एक दिवस जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट (जे.एन.पी.टी.) च्या आम्ही काही मैत्रिणी गप्पा मारत असताना शैला घरत यांनी आपण ट्रेकिंगला जाऊ अशी इच्छा व्यक्त केली आणि आम्ही काही हौशी मैत्रिणींनी लगेच ह्या गोष्टीला मान्यता दिली. रोज रोजच्या जीवनप्रवाहातून थोडे वेगळेपण अनुभवायचं, रोजच्या संसार व ऑफिस मधील जबाबदार्यांना एक दिवस विसरून फक्त आपल्या मनाप्रमाणे बागडायचं अस ठरलं. पिकनिक आणि मॉलला बरेचदा जातो पण त्यापेक्षाही काहीतरी वेगळी वाट धरून ट्रेकिंगला जायचे असे सर्वानुमते ठरले. आम्ही सगळ्या मैत्रिणी वयाने कोणी ४० च्या पुढे तर कोणी ५० तर कोणी ५५ च्या पुढच्या. पण आमच्या मनातील उत्साह मात्र विशीतला होता. ऑफिसच्या ग्रुपवर, जे.एन.पी.टी. हॉस्पिटलमधील कर्मचारी मैत्रिणींना ही ट्रेकिंगची कल्पना देण्यात आली त्या नुसार २१ जणींनी आपली नाव नोंदणी केली. लगेच ट्रेकिंगसाठी आमच्या एक-दोन मीटिंग झाल्या. ट्रेकिंगसाठी जे.एन.पी.टी. ट्रेकर्सची मदत घ्यायची असे ठरविण्यात आले. त्यांनुसार श्री. मोहन भोईर, श्री आपटे यांच्याशी संपर्क साधून ट्रेकिंगचा दिवस, ट्रेकिंगची तयारी व रूपरेषा ठरविण्यात आली.२३ जून २०१८ हा दिवस माथेरान येथील सनसेट पॉइंटवर ट्रेकिंग करण्यासाठी ठरविण्यात आला. जे.एन.पी.टी. ची बस बुक केली. ट्रेकिंग साठीच्या सामानाची जमवा जमव चालू झाली. स्पोर्ट शूज अनिवार्य आहेत असे जे.एन.पी.टी. ट्रेकर्सकडून सूचना होतीच. २३ तारीख येई पर्यंत आपण पूर्ण सनसेट पॉइंट चढू की नाही ह्या विचारांचा तराजू वरखाली झुलतच होता. पाय दुखतील, दम लागल्याने चढता येणार नाही, काहीतरी शारीरिक त्रास होईल अशा अनेक शंका कुशंका वारंवार डोकावत होत्या. त्यात दोन ट्रेकिंगच्या दोन दिवसांपूर्वीच माथेरानवरून सेल्फी काढताना एका महिलेचा दरीत पडून मृत्यू झाल्याची न्यूज वॉट्स अॅपवर फिरत होती त्यामुळे प्रत्येकाचे आप्त, मैत्रिणी जपून जाण्याच्या सूचना करत होत्या. पण आमचा आमच्या संयमावर विश्वास असल्याने आम्ही माघार मात्र घेतली नाही. नाही पूर्ण चढलो तरी अर्ध्यात डबे खाऊन, मौज-मजा करून यायचे असे सर्वानुमते ठरवले होते.
दिवस ठरल्या पासून ते २३ तारखे पर्यंत २१ नावांतून १३ जणी ट्रेकिंगसाठी जात आहेत ह्यावर शिक्कामोर्तब झाला. २३ तारखेला सकाळी पाऊसही आमच्याबरोबरच उत्साहात कोसळत होता. सकाळी ६ ला घर सोडून उरण स्टॉपवर मी स्वतः प्राजक्ता म्हात्रे, सौ. शैला घरत, सौ. निलिमा माळी व सौ. मृणालिनी पाटील अशा चार जणी जमलो. बसला काही तांत्रिक अडचणीमुळे अर्धातास वेळ झाला. पण आल्याबरोबर गणपती बाप्पा मोरयाच्या नामघोषात आम्ही आमच्या प्रवासाला सुरुवात केली. गाडीत बसताच आम्ही निघालो हे इतर मेंबर्सना कळायला व स्टॉप वर या म्हणून सांगायला फोनाफोनी चालू झाली. १० मिनिटांत आम्ही जे.एन.पी.टी. टाउनशिपला पोहोचलो. तिथे सौ. शोभा म्हात्रे सगळ्यांचे डब्याचे पार्सल घेऊन थांबल्याच होत्या त्या गाडीत आल्या. पावसाने आता धुवांधार बॅटिंग चालू केली होती त्याचीच मजा घेत श्रीमती सुषमा म्हात्रे, सौ. जागृती धुमाळ व सौ. स्मिता शेट्टे चढल्या. जे.एन.पी.टी. ट्रेकर्सचे सदस्य श्री. मोहन भोईर चढले. श्री मोहन भोईर यांनी सुखरूप प्रवासाच्या प्रार्थनेसह प्रवासाचा नारळ गाडीसमोर फोडला. पुढचा स्टॉप होता जासई. श्रीमती मनीषा म्हात्रे फोन केल्या नुसार स्टॉपवर आलीच होती. आता गव्हाण फाट्यावर सौ. शशिकला सोनकांबळे व सौ. जयश्री पाठारे चढल्या. पुढचा स्टॉप होता पनवेल. तिथे सौ. पूजा म्हात्रे आमचा नाश्ता घेऊन आमची वाट पाहत होत्या. पनवेल मध्येच सौ. सायली ठाकुरही चढल्या व आमचा महिला ट्रेकिंग ग्रुप उदयास आला. बाकीचे ४ जे.एन.पी.टी. एक्स्पर्ट ट्रेकर्स व्हॅन ने निघाले होते.
बसमध्येच जेवणाचे पार्सल व नाश्ता सगळ्यांना देण्यात आला. वेळ वाया जाऊ नये म्हणून आम्ही नाश्ता बसमध्येच खाऊन घेतला. माथेरानला जाण्याचा मार्ग हिरवाई आणि पावसामुळे नयनरम्य झाला होता. ते नयनसुख घेत आम्ही धोधाणीगावात डोंगराच्या पायथ्याशी पोहोचलो. व्हॅन मधले ट्रेकर्स आधीच तिथे पोहोचले होते. तिथे एक देऊळ आहे त्याला नमस्कार करून रेनकोटधारी थोड्या सेल्फी, फोटो काढून ज्यांनी ट्रेकिंग स्टिक आणली होती त्यांनी त्या धरून गावातून डोंगर चढायला साधारण ९ वाजता सुरुवात केली. माझ्याकडे नवर्याच्या आग्रहावरून घरूनच आणलेली बांबूची काठी होती. ज्याचा मला खूपच उपयोग/आधार झाला. थोडासा वर गेल्यावर एका बेटावर जे.एन.पी.टी. ट्रेकर्सनी आम्हाला सूचना देण्यासाठी एकत्र बोलवलं. त्यांनी प्रत्येकाची ओळख करून घेतली व स्वतःचीही ओळख करून दिली. त्या पाच जे.एन.पी.टी. ट्रेकर्समध्ये होते श्री. राजेन्द्र आपटे, श्री. मोहन भोईर, श्री. गणेश व जे.एन.पी.टी. ट्रेकर्सची दोन मुले त्यातील एक कु. दर्पण मुद्रास (जे.एन.पी.टी. ट्रेकर्स चे सदस्य श्री मुद्रास यांचा मुलगा) आणि कु. हर्षिता आपटे (श्री. राजेन्द्र आपटे यांची मुलगी) . कोण पुढे असेल, कोण पाठी असेल ह्याबद्दल कल्पना दिली व पुढच्याला ओलांडून जयाचं नाही आणि पाठच्याच्या मागे राहायचा नाही ही सूचना मिळाली. बाकी तिघे मध्ये असणार होते. एक मेकांना साहाय्य करत जायचे हा मंत्र त्यांनी दिला. तिथेच सौ. शैला मॅडम यांनी ग्रुपसाठी हिरकणी ट्रेकिंग ग्रुप हे नाव सुचविले व त्याला सगळ्यांनी मान्यता दिली.
आता आमच्या गिर्यारोहणाला खरी सुरुवात झाली. आजूबाजूचे डोंगर आणि डोंगरावर आलेले ढग ह्यामुळे फक्त काश्मिरलाच स्वर्ग न म्हणता महाराष्ट्राच्या डोंगर-दर्यातही स्वर्गच आहे हे मनोमन वाटत होते. रिमझिम पाऊस, थंड हवा आणि आजूबाजूला हिरवळ, मध्ये मध्ये तांदळाची शेती ह्या वातावरणात अगदी प्रसन्न वाटत होत. पंधरा मिनिटांतच जसा चढ वाढला तशी पाऊसाने आमची रजा घेतली व जणू काही पुढील प्रवासासाठी शुभेच्छाच दिल्या. कारण आता रेनकोटमुळे गरम होत होते आणि जास्त पाऊस पडला असता तर चढण्याच्या वाटेतही पाण्यामुळे अडथळे आले असते. पाऊस जाताच आम्ही आमचे रेनकोट बॅगमध्ये भरले व मध्ये मध्ये एकमेकींच्या चॉकलेट गोळ्या खात, मौज मजा करत, सेल्फी, फोटो काढत चढत होतो. दम लागला की थोडा वेळ थांबत होतो. काही जणी न थांबताही पुढे मार्गक्रमण करत होत्या. मध्येच एक छोटासा पाण्याचा धबधबा लागला. येताना त्या धबधब्यावर थांबायचे ठरले. ते कातळांवरून शांतपणे पण उत्साहात झरझरणार पाणी जणू काही आम्हाला सांगत होत की मनाचा तोल जाऊ देऊ नका, माझ्यासारख्या आपला मार्ग न डगमगता पार करा. निसर्गाची ही शिकवण घेत आम्हीही अडलं की एक मेकिंना हात देत होतो व ट्रेकर्सच्या सूचनांप्रमाणे उंचीच्या मार्गाला भरारी घेत होतो. एक दोन जाणीना थोडा अॅसिडिटीचा त्रास झाला पण आपल्या मैत्रिणींची साथ व ग्रुपचा उत्साह ह्याने त्या अॅसिडिटीवरही विजय मिळविला. जवळ जवळ अर्ध्यावर गेल्यावर एक छोटंसं गणेश मंदिर व समोर थोडी सपाट जागा आहे तिथे सगळ्यांनी पुन्हा विश्रांतीसाठी एकत्र जमायचे ठरले. त्यानुसार आम्ही सगळे पुढे मागे करत एकत्र आलो. तिथे आम्ही आमचा खाऊ शेयर केला. एक ४-५ जणांचा ग्रुप होता त्यांनीही आमच्याबरोबर आणलेले पौष्टिक लाडू शेयर केले. कस असत ना जेव्हा आपण अशा निर्जन स्थळी निसर्गाच्या सानिध्यात असतो तेव्हा कोणाबद्दलही ईर्ष्या, हेवा, पत, कोण मोठं आहे लहान आहे अशी कोणतीही भावना न ठेवता फक्त माणुसकीचा आधार देत असतो आणि घेत असतो.
थोडा वेळ विश्रांती घेऊन आम्ही आता पुढचा टप्पा गाठायला निघालो. आम्ही जवळ जवळ अर्धा टप्पा पार केला होता. वर चढताना वाटही थोडी उंचीची व पाण्याच्या ओहोळामुळे तयार झालेली दगड-मातीची होती. पण आम्ही तीही उत्साहात पार पाडत होतो. मध्ये मध्ये फोटो चालूच होते एकमेकींचे. थंड वातावरणातही घाम येत होता. शरीरातील पाण्याची पातळी योग्य ठेवण्यासाठी पाणी, लिंबूसरबतासारखे अमृतपेय चालूच होती. अंककाठीने बारीक असलेल्या, चढण्याचा सराव असलेल्या पुढे जात होत्या. त्यांना त्यांची गती कायम ठेवण भागच होत. आम्ही दोन-तीन वजनदार जरा मागे होतो पण गंमत जंमत करत आणि आरामात चढत होतो. जे.एन.पी.टी. ट्रेकर्सही तुम्ही आता महत्त्वच टप्पा पार पाडला आहे, थोड्याच वेळात पोहोचणार, गिर्यारोहणाचा तब्येतीसाठी कसा फायदा असतो, हे सांगत आमचा हुरूप वाढवत होते.
ह्या प्रवासात डोंगरातील हिरवळ, रानभाज्यांचे दर्शन झाले तसेच काही फळफळावळही दिसली. रानफुलेही मध्ये मध्ये डोकावत होती. पक्षांची कुजबुज चालू होती पण आम्हा जे.एन.पी.टी. पक्ष्यांच्या चिवचिवाटात ती मिसळून होऊन गेली होती. रंगीत कीटकही सुंदर दिसत होते. मध्येच माकडांचे दर्शन झाले. डोंगरावर अधून मधून येणारे ढग म्हणजे डोळ्यांना आणि मनाला स्वर्गसुख होत. हवेची येणारी झुळूकही हवीहवीशी वाटत होती.
आता अंतिम टप्प्यात आमचा प्रवास आला होता पण कोणीही मनाने मरगळले नव्हते. गिर्यारोहणाची खरी मेख इथे होती. आम्ही आता उंचीवर येऊन पोहोचलो होतो. जे.एन.पी. ट्रेकर्सनीही आम्हाला सूचना दिली की तुमचे शरीर डोंगराच्या बाजूला राहूद्या आणि वाकू नका त्यामुळे गुडघ्यांवर ताण पडतो. नजरही डोंगराच्या दिशेनेच राहूद्या कारण खाली पाहून घाबरण्याची शक्यता असते आणि ते खरे होते. थोडी हुरहुर तर लागलीच होती. अंतिम टप्प्याला १५ मिनिटे राहिली असतील तेव्हा मार्ग उंच-सरळ दिसत होता. तो सरळ खडकाळ रस्ता होता. मध्येच थोडासा पाण्याचा झराही होता. ग्रिप मिळेल की नाही ह्याची धागघुगी मनात होती. मी तर ईश्वराचे नामस्मरणही चालू ठेवले होते. पण जे.एन.पी.टी. ट्रेकर्सनी आम्हाला पूर्ण विश्वासाने पटविले होते की तुम्ही सहज हा टप्पा पार पाडाल. त्यांनी त्या खडतर जागी पाय कुठे ठेवायचा काठी कुठे टेकायची हे अगदी पावला पावलाला मार्गदर्शन केलं. गरज असेल तिथे मदतीचा हात दिला. हर्षीता आपटे ही कॉलेजवयीन मुलगी आहे. तिला हात देताना ती तर आपल्यामुळे संकटात नाही ना येणार असा संशय यायचा पण ती इतकी सराईत होती की न घाबरता पुढे जायची आणि माझी तर शेवटी बॅगही तिनेच पाठीवर घेतली मला बॅलंस करता यावा म्हणून. शिवाय सगळ्यांमध्येच कौतुकास्पद आत्मविश्वास होता. एक एक जण माथेरान सनसेट पॉइंट चढत होता तसं तशा पोहोचलेल्या मैत्रिणी आवाजाच्या गजरात ओरडून त्याचं स्वागत करत होत्या, उत्साह वाढवत होत्या. आमच्यात सगळ्यात सीनियर पण नेहमीच सदाहरित, नेहमी दुसर्यांना हसवत ठेवणार्या अशा सौ. शशी सोनकांबळे आल्या आणि आमचा पूर्ण ग्रुप माथेरान सनसेट पॉइंट गिर्यारोहण करण्यात यशस्वी ठरला. सगळ्यांनी ओरडत एकच आवाजात आनंद साजरा केला. साधारण चार तास आम्हाला चढायला लागले.
सनसेट पॉइंटवर वानरसेना पाहुण्यांची वाटच पाहत होती पाहुण्यांकडून आपलाही काहीतरी पाहुणचार होईल ह्या आशेवर. पण सगळ्यांच्या अनुभवाच्या सांगण्यानुसार काळजी म्हणून आम्ही आमचे सामान जवळच सुरक्षित ठेवत होतो. पाच दहा मिनिटे जरा विश्रांती घेऊन आम्ही आमचे डबे खायला एकत्र गोल बसलो. माकड आता जवळ येऊ लागले. आम्हाला डबे खायला सांगून सीनियर जे.एन.पी.टी. ट्रेकर्स हातात काठ्या घेऊन माकडांना जवळ न येऊ देण्यासाठी राखण करत थांबले. गोल एकत्र बसून खाताना जेवणाची लज्जत औरच लागत होती. त्यात जेवणात अजून रुचकरपणा वाढविला तो सौ. जागृती धुमाळ यांच्या आंबट-गोड मेथांबाने व सौ. शैला घरत यांच्या चटकदार चटणीने. गप्पा-गोष्टी, चढतानाच्या गमती जमती आठवत आनंदात आमची भोजनाची मैफिल पार पडली. राहिलेल्या ट्रेकर्सनीही डबे खाऊन घेतले. मग आमच्याकडे जे शिल्लक राहिले होते ते सगळे माकडांच्या स्वाधीन केले. काही जणींनी आपल्या बरोबरचा खाऊही खाऊ घातला ह्या माकडांना. माकडांनीही आनंदोत्सव साजरा केला असावा त्यांच्या परीने.
जेवण उरकल्यावर आम्ही थोडा सनसेट पॉइंटचा फेरफटका मारला. ह्यावेळी वातावरण अतिशय रम्य झाले होते. दरी ढगांनी पूर्ण विस्तारली होती आणि काही क्षणातच हे ढग अदृश्य होऊन दरीतील निसर्ग सौंदर्य आम्ही आमच्या दृष्टीत सामावून घेऊ लागलो. खोल दिसणारी फक्त हिरवी झाडी आणि मध्ये मध्ये दिसणारे पाण्याचे झरे पाहताना मनही हिरवे चिंब झाले होते. मस्ती मौज करत आता मात्र फोटो आणि सेल्फीची आतषबाजी चालू होती. वेगवेगळ्या पोझ मध्ये एकमेकांचे सिंगल, ग्रुप फोटो काढणे चालूच होते पण त्या बरोबर एकमेकींना सांभाळतही होतो. कुणीही कुणाला धोक्याच्या लाइनला जाऊ देत नव्हते. पंधरा मिनिटे थांबून आम्ही तिथेच असलेल्या दुकानात चहाचा आस्वाद घेतला व परतीच्या प्रवासासाठी पाणी घेतले. दुकानाची पायरी चढताना माझ्या पायात गोळा आला कारण माझे सॉक्स येताना पावसात भिजले होते व एवढा वेळ ओला पाय असल्याने वात ह्या राक्षसाने आगमन केले. पण ग्रुप मधील मैत्रिणींमध्ये आमच्यासोबत तीन नर्स होत्या. त्यांनी लगेच पायाला योग्य दिशेने दाबले व लगेच पायाच्या गोळारूपी राक्षसाचे पलायन झाले.
आता उतरताना जे दोन डेंजर स्पॉट होते त्याबद्दल धागधुगी लागली होती. त्यामुळे आम्ही अर्ध्या जणी सरळ मार्गाने जाऊ हा विचार ट्रेकर्सना बोलून दाखविला. परंतू आम्ही तुम्हाला काहीही धक्का न लागता व्यवस्थित खाली उतरवून देऊहा ठाम विश्वास जे.एन.पी.टी. ट्रेकर्सनी आम्हाला दिला. गरज लागल्यास आम्ही दोरीही बांधू
म्हणून सांगितले. सगळे सामान त्यांच्या बरोबर होते. हवे तर आम्ही जे.एन.पी.टी. ट्रेकर्स कडेला उभे राहून तुम्हाला एक एक करून त्या स्पॉट वर उतरवून देऊ अशीही हमी दिली. मग काय निघालो आम्ही. निघताना शुभेच्छा की आशीर्वादम्हणून काय पावसाची थोडी वृष्टी झाली. उतरताना पुन्हा माझ्या तळव्यात वाताचा राक्षस शिरला. मला अंदाज होताच पायांचा म्हणून मी रेली स्प्रे आणला होता. ट्रेकर्सनी ओले सॉक्स काढून टाकायला सांगितले. ते काढले आणि स्प्रे मारला. मग ट्रेकर्सनी व्यवस्थित हा पाय इथे तो पाय तिथे, एकत्र पाय ठेवायचे नाहीत अशा सूचनांमधून गरज पडेल तेव्हा हात देऊन ते दोन डेंजर स्पॉट व्यवस्थित उतरवून दिले व नंतरही सगळ्यांना खाली उतरायचे व्यवस्थित मार्गदर्शन दिले. बर्याचशा ट्रेकिंग टिप्स मिळाल्या चढता उतरता. ट्रेकिंग करताना पूर्ण लक्ष आपले चढण्या-उतरण्यातच अगदी पाया समोरच असते. मेंदू एकाग्र झालेला असतो वाटेवर. एक अनोखं अनुभव घेत होतो आम्ही. पुन्हा एकदा आम्ही येताना गणपतीच्या देवळाजवळ एकत्र आलो. चॉकलेट-गोळ्यांची शेयरींग झाली आणि पुन्हा खाली उतरू लागलो. उतरताना अजून तीन-चार जाणीना पायाच्या दुखण्याचा त्रास होत होता. पण त्या दुखण्यावर विजय मिळवत आम्ही सगळ्या निसर्गाच्या छायेत मार्गक्रमण करत होतो. येताना ठरलेल्या छोट्या धबधब्यावर एकत्र आलो. भिजायची इच्छा असलेल्यांनी भिजण्याचा आनंद घेतला. थोडा वेळ थांबून पुन्हा आम्ही राहिलेला मार्ग एकमेकींच्या साथीने पार पाडला. एक एक जण आता पुन्हा धोधाणी गावाच्या पायथ्याच्या देवळापाशी जमलो. आता साधारण ५.३० वाजले होते. सगळे एकत्र आल्यावर सौ. शैलजा घरत मॅडम व आम्ही सगळ्यांनीच जे.एन.पी.टी. ट्रेकर्सचे इतक्या चांगल्या पद्धतीने आमचे ट्रेकिंग घडवून आणण्याबद्दल धन्यवाद मानले. ह्या ट्रेकिंगच्या मोबदल्यात त्यांनी आमच्याकडून कोणतेच मानधन घेतले नाही व त्याची कल्पना त्यांनी आधीच दिली होती. त्यांनीही आमच्या ग्रुपला योग्य सहकार्य दिल्याबद्दल आभार मानले. कोणताही स्वार्थ न बाळगता दिवसभराचा हा साहसी ट्रेक आम्हाला सहज शक्य करून दिल्याबद्दल त्यांचे मानावे तेवढे आभार कमीच आहेत.
आम्ही उतरल्यावर मात्र प्रचंड उंचीचा आत्मविश्वास आमच्यामध्ये आला होता व आहे. आपण वयानुसार आरोग्याला घाबरत होतो तसे काही नाही. आता आपण कितीही चालू शकतो, चढू शकतो ह्या बाबत मनात जागृती निर्माण झाली. आम्हा मैत्रिणींमध्येही आता आपलेपणाचे एक घट्ट नाते तयार झाले. एक-एकीला प्रत्येकीच्या स्टॉपवर बस सोडत होती. मध्ये ट्राफिक लागल्याने थोडा उशीर झाला पण आम्ही सगळ्या अगदी सुखरूप घरी पोहोचलो. आम्ही बसमध्ये आमच्या परतीच्या मार्गाला बसलो व तिथून जो काही पाऊस चालू झाला तो घरी पोहोचे पर्यंत. म्हणजे आमचे ट्रेकिंग व्यवस्थित पार पाडावे ह्यासाठी निसर्गदेवतेने घेतलेली दखलच होती की काय असे मनोमन वाटत होते. कारण त्या दिवशी सगळीकडेच धुवाधार पाऊस दिवसभर पडत होता हे नंतर माहीत पडले.
ग्रुपमधील सगळ्यांनीच आपआपल्या परीने हा ट्रेक यशस्वी करण्यासाठी योगदान दिले. सौ. शैला घरत यांनी पुढाकार घेऊन वेळोवेळी सगळ्यांचा पाठपुरावा केला त्याबद्दल त्यांचे आभार. सौ. शोभा म्हात्रे यांनी भाजी भाकरीची व्यवस्था करून दिली त्याबद्दल त्यांचे आभार. सौ. पूजा म्हात्रे यांनी नाश्त्याची व्यवस्था करण्यात हातभार लावला त्याबद्दल त्यांचे आभार. जे.एन.पी.टी. प्रशासनाने आम्हाला बस सुविधा उपलब्ध करून दिली त्याबद्दल त्यांचेही आभार.
सौ. प्राजक्ता पराग म्हात्रे.