शुक्रवार, ७ डिसेंबर, २०१८

घार

गुरुवार, २२ नोव्हेंबर, २०१८

मिंट (टाकसाळ) मधील देशपातळीवरचा आगरी चित्र-शिल्पकार - श्री वसंत लडग्या गावंड



घाव सोसूनच एखादी कलाकृती जन्माला येते, घाव बसत असताना, चटके खात असतानाच ती सुबक होत असते. घडवणाराही योग्य असला की कलाकृती कशी सुबक सुंदर बनते व कलाकृती तयार झाली की ती जनमानसांत डोळ्यांत भरते, सुंदर दिसू लागते असेच काहीसे घडले गेलेले श्री वसंत लडग्या गावंड ह्या उरण - कुंभारवाडा येथील चित्रशिल्पकारा विषयी माहिती करून घेऊया.

आपण रोजच्या व्यवहारात चलनी नाणी व नोटा पाहत असतो. नोटा व नाण्यांवरची चित्रशिल्पे आपले लक्ष वेधून घेत असतात. जुन्या पाचशेच्या नोटेचं डिझाइन, विशेष स्मरणार्थ नाणी व चलनी नाणी ही श्री वसंत गावंड या अस्सल आगरी माणसाने बनवली आहेत ही फार अभिमानाची गोष्ट आहे.

श्री वसंत लडग्या गावंड यांचे बालपण उरण मधील आवरा व करंजा या दोन गावी खडतर परिस्थितीत गेले. ब्रिटिश काळी काही दुर्गम खेड्यांमध्ये आगरी समाजातील कुटुंबे दारूने व्यसनाधीन झाली होती त्यात महिला व लहान मुलांचाही समावेश होता. रोजीरोटीचे साधन म्हणून श्री वसंत गावंड यांच्या वडिलांची आवरे व करंजा गावात त्यावेळी दारूची दुकाने होती. श्री वसंत गावंड यांच्या आईला दारूबद्दल चीड होती पण भवतालच्या परिस्थितीमुळे श्री वसंत गावंड यांना काय चूक काय बरोबर हे समजायचं वय नसतानाच बालपणात दारूचे व्यसन जळवांसारखे चिकटले. भारताला स्वातंत्र्य मिळून दारूबंदी लागू झाली आणि गावंड कुटुंबांची रोजीरोटीची दारूची दुकाने बंद झाली. त्यानंतर सन १९५१ साली गावंड कुटुंब उरणमधील आवरे गावात स्थायिक झाले. श्री वसंत यांचे आई वडील त्यावेळी तिसरी-चौथी इयत्ता शिकले होते. अत्यंत हलाखीत दिवस चालू होते पण ह्या ही परिस्थितीत शिक्षणाचे महत्त्व व आपल्या मुलाचे भविष्य उज्ज्वल व्हावे हे विशेषकरून आईला वाटत असल्याने श्री वसंत यांच्या आईवडीलांनी त्यांना पहिलीच्या वर्गात दाखल केले. परंतु श्री वसंत यांचे काही शिक्षणात लक्ष लागत नसे. कोवळ्या वयात लागलेले दारूचे व्यसन त्यांची साथ सोडत नव्हते. ते शाळेतही दारू पिऊन जात. इयत्ता तिसरीपर्यंतचे शिक्षण त्यांनी दारूच्या व्यसनात झिंगतच घेतले. चौथी इयत्तेत मात्र त्यांच्या समोर गणपत जाखू म्हात्रे नावाचे शिक्षक दत्त म्हणून ठाकले आणि श्री वसंत यांच्या आयुष्याच्या प्रगतीच्या पाया भरणीला जणू सुरुवात झाली. श्री गणपत म्हात्रे गुरुजींनी एक दिवस वसंत दारू पिऊन आलाय हे कळल्यावर त्याला बेदम मारले व वडिलानं बोलावून त्यांचीही कान उघडाने करून यापुढे दारू प्यायलात तर पोलिसांत देईन अशी धमकी दिली. ह्या धमकीमुळे श्री वसंत यांनी त्यांना चिकटलेले दारूचे व्यसन कायमचे झटकून टाकले व शिक्षणात लक्ष दिले. सातवी पास झाल्यावर श्री वसंत यांना शिक्षकाची नोकरी मिळू शकली असती परंतू मुलाने अजून शिकावे अशी त्यांच्या आईवडीलांची इच्छा होती. तेव्हा उरण पूर्व भागात माध्यमिक शिक्षणाची सोय तिथे नव्हती. पण म्हणतात ना इच्छा तिथे मार्ग असतो. एक दिवस एन.आय. हायस्कूल उरण चे प्रिन्सिपल श्री किनरे सर हे भर चिखलातून वाट तुडवत गावंड कुटुंबाकडे आले आणि त्यांनी वसंत यांना व आवरे, पिरकोण, गोवठणे गावातीलही काही मुलांना शिक्षणासाठी एन.आय. हायस्कुलमध्ये भरती करून घेतले. येथे श्री वसंत यांनी एस.एस.सी. पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले.

श्री वसंत यांना उत्तम चित्रकला येत होती हे त्यांची आई जाणत होती. त्यांच्यातील कलाकार त्यांच्या आईने अचूक टिपला होता. त्यामुळे डॉक्टर, वकील होण्यापेक्षा आपल्या मुलाने ड्रॉईंग कॉलेजला जावे अशी आईची असलेली प्रबळ इच्छा पुढे फळाला आली. हे शिक्षण कुठे मिळेल ह्याचा शोध श्री वसंत घेत होते. त्याच दरम्यान जिल्हा परिषदांच्या निवडणुका जाहीर झाल्या होत्या. श्री गणेश लक्ष्मण पाटील हे एक आगरी समाज नेते काँग्रेसच्या प्रचारासाठी गावात आले असताना त्यांना वसंत ह्या शिक्षणासाठी रखडलेल्या कलाकाराची ओळख झाली. श्री गणेश पाटील यांची शैक्षणिक क्षेत्रातील बर्‍याच लोकांची मैत्री होती. श्री. बा.वा. फाटक हे जि.पि.ओ. मध्ये अधिकारी होते. त्यांनी जे.जे. स्कूल ऑफ आर्टस मध्ये अ‍ॅडमिशन घेण्यासाठी श्री वसंत यांना नेले पण बॅचेस पूर्ण झाल्याने त्यांना तिथे अ‍ॅडमिशन मिळू शकले नाही. परंतू श्री वसंत यांच्यातील कलेला योग्य न्याय मिळावा म्हणून तेथील डीन श्री अडारकर यांनी श्री वसंत यांना माधव सातवडेकर आणि बोरकर सर यांच्या इंडियन आर्ट इन्स्टिट्यूटमध्ये कमर्शिअल आर्ट साठी अ‍ॅडमिशन मिळवून दिले आणि अशा प्रकारे श्री वसंत यांचे सन १९६२ सालात कॉलेजमध्ये पदार्पण झाले. श्री वसंत चिकाटीने शिक्षण घेत होते पण दोन वर्षातच त्यांना प्रचंड आघात सोसावा लागला तो म्हणजे त्यांच्या आईच्या मृत्यूचा.१९६४ साली श्री वसंत यांची आई वारली आणि त्यांची मानसिक शोचनीय अवस्था झाली. ह्या धक्क्यामुळे ते दोन वर्षे नापास झाले आईचा अत्यंत लळा त्यांना होता. आईच त्यांचे पालन पोषण करायची त्यामुळे त्यांचे अत्यंत हाल झाले. काही दिवस त्यांनी भिकार्‍यांच्या खानावळीत जेवण जेवून दिवस काढले. आता त्यांनी कमर्शिअल आर्ट सोडून फाईन आर्टला ३ वर्षे शिक्षण घेतले. परंतू जाणकारांनी पटवून दिले की फाईन आर्टचा पुढील आयुष्यात नोकरीसाठी उपयोग नाही त्यामुळे त्यांनी पुन्हा जे.जे. स्कूल ऑफ आर्टसला कमर्शिअल आर्ट साठी अ‍ॅडमिशन घेतले व त्यांच्या मुळातच चांगल्या असणार्‍या चित्रकलेमुळे सन १९७१ ला ते डिप्लोमा पास झाले.


१९७४ साली वर्तमानपत्रात पत्रात आलेली जाहीरात पाहून त्यांनी मुंबई मिंट मधील ज्युनियर आर्टिस्ट एन्ग्रेव्हर पदासाठी अर्ज केला. त्यांना तिथे दीड वर्षे प्रशिक्षण देण्यात आले. त्यांचे उल्लेखनीय काम पाहून अल्पावधीतच श्री वसंत गावंड यांना आर्टिस्ट एन्ग्रेव्हरपदी बढती मिळाली. हे पद खूपच कमी लोकांच्या पदरी पडत असल्याने ते खूप मानाचे समजले जाते.

हे सगळे शिक्षण व संधी ही त्यांना मिळालेले कुटुंबातील शिक्षक, ग्रामसेवक यांच्या मदतीच्या साहाय्याने पुरे करता आले. आपआपल्या परीने या सर्वांनी श्री वसंत यांच्या गुणांना योग्य न्याय मिळावा म्हणून आर्थिक मदतही केली. याबद्दल श्री वसंत गावंड कृतज्ञता व्यक्त करतात. तसेच ते सी.आर.ए. उमरोडकर यांच्या स्टुडिओमध्ये असिस्टंट आर्टिस्ट म्हणून पार्टटाइम जॉब करत होते.

जरी ते अधिकारी झाले होते तरी बरेचसे काम त्यांना माहीत नव्हते. या क्षेत्रातील जाणकार मार्गदर्शन करायला तयार नव्हते. पण खडतर परिश्रम आणि जिद्दीने श्री वसंत यांनी ते एकलव्याच्या जिद्दीने आत्मसात केले व भारत सरकारच्या चलनी नाण्यांचे अप्रतिम डिझाइन्स ते बनवू लागले.









सन १९८२ ला झालेल्या नवव्या एशियन गेम्स (एशियाड) साठी श्री वसंत गावंड यांनी इतकी अप्रतिम स्पर्धात्मक आणि स्मरणार्थ मेडल्स व नाणी बनवली ती अप्पू एशियाडची नाणी व मेडल्स प्रसिद्ध झाली व त्याबद्दल भारत सरकार तर्फे त्यांना विशेष पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

सन १९८४ मध्ये पंतप्रधान इंदिरा गांधी यांची हत्या झाली त्यांच्या स्मरणार्थ सरकारच्या आदेशानुसार स्मरणार्थ आणि चलनी नाणी काढण्यात आली. ह्या मॉडेलसाठी शिल्पकाम प्रचलित शिल्पकाराला दिले होते पण ते प्रॉडक्शन साठी चालले नाही. फक्त श्री गावंड यांनी तयार केलेल्या नाण्याचे अचूक, अभ्यासपूर्ण व सुबक इंदिरा गांधींचे शिल्प स्वीकृत झाले. नाण्यांच्या अचूक डिझाइन तंत्राबद्दलची माहिती सन्माननीय श्री मेस्त्री साहेब व काते साहेब यांच्याकडून मिळाली ही जणू मोलाची देणगीच त्यांना मिळाली होती त्याचा त्यांना पुढील आयुष्यात खूप उपयोग झाला.

स्व. पंडित जवाहरलाल नेहरू, स्व. राजीव गांधी, स्व. अरविंद घोष, छत्रपती शिवाजी महाराज, भारत छोडो आंदोलन, स्वातंत्र्याची ५० वर्षे आणि स्व. जयप्रकाश नारायण यांच्या प्रतिमा हुबेहूब प्रतिमा श्री वसंत गावंड यांनी चलनी नाण्यावर आणल्यामुळे मिंट या संस्थेला जागतिक स्तरावर गौरविण्यात आले. ह्या चित्रशिल्पकलेसाठी उरण मधील आगरी समाजातील व्यक्तीला म्हणजे श्री वसंत गावंड यांना भारत सरकारची पुरस्कार (अ‍ॅवॉर्ड) मिळाले ही बाब किती गौरवास्पद आहे. त्यांनी १७ प्रकारची चलनी नाणी बनवली. या कलेबद्दल श्री वसंत गावंड यांना वेगवेगळे १५ देशपातळीवरील पुरस्कार मिळाले.

श्री वसंत गावंड सांगतात की डिझाइन बनवताना कलाकाराला अचूकतेचं भान ठेवावं लागत. ज्या व्यक्तीचे शिल्प काढतो त्याचं हुबेहूब स्वभाव वैशिष्ट्य त्या डिझाइनमध्ये उतरणे गरजेच असत. प्रत्येकाच्या प्रतिमेनुसार, स्वभाव वैशिष्ट्या नुसार विचार करून ते नाण्याला फॉन्ट देत. डिझाइन, स्कल्पचर (थ्रीडी), मास्टर, सिट पंचेस, डाइज यांच्या तंत्रामध्ये ते अतिशय निष्णात होते. ब्रिटिश साम्राज्य गेल्यानंतर बरीच वर्षे म्हणजे ६० व्या दशका पर्यंत हिंदुस्तानी नाण्यांच्या डिझाइन्स व फिनिशिंग खास नव्हते याची कल्पना त्यांना देण्यात आली होती. मग त्यांनी ब्रिटिशकालीन नाण्यांचा सखोल अभ्यास केला आणि त्यावरून खुपसे बदल करून अप्रतिम नाणी तयार केली. आताचे कित्येक क्वाईन कलेक्टर विचारात आहेत की पूर्वीसारख्या आता अशा डिझाइन्स का उतरत नाहीत.



श्री वसंत गावंड हे १९७४ साली काँग्रेसचे प्रसिद्ध पुढारी श्री. श्रीनिवास पाटील यांची कन्या कु. शकुंतला हिच्याबरोबर विवाहबद्ध झाले व त्यांच्या आयुष्यात सुखाची बरसात झाली. सौ. शकुंतला ह्या एन.ए.डी. नेव्हल हॉस्पिटलमध्ये स्टाफ नर्स म्हणून काम करत होत्या. त्यांना एक मानसी नावाचे कन्यारत्न आहे. ती विवाहित असून तिनेही वडिलांच्या कलेचा वारसा चालू ठेवला आहे. ती एका ड्रॉइंग संस्थेमध्ये प्रोफेसर आहे. तिघांनाही वाचन, संगीताची आवड आहे.

श्री वसंत गावंड २००२ साली निवृत्त झाले. श्री वसंत गावंड यांना आयुष्यात प्रचंड संघर्ष करावा लागला. त्यांच्यातील कलाकाराला ओळखून त्यांना अनेक व्यक्तींनी मदतीचा हात दिला व त्या मदतीचे श्री वसंत यांनी सोने केले. परंतू त्यांनी स्वतःचा कधीच प्रचार केला नाही. त्यामुळे आपल्यात, उरणमध्ये, आगरी समाजात इतका महान प्रोफेशनल कलाकार आहे ह्याबद्दल त्यांची मुलाखत घेतानाच प्रचंड गर्व वाटला. वास्तविक त्यांच्या चित्रशिल्प कलेचे प्रदर्शन मुंबईत भरणार होते परंतु काही तांत्रिक अडचणींमुळे हे प्रदर्शन लांबणीवर गेले आहे.

तर असा हा उरण मधील आगरी समाजात लपलेला तारा श्री वसंत लडग्या गावंड, भारतातील पहिला महाराष्ट्रीयन मिंट इन्ग्रेव्हरआर्टिस्ट असलेला हा आगरी सुपुत्र उरणवासीयांना आणि आगरी समाजाला उर भरून अभिमान वाटावा असे ह्यांचे व्यक्तिमत्त्व आहे.

सौ. प्राजक्ता पराग म्हात्रे, उरण (कुंभारवाडा)
prajaktamhatre.77@gmail.com

संपर्क सौजन्य - अ‍ॅड. पराग द. म्हात्रे.

वरील लेखन अग्रसेन दिवाळी अंक २०१८  मध्ये व्यक्तिविशेष सदराखाली  प्रकाशित झाला आहे.  

सोमवार, ६ ऑगस्ट, २०१८

घराभोवतालची हिरवाई



झाडे, पाने फुले ही माझ्या आयुष्याचाच एक भाग आहेत. माझं बालपणच उरण नागांवातील झाडे, वेली, शेती, मळ्याच्या सहवासात गेल. बालपणापासूनच निसर्गातील हा हिरवा रंग माझ्या मनाला गारवा देत आला आहे. आई-वडील त्यांच्या नोकर्‍या सांभाळून वाडीतील वृक्ष संपदेची, शेतीची मशागत करताना मी त्यांचे अनुकरण करत होते. बी ला आलेला अंकूर किंवा एखाद्या कोवळ्या फांदीला कळी धरते ते पाहण्यातील समाधान मला बालपणापासून ते आतापर्यंत शब्दात व्यक्त न करण्याइतपत आनंददायी आहे.

माझे वडील हयात असे पर्यंत सगळ्यांना सांगायचे, हिला कुठे थिएटरमध्ये सिनेमा दाखवायला नेलं

तरी ही बाहेरच्या पाना-फुलांतच रमायची. माझ्या वडिलांनी माझ्या लहानपणी आणलेली तीन गुलाबांची रोपे अजूनही माझ्या स्मरणात आहेत.











शाळेत असताना मैत्रिणींकडून किंवा कुठे पाहुणे म्हणून गेल्यावर त्यांच्याकडे असलेली व आमच्याकडे नसणारी झाडांची देवाण घेवाण करणं हा एक छंदच होता जो अजूनही आहेच. ह्या निसर्गाच सानिध्य लग्नानंतरही मिळेल की नाही या बाबत कधी कधी मनात पाल चुकचुकायची पण निसर्ग देवतेने माझ्यावरची माया अबाधित ठेवली. सासर्‍यांनी उरण- कुंभारवाड्यातच नवीनच वाडी घेतली होती व तिथे घर बांधायला सुरुवात केली होती. लग्ना नंतर वर्षभरातच आम्ही नवीन जागेत राहायला गेलो आणि माझी निसर्ग सानिध्याची ओढ फळास आली. इतर मोठ्या झाडांपेक्षा मला बागेतील फुलझाडांचे खूप वेड होते. नवीन घरा भोवती नर्सरीतून आणि परिचितांकडून आणून खूप फुलझाडे मी लावली. घरातील इतर मंडळीही आपआपल्या आवडीनुसार फळझाडे, फुलझाडे आणून लावत होते. काहीच दिवसात आमचा परिसर हिरवा गार व फुलांनी रंगीबिरंगी झाला. जास्वंदीचे सात-आठ प्रकार, गुलाब, अनंत, मोगरा, मदनबाण, जुई, सायली, रातराणी, तगर, प्राजक्त, लिली, कर्दळ अशी अनेक फुले वार्‍यावर डुलू लागली. प्रत्येक झाडांची वेगवेगळी वैशिष्ट्ये तशाच त्यांच्या वेगवेगळ्या आठवणी व ती ज्यांच्याकडून आणली त्यांची आठवण ही वृक्षसंपदा नियमितपणे करून देते. परिसरातील ह्या वृक्षांमुळे अनेक जीव ह्या हिरवाईवर येतात. आमच्या आवारातील फळझाडे म्हणजे जाम, चिकू, पेरू, आंबे ह्यावर येणारे पक्षी आणि त्यांचे गुंजन फार मनोरंजक असत.




फुलपाखरांचे कोवळ्या उन्हात फुलांवर बागडणे मन त्यांच्यावरच खिळवून ठेवते. मधमाश्याही बागेतील फुलांतील मधुरास गोळा करून आंब्याच्या झाडावर पोळ्यामध्ये आपली वस्ती बनवतात. पावसाळ्यात काजव्यांची मिणमिण दिसते, बेडूक टुणुक टुणुक करत अंगणात फिरतात, सरपटणारे प्राणीही येतात बरं का पाहुणचाराला झाडीत.





सकाळी उठल्यावर ताज्या ताज्या फुलांचे विलोभनीय दर्शन घ्यायला मला खूप आवडते. हल्ली तर काय मोबाइलवर त्यांचे फोटो काढून ग्रुप्सवर शेयर करुण दुसर्‍यांसोबत हे प्रसन्न वातावरण शेयर करायचं असा नियमच पडला आहे. जास्त फुले असतील तर ती मैत्रिणींना देऊन आमची मैत्री सुगंधी करण्यात फुलांचा वाटा आहे. ऑफिसच्या टेबलवर असणार्‍या देवाच्या प्रतिमेला न विसरता मी काही सुगंधी फुले नेते ज्याने ऑफिसचे काम करत असताना त्या फुलांच्या सहवासाने मन प्रसन्न राहते व कामाचा ताण जाणवत नाही. संध्याकाळी घरी गेल्यावर चहा घेतल्यावर एक तास बाग कामासाठी राखलेलाच असतो. ह्या वेळी माझ्या दोन मुली श्रावणी आणि राधाही मदतीला असतात. त्याही आवडीने झाडांना पाणी घालतात. दीर-जाऊबाईही गार्डनिंगचे काम आवडीने करतात. माझ्या मिस्टरांना माझे झाडांचे वेड माहीत असल्याने ते हल्ली मला वाढदिवसाला फुलझाडेच आणतात गिफ्ट म्हणून मग ही झाडेही माझ्यासाठी स्पेशल होऊन जातात. मोठ्या प्रमाणात खताची व्यवस्थाही तेच करतात. मी आमच्या जागेत फक्त शेणखत आणि झेड.बी.ऍना.एफ.च्या देसाई कुटुंबाने ओळख करून

दिलेले जीवामृत घरी करून वापरते, कोणतेही रासायनिक खत अथवा औषध

वापरत नाही.









आता सोशल नेटवर्कच्या जमान्यात झाडांविषयी अनेक माहिती उपलब्ध होते. मायबोली डॉट कॉम वरील निसर्गाच्या गप्पा ह्या माझ्या ग्रुपमुळे माझी फुलझाडे हिच ओढ न राहतं अनेक दुर्मिळ व नवनवीन वृक्षांची ओळख होऊन त्या वृक्षांबद्दलही ओढ वाटू लागली आहे. त्यामुळे मी ६-७ वर्षापूर्वी आमच्या परिसरात नर्सरीतून आणून बहावा लावला त्याचे पिवळे झुंबर दिवसा ढवळ्या परिसर चमचमवत होते. बकुळही आता फुलू लागली आहे. हादगा तर मागील तीन-चार वर्षापासून आपल्या कुयरीच्या आकाराच्या फुलांची देवाण करत आहे. ह्या

फुलांची भाजी होते.


माहेराहूनही अनेक फुलझाडे आणून लावली त्यामुळे माहेरच्या बगिच्याची सोबतही अजून हरवल्यासारखी वाटत नाही. नर्सरीतून आणलेल्या झाडांपेक्षा कोणाकडून आणलेली-दिलेली झाडे विशेष काळजीने, मायेने वाढवली जातात. साधनाने दिलेल्या भूईचाफ्याचे खूप वैशिष्ट्य वाटते. त्याच्या कंदातून पहिला सुगंधी फुल उगवते व नंतर रोप तयार होते. 



सायलीने नागपूरवरून पाठवलेली पिवळी लिली, दुपार शेंदरी फुलली की नागपूरच्या मातीचा गंध येतो. पुण्यातील अंजलीने पाठवलेले आयरीस फुलले की त्याचे सौंदर्य पाहायला मन कुंडीजवळ वारंवार रेंगाळत. ह्या फुलांसोबत आमची मैत्रीही अधिक फुलत जाते.


घरासमोरची तुळस आमच्या अंगणाची शोभा आहे. पावसाळ्यात फुलणारा मोगरा, मदनबाण, अनंत ही फुले मन धुंद करतात. रात्री फुलणारी रातराणी रात्र सुगंध करते. सकाळी पडणारा प्राजक्ताचा सडा जणू मोती पोवळ्यांची रांगोळी घालते अंगणात. तगरीचे फुललेले झाड मला उन्हातील चांदण्या वाटतात. आमच्या बागेतील गुलाब फुलले की बाग श्रीमंत वाटू लागते. मी फुललोय हे सांगण्यासाठी कवठी चाफ्याचा सुगंध अगदी घरात येऊन दरवळतो. खिडकीतील ऑफिसटाईम न चुकता ऑफिसच्या वेळेवर फुलतो. सोनचाफा फुलल्यावर सगळा परिसर सुगंधाने प्रसन्न होतो. पावसाळ्यात जेव्हा एकदाच २०-२५ पांढरे कॅकटस ज्याला ब्रह्मकमळ म्हणून आपल्याकडे नाव पाडलंय (खरे ब्रह्मकमळ हिमालयात उगवते) ते फुलतात तेव्हा शुभ्रता, सुगंध आणि सौंदर्य ह्यांचा रिमझीमणार्‍या पावसात स्वर्गीय देखावा पाहायला मिळतो.




ऋतू नुसार फळे-फुले येतात. पाऊस आणि हिरवी झाडे हे एक सुंदर समीकरण आहे. रिमझिमणार्‍या पावसातील झाडे फुले अधिक तजेलदार, गारेगार दिसतात. हिवाळ्यात फुलणारी फुले मनमोहक रंगाची असतात तर उन्हाळ्यातील फुले कडक उन्हाच्या मार्‍य पासून मनाला थोडी शीतलात मिळावी म्हणून सुगंधी असतात असा माझा अंदाज आहे. ही फळे-फुले, त्यांचा सुगंध आणि सौंदर्य ही ईश्वराची अगाध लीला आहे हे नेहमी मनोमन वाटत असते.

सौ. प्राजक्ता पराग म्हात्रे, उरण




शनिवार, ७ जुलै, २०१८

भांड्याला भांड



आज स्वयंपाक करता करता अचानक मनात विचार आला तो स्वयंपाक घरातील भांड्यांचा. आपल्या स्वयंपाक घरात भांडी एकमेकांच्या साथीने, गुण्यागोविंद्याने चविष्ट आणि कलात्मक पदार्थ बनवण्यासाठी किती संगठित होऊन काम करत असतात. त्यातील काही ठरलेल्या जोड्या म्हणजे पोळीपाट-लाटणं, तवा-कालथा, कढई-झारा, खल-बत्ता, चमचा-वाटी. थोड्या आधीच्या काळात गेलो तर कप-बशी, पाटा-वरवंटा, तांब्या-पेला, उखळ-मूस ही भांडी किंवा साधनेही कायम एकमेकांच्या साथीनेच काम करायची.

तसं पाहील तर प्रत्येक भांड्याला धडपड करावी लागते अस नाही, जसं की वाटी-चमचा. वाटीतील पदार्थाचा आस्वाद देण्यासाठी चमच्यालाच धावाधाव करावी लागते. पण वाटी तो पदार्थ सांडू न देता आपल्या उदरात त्या पदार्थाला मावून घेत स्थिर ठेवते म्हणूनच चमचा खात्रीशीर पदार्थ उचलू शकतो.

पोळीपाट स्वतः मजबूत आणि स्थिर राहून लाटण्याला आपले काम करून देत चपातीला भक्कम आधार देतो त्यामुळे लाटणे पोळीपाटाच्या आधारे चपातीला गोल गरगरीत बनवते. तवा-कालथ्याचेही तसेच. तवा गॅसवर स्वतः आगीवर तळपत चपातीला शेकवत असतो तर कालथा ती चपाती योग्य प्रमाणात शेकून निघावी ह्यासाठी संयमाने चपातीची किंवा भाकरीची उलथा पालथं करतो. जर तवा तापला नाही तर चपाती किंवा भाकरी शेकणार नाही आणि जर कलथ्याने उलथापालथ नाही केली तर त्या चपातीचा किंवा भाकरीचा कोळसा होऊन जाईल अथवा करणार्‍या व्यक्तीला चटके सहन करावे लागतील. कढई झार्‍याचे सुद्धा हेच नाते. उकळत्या तेलात कढई आणि झार्‍याच्या भरवशावर पुरी कशी टम्म फुगते. तसेच इतर गोड तिखट अनेक तळण्याचे पदार्थांचा चटपटीतपणा ह्या कढई झार्‍याच्या सहवासात तयार होत असतो.

खलबत्त्यात आपण काही ठेचतो तेव्हा खल स्थिर राहून बत्त्याचे वार सहन करतो आणि बत्त्यालाही प्रतीमार लागतोच की. पण त्यातूनच वेलचीचा सुगंध दरवळतो, लसूण खमंग फोडणीसाठी ठेचून तयार राहतो, आल्याचा, मिरीचा औषधी गुण कुटल्यामुळे द्विगुणित होतो. ठेच्याची लज्जतही ह्या साधनांमुळे जिभेवर रेंगाळत राहते.

हे झाले जोडप्यांची संगत. पण चपाती/भाकरी, पुरी किंवा इतर तळणीचे पदार्थ पूर्णत्वास जाण्यासाठी चपातीच्या भांड्यांचं कुटुंब किंवा तळणीच्या पदार्थाच कुटुंबच राबत असत. चपाती तयार होण्यासाठी स्वयंपाक घरात पिठाचा डबा, परात, तेलाची वाटी, मळण्याच्या पाण्याच भांड, गॅसची शेगडी, पोळीपाट-लाटणं, तवा-कालथा आणि चपाती ठेवण्याचा डबा एवढ्या भांड्यांचं एक कुटुंब राबत असतं. अशा बर्‍याच पदार्थांसाठी विशिष्ट भांड्यांचं टीमवर्क स्वयंपाक घरात चालतं.

ही भांडी नक्कीच पदार्थ बनवत असताना एकमेकांशी संवाद करत असणार. रोज स्वयंपाक करत असणार्‍या चाणाक्ष सुगरणीला त्या प्रत्येक भांड्याचा आवाजही माहीत असतो जसे तवा कालथ्यावर पडल्यावर होणारा आवाज, चमचा-वाटी चा संवाद, खल-बत्त्याची काथ्याकूट, भाकरी थापताना योग्य वळण घे सांगणार्‍या परातीच्या आवाजातील संदेश, एखादा भांड हातातून सटकून किंवा कोणत्याही कारणाने पडलं तर आवाजावरून कोणत्या भांड्याने थयथयाट केला आहे हे स्वयंपाक घरातील मालकिणीला अचूक समजत. एकमेकांत अनेक जिन्नसांची चव एकरूप होऊन कशी रुची वाढते हे मिक्सरची घरघर सांगत असते. कुकराची शिट्टी पदार्थ झाल्याची सूचना घरभर पोहोचवते. ह्या भांड्यांमध्येही राग-लोभ, रुसवे-फुगवेही होत असतील अशी कल्पना करूया. तसेच भांड्याला भांड लागण हे ह्या भांड्यांवरूनच तर बोललं जातं.

भांड्यांमध्ये पदार्थ आले की तेही भांड्यांसोबत संवाद साधू लागतात. जसं की फोडणीचा चुर्र आवाज सांगत असतो आज पदार्थ नेहमीपेक्षा स्पेशल झाला पाहिजे. आमटी-रश्शाची रटरट घाई करा भुका लागल्यात सगळ्यांना सांगत असावी. दूध किंवा चहा उकळून येणारा फस्स आवाज सांगतो धावा गॅस बंद करा नाहीतर मी पडलोच.

जेवणं उरकली की आपण स्वच्छ कधी होतोय ह्याची घाई लागते भांड्यांना. साबण-घासणीच्या तालावर आणि पाण्याच्या खळखळाटात न्हाऊन निघाली की पुन्हा कशी राबलेली भांडी गोरी-गोमटी होतात आणि शिस्तीत आपल्या मांडणी, ट्रॉलीत, आपल्या नेहमीच्या जागेवर जाऊन स्थिर होतात.


तर अशा प्रकारे भांड्यांचे हे नित्य कर्म जोडीने किंवा टीम वर्कनेच पदार्थात योग्य रूप, रुची, रंग, खमंगपणा आणतो हा सहजीवनाचा किती मोठा धडा मिळतो ह्या स्वयंपाक घरातील भांड्यांमधून.


सौ. प्राजक्ता पराग म्हात्रे.

हा लेख दिनांक ०७/०७/२०१८ च्या लोकसत्ता वास्तुरंग मध्ये प्रकाशित झाला आहे.