उरण - द्रोणागिरी
आमच्या उरणचे सौंदर्य वाढविण्यात जसा समुद्र किना-यांचा खळखळाट आहे तसेच उरणच्या डोंगरांमधला द्रोणागिरी हा डोंगर उरणची उंच शान आहे. हा डोंगर नागावातल्या आमच्या वाडीतून लोभसवाणं दर्शन द्यायचा. पावसाळ्यात डोंगर हिरवागार होऊन त्यावरचे खळखळणारे झरे पाहताना डोळे सुखावून जायचे. डोंगरावर ढग जमा होऊ लागल्यावर आपल्यासमोर स्वर्गच आहे की काय असा भास अजूनही होतो. डोंगरावर काळोख झाला की पाऊस पडणार हे लहानपणी आईने शिकवलेलं बालपणीच ज्ञान त्यामुळे वाडीत असलो आणि डोंगरावर ढग जमा होऊन तो अदृश्य झाला की मी पण घरात धाव ठोकायचे. हिवाळ्यात याची हिरवाई तशीच गारेगार असायची फक्त हिरव्या रंगात थोडा गडदपणा यायचा आणि उन्हाळ्यापर्यंत डोंगर पुन्हा आपले तांबडे रूप धारण करायचा आणि अजूनही याचे तेच चक्र चालू असते. डोळ्याला आंधोळी आली की डोंगराला चिडवायचे असे पूर्वी बोलले जायचे त्यामुळे अशी आंधोळी आली की चिडवायला समोर आपला हाच द्रोणागिरीचा डोंगर. मग काय जणू काही हा बालपणीचा सवंगडीच चिडवा चिडवी करायला.
लहानपणी मे महिना म्हणजे आम्ही आम्ही चुलत-आत्ये भावंड एकत्र यायचे दिवस. त्याच दिवसात आम्ही सगळे मिळून हुंदडायची दोन ठरलेली ठिकाणे होती. एक म्हणजे उरण पिरवाडीचा समुद्र किनारा आणि द्रोणागिरीवर किल्ला असलेला डोंगर. घरूनच कधी भेळ, कधी चिकन पाव, कधी टपरीवरचा वडापावच पार्सल घ्यायचं आणि डोंगराची वाट धरायची. अडसर, अवघड मार्गात भाऊ-बहिणी हात धरून पुढे चढवायच्या कारण मीच त्यांच्यात शेंडेफळ. मध्ये मध्ये दगड रचून केलेल्या पाय-या तर मध्ये खडबडीत चढण असा रस्ता झपाझप चालत जाऊन डोंगर माथ्याचा वाहणारा गार वारा जणू आमचं स्वागतच करायचा. त्या वा-याने चढल्याचा सगळा थकवा, मरगळ दूर व्हायचा. तिथे पोहोचून पहिला फिरायचं, गप्पा गोष्टी करायच्या कधी खेळायचं मग खाऊ खायला एकत्रित बसायचं हे नित्याचंच ठरलेलं. तिथलं बांधकाम चर्च सारखं असलं तरी आमचा तो किल्लाच होता. त्या किल्ल्याच्या बाजूलाच हौद आहे. आम्ही जातानाच छोटंसं लामणं घेऊन जायचो. हौदाला तवंग आलेला असायचा मग लामण डुबुक डुबुक केलं की पाणी साफ व्हायचं. तेव्हा ना प्रदूषण ना घाण त्यामुळे आम्ही ते स्वच्छ पाणी थेट प्यायचो. या हौदाबद्दल अस बोलायचे की त्या हौदात कोणी व्यक्ती किंवा काही पडलं की घारापूरीला निघते. त्यामुळे त्या हौदाजवळ सगळे जपूनच असायचे. पण त्यातलं ते हिरवं गार पाणी बघून समाधान व्हायचं. वरून खालच आमचं उरण अगदी छोटं झाल्यासारखं दिसायचं. तेव्हा स्पष्ट दिसायचा वरून तो विमला तलाव. मग त्याचा अंदाज धरून कुठे काय असेल हे कोड सोडवण्यात गंमत यायची. आपल घर शोधण्यासाठी डोळे अधिक आतुर असायचे. पाठीमागे असलेला विशाल समुद्रकिनारा अगदी नजरेत भरायचा. तिथली रानफुले शोधण्यात मला विशेष आनंद मिळायचा. पण तशी जास्त झाडी नव्हती काही तुरळक करवंदाच्या जाळी असायच्या आणि कुठेतरी निवडुंग, एक्झोराची फुले मात्र गुच्छात असायची त्यांना पहायच, त्यांच्या मधाची चव घ्यायची आणि निसर्गात रमून जायचं हा माझा आवडता छंद. संध्याकाळ व्हायच्या आधीच डोंगर उतार व्हायचं असा आमचं नेहमीच ठरलेलं असायचं. उतरताना पटकन कधी उतरलो हे कळायचच नाही. नंतर काही वर्षातच ओएनजीसी जवळ असल्याने ओएनजीसीने डोंगरावर जाण्यास प्रतिबंध घातले आणि आमची डोंगर सफर तिथे थांबली.
या डोंगराची अशी आख्यायिका सांगितली जाते की जेव्हा लक्षुमण बेशुद्ध पडला होता तेव्हा रामाने मारुतीला संजीवनी आणायला सांगितली होती पण मारुतीला संजीवनी ओळखता येत नव्हती तेव्हा त्याने संजीवनी असलेला द्रोणागिरी डोंगरच उचलून आणला त्या प्रवासात त्या डोंगराचा एक तुकडा येथे पडला तोच हा द्रोणागिरी डोंगर. करंजा बंदरापर्यंत हा डोंगर विसावलेला आहे. करंजाची द्रोणागिरी देवी याच डोंगराच्या एका भागावर वसलेली आहे जिथे अनेक भाविक दर्शनासाठी जात असतात. येथील किल्ल्याची थोडी ऐतिहासिक माहिती डोंगर चढताना बोर्डावर लावलेली आहे व डोंगरावर येणारे दूर्गविर, यावर काम करणा-या संस्थांकडे आहे जी त्यांच्यामार्फतच सगळ्यांना कळलेली योग्य.
डोंगराच्या मागे ओ. एन. जी. सी. प्लांट आहे व दुरून दिसणारी धगधगती चिमणी नेहमी आपल लक्ष आकर्षित करते. हा उरणचा द्रोणागिरी डोंगर नुसता डोंगर नसून त्याला हत्तीच्या डोक्याप्रमाणे आकार आहे जो उरणबाहेरून येताना नेहमी प्रकर्षाने जाणवतो. संध्याकाळी याचे रुपडे विलक्षण सुंदर दिसते. कामावरून सुटले की साधारण सहाच्या सुमारास बोकडवि-याच्या पोलिस चौकीपुढे कोटनाक्याच्या रोडला ब्रिजखालून जो हा डोंगर आपल्या सौंदर्याने मोहात पाडतो तो कोटनाका येईपर्यंत. सूर्य आणि डोंगराचा खेळ सुरू झालेला असतो. जसजशी अॅक्टीवा पुढे जाते तसतसा तेजोमय तांबडा मोठा सूर्याचा गोळा चेंडूप्रमाणे हत्तिरूपी डोंगराच्या माथ्यावरून ते सोंडेच्या खालच्या टोकापर्यंत सरपटत येतो. जणू हत्ती लीलया करत आहे असाच भास होतो. मन धुंद करणारा तो निसर्गाचा नजारा अनुभवण्यासाठी मी ती दोन-तीन मिनिटे गाडी हळू चालवते. नवीनं ऊर्जाच जणू त्या दर्शनाने मिळते.
काही दिवसांपासून कानावर येत होत कि द्रोणागिरी डोंगरावर आपले काही स्थानिक कार्यकर्त्यांची व दुर्गसंवर्धन करणा-यांची टीम आपल्या द्रोणागिरी डोंगराच्या संवर्धनाला झपाटून काम करत आहेत. रोज जाऊन तिथे आपले श्रम देत आहेत. डोंगर चढण्यासाठी वाटा स्वकष्टाने सुलभ करत आहेत. रोज असंख्य पर्यटक तिथे जात आहेत. मग ओढ लागली पुन्हा त्या बालपणीच्या वस्तूला भेट देण्याची, त्या वाटा तुडवण्याचा आनंद घेण्याची. मिस्टरांचं लहानपणही माझ्यासारखच या डोंगरावरच्या भटकंतीत समृद्ध झालेलं तेव्हा द्रोणागिरीवर रविवार धरून जायचं आमचं संगनमताने ठरलं. आताही कुंभारवाड्यात आमच्या घरच्या गच्चीवरूनही द्रोणागिरीच्या डोंगरमाथ्याच दर्शन आम्हाला होत. रात्रीचा या डोंगरावरचा दिवा शांतपणे डोंगराची उंची खुणावत असतो. आमच्या मुली श्रावणी आणि राधा तर डोंगरावर ट्रेक करायचा दिवस कधी येईल याची वाट पाहतं होत्या. खूप उत्सुक होत्या त्याही आणि आम्हीही. रविवार ६ डिसेंबर रोजी आम्ही सूर्य उजाडायच्या आतच वाट धरली ती डोंगरवाटेची. वातावरणात थंडीने जादू केलीच होती त्यामुळे उत्साहात भर पडली होती. डोंगराचा पायथा असलेलं डाउर नगर हे गाव गाठलं आणि आपण कुठेतरी वेगळीकडेच पर्यटनाला आलोय असा भास होऊ लागला कारण भल्या पहाटे खूप गर्दी डोंग-याच्या पायथ्याशी दिसत होती. अगदी एकवीरेला वगैरे आल्याचा भास झाला. लहान मुले, मोठी माणसे सगळीच होती. गप्पा मारत, दगड-माती तुडवत आम्ही चढत होतो. अंधारला उजळत कोवळी सूर्यकिरणे डोंगराला सोनेरी छटा देत होती. पक्षी त्यांचे डोंगरावरचे अस्तित्व आपल्या किलबिलाटातून देत होते. मागे पुढे अनेक ट्रेकर्स चढत तर कोणी उतरत होते. बहुतांशी बरीचशी मंडळी परिचयाची दिसत असल्याने एखाद्या समारंभाला आल्यासारखाही भास होत होता. जिथे चढायला सोपे नसेल अशा ठिकाणी एकमेकांना हात देऊन आधार घेऊन सहज चढता येत होते. हळू हळू पूर्ण उजाडले होते आणि आम्ही चक्क द्रोणागिरी किल्ल्याच्या प्रवेशद्वाराजवळ पोहोचलोही. पोहोचताच प्रचंड समाधान वाटलं. कारण एकतर ते सुंदर प्रदूषणविरहित हवामान, खेळती हवा, कोवळी सकाळ आणि तिथे राखली गेलेली स्वच्छता याने खूप प्रसन्न वाटत होते. मुलींनीही पहिलाच ट्रेक केला असल्याने त्यांना एखादा खेळ जिंकल्यासारखा आनंद झाला होता. तिथला नजाराही सुंदरच आहे. एका दिशेला समुद्र तर किल्ल्याच्या दारासमोर उरण शहराचा नजारा. पहिला जागा ओळखण्याच्या ज्या नैसर्गिक निशाण्या होत्या त्यांची जागी सिमेंटच्या मोठ्या बिल्डिंगने आता घेतली आहे. चालायचंच, बदल हे घडतच राहणार.
किल्ला आहे तसाच आहे अजूनही. लहानपणीच्या सगळ्या स्मृती पुन्हा जाग्या झाल्या. हौदाभोवती आता सुरक्षेसाठी जाळी टाकली आहे. त्यात डोकावून पाहिले व आपण ह्या हौदाचे पाणी चांगले असताना त्याचे प्राशन केले आहे हे आठवून धन्य वाटले.
सध्या सेल्फीचा जमाना आहे त्यानुसार आम्हीही फोटो काढून घेतले काही वेळ तिथल्या निसर्गात रमलो आणि परतीच्या प्रवासाला निघालो. येतानाही उताराचे सौंदर्य खूपच सुंदर होते. आता झाडी स्पष्ट दिसत होती, मध्ये मध्ये रानफुले डोलत होती. अनेक दुर्गसंवर्धनाच्या टीमचे सदस्य येताना दिसत होते. अनेकांकडे जड जड वस्तूही वाहून नेत होते. अगदी कमी वेळात आम्ही पायथ्याशी उतरलो. तिथल्या झोपडपट्टीमध्ये चुली पेटत होत्या. झोपडपट्टीतली लहान मुले खेळात दंग होती. सोबत आणलेला त्या मुलांना दिला. त्या मुलांच्या चेह-यावरचा आनंदही वेगळाच आनंद देऊन गेला. तृप्त मनाने घरी पोहोचलो व ज्या व्यक्ती या द्रोणागिरी डोंगर, तिथल्या वास्तू टिकून राहण्यासाठी झटत आहेत, गुफा, पाण्याच्या टाक्या अशा वास्तू शोधून लोकांसमोर आणून उरणच्या ऐतिहासिक गोष्टी जिवंत करत आहेत, ज्यांनी या डोंगराचा रस्ता सुलभ करून हजारो पर्यटकांना, स्थानिकांना हे पर्यटनस्थळ मोकळे दिले आहे त्यांना कोटी कोटी प्रणाम व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.
सौ. प्राजक्ता पराग म्हात्रे. उरण (कुंभारवाडा)