शुक्रवार, १० मे, २०१९

उन्हाळी आनंद




उन्हाळ्याचे स्वागत आपण काय हा उन्हाळा, कधी निघून जातील हे गर्मीचे दिवस असे बहुतांश मंडळी करत असतो. घरातला उकाडा आणि बाहेरचे उन्हाचे चटके अगदी नकोसे वाटतात. पण ह्या उकाड्या आणि चटक्यांची दाहकता दुर्लक्षित करायला काही आनंददायी बाबींमुळे सुसह्य होतो. चैत्रातली चैत्रपालवीचे दर्शन घेताना भर उन्हातही डोळे रंगीबेरंगी फुलोऱ्यात अजूनही शांत होतात. निसर्गातील पळस, पांगारा, बहावा, गिरिपुष्प, सोनमोहोर, पिंपळाची कोवळी तांबूस पालवी रस्त्यात फुललेली दिसली की मन कस प्रसन्न होत.


उन्हाळा म्हणजे शाळांना सुट्टी हे समीकरण तर ठरलेलेच आहे. त्यामुळे उन्हाळ्याच्या सुट्टीत गड, किल्ले वा इतर निसर्गरम्य ठिकाणांच्या भेटीचे बेत ठरले जातात. शिवाय गावा ठिकाणी कैऱ्या, चिंचा, आंबा, फणस, करवंद, जांभळं, रांजण अशा रानमेव्याची ह्याच दिवसात रसाळ मेजवानी मिळते. उन्हाळा म्हणजे ओल्या काजूची उसळ, आंबेडाळ आणि फणसाची फणसाची रुचकर भाजी. ह्याच रखरखीत उन्हाच्या दिवसांत पन्हं, कोकम सरबतासारखी गारेगार सरबत आपला जीव थंड करतात.

अजूनही ब-याच घरातल्या गृहिणीसाठी उन्हाळा म्हणजे घरातील बेगीमीचे पदार्थ बनवण्याची आनंददायी लगबगच. जिकडे तिकडे पापड, लोणची, मुरंबे, शेवया, कुरडया, फेण्या, मसाला, सांडगी मिरच्यांसारख्या पदार्थांची रेलचेल चालू असते.


उन्हाळ्यात आठवतात बालपणीचे मनाला स्पर्शणारे क्षण. विहीर, नद्यांतले मनसोक्त डुंबणे (आता त्याची जागा रिसॉर्टने, स्विमिंग पुलने घेतली आहे), आजी-आजोबांनी सांगितलेल्या परिकथा, भुतांच्या उत्सुकता वाढवणार्‍या थरार गोष्टी, झाडांवर चढणे, झाडांवर दौऱ्याने बांधलेल्या झोपाळ्यावरचे उंच झोके, गोट्या, विठीदांडू सारखे मैदानी खेळ, कवड्या, सापशिडी, नवा व्यापार सारखे घरगुती खेळ, समुद्रकिनारी केलेला खेकड्यांच्या पिलांचा पाठलाग. रेतीत बांधलेले किल्ले, रेतीत काढलेली नावांची अक्षरे, झाडाच्या सावलीत खेळलेली भातुकली, टिंग टिंग बेल वाजली की रस्त्यावर धावत जाऊन रंगीबेरंगी बर्फाच्या गोळ्याचा रस्त्यातच घेतलेला रसाळ आस्वाद.


उन्हाळा म्हणजे सुरंगीच्या गजऱ्याचा सुगंध, मोगऱ्याचा मनमोहक घमघमाट, बहाव्याची पिवळी धम्मक झुंबरे, चैत्र पाढव्याची उंच नटलेली गुढी, लग्नसमारंभांची शान, कोकिळेचे गाणं, कुटुंबाचा, मैत्रीचा प्रेमळ सहवास.

उन्हाळ्याचे उबदार दिवस संपुष्टात येऊ लागले की चालू होते घरांची डागडुजी, शेतीच्या पिकांची पूर्वतयारी, आणि पावसाच्या आगमनाची प्रतीक्षा. असे हे उन्हाळ्याचे दिवस संपत आले की एक दिवस पावसाच्या सरी तापलेल्या धरणीला मिळतात आणि मातीच्या मन धुंद करणारा सुगंध देऊन निरोप घेतात.


पण हे दिवस आता हरवत चालले आहेत. मोबाईल आणि फास्टफुडने जग जिंकले आहे. काळाबरोबर अवश्य चालले पाहिजे पण आपले हे जुने संस्कार आपल्या मुलांच्या व आपल्याही मनाला चैतन्य देतात व ह्या सगळ्या गोष्टी आपल्या पुढच्या पिढीला फक्त वाचनात अनुभवायला न मिळता प्रत्यक्ष अनुभवून त्याचा लाभ घेता यावा यासाठी आपण जागरूक राहिले पाहीजे नाही का?


दिस आलन ग उन्हाचं
करा धांदल ग बायानू
मला पीठ पापराचा
घाला सडा फेन्या - कुरड्यांचा


धग पेटलीया निसर्गाची
तिला आंगणान झेला
सांडग, कोकम नी मसाल्यांची
साठवण गे वरीसभराला


भरकलाय गे सूर्यदेव
त्यास्नी बली जवल्याचा देसा
वाकट्या, बोंगिल नी बांगर
चला बिगि बिगि वालवा.


उन्हानं झालया करपाया
पर मनानं सावलीची माया
अजुन -हा प्रसन्न रे सुर्यदेवा
माजे गोतावल्याची भूक भागाया.


दिस लाख मोलाचं उन्हाचं
ओव-याची माजे भरभराट
तुजे उपकार रे सुर्यदेवा
माजा तुला साष्टांग नमस्कार.

सौ. प्राजक्ता पराग  म्हात्रे


गोतावल्याची - कुटुंबाची
ओव-याची - स्वयंपाकघराची

महाराष्ट्र दिनमान वर्तमान पात्रात ८ मी २०१९ रोजी प्रकाशित.