सोमवार, १५ जुलै, २०१९

ठिणगी ठिणगीचे लोहारकाम




"ऐरणीच्या देवा तुला ठिणगी ठिणगी वाहू दे,
आभाळागत माया तुझी आम्हावरी राहूदे"

ह्या लोकप्रिय गाण्याची आर्तता मला खर्‍या अर्थाने कळली ती उरणमधील लोहार दादांची भेट घेतल्यावरच. माझ्या ऑफिसला जाण्याच्या वाटेवरच मला बरेचदा हे लोहार काम दृष्टीस पाडायचा त्यामुळे ह्या कलेबद्दल जाणून घेण्यासाठी एक दिवस माझ्या पतीसोबत  मी उत्सुकतेपोटी लोहार परिवाराची भेट घेतली.



उरण - कोटनाका च्या रस्त्याला लागून एक झोपडी वजा घर व त्या झोपडीच्या समोरच तुळशी वृंदावना प्रमाणे लोहार कुटुंबाचा ऐरण दैवत कुटुंबाला पोसत आहे. घिसाडी जात असलेले श्री प्रकाश रामभाऊ सोळंकी आणि सौ. मिरा प्रकाश सोळंकी व त्यांची तीन मुले अस हे कुटुंब. लोहारकाम हा ह्या कुटुंबाच्या उपजीविकेचा एकमेव व्यवसाय. पिढीजात लोहारकाम हा धंदा असल्याने जन्मापासूनच प्रकाश यांची लोहारकामाची ओळख. आपल्या मुळ गावी धंद्याला जोर नाही, उदरनिर्वाह होत नाही म्हणून परभरणीवरून ह्या कुटुंबाने उरण शहरात आपली उपजीविका चालविण्यासाठी बस्तान मांडलं इथे होणार्‍या रोजच्या मेहनतीवर हे कुटुंब आपल्या पोटा-पाण्याची व्यवस्था करत आहेत व एकीकडे मुलांना शिक्षणही देत आहेत.



तळपत्या ज्वाळेच्या सानिध्यात लोखंडाला आकार देण्याची, लोखंडाचे हत्यार बनविण्याची ही सहनशील कला. शक्ती व युक्तीच्या आधारावर लोहार आपली कला व आपला व्यवसाय जोपासत असतात. ऐरण, कोळसा, भाता, लोखंड आणि हत्यारे ह्यांच्या साहाय्याने लोहार हत्यारे बनवितात. लोहारकामासाठी अग्नी देवतेला प्रसन्नपणे ज्वलंत राहण्यासाठी जो भाता लागतो हा भाता चामड्याने व सागाच्या मजबूत फळ्यांनी बनविलेला असतो. भात्याची साखळी खाली-वर करत भात्याची फुंकर मिळालेले कोळसे लाल भडक होतात व आगीची ज्वाळा तृप्तपणे झळाळू लागते.


लोखंडी ऐरण म्हणजे भक्कम लोखंडाचा चौकोनी असा तुकडा. तो बसवण्यासाठी भक्कम असे लाकूड लागते. कारण जोरदार घाव ह्या ऐरणीला सोसण्यास तेवढाच भक्कम आधार हवा असतो. त्यासाठी बाभळीचे मजबूत लाकूड वापरले जाते.

जाळ करण्यासाठी आणलेले दगडी कोळसे हे मोठ्या आकारात बाजारात मिळतात. ते आणून वापरण्यासाठी त्याचेही तुकडे करावे लागतात. इथून सुरुवात होते घाव मारण्याची ती हत्यार किंवा वस्तू तयार होई पर्यंत.





लोहार लोखंड भंगारवाल्याकडून घेतात त्यांच्याकडे गाड्यांचे मिळणारे पाटे असतात त्यापासून कोयता, खरळ, विळी, मोठे सुरे बनवता येतात. इतर वस्तू जसे की पारई, कुर्‍हाड व शेतीची काही अवजारे बनविण्यासाठी लोहारदादा हे पनवेलवरून लोखंड विकत आणतात.
खरळ, कोयत्याला लागणार्‍या मुठी कर्जतच्या डोंगरातून आदिवासी लोकांकडून आणाव्या लागतात किंवा ते आदिवासी ह्यांच्याकडे विकायला येतात. ह्या मुठीही कडक हव्या असतात त्यासाठी पेरू, करंज अशा झाडांच्या फांद्या मिळाव्या लागतात. मुठीसाठी लाकडे तासून तासून ती कोयत्या, खरळात बसवावी लागतात.




शस्त्राच्या साहाय्याने हव्या त्या आकारात घाव घालून लोहार लोखंडाचे तुकडे करतात. ह्या लोखंडाला भात्याच्या साहाय्याने कोळशाची ज्वाळा बनवून त्यावर तापवून हवा तो आकार दिला जातो. हा आकार लोखंड नुसते तापवून येत नाही तर ऐरणीवर ते तुकडे ठेवून पूर्ण ताकद लावून ते ठोकून ठोकून त्याला हत्याराचा आकार द्यावा लागतो. शेवटी कानसने धारही करावी लागते. 





हे करत असताना आगीची धग सोसावी लागते, धुराचा कोंडमाराही सहन करावा लागतो. अनेकदा ठिणग्या उडून अंगावर येतात. भाजल्या जागी फोड येतात. कपड्यांना भोके पडतात. उन्हाळा असेल तर झळा जास्तच लागून अंगाची आग आग होते. घावावर घाव घाव घालण्याने खूप अंगमेहनत होते ती तर वेगळीच. घाव चुकले की ते हाता पायावर बसून अपघात घडतात. हे काम संध्याकाळी सहा पर्यंतच करावे लागते. कारण त्यानंतर अंधारात नीट काम करता येत नाही व झोपडीत लाइटही मर्यादितच असते. दिवस भर काम करून दिवसाचे साधारण पाचशे रुपये सुटतात. त्यातच ह्या लोहार कुटुंबांना आपला दाणापाणी, मुलांच्या शाळेचा खर्च भागवावा लागतो. त्यातच मध्येच येणार्‍या आजारांवर दवापाणी आणावे लागले तर मुष्किल त्यामुळे हे लोहार दादा आजारीपणातही काम करतात.

सर्व हत्यारांची व ऐरणीची दसर्‍याला मनोभावे पूजा करतात लोहार कुटुंब. पण ह्या दिवशीही ते काम बंद ठेवत नाहीत कारण सवाल कुटुंबाच्या पोटापाण्याचा असतो.



लोहारदादांच्या अर्धांगिनी गावोगावी जाऊन हत्यारे विकून आपल्या संसाराला हातभार लावतात. जागेवरही लोक हत्यारे बनवून नेतात वा ऑर्डर देतात. 



पण पूर्वीसारखी आता शेती न राहिल्याने फार कमी मागणी असते. शिवाय खाड्या, समुद्रात पडलेल्या भरावांमुळे मासेमारीही आटोक्यात आली आहे. परिणामी कोयता, काती सारख्या हत्यारांची मागणीही कमी झाली आहे. तरी उरणमध्ये काही प्रमाणात असलेल्या शेतीमुळे आणि करंजा, मोरा बंदरांवर चालणार्‍या मासेमारीच्या व्यवसायामुळे लोहारकाम उरण शहरात टिकून आहे. जे आहे त्यात लोहार कुटुंब सध्या समाधानात आहे. जे मिळत त्यात त्यांची निदान उपासमार होत नाही इतकंच काय ते समाधान. मुलांनी आपल्या सारख्या खस्ता खाऊ नये, शिकून चांगल्या नोकर्‍या किंवा व्यवसाय करावा म्हणून हे पालक आपल्या मुलांना ह्या कामासाठी सक्ती करत नाहीत. तसेच मुलांनाही ह्या खडतर कामाची ओढ राहिली नाही. मधून मधून थोडीफार अडचणीच्यावेळी ते मदत करतात. त्यामुळे ही लोहार कामाची कला वा व्यवसाय पुढे किती पिढ्या टिकेल ह्या बाबत शंकाच निर्माण होते. ही कला टिकून राहण्यासाठी सरकार तर्फे पाउले उचलली गेली पाहिजेत. आधुनिकीकरण लोहारकामातही आणलं पाहिजे जेणेकरून लोहार कामातील भाजण्याचे अपघात, अतोनात लागणारी शक्ती व वेळ कमी लागून नवीन पिढीलाही ह्या कामात गोडी निर्माण होईल व ही कला टिकून राहील.
सौ. प्राजक्ता पराग म्हात्रे, उरण 
लोकप्रभा १९ जुलै २०१९ अंकात प्रकाशीत.