गुरुवार, २९ मार्च, २०१८

बुलबुल जन्मोत्सव

आम्ही राहत असलेल्या उरण येथील आमच्या घराच्या भवताली अनेक पक्षी येतात त्यापैकी आमच्याशी ज्यांनी घरोबा केला आहे असे पक्षी म्हणजे बुलबुल. डोक्यावर तुरा, तपकीरी रंग आणि कल्ल्याला असलेला लाल-केशरी रंग अशी सुंदर रूप घेतलेल्या पक्षाचे रूप शिपायाच्या पोशाखाशी मिळते जुळते असल्याने ह्याला शिपाई बुलबुल असे म्हणतात. अजून लालबुड्या बुलबुलाची जातही असते पण ते पक्षी झाडांवर रमलेले असतात.
सौ. शिपाई बुलबुलाला डोहाळे लागले की त्यांचे पंख आमच्या घराकडे फडफडतात. ह्यांचा गळा अगदी गोड असतो. गोड किलबिलाट ऐकायला आला की समजायचे आता आपल्या झुंबरात घरटं तयार होऊन त्यात नाजूक बुलबुलाट गुंजणार. वर्षातून तीन वेळा तरी आमच्या हॉलमधील झुंबरावर किंवा आमच्या एकत्र कुटुंब पद्धत असलेल्या घरातील दीर-जाऊंच्या हॉलमधील झुंबरात आलटून पालटून ही बाळंतपणे होत असतात. काही महिन्यांपूर्वी अशीच ह्यांची गोड चाहूल आमच्या झुंबरावर लागली आणि म्हटलं चला आता आपल्यालाही सज्ज व्हावं लागेल. ह्यांच्या बाळंतपणाची काळजी आम्हालाही आमच्या परीने घ्यावी लागते ती म्हणजे बुलबुलांना फॅनला धडकून दुखापत होऊ नये म्हणून हॉलमधला खिडकीजवळ असलेला फॅन बंद ठेवणं कारण बुलबुलांच जोडपं भलं मोठं दार उघड असलं तरी त्यांना प्रवेशासाठी खिडकीच आपलीशी वाटते त्यामुळे ही खिडकीही दिवसा उघडी राहील ह्याची खबरदारी आम्हाला घ्यावी लागते. झुंबराचे दिवे बंद ठेवावे लागतात.
१)
२)
ह्यांचा एक दिवस झुंबरात नक्की कुठल्या ठिकाणी घरटं करायचं हे ठरविण्यात जातं. ते ठरलं की मग घरट्याच्या सामानाची जमवाजमव हे जोडपं करू लागत. सुरुवातीला वाळलेली पाने, कापूस असा बेस आणतात चोचीतून. मग गवताच्या पात्या काड्या अस काय काय सामान आणलं जात व चोचीने घरटं बांधलं जातं. हे घरटं होई पर्यंत हॉलमध्ये झुंबराखाली त्यांच्या चोचीतून सटकलेली पाने आणि गवताच्या पात्या-काड्यांचा पसारा दिसू लागतो. त्यांची घरटे विणण्याची कला पाहून त्यांचे करावे तेवढे कौतुक थोडे अस वाटतं. ह्याचं घरटं गोल वाटीसारखं असतं ते गोल करण्यासाठी बुलबुल काड्या विणता विणता मध्यभागी बसून पंख फुलवून फडफडवतो व ते घरटं गोल करतो. घरटं विणून झालं की मादी बुलबुल घरट्यात तळ ठोकून बसते.ती शांत बसलेली असते तर बुलबुलोबा मधून मधून घिरट्या घालत असतो.
३)
पण ह्या वेळी काय झालं आमच्या झुंबरावर मेहनतीने दोघांनी घरकुल बांधलं आणि आमच्या सफाई कामगाराने साफसफाई करताना थोडं घरटं हाललं. बुलबुल प्रकरण भारी सोवळ्याचं, त्यांनी लगेच ते घरटं नापसंत केलं आणि यायचे बंद झाले. आम्हा सगळ्यांनाच खूप वाईट वाटलं. बिचार्‍यांनी एवढ्या मेहनतीने स्वप्ने उराशी बाळगून ते घर बांधलं असेल आणि जराशाने बिघडवला. त्यांना कदाचित धोका वाटला असेल. पण दुसर्‍या दिवशी पुन्हा बुलबुलांचा गोड गळा दीर-जाऊंच्या हॉल मध्ये कुजबुजू लागला. ह्या हॉलमध्ये गजानन महाराजांच्या तसबिरीच्या छत्रछायेत, दिव्याच्या आधाराने घरटे बनवायला सुरुवात केली. लवकरच घरटं बांधून बुलबुलाने अंडी घालून त्यातून दोन बाळ बुलबुलांचा जन्म झाला आणि घर बुलबुलाटात गजबजून गेलं.
४)
नेहमीच बुलबुलांच्या जन्मानंतर नर आणि मादी बुलबुलांचे हावभाव बदललेले दिसतात. त्यांच्या चेहर्‍यावर चिंता, धावपळ आणि आनंदाचा कल्लोळ दिसतो. अगदी पाच पाच मिनिटांनी दोघेही आलटून पालटून खिडकीतून बाहेर जातात आणि पिलांसाठी चोचीत किडे, कसलीतरी छोटीशी फळे, मांस अस बरंच काही घेऊन येतात. हे चोचीतून चोचीत भरवत असताना पिले माना उंच करतात तेव्हा त्यांचे तेवढे मानेचे दर्शन होते. पण हे दृश्य पाहणे फार सुखकारक असते. माता-पिता-पिलांच्या ममतेचा झरा वाहत असतो घरट्यात.
५)
६)
रात्री सौ.बुलबुल आपल्या पिलांना पंखांच्या उबेत घेऊन बसते मग मध्येच बाळांना भूक लागल्यावर घरात फिरते काही पाखरू वगैरेचा खाऊ आपल्या पिलांसाठी मिळतोय का ते पाहायला. अशा वेळी आम्हालाही खूप सावध राहावे लागते. सगळे फॅन आवर्जून बंद ठेवावे लागतात. अस वाटत आपलं खाद्य ह्या बाळांना खाता येत असतं तर घरट्यात दूध, ग्राइप वॉटर, बाळघुटी अस काय काय ठेवता आलं असत आणि बाळंतिणीसाठी मेथीचे लाडू, खोबरं-मिर्‍याची चटणी, खजूर देऊन तिच बाळंतपण साजरा केलं असत. पण त्यांच्या खाण्यापिण्यात आपण ढवळाढवळ करायची काही सोयच नाही आणि ते स्वतः त्यासाठी समर्थ असतात.
७)
८)
९)
१०)
सात आठ दिवसांत बाळे बाळसं धरतात. त्यांना पंख फुटतात आणि त्यांची धडपड चालू होते मोकळ्या निसर्गात भरारी घेण्याची. माता पित्याच अनुकरण काय किंवा माता पिता आपल्या पिलांना उडायला शिकवतात हे पाहणं फार रोमांचकारी असत. माता पिता बुलबुल बाळांसमोर किंवा उभे राहून स्वतःचे पंख फडफडवून दाखवतात, उडून दाखवतात. त्यांचं अनुकरण पिले करतात. हे करत असताना खालीही पडतात पण भरारी घेण्याच्या ओढीने परत प्रयत्न करून उडत इकडे-तिकडे त्यांना दिशा दिसेल तिथे हॉलभर फिरतात, घरातील वस्तूंवर बसतात. मग माता-पिता बुलबुल त्यांना खिडकीतून आपल्या निसर्गातील झाडा-झुडुपांतल्या गोकुळाची ओळख करून देतात व त्या दिशेने उडण्याची शिकवण देतात त्यांनुसार आपले घरटे कायमचे रिकामे करून ते कुटुंब आपल्या मुक्त विश्वात भुर्रर्र उडून जातात. काही दिवस आम्हाला सुनं-सुनं वाटतं मग रिकामं घरटं आम्ही एखाद्या झाडावर ठेवून देतो एखाद्या बुलबुलाला परत उपयोगी पडलं तर, त्यांना पुन्हा मेहनत नको करायला अशी स्वतःची समजूत काढून. पण बुलबुल स्वकष्टाने आपल्या आवडी-सोयी नुसारच दुसरी घरटी बांधतात इतका त्यांच्यामध्ये जन्मजात असणारा स्वावलंबीपणा व शिस्त पाहून मनातून त्यांना दंडवत घालावासा वाटतो.
वरील लेख  दिनांक २४ मार्च २०१८ च्या लोकसत्ता वास्तुरंग पुरवणीमध्ये प्रकाशित झालेला आहे. 

1 टिप्पणी: