सोमवार, १४ डिसेंबर, २०२०

दत्तूभाऊ

श्री दत्तात्रेय गंगाराम ठाकुर एक गोड गळ्याच हसतमुख व्यक्तिमत्त्व. लहानपणापासून दत्तू हे त्यांचं नाव सर्वश्रुत झाल्याने आमचे ते दत्तूभाऊ. निर्मलाताई ही माझ्या मावशीची मुलगी. माझा जन्मही झाला नव्हता तेव्हापासून आईने तिला आमच्याच घरी सोबत म्हणून आणली तेव्हापासून जणू ती सख्खीच झाली आमच्यासाठी. स्वभावाने ती अतिशय हळवी, सुस्वभावी व मदतीला तत्पर अशीच. आमच्या घरातही माझे आई वडील शांत, सुस्वभावी, मायाळू असल्याने ती आमच्या घरात मुलीप्रमाणेच रुळली, माझ्या भावावरही ती बहिणीची माया पेरत असे. माझ्या आजीनेही तिला आपलेसे केले.  नंतर माझा जन्म झाल्यावर मलाही तिने काही दिवस सांभाळले. कालांतराने ती लग्नाच्या वयात येताच माझ्या आई वडिलांनीच आमच्याच गावातील सुस्वभावी, नोकरदार, स्थिरस्थावर मुलगा   पाहून निर्मला ताईचे लग्न कु.दत्तात्रेय गं. ठाकुर यांच्याबरोबर लावून दिले आणि तेव्हापासून ते आमचे दत्तूभाऊ झाले. दोघांचे स्वभाव सारखेच. सदा हसतमुख, कधी कुणाला दुखावणार नाही की आवाज वर करून बोलणं नाही. दोघांची जोडी म्हणजे लक्ष्मी-नारायणाचा जोडा. दत्तूभाऊंचे कुटुंब  हे नागांव मांडळ आळीतील आंबाड्याखाली राहत होते. त्यांना पाच बहिणी व हे एकटेच पुत्ररत्न अगदी रत्नासारखेच. उरणमधील स्काॅल ब्रेवरीज या नामांकित कंपनीत ते कर्मचारी होते. निर्मलाताईच लग्न झालं तेव्हा घरात दत्तूभाउंचे आई वडील व एक लग्नाची बहीण राहत होती. दत्तूभाऊ व निर्मलाताई यांना नंतर तीन अपत्ये एका मागोमाग एक झाली. मुलीची हौस असूनही मुलगी काही झाली नाही. मोठा मुलगा विनोद, दुसरा विरेंद्र व तिसरा विनेश. घराच आता गोकूळच झालं होत. माझं लहानपणही तिथेच खेळण्यात गेलं. आई शाळेत गेली, आजी आजारी किंवा कुठे गेलेली असली की शाळेत जाताना केस बांधण्यासाठी माझी धाव निर्मलाताईकडे. ती अगदी प्रेमाने माझ्या दोन वेण्या घालायची व बोलायची मला मुलगी नाही पण तुझे केस बांधताना हौस पुरी होते बोलत कोड कौतुक करायची. अस आमचं मावस असलं तरी मनाने सख्खं नात. 

कधीही निर्मलाताईकडे गेलो आणि दत्तूभाऊ घरात असले की नेहमी प्रसन्न, हसरे व विनोदी वातावरण निर्माण झालेले असे. अगदी छोट्या छोट्या गोष्टीतही साधेसे विनोद करून दुस-यांना आनंद देणे ही कलाही त्यांना अवगत होती. 

दत्तूभाऊ हे उत्तम समाज सेवकही होते. स्काॅल ब्रेव्हरीज उरण या  कंपनीत ३० वर्षे आपली सेवा दिली व सेवानिवृत्त झाले. कुठल्याही गावकीच्या कार्यक्रमात सूत्रसंचालन करणे, गायन, भजनाचे कार्यक्रम करणे, निवडणुकीच्या काळात आपल्या पक्षाच्या मागे ठाम उभे राहणे आणि तेव्हा पक्षाला वाहून घेणे हे नेहमीचच होत त्यांचं. शिवाय गावातील लोकांच्या अडीअडचणीलाही धावून जायचे.   त्यांनी निर्मलाताईलाही आपल्या बरोबर समाज सेवेच्या कार्यात सहभागी केले व तिच्याकडूनही ग्रामसेवा व्हावी म्हणून तिला ग्रामपंचायतच्या निवडणुकीला उभी केली. आजही निर्मलाताई ग्राम सदस्या आहे. दत्तूभाऊ मासे पकडायलाही समुद्रावर जाळ टाकायला जायचे व एक एक माशाचे मस्त वर्णन करायचे व पकडलेले मासे अनेकदा भेट स्वरूपात आप्तांमध्ये वाटून समाधान पावायचे.

दत्तूभाऊंची मुलेही तशीच कलागुणसंपन्न आहेत. दत्तूभाउंच घर एकत्र कुटुंब पद्धतीत असून तिघे एकत्र राहतात हे दत्तूभाऊ व निर्मलाताई यांनी केलेल्या संस्कारांना मिळालेली मोठी दाद आहे.  मोठा मुलगा विनोद याचा आवाजही अतिशय गोड आहे. तो आ‌ॅर्केस्ट्रा मध्ये गावून कित्येकांची दाद मिळवतो. दोन नंबर विरेंद्र म्हणजे आमच्यासाठी बाळा याला क्रिकेट, पक्ष्यांची खूप आवड आहे. त्यांच्या घरात पोपट, कबुतरे, कोंबड्या, कुत्रा त्याने पाळले आहेत व हे सर्व त्याच्याशी उत्तम संवाद साधतात. मासेमारीचीही त्याला अत्यंत आवड आहे व त्यात तो कुशल आहे.  तिसरा मुलगा विनेश म्हणजे पपू हा उत्तम क्रिकेटर आहे. त्यांचा हाॅल पूर्ण बक्षिसांनी चमकून दिसतो. त्यांच्या तीन सुना अनुक्रमे विनया, मयुरी व शशांका या ही गुणी, सालस व आपापल्या जबाबदा-या उत्तम रितीने पेलत असल्याने दत्तुभाऊ व निर्मलाताईला फारच समाधान आहे. घरातील चार नातवंडांमुळे घराच गोकूळ झालं आहे. 

माझे वडील, भाऊ आणि दत्तूभाऊ यांचे फार जमायचे, लग्न झाल्यावर माझ्या मिस्टरांशीही त्यांची चांगली मैत्री झाली. अनेकदा कौटुंबिक गोष्टींचे शेयरींग करायचे. आपल्या कुटुंबाचा त्यांना नेहमी एक आदर्श कुटुंब म्हणून अभिमान होता व त्यांनी ते तसे जपलेही होते. निर्मलाताईबद्दल ते नेहमी कौतुकाने बोलत व मुलं आणि सुनाही खूप चांगल्या आहेत याचीही वारंवार वाच्यता करत. आता तर नातवंडांमध्येच ते कसे रमून जात होते याचेही वर्णन करत असायचे. 

आमचे वारंवार एकमेकांकडे जाणे येणे होत असे. माझे वडील ४ वर्षापूर्वी गेले तेव्हा त्यांनाही आधार गेल्यासारखा वाटला. माझ्या वडिलांनाही त्यांनी खूप चांगली सोबत दिली होती. अगदी त्यांच्या सोबत बोलवतील तिथे जायचे त्यांना घेऊन. माझ्या वडिलांच्या पुस्तक प्रकाशनाचा सोहळा माझ्या मिस्टरांनी आयोजित केला होता त्यात ते मदतीला अग्रेसर होते. माझ्या मिस्टरांशीही त्यांची खूप सलगी होती. त्यांच्या मनातील अनेक सुखदुःखाच्या गोष्टी  ते माझ्या मिस्टरांबरोबर शेयर करायचे. माझा भाऊ मनिष आणि त्यांची इतकी गहन दोस्ती होती की ते रोज एकमेकांना भेटल्याशिवाय राहायचे नाहीत. बहीण म्हणून निर्मलाताई आणि दत्तूभाऊ हे त्याचे जिव्हाळ्याचे घर आहे. माझ्यासाठी ते एक माहेरची जिव्हाळ्याची व्यक्ती होती. कधी जोड्याने माझ्याकडे शेतातील भाज्या घेऊन यायचे, माझ्या वडिलांसोबत सदिच्छा भेट घ्यायला यायचे , माझे वडील गेल्यावरही त्यांनी येणे सोडले नाही. निर्मलाताई नेहमी 

त्यांच्याकडे कधी करांद्यांचा, कधी भानवल्यांचा तर कधी कोंड्याच्या पेल्यांचा डबा घेऊन पाठवत असे. 

कुठेही पिकनिकला वगैरे जाताना आम्ही एकत्र असायचो.  अनेकदा निर्मलाताई कामानिमित्त नाही आली तरी दत्तूभाऊ मात्र आमच्यासोबत खुशीने यायचे,  दत्तूभाऊंचा खेळकर स्वभाव, गप्पागोष्टी, पिकनिकला गाण्यांची मैफिल याने पिकनिकमध्ये रंग भरायचा.

२८ आ‌ॅगस्ट २०२० हा मात्र आमच्या सगळ्यांसाठी काळा दिवस ठरला. दत्तूभाऊ कोरोनाच्या आजाराला बळी पडले आणि त्यांना वयाच्या ६६ व्या वर्षी देवाज्ञा झाली. त्यांच्या अचानक जाण्याने सर्वांवरच प्रचंड मानसिक आघात झाला. तो भरून निघायला काळच जावा लागेल. आठवणींतून दत्तूभाऊ कायम सोबत राहतील सगळ्यांच्या. अशा दत्तूभाऊंच्या आत्म्यास शांती लाभो. त्यांना आदरपूर्वक श्रद्धांजली.

सौ. प्राजक्ता पराग म्हात्रे, उरण

(अग्रसेन दिवाळीअंक २०२० मध्ये प्रकाशित)