पाडव्याच्या आगमनासाठी झेंडूच्या फुलांचे डोंगर रचलेले असतात. तोरणे, माळा बाजारपेठ अधिक सुशोभित करत असतात. लक्ष्मीपूजन म्हणजे खरा दुकानाचा सण. प्रत्येक दुकानाभोवती रांगोळ्या वेगवेगळ्या नक्षीकामात मिरवताना दिसतात. झेंडूच्या आणि आंब्याच्या पानांची तोरणे चैतन्यमय वातावरण निर्माण करतात. ह्या दिवशी दुकानात पूजेचा थाट असतो. हिशेबाच्या वह्यांसकट दुकानाची पूजा होते. रात्री फटाक्यांची आतशबाजीने बाजारपेठ दुमदुमून जाते.

Photo-Collage-20191022-202823223



कार्तिक महिन्यातील बलीप्रतिपदेसाठी नवीन झाडू बाजारपेठेत आपले स्थान उंचावतात. भाऊबीजेसाठी भांड्यांची, कपड्यांची आणि भेटवस्तूची दुकाने सामानाने आणि माणसांनी तुडुंब भरलेली दिसतात. सगळ्या भावाबहिणींची माया त्या भेटवस्तू रूपात ओथंबून भरलेली दिसते.
कार्तिकी एकादशी हा कार्तिक महिन्यातील विठोबाच्या भक्तीने भरलेला सण म्हणजे आषाढ महिन्याच्या बाजारपेठेचेच प्रतिबिंब.
पौष महिन्यात येणारी मकरसंक्रांत पुन्हा बाजारपेठ भरगच्च करते. ओवसा देण्यासाठी अनेक प्रकारच्या वस्तू घेऊन विक्रेते जागोजागी बसतात, बऱ्याच ठिकाणी तीळगूळ, साखरफुटाणे, हळद, कुंकू असे सामान मिरवत असते. ह्या दिवसांतली मातीची छोटी सुगडी लहान मुलांसाठी खास आकर्षण असते. अ‍ॅष्टर, शेवंती, गुलाब अशा फुलांनी फूलमार्केट बहरलेले असते. खायची पाने, गाजर, ऊस, हरभरा, बोरे यांनी मार्केटमध्ये राज्य मिळवलेले असते आणि हे सगळे खरेदी करण्यासाठी आलेल्या महिलांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद, उत्साह ओसंडलेला दिसतो.
फाल्गुनातली होळी म्हणजे रंगांचा सण. होळीच्या दहा दिवसांपूर्वीपासूनच दुकानांत लहान मुलांसाठी पिचकाऱ्या लटकवलेल्या दिसतात. रंगांच्या राशींनी पूर्णं बाजारपेठेला रंगीबेरंगी स्वरूप आलेले दिसते.
जीवनावश्यक सगळ्या वस्तूंचा पुरवठा मार्केटमध्येच तर असतो. विचार करा, आठ दिवस मार्केट बंद राहिले तर आपली काय अवस्था होईल? किती घट्ट नाते असते आपले ह्या मार्केटशी.
रोजच्या दैनंदिन जीवनासाठी आपल्याला मार्केटचा भक्कम आधार असतो. मला कुठल्याही बाजारपेठेत गेले की नेहमी ताजेतवाने वाटते, कितीही मरगळ आली असेल तरी बाजारपेठेतील एक चक्कर ती मरगळ घालवून एक उत्साही वातावरण निर्माण करते. मग त्यासाठी पैसेच खर्च करावे लागतात असे काही नाही. एखाद्या प्रेक्षणीय स्थळाप्रमाणे ह्या बाजारपेठेला मारलेली चक्करही मन प्रसन्न करते.

सौ. प्राजक्ता पराग म्हात्रे, उरण.
(हा लेख मिसळपाव या ई दिवाळी अंक २०१९ मध्ये प्रकाशित झालेला आहे. अंक पाहण्यासाठी  लिंक क्लिक करा. https://www.misalpav.com/node/45490)

शुक्रवार, ११ ऑक्टोबर, २०१९

पाथरवट - दगडाचा कलाकार



पेण मध्ये असलेल्या वाशी ह्या सासरच्या गावी आमची वर्षातून दोन-तीन वेळा फेरी होते. प्रत्येक वेळी तिथे जाताना मला नेहमी एका गोष्टीच आकर्षण असत ते म्हणजे हायवेवर असलेल्या रामवाडीच्या समोर रस्त्याच्या  कडेला ठोकत असलेल्या पाथरवटाच्या दगडी वस्तूंच. तिथून येताना नेहमी आम्ही गाडी थांबवतो आणि पाथरवटांकडून छोटे पाटा-वरवंटे, खलबत्ता अशा वस्तू कधी आम्हाला घरात तर कधी भेट देण्यासाठी घेतो. यावेळी जरा वेळ काढूनच या पाथरवटांशी गप्पा मारल्या. गप्पांतून त्यांच्या व्यवसायाबद्दल माहिती मिळाली आणि पाथरवटांच्या त्या दगडी कलेकडे पाहण्याचा दृष्टिकोनच बदलून गेला.

रामवाडीच्या हायवेच्या कडेला श्री रामदास जाधव व सौ. संगिता जाधव यांचं कुटुंब फलटण वरून येऊन पेणमध्ये वास्तव्य करत हे दगडी कलाकुसर करण्यात रमलेली असतात. त्यांचे  नातलगही तिथेच हा व्यवसाय करतात. त्यांची झोपडीवजा तीन चार दुकाने जवळ जवळच आहेत. त्या दुकानांत छोटे-मोठे पाटा वरवंटे, खल-बत्ते, छोटी-मोठी जाती अगदी खेळण्यातलीही, मूर्ती अशा वस्तू आपले मन आकर्षीत करून घेत असतात. त्यांचं ठक ठक आवाजात काम चालूच असत. जवळ काही अवजारे असतात वेगवेगळ्या आकारातली. अवजारांच्या, आपल्या बळाच्या, बुद्धीच्या व कौशल्याच्या साहाय्याने  ह्या कलाकृती पाथरवट बनवत असतात.






श्री रामदास जाधव यांच्याकडून माहिती मिळाली की ह्या वस्तूंसाठी लागणारे दगड ते स्थानिक डोंगरातले घेत नाहीत. कारण स्थानिक दगडांना वस्तू घडवताना चिरा पडतात. कल्याणच्या डोंगरातून खणून आणलेले दगड ते विकत घेतात. क्वारीतील दगडही तुटलेले असल्याने ते ह्या कामासाठी चालत नाहीत. दगडी वस्तू घडवत असताना त्यावर मारलेला प्रत्येक ठोका योग्य जागी पडावा लागतो. हे ठोके मारत असताना दगडांचे तुकडे आजूबाजूला, अंगावर उडत असतात. अनेकांचे दगडाचे तुकडे डोळ्यात गेल्याने डोळेही गेले आहेत. कारण निघालेला बारीक तुकडाही धारदार व वेगाने डोळ्यात गेल्याने बुबुळाला जखमी करून डोळा निकामी करतो. कधी कधी हातोडीचा नेम चुकून हातावरही येतो, सतत ठोकून हात दुखतात ते वेगळेच. दगड तासत तासत त्याची एखादी कलाकृती तयार करायची हे दगडाएवढंच कठिण काम आहे. अतिशय संयमाने हे पाथरवटाचे काम करावे लागते. एक पाटा घडवण्यासाठी एक पूर्ण दिवस लागतो. पाट्याचा दगड आकारात तासून झाला की त्याला धार येण्यासाठी टाकी लावली जाते. पूर्वी दारोदार  टाकी बसवून द्यायला हे पाथरवट फिरायचे पण आता पाट्याची जागा मिक्सरने घेतल्यामुळे पाट्याचा वापर बहुतांशी घरातून बंदच झाला आहे. आता पाटा फक्त शोभेची वस्तू  म्हणून घरात ठेवला जातो आणि आपल्या पारंपरिक रिती-भाती सांभाळण्यासाठी पाचवी ,बारसं, लग्न अशा समारंभांसाठी वापरण्यात येतो. फार कमी घरात आता पाटा-वरवंटा वापरला जातो.

गिरणी झाल्यामुळे जाती तर फक्त शोभिवंत वस्तू व पाट्यांप्रमाणेच लग्नातील काही विधीसाठी उपयोगात येतात. काही हौशी व्यक्तीच घरी दळण्यासाठी जात्याचा कधीतरी वापर करतात. मोठी जाती तर आता बनतच नाहीत जी शेतातील टरफलासकट असणारा तांदूळ दळण्यासाठी उपयोगात यायची. ही जाती मी लहानपणी उरण नागावात माझ्या माहेरी पाहिली आहेत, विरंगुळा म्हणुन आई-आजीचा हात  धरुन  लहान मोठी अशी जाती फिरवलीही आहेत.


यावरून आपल्या लक्षात येईल की आता विजेच्या उपकरणांमुळे पाट्या-वरवंट्याचा, जात्यांचा खप किती कमी झाला असेल पूर्वीपेक्षा. पूर्वी जाती, पाटा-वरवंटा, खलबत्ते हे घरोघरी असायचे, पूर्वी तर दगडी उखळी होत्या, पाणी ठेवण्यासाठी मोठमोठी भांडी तयार केली जायची दगडाची. माझ्या सासरी उरण-कुंभारवाड्यात ही पाण्याची भांडी व एक उखळ अजून आहे ज्यात मी आता झाडे लावली आहेत. हौसे खातर नव-याने घेतलेल जातं, खलबत्ता आहे. जुुुुना सासूबाईनचा   पाटा वरवंटा आहे, ओट्यावर छोटा पाटा वरवंटा आहे ज्याचा मी रोज आले व लसुण ठेचण्यासाठी वापर करते. 

त्यावेळच्या मोठमोठ्या कामांमुळे पाथरवटांना फुरसत मिळत नसे. आताच्या यांत्रिकी युगात मात्र  नवनवीन विजेच्या उपकरणांमुळे पाथरवटांचा व्यवसाय अस्ताला चालला आहे.  पण श्री रामदास जाधव यांना त्याबद्दल काही खंत नाही. ते त्यांच्या व्यवसायाशी प्रामाणिक व समाधानी आहेत. ते म्हणतात अजूनही लोक शोभेसाठी का होईना पाटे-वरवंटे, जाती, खलबत्ते घेतात त्यात आमची गुजराण होते. त्यांना फक्त खंत आहे ती हा व्यवसाय संपुष्टात यायला लगला आहे याची. ह्या धंद्यात वस्तूला कमी मागणी, अतिशय मेहनत व कमी मिळकत असल्याने नवीन पिढी ह्यात रस घेत नाही. परिणामी ह्या व्यवसायाचे भविष्य धोक्यात आले आहे. ही कला व हा व्यवसाय टिकावा अशी मनोमन ईश्वर चरणी प्रार्थना.

सौ. प्राजक्ता पराग म्हात्रे, उरण

झी मराठी दिशा (शनिवार १२ - १८ ऑकटोबर २०१९ ) साप्ताहिकात प्रकाशित.



     

शुक्रवार, ३० ऑगस्ट, २०१९

उरण - विनायक गावातील प्राचिन ऋद्धि-सिद्धि विनायक मंदिर

निसर्गाच्या सानिध्यात असणार अस आमचं छोटंसं उरण हे मूर्ती लहान पण कीर्ती महान प्रमाणेच माझ्या ऋदयात घर करून आहे. आमच्या उरणमध्ये मोरा बंदर, करंजा बंदर व पिरवाडी -दांडा या निसर्गसंपन्न समुद्रकिनार्‍यांची झालर आहे. पिरवाडीचा समुद्रकिनारा हा आम्हा रहिवाशांसाठी मनःशांती, करमणुकीचे मोठे स्रोत आहे. सुट्टीच्या दिवसांत अनेक पर्यटक ह्या समुद्रकिनारी भेट देऊन मनात आनंद घेऊन जातात. उरणमध्ये पूर्वी खूप खाड्या होत्या, मिठागरे होती. परंतू आता औद्योगिककरणामुळे त्यांचे प्रमाण कमी आहे. तरीही काही खाड्या शाबूत आहेत. त्यातील पाणज्याची खाडी ही विदेशी रोहीत पक्षांच्या दर्शनासाठी प्रसिद्ध आहे. रोहीत पक्षांबरोबर इतर अनेक पक्षी ह्या खाडीच्या परिसरात आपली गुजराण करतात. इथल्या करंजा गावातील द्रोणागिरी पर्वताबद्दल एक आख्यायिका आहे. मारुतीने लक्ष्मणाला संजीवनी वनस्पतीसाठी पर्वत उचलून नेत असताना त्या पर्वताचा एक तुकडा उरणच्या करंजा गावी पडला. तो डोंगर द्रोणागिरी डोंगर म्हणून प्रसिद्ध आहे. ह्या डोंगराच्या एका भागात द्रोणागिरी देवीचे सुंदर मंदिर आहे. मंदिर टेकडीवर असून करंजा जेट्टीचे, समुद्र किनार्‍याचे, तिथल्या होड्यांचे विहंगम दृश्य ह्या टेकडीवरून होते. द्रोणागिरीच्या डोंगरावर एक इतिहासकालीन पडका किल्ला आहे. किल्ल्याच्या बाहेर एक हौद आहे. हे नैसर्गिक थंडगार पाणी आम्ही पूर्वी डोंगरावर गेल्यावर प्राशन करायचो. आमच्या उरणात अजूनही तांदळाची शेती पिकते. तांदळाच्या शेतीनंतर काही ठिकाणे भाजीचे मळे फुलतात. आमच्या ह्या उरण तालुक्यातील घारापुरी ही लेणी पर्यटनस्थळ म्हणून जगप्रसिद्ध आहे. आमच्या उरणातली जनताही जितकी प्रेमळ तितकीच जिगरबाज आहे. अनेक ऐतिहासिक लढे उरण तालुक्यात गाजले. त्यात चिरनेरचा जंगल सत्याग्रह, शेतकरी आंदोलन यांचा समावेश आहे. सत्याग्रहाबरोबर जमिनींच्या आंदोलनातही अनेक हुतात्मे शहीद झाले आहेत व त्यांची हुतात्मा स्मारके ही आता बलिदानाची साक्ष देत आहेत. भारताच्या नकाश्यावर उरणचे नाव गाजवणारे आशिया खंडातील दोन नंबरचे जवाहरलाल नेहरू बंदर (जे. एन. पी. टी. ), ओ. एन. जी. सी., बि. पी. सी. एल सारखे प्रकल्प उरणच्या छत्रछायेत प्रगतिपथावर आहेत. आमच्या उरणात अनेक प्राचीन मंदिरे आहेत. चिरनेरचा महागणपतीच्या देवळावर जंगल सत्याग्रहाच्या खुणा देखील आहेत. उरणच्या बाजारपेठेत उरणावती देवीचे मंदिर आहे. ह्याच देवीला शितळादेवी असेही म्हणतात. ह्याच देवळाच्या आजूबाजूला एका ओळीत शंकर, विठोबा, तिरूपती, दत्तगुरू या देवतांची पूर्वीपासून मंदिरे आहेत. ह्या भागाला देवळांवरून देउळवाडी संबोधण्यात येते. त्याच्याच पुढे नाक्यावर, मारुती, गणपती व लक्ष्मीनारायण यांची पूर्वापार मंदिरे आहेत. देऊळवाडीच्या मागच्या अंगाला मोठे विमला तलाव आहे वयोवृद्धापासून ते लहान बालकांसाठी हे विरंगुळ्याचे स्थान आहे. केगांव ह्या गावी माणकेश्वराचे प्राचीन मंदिर आहे. त्यातच आमच्या उरण तालुक्यात पूर्वीचे रानवड गावी असलेले ऋद्धि सिद्धि विनायकाचे जागृत देवस्थान आहे.
हिंदू धर्मात बुद्धीचा अधिष्ठाता, विघ्नहर्ता मानला जाणारा देव म्हणजे गणपती. गणपतीची अनेक नावे आहेत. त्यातील विनायक म्हणजे विशिष्ट रूपाने नायक किंवा नेता. ऋद्धि सिद्धि विनायका वरून सदर गाव हे विनायक ह्या नावाने ओळखले जाते. विनायक गावातील परिसर हिरवागार आहे. इथे आल्यावर नक्कीच कोकणची सफर घडल्यासारखे वाटते. प्रत्येक घराच्या समोर छोटीशी फुललेली बाग, बागेत अबोली, गावठी गुलाब, जास्वंद, चाफा अशा प्रकारची टवटवीत फुले व त्यांचा सुगंध, त्यात आंबा, फणस, नारळांसारख्या महावृक्षांची शीतल सावली, विविध पक्षांचे गुंजन, तोर्‍यात चालणार्‍या वाटा, खेळता वारा असे सुंदर श्री ऋद्धि सिद्धि विनायकाच्या आशिर्वादाच्या छायेत असणारे विनायक हे गाव.
ऋद्धि सिद्धि विनायक हे प्राचीन मंदिर ६५४ वर्षापासूनचे आहे. हे मंदिर शके १२८७ म्हणजे इसवीसन १३६५ मधील हम्बीराज कालीन आहे. हम्बीराज हा देवगिरी येथील यादव राजवटीतला सरदार होता व त्याच्या आधिपत्याखाली कोंकण भूमीचा भाग होता. त्यानेच हे मंदिर बांधलेले आहे असे रानवड व अलिबाग - नागाव येथे सापडलेल्या प्राचीन शिलालेखात उल्लेखीलेले आहे. सध्या हे शिलालेख मुंबई येथील प्रिंस ऑफ वेल्स या म्युझियम मध्ये आहेत.
मंदिरातील गणेशाची मूर्ती ही दगडी कोरीव असून अतिशय सुंदर व विलोभनीय आहे. एकाच पाषाणावर गणपती व त्याच्या दोन बाजूला ऋद्धि व सिद्धि उभ्या आहेत हे ह्या मूर्तीचे वैशिष्ट्य आहे. कारण अन्य कोणत्याही देवळामध्ये एकाच पाषाणावर गणपतीसह ऋद्धि व सिद्धि असलेली अशी मूर्ती आढळून येत नाही. ही मूर्ती काळ्या पाषाणात असून पाषाण साडेतीन फूट उंचीचा आहे तर अडीच फूट रुंद व आठ इंच जाडी असलेला आहे. विनायकाची मूर्ती साडेतीन फूट उंच असून ऋध्दि सिद्धि दोन फूट उंचिच्या आहेत. श्री विनायकाने आपले दोन्ही पाय मांडी घालण्यासाठी दुमडलेले आहेत. श्री गजाननाने पितांबर धारण केलेले आहे तसेच माथ्यावर सुंदर नक्षी असलेले मुकुट आहे. श्री गणेशाच्या हातात परशू, अंकुश आहेत आणि मांडीवर ठेवलेल्या हातात मोदक लाडू आहे. ऋद्धि सिद्धिंच्या हातात चवऱ्या आहेत. मुर्तीचा गोलाकार गाभारा दगडी आहे.
मुस्लिमांनी सदर मुर्तीचा विध्वंस करू नये म्हणून मंदिराचा कळस मशीदींच्या आकारासारखा ठेवला होता. त्यामुळे १२ व्या शतकात ही मूर्ती टिकून राहिली.
ह्या मंदिराच्या गाभार्‍यातून कळसाचे दर्शन होते हे देखील ह्या देवळाचे अजून एक वैशिष्ट्य आहे.
गेली कित्येक वर्षे रोज सकाळी सूर्यनारायण ह्या प्रथम पूज्य, विघ्नहर्त्याचे चरण स्पर्श करण्यासाठी मंदिरात किरणरूपी नमस्कार घालतात. नियमित सकाळी सव्वासातला सूर्यकिरणांचे आगमन मूर्तीवर होते.
देवळाच्या बाजूला एक हिरवेगार तळे आहे. देवळाचा परिसर टापटीप व स्वच्छ आहे. ह्या परिसरात एक विहीर आहे त्यातून पाण्याच्या टाकीची सोय केलेली आहे. १९३३ साली देवळाच्या समोर बुद्धी बरोबर शक्तीचे दैवत म्हणून मारुतीच्या देवळाची स्थापना केली होती परंतू बुद्धीची देवता व शक्तीची देवता समोरासमोर नसावी अशा जाणकारांच्या सूचना आल्याने मारुतीचे मंदिर ऋद्धि सिद्धि विनायकाच्या उजव्या बाजूला दक्षिणाभूमुखी करण्यात आलेले आहे.
मारुती बाप्पा
Code
मूर्तीच्या पाठीमागे सव्वातीन फूट उंचीचा प्राकृत भाषेमध्ये शिलालेख आहे. शिलालेखाच्या वर सूर्य, चंद्र व कलश यांच्या आकृती आहेत तसेच खालच्या बाजूला गध्देगल म्हणजे वस्तूचा व जमिनीचा अपहार करणार्‍यास दहशत घालणारे गदर्भ चित्र आहे. हा शिलालेख अनेक शतकांपासून एक गूढ होते, ह्या गूढ शिलालेखाचा उलगडा सन १९४० मध्ये सेंट झेवियर कॉलेज, मुंबई च्या हिस्टॉरिकल ग्रुपने केला हे आलिकडच्या काळात जुन्या कागदपत्रांचा शोध घेताना सापडले. ह्या शिला लेखाचा मराठी अनुवाद नांदेड येथील इतिहास संशोधक श्री प्रभाकर देव यांनी केलेला आहे.
सदर देवस्थानाची मालकी गेल्या नऊ पिढ्यांपासून घरत कुटुंबीयांकडे आहे. ह्या देवळात श्रीमंत नानासाहेब पेशव्यांचे येणे-जाणे होते. श्रीमंत पेशव्यांनी सन्मानाने घरत कुटुंबीयांना फजनदार हा किताब बहाल केला व आजूबाजूच्या शेतजमिनी इनाम म्हणून या देवस्थानाला देण्यात आल्या. सन १८६७ मध्ये ब्रिटिश सरकारने पांडूरंग दामाजी घरत (खोत) यांच्या नावे सनद दिली. पूर्वी या देवस्थानाची पूजा अर्चा उपाध्ये कुटुंबाकडे होती. १९३२ पर्यंत ही मूर्ती आकारात आहे ह्याची माहिती नव्हती. शतकानुशतके लावल्या जाणाऱ्या शेंदुरामुळे मूळ मुर्तिचे स्वरूप झाकले गेले होते. पण गणपती बाप्पानेच लीला केली आणि वैद्यकीय व्यावसायिक कै. वामन गणेश उपाध्ये यांच्या स्वप्नात वारंवार येऊन मला मोकळे कर असे बाप्पा सांगत असे. एक दिवस कै. श्री उपाध्ये मंदिरात ध्यान लावून बसलेले असताना त्यांना शेंदुरजडीत एक खपली पडल्याचे दिसले. त्यांना स्वप्नाचा उलगडा झाला. श्री उपाध्ये यांनी तातडीने त्यावेळचे फजनदार स्वर्गीय श्री. रघुनाथ दादाजी घरत यांना या अभूतपूर्व घटनेची कल्पना दिली. श्री रघुनाथ घरत यांनी राघो मेस्त्री, जुवेकर कुटुंब व गावकर्‍यांच्या मदतीने रातोरात त्या मूर्तीचा शेंदूर काढला व तो बाजूलाच असलेल्या तलावात विसर्जन केले. विनायकाचे हे नवीनं रूप पाहून सगळ्यांच्या अंगावर रोमांच उभे राहिले. काळ्या पाषाणात अत्यंत रेखीव, प्रसन्न अशी मूर्ती पाहून सगळ्यांचे भान हरपले होते. दुसर्‍या दिवशी ह्या चमत्काराची बातमी उरणभर पसरली व उरणमधील सगळ्या भाविकांनी देवळात हजेरी लावून विनायकाच्या मूळ सुंदर रूपाचे दर्शन घेतले.
Code
सन १९९३ पासून ह्या देवळाचे व्यवस्थापकीय विश्वस्त - फजनदार हे श्री सदानंद रघुनाथ घरत आहेत. हे मंदिर घरत घराण्याच्या मालकीचे असले तरी ते सगळ्यांसाठी खुले आहे व हे विनायक गावातले मंदिर म्हणूनच प्रसिद्ध आहे. श्री घरत यांनी मंदिरात व मंदिराच्या परिसरात अनेक सोयी-सुधारणा केल्या. श्री सदानंद घरत यांच्या पुढाकारातून कौलारू व मोडकळीस आलेल्या जुन्या देवळाचे १९१० साली नूतनीकरण करून प्रशस्त व सुबक सभागृह असलेले मंदिर उभारण्यात आले . मंदिराचे नूतनीकरण केले असले तरी मंदिराचा मूळ गाभारा व घुमट जाणीवपूर्वक तसाच ठेवला आहे.
तसेच सभागृहात असलेल्या प्राचीन काचेच्या हंड्या अजून काळजीपूर्वक जतन करून ठेवल्या आहेत व देवळाच्या प्रत्येक उत्सवाला व संकष्टी चतुर्थीला हंडीमध्ये काकडा प्रज्वलित करून मंदिराचे सभागृह मंगलमय व प्रकाशमय केले जाते. श्री सदानंद घरत यांच्या वडिलांच्या नावाने देवळात नंदादीपाची ज्योत अखंड तेवत आहे. सभागृहात दोन बाजूला दोन लाकडी जीने असून लाकडी खांबाची किनार असलेला माळा आहे.
सभागृहाच्या भिंतीवर वरच्या बाजूला चारही दिशेला हत्तीची रांग व त्यावर कलाकुसर असलेल्या नक्षीची पट्टी आहे जी सभागृहाच्या शोभेत वाढ आणते.
Code
मंदिराच्या प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला मूर्तिरूपी हत्ती भाविकांचे स्वागत करतात. देवळाच्या आजूबाजूचा परिसरही हिरवागार आहे. मंदिर जवळच एक तुळशीवृंदावन आहे. मंदिराच्या उजव्या बाजूला असलेल्या मारुती मंदिरातील शक्तिशाली मारुतीचे दर्शन घेतल्याने मनातील भय निघून जाऊन मन शांत होते. मंदिराच्या आवारातील रंगरंगोटी व कुंड्यांमधली हिरव्यागार झाडे व फुलांमुळे परिसर सुशोभित दिसतो.
काही दानी भक्तांनी दान म्हणून दिलेले बाकडेही मंदिराबाहेरच्या आवारात विश्रांतीसाठी ठेवले आहेत.
देवळाच्या परिसरात भाविक यात्रेकरूंसाठी निवासस्थान उभारले आहे. ह्या मंदिराची साफसफाई व नीटनेटकेपणा तिथे प्रवेश करताक्षणीच डोळ्यांना सुखावतो. परिसरात प्रवेश करायचा मुख्य दरवाजाही सुंदर मोराच्या नक्षीने सुशोभित केलेला आहे. मंदिरालगत असलेले तळे पाहून मन उल्हसित होते. ह्या तळ्यात पूर्वी गावकरी मनमुराद पोहण्याचा आनंद लुटत असत.
ऋद्धि सिद्धि विनायकाचे दर्शन घेताच मन प्रसन्न होते. विनायकाचे हे गोजिरे रूप डोळे भरून पाहतच राहावेसे वाटते. सभागृहात क्षणभर विसावल्यानेही मन शांत होते. या मंदिरात संकष्टी चतुर्थी, माघी गणेशोत्सव, भाद्रपदातील गणेशोत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरे केले जातात. गावातील व लांबून येणारे अनेक भाविक या ऋद्धि सिद्धि विनायकाच्या दर्शनासाठी मनोभावे येतात व श्रद्धेने विनायकाचे दर्शन घेतात. हा गणपती नवसाला पावतो अशी त्याची ख्याती आहे. भाविक आपल्या मनातील अनेक सुख-दु:खे विघ्नहर्त्यापाशी मोकळे करतात व त्यातून तारून जाण्यासाठी प्रार्थना करतात तसेच नवस करतात. विशेषतः दर संकष्टीला मोरा व करंजा येथील कोळी भाविक मोठ्या श्रद्धेने चालत अनवाणी दर्शनासाठी येतात. अनेक भक्तांचे संकट निरसन या विनायकाने केलेले आहे. पूर्ण झालेले नवस भक्त हर्षभराने फेडतात. काही दानी भक्तांनि देवळाला दानही दिलेले आहे. अनेक मोठ मोठ्या राजकीय नेत्यांनीही ह्या विनायकाच्या दर्शनाचा लाभ घेतला आहे.
गावकरी कोणतेही नवीनं कार्य करण्यापूर्वी विनायकाचे दर्शन घेतात व कार्य निर्विध्न पार पडण्यासाठी प्रार्थना करतात. अनेक गावकरी व इतर भाविकांना विनायक गावातील हा ऋद्धि सिद्धि विनायक पावलेला आहे. त्यांच्या अनेक आख्यायिका आहेत. अनेकांच्या दु:खाचे निरसन झाले आहे. गावकर्‍यांना ह्या ऋद्धि सिद्धि विनायकाचे अनेक दृष्टांत घडलेले आहेत. उपाध्ये कुटुंबीयांनाही बाप्पांचे अनेक दृष्टांत झाले आहेत. त्यांना एकटे चालत असताना मनात भय निर्माण झाले असताना या विनायकाने रूप पालटून साथ दिलेली आहे . श्री सदानंद घरत यांच्या घराण्यालाही विनायकाचे दृष्टांत झाले आहेत. त्यांच्या मुलाचा जन्मही अनंत चतुर्थीच्या दिवशी झाला हे ते आनंदाने सांगतात. ह्या ऋद्धि सिद्धि विनायकाची सेवा आपल्या ९ पिढ्यांपासून होऊन आपल्यालाही सेवा करण्याची संधी मिळतेय ह्यासाठी ते स्वतःला भाग्यवान समजतात. सन २००३ साली या मंदिराचा द्विशतकोत्तर सुवर्णमोहोत्सव साजरा झाला. या द्विशतकोत्तर सुवर्णमोहोत्सवाच्या निमित्ताने ऋद्धि-सिद्धि विनायकाने नाणे काढण्यात आले. या नाण्याच्या छपाईचे काम उरण येथील रहिवाशी मिंट टाकसाळ मधील प्रोफेशनल कलाकार श्री वसंत गावंड यांनी केले आहे. मूळ मूर्ती ही अत्यंत दुर्मिळ व पुरातन असून ती हल्लीच्या भेसळयुक्त शेंदूर व तेलामुळे मुर्तीची हानी होऊ नये या उद्देशाने पुरातत्त्व खाते व इतिहास संशोधक यांच्या सुचने नुसार श्री वसंत गावंड यांनी ऋद्धि-सिद्धि विनायकाची हुबेहूब छोटी प्रतिकृती तयार केली आहे व ती भक्तांच्या पूजनासाठी सभागृहाच्या कोनाड्यात विराजमान केली आहे.
मुंबईहून ऋद्धी सिद्धी विनायकाच्या देवळात येण्यासाठी भाऊचा धक्का ते मोरा बंदर असा ४५ मिनीटांचा लाँचचा प्रवास करून मोरा बंदर गाठता येते. मोरा बंदरावर रिक्शांची सोय आहे रिक्शांतून विनायक गावात जाता येते तसेच दादर व वाशी वरून थेट उरण बसेस ची सुविधा आहे. एस.टि. स्टँड वरून रिक्शाने ऋद्धि सिद्धि देवळाची वाट धरता येते. सध्या ट्रेनचे कामही चालू आहे. अंदाजे दोन वर्षात भाविकांना ट्रेनचा लाभ घेता येणार आहे.
तर अशा आमच्या या उरणच्या ऋद्धि सिद्धि विनायकाला प्रार्थना की त्याच्या सगळ्या भक्तांच्या मनोकामना पूर्ण होऊन सगळ्यांना सद्बुद्धी दे व सुख समाधान लाभूदे.
हा लेख. ३१ आॅगस्ट २०१९ रोजीच्या लोकसत्ता वास्तुरंग पुरवणीत प्रकाशित झालेला आहे.

सौ. प्राजक्ता पराग म्हात्रे, उरण.


सोमवार, १५ जुलै, २०१९

ठिणगी ठिणगीचे लोहारकाम




"ऐरणीच्या देवा तुला ठिणगी ठिणगी वाहू दे,
आभाळागत माया तुझी आम्हावरी राहूदे"

ह्या लोकप्रिय गाण्याची आर्तता मला खर्‍या अर्थाने कळली ती उरणमधील लोहार दादांची भेट घेतल्यावरच. माझ्या ऑफिसला जाण्याच्या वाटेवरच मला बरेचदा हे लोहार काम दृष्टीस पाडायचा त्यामुळे ह्या कलेबद्दल जाणून घेण्यासाठी एक दिवस माझ्या पतीसोबत  मी उत्सुकतेपोटी लोहार परिवाराची भेट घेतली.



उरण - कोटनाका च्या रस्त्याला लागून एक झोपडी वजा घर व त्या झोपडीच्या समोरच तुळशी वृंदावना प्रमाणे लोहार कुटुंबाचा ऐरण दैवत कुटुंबाला पोसत आहे. घिसाडी जात असलेले श्री प्रकाश रामभाऊ सोळंकी आणि सौ. मिरा प्रकाश सोळंकी व त्यांची तीन मुले अस हे कुटुंब. लोहारकाम हा ह्या कुटुंबाच्या उपजीविकेचा एकमेव व्यवसाय. पिढीजात लोहारकाम हा धंदा असल्याने जन्मापासूनच प्रकाश यांची लोहारकामाची ओळख. आपल्या मुळ गावी धंद्याला जोर नाही, उदरनिर्वाह होत नाही म्हणून परभरणीवरून ह्या कुटुंबाने उरण शहरात आपली उपजीविका चालविण्यासाठी बस्तान मांडलं इथे होणार्‍या रोजच्या मेहनतीवर हे कुटुंब आपल्या पोटा-पाण्याची व्यवस्था करत आहेत व एकीकडे मुलांना शिक्षणही देत आहेत.



तळपत्या ज्वाळेच्या सानिध्यात लोखंडाला आकार देण्याची, लोखंडाचे हत्यार बनविण्याची ही सहनशील कला. शक्ती व युक्तीच्या आधारावर लोहार आपली कला व आपला व्यवसाय जोपासत असतात. ऐरण, कोळसा, भाता, लोखंड आणि हत्यारे ह्यांच्या साहाय्याने लोहार हत्यारे बनवितात. लोहारकामासाठी अग्नी देवतेला प्रसन्नपणे ज्वलंत राहण्यासाठी जो भाता लागतो हा भाता चामड्याने व सागाच्या मजबूत फळ्यांनी बनविलेला असतो. भात्याची साखळी खाली-वर करत भात्याची फुंकर मिळालेले कोळसे लाल भडक होतात व आगीची ज्वाळा तृप्तपणे झळाळू लागते.


लोखंडी ऐरण म्हणजे भक्कम लोखंडाचा चौकोनी असा तुकडा. तो बसवण्यासाठी भक्कम असे लाकूड लागते. कारण जोरदार घाव ह्या ऐरणीला सोसण्यास तेवढाच भक्कम आधार हवा असतो. त्यासाठी बाभळीचे मजबूत लाकूड वापरले जाते.

जाळ करण्यासाठी आणलेले दगडी कोळसे हे मोठ्या आकारात बाजारात मिळतात. ते आणून वापरण्यासाठी त्याचेही तुकडे करावे लागतात. इथून सुरुवात होते घाव मारण्याची ती हत्यार किंवा वस्तू तयार होई पर्यंत.





लोहार लोखंड भंगारवाल्याकडून घेतात त्यांच्याकडे गाड्यांचे मिळणारे पाटे असतात त्यापासून कोयता, खरळ, विळी, मोठे सुरे बनवता येतात. इतर वस्तू जसे की पारई, कुर्‍हाड व शेतीची काही अवजारे बनविण्यासाठी लोहारदादा हे पनवेलवरून लोखंड विकत आणतात.
खरळ, कोयत्याला लागणार्‍या मुठी कर्जतच्या डोंगरातून आदिवासी लोकांकडून आणाव्या लागतात किंवा ते आदिवासी ह्यांच्याकडे विकायला येतात. ह्या मुठीही कडक हव्या असतात त्यासाठी पेरू, करंज अशा झाडांच्या फांद्या मिळाव्या लागतात. मुठीसाठी लाकडे तासून तासून ती कोयत्या, खरळात बसवावी लागतात.




शस्त्राच्या साहाय्याने हव्या त्या आकारात घाव घालून लोहार लोखंडाचे तुकडे करतात. ह्या लोखंडाला भात्याच्या साहाय्याने कोळशाची ज्वाळा बनवून त्यावर तापवून हवा तो आकार दिला जातो. हा आकार लोखंड नुसते तापवून येत नाही तर ऐरणीवर ते तुकडे ठेवून पूर्ण ताकद लावून ते ठोकून ठोकून त्याला हत्याराचा आकार द्यावा लागतो. शेवटी कानसने धारही करावी लागते. 





हे करत असताना आगीची धग सोसावी लागते, धुराचा कोंडमाराही सहन करावा लागतो. अनेकदा ठिणग्या उडून अंगावर येतात. भाजल्या जागी फोड येतात. कपड्यांना भोके पडतात. उन्हाळा असेल तर झळा जास्तच लागून अंगाची आग आग होते. घावावर घाव घाव घालण्याने खूप अंगमेहनत होते ती तर वेगळीच. घाव चुकले की ते हाता पायावर बसून अपघात घडतात. हे काम संध्याकाळी सहा पर्यंतच करावे लागते. कारण त्यानंतर अंधारात नीट काम करता येत नाही व झोपडीत लाइटही मर्यादितच असते. दिवस भर काम करून दिवसाचे साधारण पाचशे रुपये सुटतात. त्यातच ह्या लोहार कुटुंबांना आपला दाणापाणी, मुलांच्या शाळेचा खर्च भागवावा लागतो. त्यातच मध्येच येणार्‍या आजारांवर दवापाणी आणावे लागले तर मुष्किल त्यामुळे हे लोहार दादा आजारीपणातही काम करतात.

सर्व हत्यारांची व ऐरणीची दसर्‍याला मनोभावे पूजा करतात लोहार कुटुंब. पण ह्या दिवशीही ते काम बंद ठेवत नाहीत कारण सवाल कुटुंबाच्या पोटापाण्याचा असतो.



लोहारदादांच्या अर्धांगिनी गावोगावी जाऊन हत्यारे विकून आपल्या संसाराला हातभार लावतात. जागेवरही लोक हत्यारे बनवून नेतात वा ऑर्डर देतात. 



पण पूर्वीसारखी आता शेती न राहिल्याने फार कमी मागणी असते. शिवाय खाड्या, समुद्रात पडलेल्या भरावांमुळे मासेमारीही आटोक्यात आली आहे. परिणामी कोयता, काती सारख्या हत्यारांची मागणीही कमी झाली आहे. तरी उरणमध्ये काही प्रमाणात असलेल्या शेतीमुळे आणि करंजा, मोरा बंदरांवर चालणार्‍या मासेमारीच्या व्यवसायामुळे लोहारकाम उरण शहरात टिकून आहे. जे आहे त्यात लोहार कुटुंब सध्या समाधानात आहे. जे मिळत त्यात त्यांची निदान उपासमार होत नाही इतकंच काय ते समाधान. मुलांनी आपल्या सारख्या खस्ता खाऊ नये, शिकून चांगल्या नोकर्‍या किंवा व्यवसाय करावा म्हणून हे पालक आपल्या मुलांना ह्या कामासाठी सक्ती करत नाहीत. तसेच मुलांनाही ह्या खडतर कामाची ओढ राहिली नाही. मधून मधून थोडीफार अडचणीच्यावेळी ते मदत करतात. त्यामुळे ही लोहार कामाची कला वा व्यवसाय पुढे किती पिढ्या टिकेल ह्या बाबत शंकाच निर्माण होते. ही कला टिकून राहण्यासाठी सरकार तर्फे पाउले उचलली गेली पाहिजेत. आधुनिकीकरण लोहारकामातही आणलं पाहिजे जेणेकरून लोहार कामातील भाजण्याचे अपघात, अतोनात लागणारी शक्ती व वेळ कमी लागून नवीन पिढीलाही ह्या कामात गोडी निर्माण होईल व ही कला टिकून राहील.
सौ. प्राजक्ता पराग म्हात्रे, उरण 
लोकप्रभा १९ जुलै २०१९ अंकात प्रकाशीत.


























शुक्रवार, १० मे, २०१९

उन्हाळी आनंद




उन्हाळ्याचे स्वागत आपण काय हा उन्हाळा, कधी निघून जातील हे गर्मीचे दिवस असे बहुतांश मंडळी करत असतो. घरातला उकाडा आणि बाहेरचे उन्हाचे चटके अगदी नकोसे वाटतात. पण ह्या उकाड्या आणि चटक्यांची दाहकता दुर्लक्षित करायला काही आनंददायी बाबींमुळे सुसह्य होतो. चैत्रातली चैत्रपालवीचे दर्शन घेताना भर उन्हातही डोळे रंगीबेरंगी फुलोऱ्यात अजूनही शांत होतात. निसर्गातील पळस, पांगारा, बहावा, गिरिपुष्प, सोनमोहोर, पिंपळाची कोवळी तांबूस पालवी रस्त्यात फुललेली दिसली की मन कस प्रसन्न होत.


उन्हाळा म्हणजे शाळांना सुट्टी हे समीकरण तर ठरलेलेच आहे. त्यामुळे उन्हाळ्याच्या सुट्टीत गड, किल्ले वा इतर निसर्गरम्य ठिकाणांच्या भेटीचे बेत ठरले जातात. शिवाय गावा ठिकाणी कैऱ्या, चिंचा, आंबा, फणस, करवंद, जांभळं, रांजण अशा रानमेव्याची ह्याच दिवसात रसाळ मेजवानी मिळते. उन्हाळा म्हणजे ओल्या काजूची उसळ, आंबेडाळ आणि फणसाची फणसाची रुचकर भाजी. ह्याच रखरखीत उन्हाच्या दिवसांत पन्हं, कोकम सरबतासारखी गारेगार सरबत आपला जीव थंड करतात.

अजूनही ब-याच घरातल्या गृहिणीसाठी उन्हाळा म्हणजे घरातील बेगीमीचे पदार्थ बनवण्याची आनंददायी लगबगच. जिकडे तिकडे पापड, लोणची, मुरंबे, शेवया, कुरडया, फेण्या, मसाला, सांडगी मिरच्यांसारख्या पदार्थांची रेलचेल चालू असते.


उन्हाळ्यात आठवतात बालपणीचे मनाला स्पर्शणारे क्षण. विहीर, नद्यांतले मनसोक्त डुंबणे (आता त्याची जागा रिसॉर्टने, स्विमिंग पुलने घेतली आहे), आजी-आजोबांनी सांगितलेल्या परिकथा, भुतांच्या उत्सुकता वाढवणार्‍या थरार गोष्टी, झाडांवर चढणे, झाडांवर दौऱ्याने बांधलेल्या झोपाळ्यावरचे उंच झोके, गोट्या, विठीदांडू सारखे मैदानी खेळ, कवड्या, सापशिडी, नवा व्यापार सारखे घरगुती खेळ, समुद्रकिनारी केलेला खेकड्यांच्या पिलांचा पाठलाग. रेतीत बांधलेले किल्ले, रेतीत काढलेली नावांची अक्षरे, झाडाच्या सावलीत खेळलेली भातुकली, टिंग टिंग बेल वाजली की रस्त्यावर धावत जाऊन रंगीबेरंगी बर्फाच्या गोळ्याचा रस्त्यातच घेतलेला रसाळ आस्वाद.


उन्हाळा म्हणजे सुरंगीच्या गजऱ्याचा सुगंध, मोगऱ्याचा मनमोहक घमघमाट, बहाव्याची पिवळी धम्मक झुंबरे, चैत्र पाढव्याची उंच नटलेली गुढी, लग्नसमारंभांची शान, कोकिळेचे गाणं, कुटुंबाचा, मैत्रीचा प्रेमळ सहवास.

उन्हाळ्याचे उबदार दिवस संपुष्टात येऊ लागले की चालू होते घरांची डागडुजी, शेतीच्या पिकांची पूर्वतयारी, आणि पावसाच्या आगमनाची प्रतीक्षा. असे हे उन्हाळ्याचे दिवस संपत आले की एक दिवस पावसाच्या सरी तापलेल्या धरणीला मिळतात आणि मातीच्या मन धुंद करणारा सुगंध देऊन निरोप घेतात.


पण हे दिवस आता हरवत चालले आहेत. मोबाईल आणि फास्टफुडने जग जिंकले आहे. काळाबरोबर अवश्य चालले पाहिजे पण आपले हे जुने संस्कार आपल्या मुलांच्या व आपल्याही मनाला चैतन्य देतात व ह्या सगळ्या गोष्टी आपल्या पुढच्या पिढीला फक्त वाचनात अनुभवायला न मिळता प्रत्यक्ष अनुभवून त्याचा लाभ घेता यावा यासाठी आपण जागरूक राहिले पाहीजे नाही का?


दिस आलन ग उन्हाचं
करा धांदल ग बायानू
मला पीठ पापराचा
घाला सडा फेन्या - कुरड्यांचा


धग पेटलीया निसर्गाची
तिला आंगणान झेला
सांडग, कोकम नी मसाल्यांची
साठवण गे वरीसभराला


भरकलाय गे सूर्यदेव
त्यास्नी बली जवल्याचा देसा
वाकट्या, बोंगिल नी बांगर
चला बिगि बिगि वालवा.


उन्हानं झालया करपाया
पर मनानं सावलीची माया
अजुन -हा प्रसन्न रे सुर्यदेवा
माजे गोतावल्याची भूक भागाया.


दिस लाख मोलाचं उन्हाचं
ओव-याची माजे भरभराट
तुजे उपकार रे सुर्यदेवा
माजा तुला साष्टांग नमस्कार.

सौ. प्राजक्ता पराग  म्हात्रे


गोतावल्याची - कुटुंबाची
ओव-याची - स्वयंपाकघराची

महाराष्ट्र दिनमान वर्तमान पात्रात ८ मी २०१९ रोजी प्रकाशित.