बुधवार, १७ ऑगस्ट, २०१६

रानफुलांच्या वाटेवर

वर्षा ऋतू जीवनधारांचे सिंचन करत येतो आणि मातीच्या गर्भात असणार्‍या प्रत्येक बीज, कंदांना नवजीवनाचे अंकूर देतो. पावसाचे आगमन हळू हळू डोंगर, रानवाटा हिरव्यागार करत जातात. जून जुलै मध्ये रानावनातील कोवळी हिरवळ बाळसं घेत असते. साधारण ऑगस्ट पासून ह्या हिरवळीवर विविध रंगात हसरी फुले गवत, झुडपे, वेलींवर झुलताना दिसतात. ऑगस्ट आणि सप्टेंबर हे दोन महिने म्हणजे रानफुलांच्या बहराचे.
महाराष्ट्रात रानफुलांसाठी प्रसिद्ध असलेले कासचे पठारही आता फुलू लागेल. सीतेची आसव, कारवी, मुसळी, कंदील सारखी अनोखी रानफुले ह्या पठारावर असंख्य प्रमाणावर बहरतात.
केवळ कासचे पठारच नाही तर सगळ्याच राना-वनात, डोंगर-दर्‍यांत, अगदी शहरातील रस्त्यांच्या कडेलाही जिथे मातीचा संपर्क आहे तिथे आता विविध रंगी रानफुले फुलू लागतील. रानात, ओसाड जागी आता कुर्डूचे गुलाबी तुरे मुकुटाप्रमाणे दिमाखात मिरवताना दिसतील, कवळ्यांची पिटुकली हळदी रंगातली फुले तर पिवळ्या रंगाचा गालिचाच तयार करून ठेवतील, बहुरंगी तेरडा पावसाळलेल मन प्रसन्न करेल, केनची पांढरी तुतेरी सारखी फुले आपल्या शुभ्र धवल रंगांनी नेत्रसुख देतील, कुठे कुठे रानहळ्दीचे तुरे तर कुठे कळलावीची लाल-पिवळी हळद-कुंकवासारखी फुले, मध्येच कुठेतरी पांढर्‍या, निळ्या गोकर्णाचे वेल बहरलेले दिसतात तर कुठे रानतीळाच्या फुलांना बहर आलेला दिसतो तर हिरव्या रंगातील लव्यांचे तुरे डुलताना दिसतात. ही तर सगळी सहज पाहता येणारी फुले पण इतरही असंख्य सूक्ष्म सुंदर फुले निरखून पाहता दर्शन देतात. फुलांसोबत गवताचा एक मंद सुगंधही दरवळत असतो. श्रावणातील ऊन-पावसाचा खेळ, इंद्रधनुष्याचे कमान आणि ही रानफुले हा एक सुखद देखावा असतो.
ह्या दिवसात फक्त जमिनीवरच नाही तर पावसाळी डबक्यात, नाल्यांमध्ये, तलावांमध्येही फुललेली दिसतात. सफेद गेंद, कमळासारखी दिसणारी वॉटर लिली, तसेच इतरही काही पाणवनस्पती फुललेल्या दिसतात.
ह्या रानफुलांच्या वृक्ष-वेलींचे आपल्या मराठमोळ्या सणांमध्येही महत्त्व असते. नागपंचमीत कळलावी व इतर काही वेली नागोबाला वाहण्यात येतात. काही ठिकाणी तेरडा, कळलावी, लवे ह्यांच्या पासून पिठवरी, गौरी बसविल्या जातात. नवरात्रा मध्ये गावांमध्ये रानटी घोसाळ्याची पिवळी फुले, रानभेंड्यांची व इतर काही फुलांच्या माळी चढविल्या जातात.
चला तर आता ह्या रानफुलांचे दिवस आले आहेत. ह्या रानफुलांच्या रानवाटेवर फेरफटका मारून आपले मन ह्या फुलांच्या दर्शनाने प्रसन्न करा. दूर गावी शक्य नसले तरी नजीकच्या ओसाड जागांवर आजू-बाजूला, एखाद्या कोपर्‍यात कुठे ना कुठे ह्या रानफुलांना न्याहाळून ह्यांनाही आपल्याकडे कोणी पाहते ह्याचे समाधान द्या. फक्त त्याची नासधूस होऊ नये ह्याची काळजी घ्या.
काही रानफुलांचे फोटो माझ्या ह्या ब्लॉग वर पाहता येतील .www.ranfulanchyaranvatevar@blogspot.com
दिनांक २१ ऑगस्ट 2015 च्या  महाराष्ट्र टाइम्स मधील मुंबई पुरवणी मध्ये प्रकाशीत.

सोमवार, १५ ऑगस्ट, २०१६

उंच उंच झोका

झुला, झोपाळा, पाळणा प्रत्येकानेच अनुभवलेला असतो. सुगंधी, रंगीबिरंगी हारा-फुलांनी सजून, फिरत्या भिंगरीच्या खेळण्याच्या गमतीत, ठरलेले नाव फुला-रांगोळ्यांसह गुपित सांभाळत, कुणी राम घ्या, कुणी लक्ष्मण घ्या च्या सुरेल लयीत, बाळाचे नाव पाळण्याच्या कुशीत, पाळण्याच्या साक्षीने बाळाच्या कानात ऐकवून प्रचलित केले जाते. पाळणा गीताच्या सुरांवर बाळाच्या उंच झोक्यांची सुरुवात इथूनच होते. अशा प्रकारे अगदी बालपणापासूनच पाळण्याची संगत प्रत्येकालाच लाभलेली असते.
वेगवेगळ्या प्रकारचे पाळणे पाहण्यात येतात. लहान बाळाचा झोपायचा पाळणा, घरात टांगण्यात आलेला खुर्चीचा पाळणा, गार्डनमधील लोखंडी बैठक व साखळीचे पाळणे, बाकड्याचे पाळणे, घरात किंवा ओटीवर लावले जाणारे वेताचे पाळणे, दोन झाडांचा आधार घेऊन बांधलेले जाळीचे झोपायचे पाळणे, घरात झोपण्यासाठीही वापरले जाणारे फळीपासून केलेले मोठे झोपाळे.

लहानपणी आमच्या उरणच्या वाडीत घराच्या बाजूलाच चिंचेचे मोठे पसरलेले, उंच झाड होते. त्या झाडाला मोठा दोर आणून त्या दोराच्या मध्ये चादरीची खोलगट बैठक करून त्यात बसून हिरव्या सावलीतले उंच उंच झोके अजूनही मनाच्या कोपर्‍यात झोके घेतात. एका आंब्याच्या झाडाची फांदी खालूनच पुढे सरळ आडवी वाढली होती. ती इतकी खाली होती की त्यावर बसले की पाय खाली टेकता यायचे. चांगली जाडजूड व मजबूत असल्याने मी त्यावर बसून मागे-पुढे, वर खाली झोके घ्यायचे. हा अगदी नैसर्गिक व नित्यनियमाचा पाळणा होता.

सार्वजनिक बागेतल्या पाळण्यासाठी नंबर लावावा लागे (अजूनही बागेत लहानमुलांची तिच परिस्थिती आहे). बागेत गेलं की कोणीतरी बसलेलं उठेल व पाळणा आपल्याला मिळेल हे प्रतीक्षेचे क्षण तेव्हा लांबलचक वाटायचे. एकदा का पाळण्यावर बसलेला मुलगा किंवा मुलगी उतरली की आपल्या नंबर आपलाच असूनही कोणी मध्ये येऊ नये म्हणून धडपडतच पाळणा पकडला जायचा. बरोबर असलेल्या मैत्रिणीबरोबरही हा पाळणा शेयर करावा लागायचा तेव्हा झोके आकड्यात मोजून आकड्यांवर झोक्यांचं विभाजन वह्यांचं. पाठून कोणी झोका देणार असेल तर उंच जावा म्हणून अजून जोरात अजून जोरात करत आकाशाला भिडण्याचा मोह व्हायचा. कोणी नसेल तर स्वतःच पाय टेकून उंच झोके घेतले जायचे. बागेतले पाळणे बर्‍याचदा इकडून मोडलेले, तिकडे भोक पडलेले असे असायचे पण त्याची तेव्हा पर्वा नसायची.

सासरी उरण-कुंभारवाड्यात आमच्या घरी तीन पाळणे आहेत. एक ओटीवरचा फळीचा ओटीच्या रुंदीला मावेल असा पाळणा त्यावर आम्ही निवांतपणी बसतो. एक बागेतील फळीचा मोठा पाळणा. संध्याकाळी ह्या पाळण्यावर बसून निसर्ग अनुभवता येतो. ह्या पाळण्याची गंमत म्हणजे ह्या पाळण्याला पावसाळी सुट्टी असते. फळीचा असल्याने पाण्याने खराब होऊ नये म्हणून हा पाळणा काढून पडवीत ठेवण्यात येतो. पाऊस गेल्यावर पुन्हा जागेवर लावून त्याची रंगरंगोटी केली जाते. तिसरा म्हणजे पारावर दोरीने बांधलेला छोट्या मुलांसाठीचा पाळणा. ह्यावर घरातील बच्चे कंपनी गंमत जंमत करत असते.

पाळणे अनेक प्रकारचे असतात. लहान मुलांचा बागडता पाळणा, एखाद्या प्रेक्षणीय स्थळी असलेला विश्रांतीसाठीचा निवांत पाळणा, डोहाळे जेवणासाठी सजवलेला मातृत्वाच्या झोक्यांचा पाळणा, वृद्ध आपल्या सहचार्‍यांसोबत हलकेच झोके घेत असलेला नम्र पाळणा, देवळात रामजन्म, कृष्णजन्माचे सजवलेले पाळणेही किती प्रसन्न वाटतात. कितीतरी प्रकार असतील पाळण्याचे. पाळण्याचे झोके हे लहानपणीच नाही तर आयुष्यभर साथ देतात. जीवन म्हणजे एक प्रकारचा पाळणाच आहे. सुख-दु:ख, यश-अपयश अशा बाबींचे झोके उंच खाली होत असताना पाळण्याचा दोर घट्ट धरून ठेवायचा असतो ह्या सत्याची पाळणा आपल्याला शिकवण देत असतो.
(शनीवार दिनांक १३ ऑगस्ट २०१६ च्या लोकसत्ता वास्तुरंग पुरवणीत प्रकाशीत)

x